News Flash

पाटी कोरी करता यायला हवी..

रोजच्या छान जगण्याच्या प्रयत्नातही नात्यात जिथे खरखर होतेय, तिथे जुन्या गिरगटलेल्या खुणा पुसून, पाटी कोरी करून नव्यानं अक्षरं लिहिणं जमतंय ना? याचा शोध घेण्यासाठी,

| February 14, 2015 03:14 am

रोजच्या छान जगण्याच्या प्रयत्नातही नात्यात जिथे खरखर होतेय, तिथे जुन्या गिरगटलेल्या खुणा पुसून, पाटी कोरी करून नव्यानं अक्षरं लिहिणं जमतंय ना? याचा शोध घेण्यासाठी, नातं टिकवण्यासाठी त्या दिवसापाशी थांबून पाटी कोरी करून पुन्हा नव्याने सुरुवात केली तर सगळेच दिवस ‘व्हॅलेंटाइन्स डे’ व्हायला काहीच हरकत नसावी.
‘आणि ते दोघे सुखाने नांदू लागले.’ असा शेवट असलेल्या कथांसोबत आपण लहानाचे मोठे होतो. या परीकथा काल्पनिक आहेत, हे मोठे होता होता समजले, तरी त्यांची सावली अनेक वर्षे मनात रेंगाळत असते. पुढे एखादा राजपुत्र / राजकन्या भेटते. त्या एका व्यक्तीच्या अस्तित्वात सगळे जग सामावते. तिच्याशिवाय राहण्याची कल्पनाही करवत नाही. कधी सर्वाच्या संमतीने तर कधी विरोध पत्करून ते दोघे एकत्र येतात. कधीच संपणार नाहीत अशा वाटणाऱ्या मंतरलेल्या दिवसांची जादू हळूहळू ओसरते. ओढ असते, तरीही वाद, खटके सुरू होतात. ‘काय बिघडलंय?’ची एक अस्वस्थता वातावरणात भरून राहते. आपल्या पहिल्या भेटीचा, लग्नाचा वाढदिवस, व्हॅलेंटाइन्स डे, अशा नाती जपणाऱ्या दिवसांच्या निमित्ताने भूतकाळात एखादी हळवी चक्कर मारताना आजच्या नात्याशी ‘तेव्हा’ची तुलना होऊन ‘गेले ते दिवस.’ म्हणून हळहळणेही होते. अशा ‘विशेष’ दिवसांचे औचित्य फक्त स्मरणापुरतेच उरावे का? की अधूनमधून स्वत:कडे, नात्यांकडे तटस्थपणे पाहण्यासाठीचे ते योग्य पडाव मानायला हवेत?
 प्रियकर-प्रेयसी, पारंपरिक विवाह, परिचय विवाह, प्रेमविवाह किंवा गांधर्व विवाह (लिव्ह इन) यातल्या कुठल्याही नात्यात ‘जोडीदार’  म्हणून परस्परांना स्वीकारल्यापासून स्वत:चा, परिचितांचा प्रवास डोळसपणे पाहिला, आनंदाची आणि बिनसण्याची कारणे त्रयस्थ भूमिकेतून तपासली, तर ‘सुखाने नांदण्याचा’ रस्ता सापडेल का?
      कुठून येतो विसंवाद?
