27 May 2020

News Flash

आकाशाशी जडले नाते

अमीलिया एरहार्ट, अमेरिकन स्त्री पायलट! आयुष्यभरात तिनं अनेक धाडसी विमानोड्डाणं केली, अनेक धोके पत्करले.

(संग्रहित छायाचित्र)

मीना वैशंपायन

अमीलिया एरहार्ट, अमेरिकन स्त्री पायलट! आयुष्यभरात तिनं अनेक धाडसी विमानोड्डाणं केली, अनेक धोके पत्करले. निसर्गाला आव्हानं देत धाडसी प्रवास केले. अनेक विक्रम करणाऱ्या अमीलियाचा शेवट मात्र अद्यापही गूढ आहे.. एका साहसा दरम्यान आपल्या विमानासह तिचं नाहीसं होणं चटका लावणारं असलं तरी ती आजही अनेकांसाठी आदर्श आहे, अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.. त्या धाडसी, कर्तृत्ववान अमीलियाविषयी..

‘सागरावरून उड्डाण करण्यासाठी प्रत्येकापुढे अथांग सागर पसरलेला आहे आणि अमर्याद अवकाश आहे. तुमच्याजवळ धाडस असेल तर त्या अथांग सागराच्या बेपर्वाईचा विचार कशाला? स्वप्नांना कधी सीमा असते का?’

आपल्या छोटय़ाशा विमानातून ‘लाइट स्पोर्ट्स एअरक्राफ्ट’ यशस्वीपणे जगप्रदक्षिणा करणारी भारतीय स्त्री पायलट, तेवीस वर्षीय आरोही पंडित ही मुंबईकर. हिने आकाशात झेप घेत, विक्रम केला तो अमीलिया एरहार्ट हिच्या या सूत्रावर विश्वास ठेवत. ‘अमीलिया ही आपली प्रेरणा असून मी तिची मोठी चाहती आहे.’ असं आरोही म्हणते, तेव्हा नवल वाटतं. आठ-नऊ दशकांपूर्वीच्या, या अमेरिकी स्त्री पायलटच्या छोटय़ाशा आयुष्याने जगभरच्या स्त्री पायलटना एवढी प्रेरणा द्यावी? अर्थात, तिची कहाणीच इतकी लोकविलक्षण आहे, की ती एक दंतकथाच बनली आहे. तिनं केलेल्या विविध विक्रमांएवढेच जगप्रदक्षिणा करायला निघालेल्या अमीलियाचं अचानक गायब होणं अजूनही लोकांना कोडय़ात टाकतंय.

विसाव्या शतकाच्या आरंभी अटलांटिक, पॅसिफिक यांसारख्या महासागरांवरून एकटीने विमानोड्डाण करणारी अमीलिया एरहार्ट(१८९७-१९३७) Amelia Earhart ही अमेरिकी स्त्री पायलट! आयुष्यभरात तिनं अनेक धाडसी विमानोड्डाणं केली, अनेक धोके पत्करले. काही वेळा ती अयशस्वी झाली, पण तिने हार स्वीकारली नाही. आपल्या आयुष्याचं ध्येय हेच आहे, हे तिनं नक्की केलं होतं.

१७ डिसेंबर १९०३ मध्ये राइट बंधूंनी इंजिनवर चालणारं, मानवनियंत्रित आणि स्वबळावर आकाशात झेपावणारं यशस्वी उड्डाण केलं होतं. ते जगातलं पहिलं विमान. या शोधाद्वारे राइट बंधूंनी साऱ्या जगालाच एक अतक्र्य, अकल्पनीय अशी गती दिली. पहिल्या महायुद्धाची चिन्हे दिसू लागताच युरोपीय देश व अमेरिका यांचं सरकार या विमाननिर्मितीत फारच रस घेऊ लागली आणि विमानांमध्ये भराभर सुधारणा होऊ लागल्या. लोकांना विमानांची भीती वाटत होती.अपघात होत होते. पण विमान चालकांची संख्या वाढत गेली होती.

