रुचिरा सावंत

अवकाश विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेलेला पहिला ‘ऑल वूमन स्पेस वॉक’ नुकताच यशस्वी झाला. ख्रिस्तीना कोच आणि जेसिका मीर या दोघींनी तो यशस्वीपणे पार पाडला. ख्रिस्तीना फेब्रुवारी २०२० पर्यंत अवकाश स्थानकावर थांबणार असून त्यासोबतच ‘अवकाशात दीर्घकाळ राहणारी स्त्री’ हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाईल. अवकाशातील वसाहतीसंदर्भातील अभ्यासाला हे वास्तव्य नक्कीच उपयोगी ठरणार आहे. ‘स्पेस वॉक’ भविष्यातील अनेक अवकाशमोहिमांची पायाभरणी करणारी एक अमूल्य संधी असल्याने अवकाशातल्या या गूढ, जादूई दुनियेत ठसे उमटवणाऱ्या पावलांची ही रंजक कथा..

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!

अवकाशप्रवास करणं हे आता मानवासाठी अजिबातच अप्राप्य राहिलेलं नाही. सुट्टीतली मौज म्हणून आपण शेजारच्या देशात फिरायला जातो, तसं लवकरच दुसऱ्या ग्रहावरही जाता येईल असा विश्वासही माणसाला वाटू लागला आहे. आजवर पाचशेहून अधिक अवकाशयात्री अवकाशप्रवास करून आले आहेत. शेकडो अवकाशयात्रींनी अवकाशयानाबाहेर पडून त्या मुक्त जगात विहारही केलाय. हे सगळं आता त्यांना सवयीचं असल्यासारखं, नेहमीचं झालं आहे. असं असतानाही १५ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘नासा’ची घोषणा होताच अवकाशविज्ञान क्षेत्रातल्या उत्साहाला पुन्हा एकवार उधाण आलं. सर्वाचं लक्ष आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे लागलं होतं. काय घोषणा होती ती? असं काय वेगळं घडणार होतं? , की खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी तयार झाले? ती घटना होती पहिला ‘ऑल वुमन स्पेस वॉक’. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी पहिला ‘ऑल वूमन स्पेस वॉक’ यशस्वी झाल्यावर अवकाशयात्रींचं कौतुक करणारा संदेश ट्रंप यांनी या अवकाशयात्री स्त्रियांना पाठवला.

सकाळी ७.३८ ते दुपारी २.५५ असा साधारण ७ तास १७ मिनिटं झालेला हा ‘वॉक’ अवकाश विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. आजवर अनेक ‘स्पेस वॉक’ झाले असले तरी हा वॉक ‘खास’ होता. कारण कुणाही पुरुष सहकाऱ्यांशिवाय फक्त स्त्रियांनी अवकाश स्थानकाबाहेर राहून काम करण्याची ती पहिलीच वेळ होती. वरवर पाहता हे फार साधं दिसत असलं तरी ते तितकं सोपं नक्कीच नव्हतं. पण ख्रिस्तीना कोच आणि जेसिका मीर या दोघींनी हे करून दाखवलं. हा फक्त ‘स्पेस वॉक’ नव्हता तर भविष्यातील अनेक अवकाशमोहिमांची पायाभरणी करणारी एक अमूल्य संधी होती. स्त्रियांसाठी अनेक नवी दारं खुली करणारी, त्यांच्या क्षमता सिद्ध करणारी, एक खूप महत्त्वाची संधी..

खरं तर हा असा ‘स्पेस वॉक’ करण्याचा प्रयत्न मागची अनेक वर्ष सुरू होता. यापूर्वी तो मार्च २०१८ मध्ये योजण्यात आला होता. त्यासाठी ख्रिस्तीना कोच आणि एम. सी. क्लेन या दोघींची निवड झाली होती. पण नेमक्या वेळी एम. सी. क्लेन यांच्या ‘स्पेस सूट’मध्ये बिघाड झाल्यामुळे अवकाश स्थानकाबाहेर पडण्याचा धोका न पत्करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्याऐवजी निक हॉग या त्यांच्या पुरुष सहकाऱ्याने ख्रिस्तीना यांच्यासोबत तो ‘स्पेस वॉक’ केला. पुढे स्वत: ख्रिस्तीना यांनीच अवकाश स्थानकात उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या आधारे त्या बिघाड झालेल्या स्पेस सूटमध्ये बदल करत त्याला व्यवस्थित  केलं. त्यानंतर क्लेन पृथ्वीवर परतल्या पण ख्रिस्तीना  मात्र अवकाश स्थानकातच पुढील नव्या मोहिमांवर काम करत थांबल्या. त्यानंतर जेसिका मीर अवकाश स्थानकात आल्या आणि १८ तारखेला दोघींनी अवकाश स्थानकाच्या देखभालीअंतर्गत बॅटऱ्या बदलण्यासाठी ‘स्पेस वॉक’ केला.

