डॉ. राजन भोसले

जॉनवर लहानपणापासून बॉडी बिल्डर होण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या वडिलांनी बिंबवली. जॉनकडून रोज कसून व्यायाम करून घ्यायचा व त्याला योग्य तो प्रथिनयुक्त आहार द्यायचा हे त्यांनी काटेकोरपणे पाळले. साधारण जॉन अठरा वर्षांचा असतानाच कुण्या प्रशिक्षकाच्या सुचवण्यावरून त्यांनी जॉनला ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’ द्यायला सुरुवात केली..बाह्य़ांगी दिसणाऱ्या फायद्यांव्यतिरिक्त त्याच्या गंभीर दुष्परिणामाचा परिणाम जॉनच्या वैवाहिक आयुष्यावरही झाला.

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

जॉन व इलाचा प्रेमविवाह झाला होता. महाविद्यालयात शिकत असतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जॉनने आंतर- महाविद्यालयीन महोत्सवामध्ये व्यक्तिमत्त्व स्पर्धेत पूर्ण मुंबईत पहिला क्रमांक पटकावला होता तर त्याच महोत्सवात इला पाश्चिमात्य नृत्य स्पर्धेत पहिली आली होती. जॉन दिसायला एखाद्या सिनेनायकासारखा, खूपच देखणा होता. गोरा रंग, रेखीव चेहरा, सहा फूट उंची व कमावलेलं पीळदार शरीर. इलासुद्धा त्याला शोभेल अशीच सुंदर युवती होती. शिक्षण पूर्ण करत असताना व त्यानंतरही जॉनने अनेक शरीरसौष्ठव स्पर्धामध्ये पारितोषिकं मिळवली. शरीर पीळदार व सशक्त दिसावं यासाठी रोज तीन ते चार तास कसून व्यायाम करणं, स्नायू पुष्ट दिसावेत यासाठी खास बनवलेला प्रथिनांचा भरपूर आहार करणं.. बॉडी बिल्डिंगसाठी गरजेच्या या व अशा सर्व गोष्टी तो नेटाने करत असे.

जॉन आणि इलाचं लग्न खूपच गाजावाजात झालं, पण लग्न होऊन एक वर्ष होण्यापूर्वीच इला जॉनला सोडून विभक्त झाली. जॉन शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पूर्णपणे असमर्थ आहे व त्याच्यापासून मूल होणंसुद्धा शक्य नाही या गोष्टी समोर आल्यामुळे इलाने हा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेण्याआधी, जॉन व इला एका नामांकित अँड्रॉलॉजिस्टकडे जॉनच्या याच तक्रारींसाठी अनेक महिने उपचार घेत होते. त्या डॉक्टरांनी जॉनच्या अनेक अद्ययावत तपासण्या करून घेतल्या होत्या व त्यानंतरच हा निर्णय दिला होता की जॉनमध्ये ‘लैंगिक क्षमता’ व ‘प्रजननक्षमता’ देणारे संप्रेरक (हार्मोन्स) व शुक्राणू खूपच अल्प प्रमाणात आहेत. हे संप्रेरक व शुक्राणू असे कमी होण्याची कारणंही या तपासण्यांमधून उघडपणे समोर आली होती. जॉनच्या वृषणग्रंथी (टेस्टीकल्स) क्षीण व अकार्यक्षम झाल्या होत्या. त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दिलेल्या औषधांचासुद्धा काहीही परिणाम जॉनवर होऊ शकत नव्हता. ही गोष्ट परीक्षणांत दिसून येताच डॉक्टरांनी आपलं निर्णायक निदान स्पष्टपणे जॉन आणि इलासमोर व्यक्त केलं होतं. त्यामुळेच निराश झालेल्या इलाने जॉनपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

बाह्य़ांगी पीळदार व बलदंड दिसणारं शरीर व देखणेपणाचे सगळे निकष एकवटलेले असावेत असं व्यक्तिमत्त्व. असा रुबाब असूनही जॉनवर आज ही परिस्थिती आली होती. डॉक्टरांनी केलेल्या तपासण्यांमध्ये वृषणग्रंथी अकार्यक्षम झालेल्या निदर्शनास येण्याव्यतिरिक्त यकृत व हृदय यांच्या कार्यक्षमतेवरही काही बाधक परिणाम झाले असल्याचं समोर आलं होतं. शारीरिक त्रुटी, तक्रारी, पत्नीचं हे असं विभक्त होणं या गोष्टींचा परिणाम जॉनच्या मन:स्वास्थ्यावरही झाला होता. निराशेचं ग्रहण लागावं अशीच त्याची मन:स्थिती झाली होती. रात्रभर झोप न लागणं, हाता-पायाचे सांधे दुखणं, मोठय़ा प्रमाणात डोक्यावरचे केस गळणं, क्रोध अनावर होणं, या तक्रारीसुद्धा उद्भवल्या होत्या.