अमेरिकेतील अचिसन-कन्सास या ठिकाणी जन्मलेली अमीलिया लहानपणापासून निर्भय तर होतीच, पण वेगवेगळे धाडसी उद्योग करणे तिला आवडे. घोडय़ांवरून रपेट मारणं, नाठाळ घोडय़ांना लगाम लावणं, घराच्या छतावरून उडय़ा मारणं अशा गोष्टी ती आपल्या बहिणीबरोबर सहज करीत असे. मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती सारखी वरखाली होत असल्याने अमीलियाचं औपचारिक शिक्षण मध्ये मध्ये खंडित झालं. याच काळात तिनं कधी परिचारिकेची सहायक, नंतर स्टेनो, छायाचित्रकार, अशा छोटय़ामोठय़ा नोकऱ्या केल्या. एकदा टोरांटोला एक प्रदर्शन पाहायला गेल्यावर, तिथल्या एका विमानचालकाने आपले विमान जमिनीपासून काही फुटांवरून व तिच्या जवळून नेले. त्यावेळी ती घाबरली तर नाहीच, पण ते विमान आपल्याशी बोलल्याचा भास तिला झाला. त्यानंतर वडिलांच्या मागे लागून ती एक दिवस एका छोटय़ाशा विमानतळावर गेली. लोकांना आकर्षति करण्यासाठी दहा दहा मिनिटांची सफर त्या छोटय़ा विमानातून घडवली जाई. तशी सफर तिने केली आणि तिचं आयुष्य जणू बदललं.

आपला जन्म पायलट होण्यासाठीच झाला आहे अशी तिच्या मनाची खात्री पटली. ती लिहिते, ‘मी विचार केला होता, की आपलं ध्येय नक्की करताना त्यातील धोके लक्षात घ्यावेत. ते धोके स्वीकारण्याएवढं ते ध्येय मला महत्त्वाचं वाटत असेल तर मग कोणतीच काळजी करायची गरज नाही. खुशाल पुढे जायला हरकत नाही.’ तिचा हा विचार आयुष्यभर तिच्या मनात केंद्रस्थानी होता. त्यासाठी अनीता स्नुक या पायोनियर स्त्री पायलटकडे तिने प्रशिक्षण घेतलं.  त्यासाठी तहान-भूक विसरून, मिळतील त्या नोकऱ्या करत पैसे जमा केले. विमानोड्डाणाचं (एव्हिएशन) क्षेत्र तेव्हाच्या समाजासाठी नवीनच होतं. स्त्रियांना तर ते वर्ज्य मानलं जाई. अमीलियाला हे बदलावंसं वाटत होतं.  प्रशिक्षण संपत आलं तेव्हा तिनं एक सेकंडहॅण्ड छोटं विमान घेतलं आणि त्यावर सराव करत १९२२ मध्ये ती १४ हजार फुटांपर्यंत विमान नेऊ लागली. तो तिचा विक्रम होता. इतरांना ते एक आव्हान होतं. पुढे एका वर्षांतच तिला ‘फेडरेशन एरोनॉटिक्स इंटरनॅशनल’तर्फे विमान चालवण्याचं अधिकृत प्रमाणपत्र मिळालं. त्यावेळी फक्त १५ स्त्रिया अधिकृत पायलट होत्या. आर्थिक चणचण, तब्येतीच्या तक्रारी आणि विमानोड्डाणात येणारी संकटं यांचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. याच वेळी जनसामान्यांमध्ये एव्हिएशनविषयी जागृती निर्माण करण्यासाठी तिनं हातात लेखणी घेतली. ‘कॉस्मॉपॉलिटन’ या नियतकालिकात या विषयावर तिनं सदर चालवलं. १९२८ मध्ये अटलांटिक महासागर ओलांडायला निघालेल्या एमी गेस्ट या स्त्री पायलटने आयत्या वेळेस जायला नकार दिला. तिच्या जागी अमीलियाला विचारलं गेलं. बरोबर दोन पुरुष पायलट होते. तिला गरज पडली तरच विमान चालवायचं होतं. नाहीतर फ्लाइट लॉग (प्रवासाच्या नोंदी) ठेवायच्या होत्या. प्रवास सुखरूप पार पडला. इंग्लंडमध्ये विमान पोचल्यावर लोकांनी जल्लोष केला, पण विमान चालवायला न मिळाल्याने ती मात्र हिरमुसली. आपल्या या पहिल्या अनुभवाचं शब्दांकन तिनं पुस्तकरूपात प्रसिद्ध केलं. हेच तिचं पहिलं पुस्तक, ‘२० तास ४० मिनिटं’ ते तडाखेबंद खपलं.

या सगळ्या घटनेत तिची ओळख त्या मोहिमेचा समन्वयक जॉर्ज पुटनाम याच्याशी झाली. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली तरी लग्न मात्र पाच वर्षांनी केलं. याला कारण होतं तिची मतं. लग्न करून तिला संसारी गृहिणी होत आपलं करियर संपवायचं नव्हतं. त्या काळात अमीलियाची मतं म्हणजे एका मुक्त स्त्रीची मतं होती. ‘आपण वेगळं करियर करत आहोत त्यामुळे मुलांची जबाबदारी घेऊ शकणार नाही, आपलं नावही तेच राहील.’ हेही तिने स्पष्ट केलं.

