ती दीपमाळ आता कायमची माझ्या असण्याचा भाग होऊन गेली आहे. माझ्या कित्येक अंधाऱ्या वेळांना जेव्हा माझ्या आतल्या दगडी कोनाडय़ातला दिवा थरथरतो. तेव्हा मला ती दीपमाळ आठवते. त्या दीपमाळेत एकेक पणती ठेवणारी ती गूढ मुलगी आठवते. महेश एलकुंचवारांची नंदिनी.. मी माझ्या आतल्या मोतीया साडी नेसलेल्या मला बोलावते..
काही वेळाच अंधाराच्या असतात. कारणं कळत नाहीत बऱ्याचदा. कारणं आत, खोल असतात कुठेशी. पण कधी कधी स्वत:च्या इतक्या आत, खोलवर हातच पोचत नाही. मग जिथपर्यंत पोचतो हात, तिथलंच काहीसं हाताला लागतं आणि त्या दुसऱ्याच ‘काहीशा’ वर खापर फुटतं मग अंधाराचं.. खरं कारण कळतंच नाही बऱ्याचदा. मी एक नाटक करायचे. राजीव नाईक लिखित ‘साठेचं काय करायचं?’ नावाचं. त्यातलं माझं पात्र सलमा मला माझ्या कितीतरी अंधाऱ्या वेळांना साथ करतं. त्या नाटकात एक प्रसंग आहे. सलमा बाहेरून घरात येते. रंगमंचावरच्या डावीकडच्या सोफ्यावर बसते आणि अचानक रडायला लागते. तिचा आवाज ऐकून आतल्या खोलीत असलेला तिचा नवरा अभय बाहेर येतो. अचानक तिला रडताना पाहून थोडासा बावचळतो, मग तिच्या जवळ जाऊन विचारतो, ‘काय झालं सलमा? का रडतेस?’ ती काही वेळानी कसंबसं स्वत:ला गोळा करून म्हणते, ‘मला रडू येतं आहे. मला फक्त रडायचं आहे.’ तो तिला वेगवेगळ्या शब्दांत विचारत राहतो, ‘कारण काय पण तुझ्या रडण्याचं?’ ती थोडं शांत झाल्यावर त्याला म्हणते, ‘कारण कशासाठी हवंय पण तुला, रडायला?’ आणि इथेच हा प्रसंग संपतो. मला स्वत:ला हा प्रसंग फार आवडतो. प्रेक्षकांतल्या काही लोकांना तो आवडायचा, पण काही जण अभयसारखंच- नंतर आत येऊन विचारायचे, ‘ती का रडली?’ त्यावर माझंही उत्तर हेच असायचं , ‘कारण कशासाठी हवंय तुम्हाला? रडायला?’  सलमाची ‘अंधारी’ वेळ होती ती.. त्याचं कारण काय देणार ती? कित्येकदा रडायचं कारण सापडत नाही आपल्या.. आत दाटून आलेल्या इतक्या सगळ्या मळभाचा नेमका उगम निगुतीनं शोधण्याइतकी द्रष्टी मी अजून नाही. ‘अशा’ वेळांना कारणमीमांसेत जाणं मी आता सोडलं आहे. कवी ग्रेस म्हणतात तशी ‘अंधाराची बूज’ राखण्याचा मी प्रयत्न करते आहे. ते म्हणतात, ‘दिव्याची जपणूक आणि अंधाराची बूज राखतो मी..’, ‘अंधाराची बूज’ राखण्याबरोबरच ‘दिव्याची जपणूक’ ही आलीच. दिवा आहे म्हणून अंधार आहे किंवा उलटंही.. दोघांना एकमेकांपासून वेगळं कसं काढू? काही वेळा अंधाराच्या असतात तशा काही वेळा लख्खं प्रकाशाच्याही असतातच की.. अंधार जसा सांगून येत नाही तसा या प्रकाशवेळाही सांगून येत नाहीत. अवचित प्रगटतात..
