रुचिरा सावंत – ruchirasawant48@gmail.com

‘एअर इंडिया’च्या चार स्त्री वैमानिकांनी नुकताच एक विश्वविक्रम केला. सॅन फ्रान्सिस्कोहून झेपावलेलं त्यांचं विमान कुठेही थांबा न घेता जवळपास १४ हजार किलोमीटर्सचा सलग प्रवास करून थेट बंगळूरुत उतरलं. अंदाजे १७ तासांचा हा प्रवास उत्तर ध्रुवामार्गे करायचा असल्यानं या विक्रमाची झळाळी मोठी आहे. कॅप्टन झोया अगरवाल यांच्यासोबत हा विक्रम पूर्ण करणाऱ्या कॅप्टन थन्मयी पापगिरी, कॅप्टन शिवानी मनहस, कॅप्टन आकांक्षा सोनावणे या चौघींचं धाडस आणि त्यांची स्वप्नपूर्ती  सगळ्यांनाच स्वप्नांचा ध्यास घ्यायला  लावणारी..

रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीतून दिसणारं आकाश आणि चमचमणारे अनेक तारे पाहात त्यात मग्न होणं इतर अनेक लहान मुलांप्रमाणे तिलाही फार आवडायचं. ताऱ्यांच्या त्या विश्वात रमलेलं असताना अचानक दिसणारं जेट विमान पाहून ‘आपण त्या विमानात असायला हवं होतं,’ असा विचार कित्येक लहान मुलं आणि अगदी मोठय़ांच्याही मनात डोकावून जातो. पण आपल्या घराच्या छतावरून ते विमान उडवण्याची स्वप्नं पाहाणारी ही लहानगी थोडी वेगळी होती. ती नुसता विचार करत नव्हती, तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे सगळे कष्ट घ्यायला ती तयार होती..

नव्वदीच्या दशकात जेव्हा आपलं वैमानिक होण्याचं स्वप्न तिनं आई-बाबांना सांगितलं तेव्हा आपल्या या एकुलत्या एक लाडक्या लेकीला कुणीच वरणार नाही, या विचारानं तिच्या आईला रडू आलं होतं. पण झोया मात्र ठाम होती.  ध्येयाप्रती तिची निष्ठा पाहून पुढे आई-बाबा तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. ती वैमानिक झाली तेव्हा तिची आई पुन्हा एकदा रडली. पण या वेळी त्या अश्रूंचं कारण अभिमानाचं होतं. आता झोया यांना ‘कॅप्टन’ म्हणून काम करायला लागून ८ र्वष झालीत. विमान उड्डाण त्यांच्यासाठी दैनंदिन जीवनाचा भाग झालंय. हे असलं, तरी ११ जानेवारी २०२१ या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. या वेळी फक्त आईच नाही, तर भारतातील, जगातील अनेकांना त्यांचा आणि त्यांच्या वैमानिक चमूचा अभिमान वाटतोय. ही फक्त त्यांची गोष्ट नाहीये, तर थोडय़ाबहुत फरकानं त्यांच्याबरोबर त्या मोहिमेत असणाऱ्या सगळ्यांची गोष्ट आहे. कोण आहेत या चार वैमानिक? आणि अशी कोणती मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे?

ही गोष्ट आहे झोया अगरवालची आणि त्यांच्यासोबत उड्डाण केलेल्या ‘एअर इंडिया’च्या इतर तीन ‘लेडी कॅप्टन्स’ची. ही गोष्ट आहे एका विश्वविक्रमाची!  ११ जानेवारीच्या पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांनी या विश्वविक्रमाची पूर्ती बंगळूरु विमानतळावर केली. सॅन फ्रान्सिस्कोहून तिथल्या स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी निघालेलं हे विमान कुठेही थांबा न घेता जवळपास १४ हजार किलोमीटर इतका सलग अंदाजे १७ तासांचा प्रवास करून थेट  बंगळूरु येथे येऊन दाखल झालं. यासाठी त्यांनी जो हवाई मार्ग निवडला, तो व्यावसायिक उड्डाणांसाठीचा सर्वात लांबच्या पल्लय़ाचा हवाई मार्ग होता. गोष्ट इथे संपत नाही, तर सुरू होते. कारण हा प्रवास उत्तर ध्रुवामार्गे करायचा होता. आणि सर्वाचं लक्ष केंद्रित करणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे या मोहिमेची आणि प्रवासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या साऱ्या वैमानिक या स्त्रिया होत्या.