अवकाश स्थानक २००० पासून कार्यान्वित झाले असून त्याच्या देखभालीसाठी आजवर साधारण २२१ ‘स्पेस वॉक’ झालेत. हा त्यापैकीच एक. ख्रिस्तीना यांचा हा चौथा ‘स्पेस वॉक’ होता तर जेसिका यांचा पहिलाच. असं असूनही यासंदर्भात बोलताना जेसिका फार आत्मविश्वासाने जे सांगतात ते फार प्रेरणादायी आहे. त्या म्हणतात, ‘‘यासाठी आम्हाला सहा वर्ष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही फक्त तिथे जाऊन आमचं काम केलं. ते ऐतिहासिक ठरलं हे माझ्यासाठीसुद्धा रोमांचक आहे.’’ हे सांगताना त्या या मोहिमेचं श्रेय त्यांच्या आधी त्या निर्वात पोकळीत जाण्याचं धाडस करणाऱ्या, तिथे जाऊन यशस्वी होऊन परतलेल्या स्त्रियांना देतात. त्यांच्याच पाऊलखुणांचा माग घेत आपण इथवर पोहोचल्याचं आणि त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा आणि कमालीचा विश्वास मिळतो हेसुद्धा त्या नमूद करतात.

या यशस्वी मोहिमेविषयी बोलताना ट्रेकी डायसन या ‘नासा’च्या अवकाशयात्री फार महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. त्या म्हणतात, ‘‘मी आशा करते की, हा स्त्रियांचा एकत्रित पहिला ‘स्पेस वॉक’ आहे हे छानच आहे. पण तो एकमेव नसावा. भविष्यात हे इतकं रोजचं होऊ दे, की याचं अप्रूप वाटू नये.’’ मागच्या ३५ वर्षांत अमेरिकेच्या साधारण १४ स्त्री अवकाशयात्रींनी ‘स्पेस वॉक’ केलाय. मीर या त्यांच्यापैकी चौदाव्या. त्या ‘स्पेस वॉक्स’ची संख्या साधारण ४० इतकी आहे. मात्र अवकाशात तरंगणं दिसायला कितीही सोपं असलं, तरी ते तसं अजिबातच नसतं. उलट शारीरिकदृष्टय़ा ते सर्वाधिक आव्हानात्मक असतं.

स्पेस वॉक करण्यासाठी वापरण्यात येणारे स्पेस सूट हे एखाद्या स्पेस क्राफ्टसारखे असतात. त्यामध्ये माणसाच्या सर्व गरजेच्या सोयी केलेल्या असतात. एकावर एक असे अनेक थर असणाऱ्या या सूटमध्ये दाबाच्या साहाय्याने ऑक्सिजन पुरवलेला असतो. आणि अवकाशयात्री त्याच्या मदतीने काही तास यानाबाहेर राहू शकतात. हा स्पेस सूट तब्बल अंदाजे १६० किलो इतक्या वजनाचा असतो. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशात त्याचे वजन बिल्कुल जाणवत नसले तरी त्या इतक्या मोठय़ा लवाजम्यासह अवकाशात वावरणं आणि सोबत आपल्याला नेमून दिलेली कामं करणं फार कष्टाचं काम असतं आणि म्हणूनच काम करून परतल्यावर अवकाशयात्री फार थकून जातात. त्यांच्यातील ऊर्जा संपुष्टात येते. इथे पृथ्वीवर काम करताना आपण दमलो की थोडा वेळ शांत बसतो. पुन्हा ऊर्जा साठवतो आणि काम करतो. तिथे अवकाशात तर तेही शक्य नसतं. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशवीरांना एका जागी स्थिर थांबता येत नाही. आणि प्रत्येक छोटी हालचाल ही त्यांना फार ऊर्जा वापरून करावी लागते. कारण केलेल्या छोटीशी कृतीसाठीही पाहायला मिळणारी प्रतिकृती त्यामानाने फार मोठी असते. म्हणजे समजा, एखादा अवकाशयात्री एखादी दुरुस्ती करताना हातातील पाना एखाद्या बाजूला हळुवार फिरवत असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच्यावर फार मोठे बल प्रयुक्त होते. आणि त्याने जर तेवढी ऊर्जा वापरून स्वत:ला धरून ठेवले नाही तर तो फार दूर फेकला जाईल.