समजायला लागल्यापासून कथा-कादंबऱ्या, चित्रपट-मालिका आणि जवळची माणसे नकळतपणे आपल्या मनात प्रेमाच्या, नात्यांच्या व्याख्या रुजवत असतात. त्या जपलेल्या कल्पना, प्रतिमांच्या प्रभावातून ‘खरं प्रेम म्हणजे अमुक’ किंवा ‘लग्नानंतर जोडीदारांचं नातं असंच असलं पाहिजे, तसं नसलंच पाहिजे’, असे काही तरी अबोध मनात पक्के ठसलेले असते. ज्यांनी कुटुंबीयांच्या,परिचितांच्या आयुष्यातली भांडणे आणि गुंतेच पाहिलेत त्यांच्यासाठी ते टोकाचे नकारात्मक असू शकते, आपल्या आयुष्यातही तसेच घडले तर?ची एक भीती त्यांना सतत असते. ज्यांनी नात्यामधली गोडी पाहिलीय त्यांच्या मनात हळवी स्वप्ने असतात. नात्याच्या प्रवासाची दिशा या भीती किंवा स्वप्ने यातूनही ठरते. आपल्या मनाच्या पाटीवरची ही स्वप्नं किंवा भीती जेवढय़ा ठसठशीत, पक्क्या तेवढं त्यावर नवं काही चित्र उमटणं अवघड बनत जातं. भारतात एकाच वेळी शंभर वर्षांच्या मानसिक काळांमध्ये नांदणारे लोक आहेत, असे म्हटले जाते. इथे साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या परंपरा पाळणारे लोक आहेत तसेच काळाच्या खूप पुढे जाणारेही आहेत. पण एकुणात आपल्याकडची स्त्री-पुरुष नात्याबाबतची गूढ गुप्तता आणि नीतीमत्तेबाबतच्या टोकाच्या कल्पना अजूनही फार बदललेल्या नाहीत. या विषयावर मोकळा संवाद आपल्याकडे बहुतेकदा त्याज्य असल्यामुळे वस्तुनिष्ठ माहिती हा प्रकार आस्तित्वात नसतो. कल्पनारंजन आणि अर्धवट ज्ञानासोबत मुले पुढे जात असतात. त्यातून अनेकदा भावनिक प्रगल्भता विकसित न होणे किंवा काल्पनिक / ऐकीव अतिरंजनात रमणे अशी दोन टोके गाठली जातात. वैवाहिक नात्याच्या उत्सुकतेसोबत एक अनाकलनीय भीतीही बहुतेक मुला-मुलींच्या मनात असते. पारंपरिक वातावरणाच्या प्रभावात ती अतिरेकीदेखील असू शकते. एक सधन घरातली, गावाकडून शहरात शिकायला आलेली मुलगी. अभ्यासात ठीकठाक. समजायला लागल्यापासून तिच्या करिअरपेक्षा तिच्या थाटामाटातल्या लग्नाचीच घरात चर्चा. स्वत:च्या लग्नाच्या विषयाने ती खुलणार, सतत त्याबद्दलच बोलणार, लाजणार, वगरे. वधूपरीक्षेच्या वेळी मात्र दारुण परिस्थिती. तिने परीक्षेसारखी एक संभाव्य प्रश्नांची यादी बनवली. स्वत:च्या आवडत्या गायक-गायिकांची नावेसुद्धा घोकून पाठ केली. लग्न ठरल्यावर मुलाबरोबर एकटे फिरायला जाण्याच्या कल्पनेने हिचा थरकाप. त्याने ‘भलतेच’ काही मागितले तर? आणि ‘भावी पतीला ‘नाही’ म्हटल्यावर त्याने चिडून लग्नालाच नकार दिला तर?’ एवढय़ाच भीतीत ती अडकलेली. पहिल्या भेटीत कुणी ‘भलतंच’ काही मागत नसते, त्यातून मागितलेच तर आपण नकार देऊ शकतो. आणि ‘असा’ पती  आपल्याला तरी हवाय का? हे विचार तिला सुचतच नव्हते. लवकरात लवकर, थाटामाटात लग्न आणि शरीरसंबंध एवढीच जेव्हा नात्याची व्याख्या आपल्या पाटीवर असते, तेव्हा असा अजागळपणा घडतो. शारीरिक संबंध चांगले असण्या-नसण्याचा प्रभाव वैवाहिक जीवनावर खूपच असतो. ते नाते आनंददायी हवेच, पण संपूर्ण आयुष्यातला तो एक छोटा भाग आहे. त्याशिवायच्या काळात जगण्यासाठी आपल्या पाटीवर, नात्यात आणखीही खूप काही  असावे लागते, याचे भानच येत नाही.