उत्तर ध्रुवामार्गे प्रवास करणं हा या मोहिमेतील फार महत्त्वाचा आणि आव्हानात्मक पैलू का होता याविषयी थोडं सविस्तर समजून घेण्याआधी या मोहिमेत सहभागी झालेल्या चार धाडसी, साहसी वैमानिकांविषयी थोडक्यात जाणून घ्यायला हवं. कॅप्टन झोया अगरवाल या त्यापैकीच एक. २०१३ मध्ये ‘बोईंग- ७७७’ हे विमान चालवणारी भारतातील सर्वात तरुण स्त्री वैमानिक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांच्याबरोबर असणाऱ्या कॉकपिटमधील आणखी एक वैमानिक म्हणजे कॅप्टन थन्मयी पापगिरी. मुंबईमध्ये राहाणाऱ्या थन्मयी २००५ पासून ‘एअर इंडिया’बरोबर काम करत आहेत. शाळेपासूनच त्यांनाही उड्डाणाचे वेध लागलेले होते. पण त्याला खतपाणी मिळालं जेव्हा त्या मुंबईमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आल्या तेव्हा. त्यांचा ध्यास पाहून त्यांच्या आत्यानं प्रोत्साहन दिलं. योग्य वेळी मिळालेलं ते प्रोत्साहन त्यांना आज एअर इंडियामधील वैमानिक होण्यासोबतच हा विश्वविक्रम करण्याची संधीसुद्धा मिळवून गेलं. आपलं वैमानिक असणं त्यांना जितकं  अभिमानाचं वाटतं, तितकंच दोन लहान मुलींची आई असणंसुद्धा.

या दोन वैमानिकांसोबत दोन सहाय्यक वैमानिक होत्या. त्यांपैकी एक होत्या कॅ प्टन शिवानी मनहस. मागील चार र्वष  शिवानी ‘एअर इंडिया’बरोबर वैमानिक म्हणून काम करत आहेत. विमानप्रवास करताना वैमानिक, त्यांचा रुबाब हे त्यांच्यामधल्या लहान मुलीला कायमच भुरळ घालायचं. कॉकपिटच्या बंद दरवाजापलीकडची दुनिया त्यांच्यात कुतूहल जागृत करायची. ते जग जवळून अनुभवावंसं तेव्हा वाटायचं. आपणही वैमानिकांसारखं रुबाबदार चालीनं चालावं, असं त्यांना  वाटत असे. पुढे महाविद्यालयीन दिवसांत ‘फ्लाईंग क्लब’मध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली आणि मग गगनाला गवसणी घालणं सुरूच झालं. आपली स्वप्नं कवेत घेण्यासाठी मिळालेल्या या संधीचं त्यांनी सोनं केलं. आपण वैमानिक होऊ शकतो की नाही, याबाबतीत सुरुवातीला साशंक असणाऱ्या शिवानी आज या विश्वविक्रमाची भागीदार आहेत त्या त्यांच्या  स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या वृत्तीमुळे. या मोहिमेत सहभागी झालेल्या आणखी एक सहाय्यक वैमानिक म्हणजे कॅप्टन आकांक्षा सोनावणे. आपल्या ‘एअर इंडिया’तील आणि या क्षेत्रातील अनुभवाविषयी बोलताना त्या सांगतात, ‘‘एअर इंडियातील जवळपास १० टक्के  वैमानिक या स्त्रिया आहेत. आणि जगातील सर्वात जास्त स्त्री वैमानिक असणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये याचा समावेश होतो.’’ विमानात चढल्यावर एकदा का तुम्ही कॉकपिटमध्ये शिरलात, की तुम्ही स्त्री आहात की पुरुष, तुमचं वय काय आहे, या कशाचाच फरक पडत नाही. येणारी आव्हानं यातील कोणतेच मुद्दे पाहून येत नसतात. तिथे तुम्ही वैमानिक असता आणि विमान सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. हे आणि हेच महत्त्वाचं असतं यावर या चौघींचंही एकमत आहे.