आजवर अनेकांनी ‘स्पेस वॉक’ केलेला असल्यामुळे तिथवर जाणं मानवासाठी आता अशक्य नाही. माणूस खुल्या अवकाशात राहू शकतो, तिथून तो सहीसलामत परतू शकतो, हे आपल्याला माहीत आहे पण त्या निर्वात पोकळीत पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या मानवासाठी ते सोपं असेल का? किती भावना आणि विचार दाटून आले असतील त्याच्या मनात.. ती पहिली हिंमतवान व्यक्ती होती रशियाचे अ‍ॅलेक्सी लिओनॉन.

युरी गागारीनसोबत प्रशिक्षण दिलेल्या २० एअरफोर्स पायलट्सपैकी ते एक होते. ते दोन वेळा अवकाशात जाऊन आले. त्यापैकी १८ मार्च १९६५ मध्ये झालेल्या जगातील सतराव्या मानवी मोहिमेदरम्यान त्यांनी खुल्या अवकाशात प्रवेश केला आणि ‘स्पेस वॉक’ करणारे ते पहिले ठरले. तिथे बाहेर गेल्यावर त्यांनी सगळ्यात आधी जे कौतुकाने पाहिलं आणि सांगितलं ते म्हणजे पृथ्वीचं गोल असणं. त्यांनी तिथून मनात जपून आणलेली ठळक आठवण म्हणजे तिथे असणारी अपूर्व शांतता. अवतीभवती दिसणारे अगणित तारे.

त्या मोहिमेदरम्यान अवघं जग प्राण कंठाशी आणून हे सगळं अकल्पित पाहत होतं. लिओनॉन यांची चार वर्षांची लाडकी लेक विकाही तर संपूर्ण वेळ डोळे हातांनी झाकून बसली होती. लिओनॉन यांचे बाबा तर कुणी तरी त्यांना परत बोलवावं म्हणून जमलेल्या पत्रकारांकडे विनवण्या करत होते. पण थोडय़ाच वेळात, म्हणजे १२ मिनिटे ९ सेकंदांनंतर काळजीची जागा अभिमानाने घेतली आणि काही वेळापूर्वी अस्वस्थ झालेले तेच वडील आता गर्व आणि कौतुकाने आपल्या मुलाला पाहत होते. वेळ पूर्ण होत आली असताना त्यांचे साथीदार त्यांना ‘आता परतण्याची वेळ झालीय,’ असं सांगत होते. त्या वेळी त्यांना लहानपणीचं आईचं खिडकीतून बोलावणं आठवलं. बाहेरच्या जगाला आणि घराला जोडणारी ती बालपणीची खिडकी.. आणि ही या वेगळ्या जगाला पृथ्वीवरच्या जगाशी जोडणारी खिडकी. दोन्ही त्यांना सारख्याच भासल्या. ती बारा मिनिटं आणि त्यानंतरचा काही काळ याचं वर्णन लिओनॉन ‘नाइट मेयर’ असं करतात, ‘परतत असताना अनेक दुर्दैवी आणि आव्हानात्मक घटना घडल्या. यान पृथ्वीवर कुठे उतरलं याची मिशन कंट्रोल रूमला मुळीच कल्पना नव्हती. पण ते या सगळ्यातून बचावले. युरी गागारीन व सेर्गी कोरोलेव्ह यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीमच्या मदतीने त्यांच्या शहरात सुखरूप पोहोचले.’ त्या थरारक प्रवासाविषयी पुढे आपल्या पुस्तकात लिओनॉननी फार सविस्तर लिहिलं आहे. वेळ काढून आवर्जून वाचावं असं..