कुठल्याशा चित्रीकरणासाठी मी कुठल्याशा आडगावी गेले होते. मला छोटय़ा गावांमधली ही चित्रीकरणं फार आवडतात. अशी गावं तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामापाशी तर आणतातच, पण स्वत:पाशीही आणतात. तो काळ माझ्या आत बिनकारणाचं, कारणाचं खूप काही अंधारून येण्याचा काळ होता. माझं जिवाभावाचं कुणीसं फार आजारी होतं. त्या कुणाला तरी इतका त्रास होत होता की त्यांनी ‘जाणं’ हीच त्याची सुटका ठरेल हे स्पष्ट दिसत होतं. तरीही मन तयार नव्हतं. मला ते माझं जिवाभावाचं कुणीसं माझ्या जवळ हवं होतं. कायमचं. या सगळ्यांनी माझ्या आत काळामिट्ट अंधार झाला होता. अशा प्रत्येक अंधाऱ्या वेळी मी करत असलेल्या कामाने नेहमीच माझ्या आयुष्यात दिवा लावलेला आहे. त्याच दिव्याची वाट धरून मी माझ्यातला तो काळामिट्ट अंधार घेऊन या गावात पोचले होते. तिथे असताना एके दिवशी मला सुट्टी होती. कुणीसं म्हणालं, ‘इथलं ते तमुक देऊळ फार सुंदर आहे. बघून ये आज हवं तर..’ मी फारशी देवधर्म, उपासतापास यातली नाही. पण श्रद्धा आहे. ती घेऊन त्या दिवशी मी त्या देवळाकडे निघाले. हॉटेलपासून जवळच होतं ते. संधीप्रकाशाची जादुची वेळ होती. हिरवी, नागमोडी, लाल वाट शेवटी एका दगडी मोठय़ा उंबऱ्यापाशी येऊन थांबली. त्या उंबऱ्यापलीकडे एक वेगळंच जग होतं. एका दगडी देव्हाऱ्यात एक मोठय़ा डोळ्यांची देवी हिरवीकंच साडी नेसून बसली होती. ती तिच्या मोठय़ा डोळ्यांनी मला, ‘आयुष्य आहे तसं लख्खं बघ’ असं सांगत होती. दगडी अंधाऱ्या देव्हाऱ्यात तिचा सोनेरी चेहरा आणि नावातली बेसरबिंदी तेवढी लखलखत होती. तिच्याभोवती कापराचे दिवे होते. त्यांचा सुंदर वास देव्हाऱ्यात भरून होता. मी किती तरी वेळ तिथेच बसून राहिले. एव्हाना अंधार पडला होता. निघावं म्हणून बाहेर आले आणि थांबलेच. मी आत माझ्या अंधारापाशी बसलेली असताना बाहेर इतकं काही ‘प्रकाशाचं’ घडत होतं..? कल्पनातीत. समोर एक भव्य दगडी दीपमाळ होती. वरपासून खालपर्यंत ती दिव्यांनी तेवत होती. कुणी एक गावातली मुलगी त्या दीपमाळेतल्या खालच्या काही राहिलेल्या ओळींवर उरलेल्या पणत्या ठेवत होती. आसपास पडत चाललेला अंधार आणि तेवणाऱ्या दीपमाळेचा प्रकाश या दोन्हीच्या असण्यानं ती संथपणे एकेक पणती लावणारी मुलगी काहीशी गूढ भासत होती. अंधारात तिचा चेहरा दिसत नव्हता. फक्त एक लांब वेणी, पाठीवर रुळणारी.  ती वाकली की तिच्या उजव्या खांद्यावरून हलकेच पुढे पडत होती. ती सरळ होऊन हलकेच ती मागे सारत होती. हातातल्या बांगडय़ांचा किणकिण आवाज. मध्येच तिच्या नाकातली खडय़ाची चमकी चमकून जात होती. त्या दीपमाळेशेजारी एक वडाचा विस्तीर्ण पार होता. त्यावर मी बसले. त्या मुलीकडे पाहात राहिले. मला ती मुलगी जी. ए. कुलकर्णीच्या कथेतलीच वाटायला लागली. आता कुणी पांथस्थ येईल; तिच्याकडे कदाचित पाणी मागेल; त्याला त्याच्या अस्तित्वाविषयीचे किती तरी प्रश्न पडलेले असतील. तो ते ‘जी.एं.’च्या गूढ भाषेत तिला विचारेल. तिच्या त्या एकेक दिवा लावत जाण्यानं तिला त्यालाच काय, पण मलाही पडलेल्या माझ्यातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येत असतील असं वाटत होतं. महेश एलकुंचवारांच्या ‘युगान्त’ नाटकात नंदिनी नावाच्या पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे. ‘आपणच उत्तर होऊन बसावं. मग कशाला पडतील प्रश्न..’ हीच ती नंदिनी असं वाटत होतं. सगळ्या प्रश्नाचं उत्तर स्वत:च असलेली. तिच्या हातातला तो दिवा हेच तर नव्हतं का उत्तर.. सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांचं? त्या अंधार प्रकाशाच्या सावल्यांमध्ये ती दीपमाळ हळूहळू एखाद्या झाडासारखी भासायला लागली होती. ती मुलगी जणू त्या झाडाच्या फांद्याफांद्यांवर एक एक दिवा ठेवत एक एक प्रकाशफूल उमलवत होती. प्रकाशफुलांनी लगडलेलं तेवणारं झाड..
