15 November 2019

News Flash

डॉक्टर-वाचकांतला दुवा

स्वमदत गटांचे महत्त्व विषद करणारे लेख वा अनेक आजारांविषयी शास्त्रोक्त माहिती देणारे लेख, त्यांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.

| December 27, 2014 01:01 am

स्वमदत गटांचे महत्त्व विषद करणारे लेख वा अनेक आजारांविषयी शास्त्रोक्त माहिती देणारे लेख, त्यांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. सामान्यांमध्ये जनजागृती करत, खबरदारीचे उपाय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून लेखमालेने मोलाची भूमिका पार पाडली.
दी ड-दोन वर्षांपूर्वी ‘स्वमदत गटांचे प्रयोजन आणि महत्त्व’ या विषयावर लिहिण्याचा प्रस्ताव आला. पण मी थोडी विचारात पडले! ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदाची माझी कारकीर्द महत्त्वाच्या टप्प्यावर होती. रोज डॉक्टरांना भेडसावणाऱ्या नवीन समस्या, त्यांवर संभाव्य उपाययोजना अशा अनेक अंगांनी, अनेक पातळ्यांवर काम सुरू होते. लेखन करण्याइतकी शांती, मेंदू आणि मन दोन्हीला नव्हती. तरीही हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. लेख कसा असावा याचा एक कच्चा आराखडा तयार झाला. लेखमाला सुरू करायची म्हटल्यावर विषय डोक्यात येत गेले, कुणाला लिहिते करायचे याची संभाव्य यादी कागदावर उतरू लागली आणि लेखांना मूर्त स्वरूप येत गेले.
     पहिले काही लेख ‘मैत्री आजारांशी’ या मथळ्याखाली विविध स्वमदत गटांची माहिती देणारे होते. कोणतेही आजारपण निभावणे अवघडच असते. चिवट, दुर्धर उतारवयात होणारे आजार, मानसिक आजार यात रुग्णाबरोबर घरातील मंडळींनादेखील तेवढेच दु:ख सोसावे लागते. ही जबाबदारी कशी पेलायची याची फारशी माहिती कुठे उपलब्ध नसते. अशा कसोटीच्या प्रसंगी स्वमदत गटांची ‘शेअरिंग आणि केअरिंग’ ही पॉलिसी प्रचंड उपयोगी ठरते. वानगीदाखल प्रत्येक गटांनी घटना/उदाहरणे द्यावीत म्हणजे सर्वसामान्यांना ते जास्त रोचक वाटेल असा आग्रह धरला. मालिकेतील या विषयाची पूर्वपीठिका सांगणारा माझा पहिला लेख १८ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. वाचकांना ही संकल्पना आवडल्याचे अनेक फोन आले आणि आमचा हुरूप वाढला. अनेकांनी लेखांची कात्रणे संग्रही ठेवल्याचे आवर्जून सांगितले. खऱ्या अर्थाने लेखनाचा प्रवास सुरू झाला.
     पुण्यात १०-१२ स्वमदत गटांचा ‘सेतू’ हा एक मंच आहे. सेवाभावी संस्था आणि स्वमदत गटांना कार्यकर्ते आणि मदतनीस यांची कायम चणचण भासते. अशा प्रसंगी सर्व गट एकमेकांना एकदिलाने मदत करतात. एकमेकांच्या कार्यक्रमांना उत्साहाने हजेरी लावतात. अशा गटांच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी लिहिलेले जिवंत अनुभव या सदरात प्रसिद्ध व्हावेत अशी इच्छा होती. त्या अनुषंगाने ‘किडनी फेल्युअर’ हा अनुराधा देशपांडे लिखित, ‘बाल मधुमेही’ हा विद्या गोखले यांचा, मानसिक स्वास्थ्यासाठी प्राजित गटाच्या अभिजात कुलकर्णीचा लेख प्रसिद्ध झाला. लेखातील स्वानुभव व प्रामाणिक आवाज ऐकून ‘प्राजित’च्या पुढील गुरुवारच्या सभेला अनेकांनी हजेरी लावली. यासह ‘दारू पिण्याचा आजार’ हा मुक्तांगण संस्थेच्या आनंद पटवर्धन यांचा आणि ‘व्यसनाधीनांच्या पत्नीसाठी’ हा मुक्ता पुणतांबेकर यांचा लेख प्रसिद्ध झाला. या लेखांनी जादू केली, अनेक लोक संस्थेच्या कामाची विचारपूस करत आले, नवे कार्यकर्ते तयार झाले व नवा हुरूप संचारला. मात्र अन्य स्वमदत गटांना लेख लिहून देणे जमले नसल्याने यापुढील मालिका ‘सामना आजारांशी’ या शीर्षकाखाली सुरू ठेवण्यात आली.     सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या रोजच्या जीवनातील आजारांविषयी शास्त्रीय माहिती, रुग्णांनी व घरातील इतर व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, विशेष आहार उपचारपद्धतींबद्दल सोप्या शब्दांत सांगितलेली माहिती, काही संभाव्य धोके याबाबत त्या त्या विषयावरील तज्ज्ञांनी माहिती द्यावी अशी रूपरेषा आखली गेली. सामान्यांना भावतील असे आणि काही इबोलासारख्या नव्याने आलेल्या आजारांविषयी माहिती देण्याचे ठरविले. यानंतर मराठीत सविस्तर लिहू शकणाऱ्या तज्ज्ञांनी शोधमोहीम सुरू झाली. सर्वच लेखकांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. आजाराविषयी वाचकांना घाबरून न सोडता आवश्यक ती सर्व माहिती योग्य शब्दात चपखलपणे पोचविण्याचे आमचे उद्दिष्ट होते. Known devil is better than unknown angel’..
  मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, दमा, अपेंडिसायटिस, टॉन्सिल्स, मूळव्याध हे नेहमी कानावर पडणारे शब्द! परंतु त्यातील काही फारसे माहीत नसलेले ‘अँजेल’ हाताळण्याचे आम्ही ठरविले. उदा. गर्भारपणातला मधुमेह, लहान मुलांमधील लठ्ठपणा, दम्याची कारणमीमांसा आणि नवीन औषधोपचार व अ‍ॅटॅक येऊ नये म्हणून घ्यायची खबरदारी, मूळव्याधीवरील जीवनशैलीचा प्रभाव आणि बदलाची आवश्यकता आदी वाचकांना सोप्या भाषेत, उपदेश न करता लिहिलेले सर्वच लेख अतिशय भावले. डॉक्टर लेखकांवर फोन आणि ई-मेल यांचा भडिमार झाला. शास्त्रीय माहिती वाचकांपर्यंत योग्य रीतीने पोचल्याचा आणि त्याचा योग्य तो प्रतिसाद मिळाल्याचे लेखकांनाही समाधान झाले.
    ‘इबोला’सारख्या वेगाने पसरणाऱ्या जवळजवळ १०० टक्के प्राणघातक असणाऱ्या आणि डॉक्टर आणि समाज या दोघांनाही नवीन असणारा विषय किंवा ‘डेंग्यू’सारखा पावसाळ्यात धुमाकूळ घालणारा आजार फारसा महीत नसलेला ‘हिपॅटायटीस सी’ आणि ‘हिपॅटायटीस बी’सारखा आजार यावरील माहितीपूर्ण लेख महत्त्वपूर्ण ठरले. ‘कुष्ठरोगा’सारखा अजूनही पूर्णपणे उच्चाटन न झालेला संसर्गजन्य आजार किंवा ‘सोरिअ‍ॅसिस’ सारखा चिकट आणि चिवट त्वचारोग,‘अल्झायर’सारखा बौद्धिक विकलांगता आणणारा आणि रुग्ण व नातेवाईक यांचे जीवन कष्टप्रद करणारा आजार किंवा संधिवात, सांधेदुखीसारखा भरपूर प्रमाणात आढळणारा आजार , टॉन्सिलवरील साधेसोपे उपाय, या विषयांवरील सर्वच माहिती उपयुक्त होती. भारत पोलिओमुक्त कसा झाला आणि तो तसाच राहण्याकरिता काय खबरदारी घ्यावी लागली याचे विवेचन करणारा लेखही माहितीपूर्ण होता. एकूणच नाक, कान, घसा, डोळे, त्वचा, हृदयरोग, मधुमेह, सांधे, दमा, टॉन्सिल्स, अपेंडिक्स, मूळव्याध, हर्निया अशा विविध अवयवांची आणि आजारांची माहिती देण्याचा हा प्रयत्न होता.
   म्हणूनच गेले वर्षभर ‘चतुरंग’मध्ये चालविलेल्या या सदराने खूप काही दिले. सर्व लेखकांनी लिखाणासाठी घेतलेल्या परिश्रमासाठी त्यांची मी ऋणी आहे. लेखनसाहाय्य आणि कार्यालयीन कामकाजासाठी अश्विनी देशपांडे आणि संगीत कोन्हाळे यांची अनमोल  मदत झाली. अजूनही ही मालिका चालू ठेवण्याबद्दलची विनंतीवजा पत्रे येत आहेत. तुर्तास इतकेच! पुन्हा कधी तरी भेटीची संधी मिळेल अशी आशा आहे.
   सरत्या वर्षांत सामोऱ्या आलेल्या ‘डेंग्यू, इबोला’सारख्या शत्रूंशी सामना उगवत्या वर्षांत करावयाची वेळ येऊ नये. तसेच नूतन वर्ष आपणा सर्वाना आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा! धन्यवाद!     (सदर समाप्त)
(वर्षभर दर पंधरवडय़ाने चाललेल्या या सदरासाठी पडद्याआडून तर कधी प्रत्यक्षपणे डॉ. माया तुळपुळे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्याचे ‘चतुरंग’ तर्फे खास आभार)

First Published on December 27, 2014 1:01 am

Web Title: an article create link between doctor and readers
टॅग Doctor