या वर्षी ११ ऑक्टोबर २०१९ रोजी लिओनॉन यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी नेमका एक ‘स्पेस वॉक’ सुरू होता. ही खऱ्या अर्थाने लिओनॉनना श्रद्धांजली आहे, असं ल्युना पॅरामीटानो या अवकाशयात्री सांगतात. त्याच आठवडय़ात ‘ऑल वूमन स्पेस वॉक’सुद्धा झाला यापेक्षा छान त्यांच्या योगदानाप्रति आदर व्यक्त करणारं दुसरं काय असू शकतं.

लिओनॉनना जसा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला तसा तो अनेक अवकाशयात्रींना करावा लागतो. तिथे अवकाशात काय होऊ  शकतं हे कुणीच सांगू शकत नाही. शून्य गुरुत्वाकर्षणाचा प्रत्येक माणसाच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होऊ  शकतो. शक्यतो तिथे निर्वात पोकळीत आपले मांस आपल्या मूळ आकाराच्या दुप्पट फुगते. विस्तारते. स्पेस सूटचा आकार निवडताना तो अंदाज चुकला तर परिणामी अवकाशयात्री जीवही गमावू शकतो. काही वेळा लिकेज होतात आणि ऑक्सिजनचे प्रमाण झटक्यात कमी होऊ  लागते. काही वेळा तर स्वत:ला वाचवण्यासाठी अवकाशयात्रींना ते स्वत:च कमी करावे लागते. दाब कमी झाला की ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसे झाले की शरीरातील द्रव्यांचे तापमान वाढून ते उत्कलन बिंदूपर्यंत पोहोचू शकते. पर्यायाने यात अवकाशयात्री दगावू शकतो. आणि या सगळ्याला अंदाजे केवळ १५ सेकंद इतका वेळ लागतो. २०१३ मध्ये ल्युका या इटालियन अवकाशयात्रीच्या हेल्मेटमध्ये पाणी ‘लीक’ झाले. अवकाशात द्रव वाहत नाही त्यामुळे ते तिथे तसेच साचून राहिले. त्यामुळे श्वास घेणं, ऐकणं या सगळ्या गोष्टी कठीण झाल्या. अवकाश स्थानकात असणाऱ्या सहकाऱ्यांसोबत संवाद जवळपास अशक्य झाला, पण त्या वेळी अडचणीकडे लक्ष न देता उपाय शोधण्याकडे लक्ष केंद्रित केले आणि या सगळ्यातून ते बचावले.

स्पेस वॉकचे दोन प्रकार असतात. एकामध्ये अवकाशयात्री स्टीलच्या मजबूत दोरखंडाने अवकाश स्थानकासोबत जोडलेला असतो. शक्यतो बहुतांश अवकाशयात्री या प्रकारचा वॉक करतात. पण स्पेस वॉक करणारा अमेरिकेचा पहिला अवकाशयात्री ठरलेले एड व्हाइट यांनी कोणत्याही प्रकारे अवकाश स्थानकाशी स्वत:ला न जोडता सेफर म्हणजेच जेट पॅकच्या मदतीने अवकाशात फेरफटका मारलेला. आणि अर्थातच हे खूप कठीण होतं. अवकाशयात्रींचे हे धाडस पाहिले की त्यांना दिलेला ‘अवकाशवीर’ हा शब्द किती योग्य आहे याची जाणीव होते.

अवकाशयात्री अवकाशात केवळ फेरफटका मारण्यासाठी जात नाहीत. ते तिथे जाऊन विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. अवकाश स्थानक, उपग्रह यांच्यात आवश्यक दुरुस्ती करतात. हे काम इतकं कठीण असतानाही आताच एक कठीण आणि महत्त्वाच्या स्पेस वॉकची मालिका सुरू केली जातेय. १५ नोव्हेंबर रोजी ‘नासा’ आणि युरोपीयन स्पेस एजन्सीच्या दोन अवकाशयात्रींनी साधारण साडेसहा तासांचा हा स्पेस वॉक करून या मालिकेची सुरुवात केली. स्पेस वॉकची ही मालिका अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमिटर या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर असणाऱ्या ‘कॉस्मिक रेज डिटेक्टर’ची कूलिंग सिस्टम बदलण्यासाठी आखण्यात आली आहे.