या उड्डाणासाठी मागची साधारण दीड र्वष ‘एअर इंडिया’ प्रयत्न करत होतं. उत्तर ध्रुवामार्गे करायच्या उड्डाणामुळे हा प्रवास आव्हानात्मक होता आणि त्यामुळेच इतर उड्डाणावेळी करायच्या तयारीबरोबरच अधिकची बरीच तयारी करणं अनिवार्य होतं. उत्तर ध्रुवावर  विमानतळ फारसे नाहीत. तिथल्या अतिशीत वातावरणामुळे असलेल्या विमानतळावरही बर्फाचे थर जमा होण्याची शक्यता असते. या प्रदेशातील लोकसंख्यासुद्धा फारच कमी आहे. तिथे काही कारणांमुळे विमानाची दिशा बदलायची ठरवली तरी फार मोठं संकट येऊ शकतं. या सगळ्या शक्यतांचा विचार करून पूर्वतयारी करावी लागते. पृथ्वीच्या आकारामुळे तिचे उत्तर ध्रुव आणि चुंबकीय उत्तर ध्रुव हे एकाच ठिकाणी नाहीत. पण ते एकमेकांपासून काही अंतरावर आहेत. त्यामुळे नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशनमध्ये (अर्थात विमानाच्या उड्डाणमार्गाकडे लक्ष ठेवत के लं जाणारं संज्ञापन) समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच ‘सोलर रेडिएशन्स’ आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफरन्सेस’ याचासुद्धा संज्ञापनावर परिणाम होतो. वातावरणातील टोकाचे बदल हा आणखी एक मुद्दा या प्रवासादरम्यान येतो. ‘बोईंग ७७७’ हे आकारानं मोठं विमान असल्याकारणानं ते कठीण परिस्थितीत कुठेही अचानक उतरवता येणं शक्य नसतं. वातावरण बिघडलंच तर बाहेर पडण्यासाठी ‘पोलर सुट्स’चा वापर करावा लागतो. त्यासाठी अतिशय वजनी कपडे तयार ठेवावे लागतात. अवकाशवीर जसं ‘स्पेस वॉक’ करताना विशिष्ट कपडे घालून जातात आणि वेगळी तयारी करतात, हे तसंच काहीसं. वापरायची साधनं आणि अशा वातावरणात विमान उडवताना घ्यायची काळजी, याविषयी खूप मोठी ‘चेक लिस्ट’ असते. अतिरिक्त ‘क्रू’ अर्थात सहकारी वर्ग विमानात तयार असतो. वैमानिकांना विविध प्रकारची तयारी ठेवावी लागते. इंधनाचं तापमान अशा अचानक बदलणाऱ्या वातावरणात योग्य ठेवणं, हे असंच आणखी एक मोठं आव्हान असतं. म्हणूनच या उड्डाणासाठी अनुभवी वैमानिकांचीच निवड केली जाते.

हे एक प्रवासी विमान असल्यामुळे या विमानात ४ वैमानिकांबरोबरच २३८ प्रवासी होते. उत्तर ध्रुवावरून प्रवास करताना विमानात एक जल्लोषाचं वातावरण होतं. सगळे प्रवासी आपण एका महत्त्वाच्या विक्रमाचा भाग होतोय म्हणून खुशीत होते, आनंद व्यक्त करत होते. असं या वैमानिक अभिमानानं सांगतात, तेव्हा २००७ मधील अशाच एका उड्डाणाची आठवण होते. २००७ मधील जुलै महिना होता तो. वॉशिंग्टन डी.सी. येथील सीअ‍ॅटल येथून भारतातील दिल्लीकडे रवाना झालेली ‘बोईंग ७७७’ ची ‘फेरी फ्लाइट’ होती ती. ‘फेरी फ्लाइट’ म्हणजे जेव्हा विमानाचे निर्माते आपल्या ग्राहकाला विमानप्रवास घडवतात. या प्रसंगी निर्माता ‘बोईंग’ असून ग्राहक ‘एअर इंडिया’ होती. या फेरी फ्लाइटमध्ये एअर इंडियाचे महत्त्वाचे अधिकारी, काही सरकारी अधिकारी आणि काही पत्रकार होते. या उड्डाणाचा महत्त्वाचा पैलू हा होता, की हा पहिलावहिला भारतीय समूह होता जो उत्तर ध्रुवाच्या फार नजीक प्रवास करत होता. ध्रुवाचा परिसर जवळ आल्यावर विमानातील ‘क्रू’नं सर्वाना सावध केलं आणि आपण आता उत्तर ध्रुवापासून फार जवळ आहोत, अशी घोषणा झाली. तिथून साठ मैलांवर असणारा, स्पष्ट दिसणारा उत्तर ध्रुव सगळ्यांना दाखवला. या अनुभवाचा साक्षीदार झालेले ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास लक्ष्मण सांगतात, ‘‘माझी बसण्याची जागा कॉकपिटपासून जवळ असल्यामुळे मी ती संधी न गमावता या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी कॉकपिटजवळ गेलो. तिथून दिसणारं ते पृथ्वीचं सौंदर्य आठवून आजही माझ्या सर्वागावर रोमांच उभे राहातात. आपण अवकाशातूनच पृथ्वी पाहिली नाही ना, असं वाटतं.’’ या उड्डाणावेळी विमानात असणाऱ्या एका भारतीय वंशाच्या कॅनडास्थित पत्रकारानं ‘ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड’ हे गाणं गायलं होतं आणि पुढे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि रशिया या भूभागांवरून प्रवास करत ते विमान दिल्लीत पोहोचलं, तेव्हा जल्लोषात या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं होतं. कारण ते उत्तर ध्रुव पाहून आले होते. आज या घटनेची आठवण झाल्यावर ११ जानेवारीच्या उत्तर ध्रुवावरून केलेल्या प्रवासाचं महत्त्व आणखी वाढतं. तो करून आल्यावर किती आनंद आणि पराक्रमाची भावना ‘एअर इंडिया’ आणि वैमानिकांना वाटत असेल हा विचार मनात डोकावतो.