मत्री, प्रियाराधनाच्या मार्गाने लग्नापर्यंत जाणाऱ्या जोडय़ांमध्येही अनेक प्रकार असतात. काहींची लहानपणापासून मत्री असते, गुण-दोषांसह जोडीदार आवडत असतो. काहींबाबत  ग्रुपमधल्या सर्वासारखे मलाही कोणी तरी मिळाले एवढय़ानेच ‘फार भारी’ वाटते. काहींचा सरळसरळ व्यवहारी अप्रोच. हॉटेलात न्यायला, भटकायला कंपनी एवढाच. विचारपूर्वक प्रगल्भतेने निर्णय घेणाऱ्याही काही थोडय़ा जोडय़ा असतात, त्यांना नात्यातले चढउतार हाताळता येतात. दोघांचीही भावनिक-बौद्धिक वाढ जेव्हा साधारण सारख्याच गतीने होते तेव्हा फार त्रास होत नाही. पण एकच जण पुढे गेला की ओढाताण सुरू होते. खूप धडपड होऊन शेवटी काहींचा ब्रेकअप होतो. काहींना दुसरा पर्याय मिळाला की फाटाफूट होते. मनाने खूप जवळ गेल्यानंतर त्या व्यक्तीपासून दूर होणे त्रासदायक असतेच. पण काही जण त्या निराशेतून बाहेरच पडू शकत नाहीत. त्यांचे आयुष्य तिथेच थांबून जाते.
इथे खटके / भांडणे / ब्रेकअपमागची मानसिकता पाहायला हवी. हल्ली भेटण्या-बोलण्यातला मोकळेपणा वाढलाय, एकत्र असण्याच्या संधी पूर्वीपेक्षा वाढल्यात म्हणून ओळखी, संवाद पटकन होतो, पण मानसिकता जुनीच आहे. समाज म्हणून आपल्याला स्त्री-पुरुषांची मोकळी मत्री अजूनही झेपत नाही. त्यामुळे जवळीकीच्या भावनांचे अनेक हळूवार पदर आपल्याला समजत नाहीत, मान्य नाहीत. अनुभवाचे शेअिरग त्याज्य त्यामुळे ‘जोडीदार’ या एकाच व्यक्तीशी सर्व भावना निगडित असल्या पाहिजेत हा दंडक बहुतेकांच्या अंतर्मनात असतो. अनेकांची  प्रेमाची व्याख्या, वयात आल्यानंतर पहिल्या आवडलेल्या व्यक्तीबद्दल जे आकर्षण वाटते ते (तेवढेच) म्हणजे प्रेम एवढी बालिश राहते. आकर्षणातून बाहेर पडून नात्याकडे पाहणे, वाढणे होत नाही. थोडा मोकळेपणा असलेल्या घरांतही मुलींबाबत ‘लवकर लग्न करून टाका’चा रेटा एवढा असतो की स्वत:चा स्वत: विचार किती होत असेल? अशा कच्च्या पायावर उभे असणारे नाते कधीही ढासळू शकते हे लक्षात घेणेच आपण टाळतो, ढासळल्यावर ‘नशीबच असे’चा आधार घेतो. जुन्या विचारांची पाटी कोरी केली तर  त्यावर लिहायला नवं काही सापडणारच नाही अशी भीती वाटते का?
एखादा ब्रेकअप झाला म्हणजे माझ्यात काही तरी दोष आहे, यापुढे माझे कुणाशीच ‘तसे’ जुळणार नाही, जग वाईट आहे, मुली अशाच बेवफा असतात, मुले अशीच फ्लर्ट असतात वगरे दु:ख, राग, निराशेत व्यक्ती बुडालेली असते. त्यातून बाहेर आल्याशिवाय त्याकडे तटस्थपणे पाहता येणार नसते. ‘मला नात्यातली कुठली तडजोड नकोशी वाटली म्हणून नाते बिघडले? तुटले?’ हे लक्षात आल्यानंतर ‘मला काय हवे आहे?’ तेही स्पष्ट होऊ शकते. जास्तीत जास्त खटके कुठल्या  मुद्दय़ांवर होतात? कुठल्या  मुद्दय़ांवर आपल्याला जोडीदाराशी तडजोड जमणारच नाही?