जॉनचे मामा ऑस्ट्रेलियात हाडांचे डॉक्टर होते. त्यांना जॉनची परिस्थिती कळताच ते तातडीने मुंबईला आले. जॉनबद्दल त्याच्या लहानपणापासून त्यांना विशेष जिव्हाळा होता. जॉनसुद्धा मामांना मानणारा भाचा होता. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मामाच जॉनसाठी वडिलांसारखे होते. मामांनी आपले वैद्यकीय महाविद्यालयातले एक जुने मित्र, जे मुंबईत प्रॅक्टिस करतात त्यांची जॉनसाठी भेट ठरवली. मामांचे डॉक्टर मित्र समुपदेशन व लैंगिक विज्ञानाच्या क्षेत्रात नावाजलेले मामांचे खास मित्र. त्यांनी लगेच जॉनला बोलावून घेतलं. जॉनशी झालेल्या प्रदीर्घ भेटीत बराच इतिहास समोर आला. जॉनच्या वडिलांना बॉडी-बिल्डिंगचं वेड होतं, पण तारुण्यात त्यांना त्यांच्या वडिलांकडून मात्र कधीही यासाठी प्रोत्साहन मिळालं नाही. उलट सतत विरोध होत राहिला. अनेक स्पर्धामधून भाग घेऊनही जॉनच्या वडिलांना तारुण्यात कधी एखादं पारितोषिक मिळवता नाही आलं. स्वत:चं हे शल्य व त्याची वेदना शमवण्यासाठी त्यांनी जॉनवर आपल्या अपेक्षांचा भार टाकला. जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलाने मिळवावं हा हव्यास त्यांनी बाळगला. म्हणूनच जॉनवर लहानपणापासून बॉडी बिल्डर होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी बिंबवली. जॉन शाळेत असल्यापासून त्याला स्वत:बरोबर व्यायामशाळेत घेऊन जायला त्यांनी सुरुवात केली. जॉनकडून रोज कसून व्यायाम करून घ्यायचा व त्याला योग्य तो प्रथिनांचा आहार द्यायचा हे त्यांनी काटेकोरपणे पाळले. साधारण जॉन अठरा वर्षांचा असतानाच कुण्या प्रशिक्षकाच्या सुचवण्यावरून त्यांनी जॉनला ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’ द्यायला सुरुवात केली.

‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’ म्हणजे कृत्रिम पुरुष संप्रेरकं. ती घेतल्याने स्नायूंची जलद गतीने वृद्धी होऊ लागते व ते उठून दिसू लागतात. शरीर अधिकाधिक भरलेलं व पीळदार दिसायला त्याचा उपयोग होतो. बॉडी बिल्डिंग करणारे अनेक पुरुष ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’ घेतात. बाह्य़ांगी दिसणाऱ्या या फायद्यांव्यतिरिक्त ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’चे अनेक गंभीर दुष्परिणामही असतात. यातला सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे वृषणग्रंथींचं दमन (अ‍ॅट्रॉफी) व त्यामुळे लैंगिक क्षमता देणाऱ्या संप्रेरकांची शरीरात निर्माण होणारी कमतरता व शुक्राणूंच्या निर्मितीला बसणारी खीळ. या कमतरतांमुळे व्यक्ती आपली लैंगिक क्षमता व प्रजनन क्षमता गमावून बसते. याव्यतिरिक्त ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’चे यकृत, हृदय, रक्तातला मेद व त्यामुळे हृदयविकाराची वाढणारी शक्यता यांवरही अपरिवर्तनीय असे विपरीत परिणाम होत जातात. व्यक्ती शीघ्रकोपी होणं हेसुद्धा ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’ घेणाऱ्या लोकांमधे नेहमी दिसून येणारं एक लक्षण.