त्यानंतर तिने उत्तर अमेरिकेपर्यंत व परत असे विमानोड्डाण केलं, त्यामुळे तिचं नाव सर्वत्र प्रसिद्ध झालं. मग स्त्री पायलटसाठीच फक्त ‘विमेन्स एअर डर्बी’ ही शर्यत आयोजिली गेली. त्यात १९ जणींनी भाग घेतला होता. त्याला लोकांनी ‘पावडरपफ स्पर्धा’ म्हणून हिणवलं तरी साऱ्याजणींनी गांभीर्याने ती शर्यत पार पाडली. सांता मोनिका ते क्लीव्हलंड अशी ही स्पर्धा ट्रान्सकॉन्टिनेन्टल होती. पुरुषांसाठीच्या अशा स्पर्धामध्ये स्त्रियांना भाग घेता येत नसे म्हणून ही स्पर्धा भरवली गेली होती. यात एकीला अपघात होऊन ती मृत्यू पावली. दुसरीलाही अपघात झाला तेव्हा अमीलिया आपलं विमान सोडून तिच्या मदतीला गेली व तिचा नंबर तिसरा आला. स्त्री पायलट्सना प्रोत्साहन मिळावं म्हणून तिने इतरांच्या मदतीने ‘नाइन्टी नाइन्स’ या नावाची संस्था स्थापन केली. आजही ती कार्यरत आहे.

हे सारं चालू असताना तिची उड्डाणं व त्यात विक्रम करणं चालू होतं. आता तिनं एकटीनं, कुठेही न थांबता अटलांटिक ओलाडांयचा असं ठरवून तयारी चालू केली. ‘लॉकहीड व्हेगा’ हे नवीन विमान त्यासाठी तिनं तयार केलं. सर्व धोके लक्षात घेऊन, भरपूर इंधन, दुसरं इंजिन, यांची व्यवस्था झाली. तिनं भरपूर सराव केला पण हवामानावर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. त्यानेच धोका दिला. तिला ठरलेल्या वेळेवर निघता आलं नाही. विमान चालू झाल्यावर काही काळाने उंची सांगणारं अल्टीमीटर बिघडलं, तुफान वादळ, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा आवेश, यामुळे विमान खालीवर होऊ लागले. त्यात एका पंख्यानं पेट घेतला. तरीही ती हळूहळू विमान चालवत राहिली. थोडय़ा वेळाने ढग पांगले पण विमानावर बर्फ जमला व काही दिसेना. खूप धडपडून विमानावर ताबा मिळवून तिने ते खाली आणलं तर आतली इंधनटाकी गळू लागली. आता लँड व्हायला केवळ अर्धा तास होता. शेवटी ठरलेला विमानतळ दिसला नाही व तिने जवळच्या एका कुरणात विमान उतरवलं. एवढय़ा साऱ्या संकटांतून वाचल्यावर लक्षात आलं की तरीही तिनं सर्वापेक्षा कमी वेळात प्रवास पुरा करत एक आणखी विक्रम रचला होता.

यानंतरचा विक्रम होता, होनोलूलू ते सॅनफ्रान्सिस्को. पॅसिफिक पार करणे. तोवर अशा सफरीत अनेक अपघात झाले होते. तिला धोक्याचे इशारे दिले गेले तरी तिने सारी काळजी घेऊन प्रस्थान ठेवलं. १९३५ यावर्षी ११ जानेवारीला तिनं आकाशात झेप घेतली. यावेळी तिच्या मदतीला रेडिओ टेलिफोन होता. ती दर अर्ध्या तासाने फोनवर आपली बातमी देऊ लागली. ते थेट प्रसारित केलं जाऊ लागलं. त्यामुळे सलग १८ तासांच्या प्रवासानंतर ती ऑकलंडला उतरली तेव्हा तिच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते.

या प्रवासाबद्दल ती लिहिते, ‘समोर पसरलेलं असीम निळं अवकाश, नुसती क्षितिजरेखा आणि अमर्याद मुक्तता. मन अनावर तितकंच आनंदी, प्रसन्न. आता फार अंतर नाहीच. केवळ एखादा तास!’