 हे  तपासणे गरजेचे असते. उदा. ‘परस्परांवर विश्वास असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असेल आणि जोडीदाराकडून आडून / सरळ संशय व्यक्त होत असेल तर त्याच्याशी / तिच्याशी बाकी कितीही जुळत असो, या विषयावर आयुष्यभर त्रास झेलणं मला झेपेल का? हा विचार पुढे कुणात गुंतण्यापूर्वी होतो. मोठे होण्याच्या प्रोसेसमधला एक टप्पा असे आपण  ब्रेकअपकडे पाहिले तर एखादा ब्रेकअप प्रगल्भतेकडे नेतो. मात्र ‘खुशाल होऊ द्या ब्रेकअप’ असा याचा सोयीस्कर अर्थ कृपया घेऊ नये.
विभक्त झालेल्या किंवा पुनर्वविाह केलेल्यांमध्ये देखील जुनी पाटी कोरी न केल्यामुळे समस्या येतात. स्वत:ची स्वप्नं, जोडीदाराकडून अपेक्षा, तुलना या सगळ्यांची पतीवर झालेली गिचमिड लक्षात घेऊन पुसायला हवी.
रीमा आणि आनंदनं चाळिशीत पुनर्वविाह केला. आनंद विधुर आणि रीमा विभक्त झालेली. वैचारिक पातळीवर मत्री झाल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हळूहळू तिच्या लक्षात आलं की, कितीही तात्त्विक बोलला तरी लग्नानंतर तो तिच्यात त्याची नम्रपणे  सेवा करणारी, त्याला आदरयुक्त घाबरणारी पहिली पत्नीच पाहतो आहे. रिमा ऑफिसर.  त्याचं एवढय़ा तेवढय़ावरचं अप्रत्यक्ष बॉसिंग तिला त्रासदायक झालं. ती वैतागली. ‘पहिला नवरा बावळा. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ‘काहीतरी छान आण’ म्हटल्यावर खाऱ्या दाण्याची पुडी आणणारा. हा प्रगल्भ, ‘ओशो’ भेट देणारा म्हणून याच्याशी लग्न केलं तर आता हा ‘पायात पंजण, डोक्यावर पदर अशी राहा ना’ म्हणून लाडात येतोय. माझ्या नशिबातच सुख नाही.’
तिच्या त्रासाचं कारण परिस्थिती आहेच, सोबत ‘दुसरा नवरा तरी माझ्या स्वप्नातला राजकुमार असेल’ ही अपेक्षा आहे. असे ‘युजरमेड’ राजकुमार किंवा राजकुमारी मिळत नसतात हे माहीत असलं तरी आता तो विचार तिला सुचत नाही. प्रेमात पडून दुसरं लग्न केलं असलं, तरी  त्याच्या अपेक्षांना स्वत:वर किती हावी होऊ द्यायचं? मन:स्वास्थ्य हलण्याएवढं?
अपेक्षांसारखाच प्रभाव असतो अपराधीभावाचा. काही जणांना जुन्या संस्कारांच्या प्रभावामुळे पुनर्वविाहाकडे सहज पाहता येत नाही. इथे ‘भूतकाळाची पाटी कोरी करणं’ म्हणजे पहिल्या जोडीदारला पूर्णपणे विसरणं नव्हे. आपल्या  आयुष्याच्या एखाद्या भागाला असं तोडून फेकता कसं येईल? पण त्याची आठवण अपराधीभाव किंवा तुलना यांच्यातून येत असेल, तर तो प्रश्न, समाजाचा किंवा दुसऱ्या जोडीदाराचा नाही, माझा स्वत:चा आहे, त्या  त्रासदायक भावनेमधून मोकळं होण्यासाठी मलाच प्रयत्न केले पाहिजेत. हे लक्षात घ्यायला हवं. जुन्या जोडीदारालाही मनात  घेऊन फिरल्यावर दडपण, कोंडमारा होणारच. आपल्याला भूतकाळात जगायचंय की वर्तमानकाळात ते ठरवून पाटी कोरी करायला हवी.
विवाहानंतर पती-पत्नींच्या पारंपरिक भूमिकेत शिरल्यानंतर परस्परांकडूनच्या अपेक्षा शंभर टक्के बदलतात. आपापल्या ‘घरचे वळण’ दोघांच्याही रक्तात नकळतपणे भिनलेले असते. एवढे, की ‘दोन व्यक्ती वेगळ्या असतात’ हे तत्त्व विसरून जाते. दोघेही परस्परांना ‘वळण’ लावायला बघतात. हे जाणूनबुजून घडत नसले, तरीही विसंवाद जाणवल्यावर त्यातला जोडीदाराला टोचणारा भाग दिसला, तर थोडासाही बदल पुरतो.