आज माणसाने अवकाश कवेत घेतलं आहे. त्यामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातील अवकाश स्पर्धेचा फार मोठा वाटा आहे. यामागे त्यांच्यातील शीतयुद्ध कारणीभूत असल्याचे आपण म्हणत असलो तरी ‘ही अवकाश स्पर्धा केवळ शीतयुद्धाची परिणती नाही,’ असं नील आर्मस्ट्राँग ठामपणे सांगतात. २००४ मध्ये एके ठिकाणी त्यांनी लिहिलं की, ही अवकाश स्पर्धा खरं तर एका वैज्ञानिक घटनेमुळे सुरू झाली आणि शीतयुद्धामुळे त्याला चालना मिळाली. जगातल्या ६६ देशांनी एकत्र येऊन पृथ्वीचा आणि त्याच्या विविध घटकांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. त्याला त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय भूभौतिक वर्ष’ म्हणून संबोधलं. त्यादरम्यान, अमेरिका आणि रशियाच्या वैज्ञानिकांच्या लक्षात आलं, की पृथ्वीच्या कक्षेत सेन्सर्स पाठवणं शक्य झालं तर हा अभ्यास आपण आणखी विस्ताराने करू शकू. मानवी महात्त्वाकांक्षेच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत जात आहेत. आज माणसाचा प्रवास आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे पोहोचला आहे.

अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागारीन आणि पहिली स्त्री अवकाशयात्री ठरण्याचा मान मिळवणाऱ्या व्हॅलेंटीना टेरेस्कोव्हा हे दोघेही रशियन. पहिला ‘स्पेस वॉक’ करणारे लिओनॉन आणि ‘स्पेस वॉक’ करणारी पहिली स्त्री ठरलेल्या स्वेतलाना सवित्स्काया यासुद्धा रशियन. सॅल्यूत- ७ मोहिमेतून अवकाशात जाणाऱ्या स्वेतलाना यांनी आपला सहकारी व्लादिमीर यांच्यासोबत अवकाशयानाबाहेर येऊन धातूच्या पट्टय़ांचं कटिंग आणि वेल्डिंग केलं. हे करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री अवकाशयात्री होत्या. ‘ऑल वूमन स्पेस वॉक’मध्ये सहभागी झालेल्या कोच आता फेब्रुवारी २०२० पर्यंत अवकाश स्थानकावर थांबणार असून त्यासोबतच ‘अवकाशात दीर्घकाळ राहणारी स्त्री’ हा विक्रम करणार आहेत. भविष्यातील अवकाशातील वसाहतीसंदर्भात अभ्यासाला हे वास्तव्य नक्कीच उपयोगी ठरणार आहे.

याआधीही भविष्यातील मानवी मोहिमांसाठी अवकाश स्थानकांमध्ये वर्षभर राहून त्या वास्तव्याचा मानवी शरीर, मानसिकता या सगळ्यावर होणारा परिणाम, भविष्यात मानवी परग्रह मोहिमा आखण्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी याचा अभ्यास करण्यासाठी मार्च २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान ७ देशांनी एकत्र येऊन एक मोहीम आखली होती. या मोहिमेविषयी साद्यंत माहिती देणारा ‘अ इयर इन स्पेस’ कार्यक्रमही टीव्हीवरही प्रक्षेपित झाला. स्कॉट केली, मार्क केली आणि मिखाएल हे अवकाशयात्री स्वत: त्या कार्यक्रमात सहभागी आहेत. स्कॉटने तर या अनुभवांविषयी अधिक माहिती देणारं ‘एंडय़ुरन्स’ नावाचं पुस्तकही लिहिलं. स्कॉट आणि मार्क हे दोघे जुळे भाऊ. त्या दोघांचीही या महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी झालेली निवड, केले गेलेले प्रयोग, आलेले अनुभव, हे सगळंच फार रोमांचक आहे.

अलीकडचा १८ ऑक्टोबरला झालेला हा ‘स्पेस वॉक’सुद्धा असाच अनेक कारणांमुळे महत्वाचा आहे. जिम ब्रिडेनस्टाईन हे ‘नासा’चे प्रशासक याविषयी बोलताना, ‘आर्टमिीज मिशनच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल’ असा उल्लेख करतात. माणसाला चंद्रापर्यंत पोहोचवणाऱ्या ‘अपोलो’ मोहिमेला या वर्षी ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘नासा’ने पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमेची घोषणा केली. ती मोहीम म्हणजेच ‘आर्टमिीज’. आर्टमिीज ही ग्रीक पुराणातील चांद्रदेवता आणि ‘अपोलो’ची जुळी बहीण. म्हणूनच ‘अपोलो’नंतर माणसाला चंद्रावर सुरक्षित नेण्याची जबाबदारी ‘आर्टमिीज’वर सोपवण्याचा निर्णय ‘नासा’ने घेतला. या मोहिमेत एक पुरुष आणि एक स्त्री अवकाशवीर चंद्रावर जातील. आणि २०३० मध्ये ‘नासा’ आयोजित करत असलेल्या मंगळावरील मानवी मोहिमेसाठीसुद्धा ही फार महत्त्वाची झेप ठरेल.