एखादा प्रवास पुरा झाला की तिची दुसऱ्या प्रवासाची तयारी सुरू होई. पॅसिफिकनंतर तिने एक महत्त्वाकांक्षी बेत आखला. जगाच्या मध्यातून जगप्रदक्षिणा घालायची. यामुळे अंतर वाढणार होतं, तरी ते आव्हान तिनं स्वीकारायचं ठरवलं. सफरीचं आखीव नियोजन, तोवर उपलब्ध झालेल्या नव्या उपकरणांशी दोस्ती करणं, येणाऱ्या अडथळ्यांचा अंदाज बांधत त्यावर उपाय शोधून ठेवणं अशा अनेक गोष्टी होत्या. तीन मार्गदर्शक तिनं बरोबर घेतले. लॉकहीड इलेक्ट्रा ई १० या तत्कालीन अत्याधुनिक विमानाची खरेदी केली. तीस हजार मलाच्या या प्रवासासाठी तिनं कसून सराव केला. कॅलिफोर्नियाहून निघाल्यावर होनोलूलूला पहिला थांबा घेतला. तिथे काही दुरुस्ती करावी लागली आणि चौघांऐवजी तिघेच पुढे निघाले. पण रनवेवर काहीतरी होऊन विमान कलंडू लागलं. तिघे वाचले पण विमानाची दुरुस्ती करण्यात बराच काळ गेला. सगळी मोहीम पुढे ढकलावी लागली. आणखी एक साथीदार मागे हटला.

शेवटी दुसऱ्यांदा प्रवासाला आरंभ झाला. आता फक्त फ्रेड नूनन बरोबर होता. ते पोटरे रिकोहून आफ्रिकेला गेले. लाल समुद्रामाग्रे कराची आणि भारतात कोलकाता, रंगून, सिंगापूर करत ती बांडुंगला पोचली. तोवर सतत प्रवास, साऱ्याचा ताण, ठिकठिकाणची वेगळी हवा, यामुळे ती थकली असली तरी जगप्रदक्षिणेचा ध्यास कमी झाला नव्हता. बांडुंगला विमानाची काही दुरुस्ती झाली. आता पॅसिफिक महासागरावरून जायचे होते. ऑस्ट्रेलियाजवळ न्यू गिनी येथे पोचेतोवर २२ हजार मल प्रवास पुरा झाला होता. फक्त सात-आठ हजार मल प्रवास उरला होता. पण अमीलिया दमली होती. जिद्द कायम असली तरी शरीर कुरकुरत होते. प्रत्येक ठिकाणाहून ती जॉर्जला पत्र लिही, फोटो पाठवी.

सलग चाळीस दिवसांचा प्रवास करून ते आता शेवटच्या टप्प्यावर आले होते. तिथून हाउलंड आयलंडवर पोचायचे होते. त्याला १८ तास लागणार होते. मध्यरात्री निघाल्यावर हवा चांगली होती. सकाळी आठ वाजेपर्यंत तिचे रेडिओ सिग्नल व्यवस्थित येत होते. पण त्यानंतर तासाभराने केवळ एक संदेश ऐकू आला आणि तिच्याशी असणारा संपर्क ऐकू आला. ‘आम्ही जवळच आहोत. इंधन संपतंय. आम्ही घिरटय़ा घालतोय कारण हाउलंड आयलंड दिसत नाहीए’, हेच तिचे शेवटचे शब्द होते. पॅसिफिकवरून जाताना आनंदित असणारी अमीलिया दक्षिण पॅसिफिकने आपल्या पोटात घेतली असावी. तो दिवस होता २ जुलै १९३७.

त्यानंतर तिचा शोध घेण्याचे अथक पण निष्फळ प्रयत्न अमेरिकन सरकार व खासगी शोधपथके यांनी दोन-तीन वर्षे केले. आजही तिच्या नाहीसे होण्याचे गूढ कायम आहे. ती सरकारसाठी गुप्तहेर म्हणून काम करत असावी, जपान्यांना जाऊन मिळाली असावी, कुणाची तरी तोतया म्हणून वावरत असावी इथपासून अनेक सिद्धान्त मांडले गेले. जॉर्ज पुटनाम यांनी तिची पत्रे व तिने पाठवलेला फ्लाइट लॉग याच्या आधारे ‘लास्ट फ्लाइट’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.

अमीलियाचा निश्चित शोध लागला नाही तरी जनमानसातील तिची धाडसी, कणखर, जिद्दी प्रतिमा आजही नष्ट झाली नाही. अजूनही तिच्यावर पुस्तके लिहिली जातात, गाणी रचली जातात. मीरा नायरसारखी दिग्दर्शिका तिच्यावर चित्रपट काढते आणि आजच्या पिढीतील पायलट्ससाठी ती प्रेरणास्थान बनते. अमेरिकेतील स्मिथसोनियनसारख्या संग्रहालयात तिच्यासाठी दालन असते. तिचे गुण लोकांच्या मनात रुजून बसतात, हे केवढे आशादायक!

meenaulhas@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2019 12:12 am

Web Title: amelia earhart aarohi pandit female pilot
Next Stories
1 सामाजिक ‘खांदेपालट’
2 अवघे पाऊणशे वयमान : जगण्याची हसरी लकेर
3 आरोग्यम् धनसंपदा : हृदयविकार आणि आहार
Just Now!
X