जॉनच्या बाबतीत नेमके हेच सर्व दुष्परिणाम त्याला सोसावे लागले होते. ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’बाबत सावध करण्याचा प्रयत्न जॉनचे मित्र आणि इतर काही हितचिंतकांनी जॉनच्या वडिलांपाशी व थोडा मोठा झाल्यानंतर थेट जॉनपाशी केला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याची घोडचूक त्या दोघांनीही केली होती. ही चूक बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रातले अनेकजण सर्रासपणे करतात. महत्त्वाकांक्षेनी बेभान झालेली माणसं अनेकदा असं तारतम्य झुगारून वागतात. आपल्याला कुणी बघू नये म्हणून स्वत:चेच डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी अशा लोकांची परिस्थिती असते. ‘इतरांना होईल पण आपल्याला होणार नाही,’ असा काहीसा त्यांचा बालिश समज असतो. समज काहीही असले तरी शरीरधर्माचे नियम कुणासाठी बदलत नाहीत. जे व्हायचं तेच झालं. जॉनचे वडील स्वत: यकृताच्या विकाराने वयाच्या चोपन्नाव्या वर्षी वारले. त्यांनी वयाच्या चाळिशीनंतर स्वत: ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’चा वापर सढळपणे सुरू केला होता.

जॉनला पूर्वी केलेल्या चुकांबद्दल दोष देत राहण्याने काहीच साधलं जाणार नव्हतं, म्हणूनच अत्यंत सुज्ञपणे डॉक्टरांनी ते पूर्णपणे टाळलं. आहे त्या परिस्थितीत इथून पुढे काय मार्ग काढता येईल जेणेकरून एक अर्थपूर्ण जीवन जॉन जगू शकेल, यावर डॉक्टरांनी आपल्या समुपदेशनात भर दिला. एकही नवं औषध लिहून न देता आधी त्यांनी ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’चा वापर ताबडतोब, पूर्णपणे व कायमचा बंद करण्याची सूचना जॉनला दिली. त्याची अंमलबजावणी करत असताना जॉनला सतत सकारात्मकरीत्या प्रोत्साहित (मोटिव्हेटेड) ठेवणं गरजेचं होतं जेणेकरून त्याने पुन्हा त्याकडे वळू नये. शरीरात ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’मुळे घडलेले काही बदल काही प्रमाणांत परिवर्तनीय (रिव्हर्सिबल) असतात. ते पूर्ववत होईपर्यंत त्याने धीर सोडू नये म्हणून त्याचं मनोबल टिकून राहील याची विशेष काळजी डॉक्टरांनी समुपदेशनातून घेतली. जीवनशैलीमध्ये काही आमूलाग्र सकारात्मक बदल करणं, काही जुन्या अपायकारक सवयी कायमच्या सोडून देणं हे सर्व क्रमाक्रमाने करत असतानाच भावी आयुष्याकडे उत्साहाने बघता येईल अशी काही नवीन ध्येयं व लक्ष्य व्यक्तीसमोर असावी लागतात. त्यांची आखणी व्यक्तीचा मूळ स्वभाव व प्रवृत्तींशी अनुकूल असावी लागते; याचं पूर्ण भान राखणं गरजेचं असतं. नेमक्या याच बारकाव्यांकडे डॉक्टरांनी आपल्या समुपदेशनांतून विशेष लक्ष दिलं. जॉनशी झालेल्या चर्चामधून एक गोष्ट समोर आली. जॉनची इच्छा होती, की त्याचं लग्न व्हावं व त्याला एखादं मूल असावं. आपला एक सुखी संसार असावा व मुलाचं प्रेमाने संगोपन करत आपण आपलं जीवन जगावं.

जॉनच्या या स्वप्नाच्या पूर्तीमधे सर्वात मोठी अडचण होती ती अशी, की ‘अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स’च्या अति वापरामुळे जॉनचे वृषण अकार्यक्षम झाले होते व त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी लागणारी लैंगिक क्षमता जॉन गमावून बसला होता, तसंच प्रजननासाठी गरजेच्या शुक्राणूंची उत्पत्तीसुद्धा त्याच्या वृषणग्रंथींमध्ये पूर्ण बंद (अझूस्पर्मिया) झाली होती. जॉनची स्वप्नपूर्ती होण्यामध्ये या दोन मोठय़ा अडचणी होत्या. या कारणांमुळेच तर त्याची पत्नी इला त्याला सोडून गेली होती.