‘आमच्या घरची रीत अशी नाही’ या सर्वमान्य वाक्यातला भयंकरपणा किंवा भंपकपणा समजून घ्यायचा असेल, तर आरशासमोर उभे राहून त्यातल्या एकेका शब्दावर एका वेळी जोर देत हे वाक्य साभिनय म्हणून पाहा. त्यातले  वेगवेगळे सुप्त अर्थ तुम्हाला दिसतील, ऐकू येतील. निम्म्या विसंवादाची मुळे तिथेच सापडतील. नंतरही या वाक्याच्या अनेक सावल्या जाणवत राहतील. म्हणून दोघांनीही आपापल्या माहेरच्या संस्कार / सवयींची पाटी कोरी करायला हवी.
वडिलांच्या व्यसनाचे चटके लहानपणापासून झेललेल्या दीपाची जोडीदाराबाबत ‘मुलगा व्यसनी नको’ एवढी एकमेव अट होती. निव्र्यसनी संदीपशी तिने खुशीत लग्न केले खरे, पण त्याचा संशयी स्वभाव तिला क्षणोक्षणी जाचायला लागला. पूर्णवेळ नोकरी करून तिने सतत कुटुंबीयांच्या आज्ञेत राहावे ही त्याची अपेक्षा, घरात खेडवळ वातावरण. चिडल्यावर हात उचलणे संदीपसाठी अगदीच सहज. ‘एवढे प्रेम करून निव्र्यसनी मुलाशी केलेले लग्न मोडायचे कसे?’ यातच दीपाचे कित्येक महिने गेले. शेवटी आत्महत्येचे विचार थांबेनात तेव्हा ती समुपदेशकाकडे गेली.
असे घडले कारण जोडीदाराबाबतचे आपले ‘मस्ट-शुड- कुड’ काय आहेत? याचा पूर्ण विचार दोघांनीही केला नव्हता. तिच्या पाटीभर ‘निव्र्यसनी’एवढंच ठळक आणि मोठ्ठं लिहिलेलं होतं. हे पूर्ण करणारा मुलगा मिळाला यानेच दीपा एवढी हरखली, की परस्पर-विश्वास, परस्पर-सन्मान या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष झाले. तसेच, शिकलेली शहरी मुलगी आपल्याला झेपणार नाही हे संदीपला कळले नाही. लग्नानंतर आपण तिला वळवून घेऊ असेही वाटले असेल. इथे ‘स्वत:ला आणि जोडीदारालाही समजण्यात आपली चूक झाली’ हे दोघांनीही मान्य करायला हवे. अपेक्षा बदलण्याचा प्रयत्न करायला हवा, अन्यथा समंजसपणे दूर व्हायला हवे. चूक समजत नसते तोपर्यंत इलाज नसतो. पण चूक कळल्यानंतर, सुधारण्याची शक्यता असतानाही ती पुढे चालू ठेवणे अक्षम्य असते.