‘आर्टमिीज’ मोहिमेच्या लाँच डायरेक्टर आहेत चार्ली ब्लॅकवेल-थॉम्पसन. ‘नासा’च्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानवी मोहिमेसाठी एक स्त्री लाँच डायरेक्टर असणार आहे.

‘अपोलो प्रोग्राम’मध्ये फायिरग रूममध्ये काम करणारी एकमेव आणि पहिली स्त्री वैज्ञानिक असलेल्या जॉन मॉगन ते लाँच डायरेक्टर चार्ली हा प्रवास नक्कीच प्रोत्साहन देणारा आहे. चार्लीच्या या यशाविषयी बोलताना ‘राष्ट्रीय विज्ञान फाऊंडेशन’च्या केसर फार महत्त्वाची गोष्ट सांगतात. ‘‘चार्ली आता स्त्रियांसाठी एक नवी वाट तयार करून देताहेत.  त्यांची या क्षेत्रातील ‘केवळ एक स्त्री’ ही ओळख कधीच मागे पडलीय. स्त्रियांची अशा हुद्दय़ांवर निवड आणि नेतृत्व हे केवळ अपवाद न राहता ते सवयीचं आणि नेहमीचं व्हायला हवं.’’ चार्ली अनेक तरुणींसाठी आदर्श ठरणार आहेत. स्त्रियांच्या क्षमता, त्यांच्यातील अनेक कामे एकावेळी करू शकण्याचे कसब आणि नेतृत्वगुण यांचं त्या उदाहरण आहेत.

चंद्रावर जाणं हेसुद्धा एकेकाळी कवीकल्पना होती त्याला माणसाने प्रत्यक्षात बदललं. आज माणूस अंतराळसुद्धा कवेत घेतो आहे. त्यात स्त्रियांची तोलामोलाची साथ मिळते आहे हे बदलत्या जगाचं फार मोठं योगदान. खरं तर स्त्री-पुरुष असा भेद न रहाता दोघंही आकाशवीर म्हणून यापुढेही असेच अनेक प्रयोग करत मानवी विकासासाठी बांधील असणार आहेत, ‘स्पेस वॉक’ हे त्याचंच उत्तम उदाहरण!

आवाहन तरुण कथालेखिकांसाठी

मराठी साहित्यात कथेचं समृद्ध दालन आहे. आत्तापर्यंत अनेकांनी दर्जेदार कथा लिहीत मराठी साहित्याचं हे दालन जिवंत ठेवलं, नव्हे वाढवलं, मोठं केलं. आजच्या तरुण कथालेखिका, ज्यांचं वय चाळिशीच्या आत आहे,  पाठवू शकतात आपल्या कथा आमच्याकडे. २०२० च्या ‘चतुरंग’ पुरवणीत असेल त्यांच्या दर्जेदार कथांचं दालन, जे असेल मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालणारं!  कथेला विषयांची मर्यादा नाही, की शैलीचं बंधन नाही. कथा कुठेही घडणारी, कुठल्याही काळातली असली तरी चालेल, मात्र माणसाच्या अस्सल जाणिवांना हात घालणारी असावी. जगण्याच्या वास्तवाला भिडत कल्पनेच्या रंजकतेून उतरलेल्या रसरशीत अनुभवगाथा आम्ही प्रसिद्ध करू शनिवारच्या अंकांतून. शब्दमर्यादा १५०० ते १८०० शब्दांपर्यंत. पाठवा chaturangnew@gmail.com किंवा चतुरंग, ई एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० या पत्त्यावर.

पाकिटावर वा सब्जेटमध्ये –

‘कथा चतुरंग’ लिहिणे आवश्यक.

ruchirasawant48@gmail.com

chaturang@expressindia.com