निसर्गाने निर्मिलेलं हे विपुल अस्तित्व व त्याचाच एक हिस्सा असलेलं आपलं जीवन खरंतर अनेक परीने समृद्धच असतं. इथे भासणारी एखादी कमतरता केवळ सापेक्ष असते. नीट पाहता इथे सर्व गोष्टींसाठी पर्याय उपलब्ध आहेत. सर्वाना सर्व काही कधीच प्राप्त होत नाही, पण तरीही एक ‘परिपूर्ण’ जीवन जगण्याचा मुबलक मौका (संधी) जीवन सर्वाना देतं.

डॉक्टरांनी मन:स्वास्थ्यासाठी सुचवलेल्या अनेक गोष्टींमध्ये ‘रविवारी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जात जा’ हीसुद्धा सहज सुचवलेली एक सूचना होती. जॉनची धार्मिक ठेवण जाणल्यानंतरच डॉक्टरांनी ही गोष्ट सुचवली होती. जॉन चर्चमध्ये रविवारच्या सामूहिक प्रार्थनेसाठी नियमित जाऊ लागला. तिथेच त्याचा परिचय शॅरॉनशी झाला. पुढे हाच परिचय मत्रीमध्ये व मैत्री प्रेमामध्ये रूपांतरित होत गेली. दोन वर्षांत जॉनने शॅरॉनशी पुनर्वविाह केला. शॅरॉन विधवा होती व जॉनपेक्षा एका वर्षांने मोठी होती. तिचे पती सन्यात होते. एका युद्धात त्यांनी देशासाठी आपला प्राण गमावला होता. तिला एक मुलगा होता वास्को. जॉनची पूर्वकथा जॉनने शॅरॉनला पूर्ण सांगितली होती व तिला त्यात काहीच आक्षेप नव्हता. जॉन व शॅरॉन दोघांनीही जीवनात बरंच काही गमावलं होतं, त्याची वेदना अनुभवली होती. आज अनपेक्षितपणे जीवनाने ही नवीन भेट त्यांना दिली. जॉनला सुखी परिवार व गोड मुलगा वास्को, शॅरॉनला जीवनसाथी, वास्कोला प्रेम करणारे वडील मिळाले होते.

जॉन व शॅरॉन लग्नाआधी आवर्जून त्याच डॉक्टरांकडे विवाहपूर्व समुपदेशनासाठी गेले. तिथे सर्व बाबींची समग्र चर्चा डॉक्टरांनी घडवून आणली, जेणेकरून एकमेकांच्या मर्यादा, उणिवा व अपेक्षा यांमध्ये कसलाही संदेह किंवा संदिग्धता राहू नये. दुसरं लग्न करताना काही खास दक्षता घ्याव्या लागतात; त्यांची स्पष्ट जाणीव करून देणं गरजेचं असतं. डॉक्टरांनी आवर्जून ते साधलं.

जॉनच्या पूर्वकथेमध्ये त्याच्या वडिलांनी केवळ स्वत:च्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी तारतम्य गहाण ठेवून आपल्या मुलाला एका महासंकटाच्या तोंडाशी नेऊन ठेवलं होतं. ही चूक कमीअधिक प्रमाणात अनेक पालक करतात.  मुलं पालकांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करण्याची ‘साधनं’ नसून त्यांचं स्वत:चं जीवन स्वप्रेरणेने जगण्यासाठी जन्माला आलेली असतात. आपण पालक म्हणून मुलांसाठी जे काही करतो ते आपल्याला स्वत:ला आनंद व समाधान मिळवण्यासाठी आपण करतो. मुलांवर केलेले ते ‘उपकार’ नसतात, तर निसर्गप्रेरणेने आपल्याकडून घडलेली ती कर्तव्यं असतात.

मुलांना आपली मालमत्ता समजणं व त्यांच्यावर आपला ‘अधिकार’ असल्यासारखं वर्तन त्यांच्याशी करणं ही चूक अनेक पालक करतात. अशाने उद्या मोठी होऊन स्वतंत्र झाल्यानंतर मुलं दुरावतात. मुलांपासून दुरावलेले अनेक वृद्ध, दु:खी पालक आज पाहायला मिळतात. आपण संगोपन करून मोठी केलेली आपली मुलं, मोठी होताच अशी कृतघ्न का होतात हा एक संशोधनाचा विषय आहे. पालकांनी ही वेळ येण्याआधीच थोडं अंतर्मुख व्हायला हवं.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नावे व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com