लग्नानंतर पुरुषांचा फोकस करिअरकडे जातो. गृहिणी घर-संसारात, नोकरी-व्यवसायातल्या स्त्रिया सुपरवूमनच्या भूमिकेत आणि नव्या कुटुंबातल्या इमेज बांधणीत गुंततात. या काळात पुरुषाला जगाकडून अॅप्रिसिएशन मिळते. स्त्रिया मात्र परंपरेमुळेही असेल, नवऱ्याकडून मिळणाऱ्या कौतुकावर भावनिकदृष्टय़ा फार जास्त अवलंबून राहतात. या गरजेच्या तीव्रतेकडे स्त्रियांनी थोडे वस्तुनिष्ठपणे पाहिले आणि पत्नीच्या नजरेतून त्याचे गांभीर्य पुरुषांनी समजून घेतले तर विसंवाद आटोक्यात राहू शकतो. विक्रम  कुटुंबवत्सल. पत्नीचेही मनात खूप कौतुक. पण ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ’ अशी वडिलांची शिकवण. लग्नानंतर स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीत तो एवढा अडकलेला, की पितृसत्ताक एकत्र कुटुंबात तिची कुचंबणा होतेय, सहवासाची, एकांताची गरज भागत नाहीये हे लक्षात यायलाही त्याला जरा वेळच लागला. नंतरही ‘कर्तव्य प्रथम’च्या पगडय़ातून, दोघांसाठी म्हणून फार क्वचित वेळ काढला गेला. ‘तुझ्यासाठी कायम कर्तव्य आणि कुटुंब पहिले, त्यांच्यापुढे मला एकदासुद्धा प्राधान्य नाही’ हा तिचा सल समजून घ्यायला आणि काढायला विक्रमला खूप काळ लागला. प्रेम असेल तरीही सतत गृहीत धरले जाणे जोडीदाराला खूप दुखावते हे लक्षात घेतले असते तर अधूनमधून खास तिच्यासाठी वेळ काढणे विक्रमला शक्य होते, पण..’
लग्नानंतर मुलींसाठी जीवनशैलीतला बदल गृहीत असतो. मात्र पारंपरिक वातावरणातल्या अनेक मुलांना ‘तू बदललास, आमचा राहिला नाहीस’ अशी वाक्ये फार टोचतात. ‘आता तू बायकोच्या इच्छेप्रमाणेच चालणार’ असा त्याचा विपर्यास घेतला जातो. रीमाच्या नव्या नवलाईच्या दिवसांत, नवऱ्याने आपल्याला कधी मधी फिरायला न्यावे एवढीच तिची अपेक्षा. दोघांनाही संवादात अवघडलेपण. ‘संध्याकाळी लवकर या बरं का’ एवढेच ती त्याला सांगायची. याच्या मनात मित्रांच्या ‘तू बदललास’ची भीती. ‘बायको आपल्याला ‘कंट्रोल’ करायला बघतेय’ असेही वाटत असेल, हा उशिरा यायचा. तिने काहीही म्हटले तरी संतापायचा. ती घाबरून गप्प बसायची. अनेक  वर्षांनी थोडा मोकळेपणा आल्यावर तिने फिरायला जाण्याची इच्छा सांगितली तेव्हा, ‘माझे काही तरी अफेअर चालू आहे अशा शंकेमुळे तू लवकर बोलावतेयस असे मला वाटायचे, त्यामुळे मुद्दाम उशिरा यायचो, चिडायचो’ हे त्यानेही सांगितले. सहज संवाद नसल्यामुळे ‘मला वाटते तेच खरे’ याला प्राधान्य दिले गेले. तिच्या अपेक्षा वेगळ्याही असू शकतील असे वाटलेच नाही. परिणाम, ऐन बहराची वर्षे वाया गेली.
घराघरात अशा कहाण्या घडत असतात. त्या बदलाव्यात म्हणून व्हॅलेंटाइन्स डेसारख्या ‘विशेष’ दिवसांच्या पडावावर तपासायच काय? तर  जुने-नवे, काल-आज, माझे असे-त्याचे असे-तिचे तसे अशा कुठल्या तुलनेत आपण नकळत अडकलेलो नाही ना? दोघांमध्ये दुरावा आणण्याएवढे ‘माझ्या घरचे वळण’ महत्त्वाचे होत नाहीये ना? मोकळा संवाद आहे ना? इतरांची मते लक्षात घेऊनही, निर्णय माझा स्वत:चा आहे ना? थोडक्यात, नात्यात जिथे खरखर होतेय, तिथे जुन्या गिरगटलेल्या खुणा पुसून, पाटी कोरी करून नव्याने अक्षरे लिहिणे मला जमतेय ना? तर मग तुमच्या कथेचा शेवट  ‘..आणि ते आयुष्यभर सुखाने नांदले.’ असा शक्य असेल.   
नीलिमा किराणे -neelima.kirane1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:14 am

Web Title: all day should be valentine days
टॅग : Valentine Day
Next Stories
1 संजीवन काव्य
2 सामथ्र्य भावनांचे
3 स्ट्रॉबेरी
Just Now!
X