वैमानिक म्हणून स्त्रियांच्या भूमिकेविषयी बोलताना कॅप्टन थन्मयी एक फार महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतात. त्या म्हणतात, ‘‘आपण फारच रूढी आणि परंपरांमध्ये अडकून पडतो. स्त्रियांना मर्यादा असतात हे आपणच ठरवतो आणि मग नसणाऱ्या चौकटी आपल्याला दिसत राहातात. खरं तर स्त्रिया बहुआयामी असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी त्या लीलया करू शकतात. मग विमान उडवणं का कठीण आणि मर्यादेपलीकडे असेल त्यांना? आपण आपली ही बंधनं तोडली पाहिजेत. स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. आणि यासाठी स्त्रियांनी स्त्रियांसाठी उभं राहिलं पाहिजे, एकमेकींना साथ दिली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जबाबदारीकडे स्त्री असण्याच्या पलीकडे जाऊन पाहायला हवं, एक माणूस म्हणून.’’

अर्ध्या दशकापूर्वीपर्यंत जगातील कित्येक विमान कंपन्या विविध कारणांमुळे स्त्रियांना संधी देणं नाकारत होत्या. त्यांची कारणं आर्थिक आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या ठिकाणी योग्य असली तरी ‘एअर इंडिया’ जगातील त्या मोजक्या कंपन्यांपैकी एक होते ज्यांनी स्त्रियांना संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. असं करून त्यांनी स्त्रियांवर केवळ विश्वास दाखवला नाही, तर अनेक मुलींच्या स्वप्नांना बळ दिलं. आशेचा किरण दाखवला. केवळ संधी मिळाली म्हणजे संघर्ष संपला असं नसलं, तरी या संधीमुळे स्वप्नांची आणि स्वप्नं पाहाण्याची अनेक दारं मुलींसाठी खुली झाली. आणि आज भारताच्या इतिहासातील, ‘एअर इंडिया’च्या कामगिरीतील जगातील सर्वात जास्त पल्लय़ाच्या विमान प्रवासांपैकी एक असणाऱ्या आणि उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्याच्या मोहिमेसाठी चारही स्त्रियांच्या टीमची निवड केल्यामुळे ‘एअर इंडिया’विषयी स्त्री वैमानिकांमध्ये असणारा आदर वृद्धिंगत झाला आहे इतकं नक्की.

उड्डाणाची स्वप्नं पाहाणाऱ्या तरुण मुलींना संदेश देताना कॅप्टन झोया सांगतात, ‘‘मी जेव्हा शाळांमध्ये मुलींना भेटायला जाते तेव्हा मी फळ्यावर ‘कटढडररकइछए’ हा शब्द लिहिते आणि मुलींना तो वाचायला सांगते. जवळपास साऱ्याच जणी तो तसा वाचत असल्या, तरी त्यात काही जणी असतात ज्या तो शब्द ‘आय अ‍ॅम पॉसिबल’ असा वाचतात. त्या काही जणींमध्ये मी स्वत:ला पाहाते. स्वप्नं पाहा, मोठी स्वप्न पहा. प्रत्येक मोठं स्वप्न हे दुसऱ्या एका महत्त्वाच्या मोठय़ा स्वप्नातून सुरू होतं आणि ते महत्त्वाचं स्वप्न म्हणजे तुम्ही स्वत: आहात. आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा. मग या जगात तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही.’’

कॅप्टन झोया यांचा हा संदेश केवळ मुलींसाठीच नाही, तर स्वप्नं पाहाणाऱ्या सगळ्याच तरुणांसाठी फार महत्त्वाचा आहे. स्वत:वर आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचं धाडस हा मला या चारही वैमानिकांना जोडणारा समान धागा वाटतो. म्हणूनच तर आता त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही, हे त्यांनी जगाला पटवून दिलंय.. अगदी उत्तर ध्रुव कवेत घेणंसुद्धा!