तुम्ही एका दिवसात २.४ मल पोहू शकता किंवा १८० किमी बाईक चालविणे आणि २६.२ मल धावू शकता का? नाही.. काय राव? ८१ वर्षांचे ल्यू हॉलेन्डर आजोबा हे सगळं करतात आणि तेही एका दिवसात. वाचूनच धाप लागली? हवाई येथे दरवर्षी होणाऱ्या जागतिक आयर्नमॅन अजिंक्यपदासाठीच्या शर्यतीतही त्यांनी सर्वाधिक वयाचे अ‍ॅथलेट असे पद मिळवले असून आत्तापर्यंत तब्बल ११ वेळा हा आयर्नमॅनचा खिताबजिंकला आहे. वयाच्या ५५व्या वर्षांपासून अशा शर्यतींमध्ये भाग घेणाऱ्या हॉलेन्डर यांनी आतापर्यंत दीडशेहून अनेक शर्यतींमध्ये विजेता होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या तंदुरुस्तीचे रहस्य विचारले तर ते सांगतात ‘योग्य आणि पोषक आहाराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा.’
अष्टपलू व्यक्तिमत्त्वाच्या हॉलेन्डर यांची आणखी एक ओळख म्हणजे ते भौतिकशास्त्रातले तज्ज्ञ आहेत. वैज्ञानिक लेखक म्हणूनही वाचकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. इतकंच नाही तर हे आजोबा घोडेस्वारी करणं, त्या स्पर्धात भाग घेणं यातही मागे नाही बरं का.. यातही त्यांनी चॅम्पियनशिप मिळवली आहे. कितीही अपयश आले तरी संयम ठेवून घोडेस्वारी कशी करावी यासाठी त्यांनी ‘इनडय़ुरन्स रायडिंग’ हे पुस्तकही लिहिलेय.
हेल्पलाइन १२९८
वृद्धांच्या कायदेविषयक, वैद्यकीय आणि आíथक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी २०१० पासून १२९८ ही चोवीस तास मदत देणारी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचे वैशिष्टय़ म्हणजे दोन समुपदेशक २४ तास या क्रमांकावर उपलब्ध असतात. या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर वृद्धांची समस्या ऐकून घेऊन त्यांचा फोन योग्य त्या समुपदेशकाकडे पाठविला जातो. ते समुपदेशक फोनवरूनच त्यांना मार्गदर्शन करतात. जर समस्या मार्गदर्शनाने सुटणारी नसेल तर त्यांची समस्या सोडवू शकेल अशा स्वयंसेवी संस्थेला तो फोन जोडला जातो. स्वयंसेवी संस्था समस्या ऐकून ती निवारण्याची व्यवस्था करतात. परंतु अनेकदा असाही अनुभव येतो की, वृद्ध या हेल्पलाइननेच मदत करावी, असा आग्रह धरतात. ही हेल्पलाइन वृद्धांसोबतच महिलांसाठीही कार्य करते. वृद्धांसाठी काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांची मदत त्यांना एकाच छताखाली विनासायास मिळावी, हा या हेल्पलाइनचा उद्देश आहे.
संकलन- गीतांजली राणे