मी आणि माझ्या एका जिवलगानं माथेरानच्या जंगलात एका किर्र्र रात्री एक काजव्यांनी लगडलेलं झाड पाहिलं होतं. चमचमणारं. समोरच्या दीपमाळेचं तसंच काहीसं होत चाललेलं होतं. मी तिच्या दिव्यांकडे टक लावून पाहात होते. त्या सगळ्या अंधारप्रकाशानं माझ्याभोवती हळूहळू एक शांत सोनेरी कोष विणायला घेतला. मोतीया रंगाची साडी नेसलेली, गजरा माळलेली, कपाळावर लालबुंद पिंजर कुंकू असलेली माझीच एक शांत छबी मला माझ्या आत जाणवली. ती माझ्या आतल्या एका हिरव्या वाटेनं चालत माझ्या आतल्या एका दगडी कोनाडय़ापाशी पोचली. त्या कोनाडय़ात एक दिवा होता. त्याची ज्योत सैरभैर होती. त्या माझ्या छबीनं वळून दीपमाळेच्या असंख्य शांत ज्योतींकडे टक लावून पाहिलं. जणू त्यांच्याकडून काहीसं मिळाल्यासारखी ती शांत वळली. तिनं माझ्यातल्या फडफडणाऱ्या दिव्याला तिच्या हातांचा आडोसा केला आणि आतली ज्योत स्थिर झाली. माझी एक तंद्री लागत चालली होती. मी चराचराचा, आसमंताचा एक भाग आहे असं वाटायला लागलं. आतल्या गाठी सुटत सुटल सैल होत चालल्या होत्या. त्या गाठी फक्त जिवाभावाचं कुणीसं या जगातून निघाल्याच्या दु:खाच्या नव्हत्या. किंबहुना त्या फक्त दु:खाच्या होत्या असंही नव्हतं. त्या रागाच्या होत्या, भित्यांच्या होत्या, आणखीही कशाकशाच्या माहीत असलेल्या, नसलेल्या.. त्या सगळ्या गाठींचं उत्तर त्या माझ्यातल्या शांत दिव्यात आहे असं वाटत होतं. माझ्यातला तो दिवा. तो मूळ आहे माझ्या असण्याचं. तो सैरभैर झाला की मीही सैरभैर होते. ग्रेसांच्या ओळी आठवल्या, ‘अंधारात मोठय़ा संयमानं दिवा ठेवावा लागतो. एक दिवा ठेवायचा तर आयुष्य पुरत नाहीये मला आणि इथे तर झुंबरेच्या झुंबरे शोभेला लावण्याची अहमहमिका सुरू आहे..’ हेच तर मूळ आहे माझ्यातला दिवा फडफडण्याचं. या अहमहमिकेत मी उतरले की आतला दिवा फडफडतो. आसपासचा झगमगाट पाहिला की मलाही त्या झगमगाटात माझं एक झुंबर लटकवण्याचा मोह होतो. त्याशिवाय आपल्याकडे बघणारच नाहीत कुणी, अशी भीती वाटते. त्या भीतीनं मी जी नाही ती बनू पाहते. खोटी होते. लहान होते. त्या संध्याकाळी त्या दीपमालेत तेवणाऱ्या असंख्य शांत ज्योतींनी मला सांगितलं, ‘मला माझ्या दिव्याची जपणूक करायला हवी..’ त्या प्रत्येक तेवणाऱ्या दिव्यापासून एक अदृश्य सोनेरी रेषा माझ्या असण्यापर्यंत येऊन मिळते आहे, असे वाटायला लागलं. मला त्या निराकार भवतालापासून वेगळं काढून कुठल्याशा आकारात बांधणारी ‘शरीर’ नावाची आकृतीरेषाही हळूहळू त्या भवतालात विरत चालली आहे, असं वाटत होतं. माझं सगळं ‘असणंच’ म्हातारीच्या पिसासारखे इकडे तिकडे संथ पसरत तंरगायला लागलं आहे असं वाटत होतं. कधी हवेत, कधी कुठल्या सांदरीत.. कधी कुठे.. आकारहीन वाटत होतं पण सैरभैर नव्हे.. वाटत होतं, आपण पसरतो आहोत, पण विखुरलेले नाही, निराकार आहोत, पण वेडेवाकडे नाही.
ती दीपमाळ आता कायमची माझ्या असण्याचा भाग होऊन गेली आहे. माझ्या कित्येक अंधाऱ्या वेळांना जेव्हा माझ्या आतल्या दगडी कोनाडय़ातला दिवा थरथरतो. तेव्हा मला ती दीपमाळ आठवते. त्या दीपमाळेत एकेक पणती ठेवणारी ती गूढ मुलगी आठवते. महेश एलकुंचवारांची नंदिनी.. मी माझ्या आतल्या मोतीया साडी नेसलेल्या मला बोलावते.
‘असं का? तसं का?’ विचारत माझ्या अंधाराचं खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी उचललेल्या माझ्या हट्टी बोटाला हळूच स्वत:कडे वळवते आणि मनातल्या त्या दीपमाळेकडे टक लावून पाहात ‘सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपणच’ व्हायच्या वाटेवर नव्यानं पाऊल टाकते.    
amr.subhash@gmail.com

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास