29 March 2020

News Flash

पुरुष हृदय ‘बाई’ : अनादि अनंत!

अतूट-अभंग प्रवासणाऱ्या दिवस-रात्रींप्रमाणेच स्त्री आणि पुरुष तेवढेच अनादि आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अनंत सामंत

alekh.s@hotmail.com

पुरुष हा स्त्रीचा आत्मा असतो. स्त्री हा पुरुषाचा आत्मा असते. आत्मा हरवलेलं शरीर प्रेत असतं आणि शरीर हरवलेला आत्मा भूत असतो. या पिशाचांचा, प्रेतांचा नंगा नाच दिवसभर सभोवताली सुरू असतो. वृत्तपत्रातील अनाचार-अत्याचाराच्या बातम्या हे केवळ हिमनगाचं टोक असतं. तरीही अजून आशा वाटते. स्त्री-पुरुष नाते हे मॅटर आणि एनर्जी, पदार्थ आणि चेतना, प्रकृती आणि पुरुषाएवढेच निसर्गनिर्मित आहे. ते नातं आहे तोपर्यंतच पृथ्वीवरील मानवी प्रजातीच्या अस्तित्वाची निश्चिती आहे. अतूट-अभंग प्रवासणाऱ्या दिवस-रात्रींप्रमाणेच स्त्री आणि पुरुष तेवढेच अनादि आहेत.

‘स्वतंत्र पुरुषजात’ या दृष्टीने मी पुरुषांचा विचार करणे इथे अभिप्रेत आहे. आणि ‘स्वतंत्र पुरुषजात’ ही संकल्पनाच मला अमान्य आहे. प्रकृती आणि पुरुष याबद्दल भारतीय तत्त्वज्ञानात खूप काही लिहिले गेले आहे. ही दोन परमेश्वराचीच स्वरूपे आहेत. तेवढीच अनादि आहेत. संपूर्ण ब्रह्म या दोन तत्त्वांनी घडले आहे. प्रकृती आणि पुरुष ही दोन स्वतंत्र तत्त्वे असली तरी ती अविभक्त व एकच आहेत. हे आणि असेच थोडय़ाफार फरकाने साऱ्यांनीच स्वीकारलेले दिसते. विज्ञान प्रकृती आणि पुरुषाच्या जोडगोळीला मॅटर आणि एनर्जी म्हणते.

ज्ञानेश्वरी म्हणते, ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र दोन्ही संलग्न आणि अनादि आहेत, त्याप्रमाणेच प्रकृती आणि पुरुष एकमेकांपासून विभक्त न करता येणारी संलग्न आणि अनादि तत्त्वे आहेत. प्रकृती शब्दसृष्टीचा वाढता संभार आहे, साकार करणारी शक्ती आहे, प्रपंचाची अभंग लाट आहे. प्रकृती एकाकी पुरुषाची जोडीदारीण आहे. नि:संग पुरुषाची सोयरी आहे. हिच्या सौभाग्याच्या व्याप्तीचं मोठेपण असं की, त्या अनावरालाही ही आवर घालून आहे. पुरुष स्वयंसिद्ध, प्रकृती त्याची उत्पत्ती. पुरुष अमूर्त, प्रकृती त्याची मूर्ती. त्या इच्छारहिताची ही इच्छा. त्या पूर्णाची ही तृप्ती. निराकाराचा ती आकार आहे आणि अहंकारहिनाचा ती अहंकार आहे.

प्रकृती आणि पुरुषाबद्दल मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा ‘प्रकृती-पुरुष’ या शब्दांऐवजी मला ‘स्त्री-पुरुष’ हेच शब्द दिसतात. महाभारत, रामायण, रोम, इजिप्त किंवा कुठलाही इतिहास घ्या; तो स्त्रीने पुरुषाचा अहंकार बनून घडवलेला आहे. काहीतरी घडवायला, बनायला, पाठपुरावा करायला, जगायला एका अहंकारिबदूची गरज असते. गर्व से कहो हम..पुढे काहीही.. आम्ही अमेरिकन, आम्ही रशियन, आम्ही नाझी, आम्ही ज्यू, वगैरे वगैरे! एकेकाळी ‘राष्ट्रवाद’ हा मानवी समुदायांचा अत्युच्च अहंकारिबदू बनला होता. त्याने दोन महायुद्धांना जन्म दिला. पर्ल हार्बरपासून हिरोशिमापर्यंत जग पेटले. राष्ट्रे उद्ध्वस्त झाली. प्रचंड रक्तपात झाला. असंख्य पुरुष पांगळे झाले, स्त्रिया विधवा झाल्या, मुले पोरकी झाली. त्या संहारातून विश्वबंधुत्वाच्या कल्पनेचा जन्म झाला.

पण नांगराच्या शोधानंतर घडत गेलेल्या समाजव्यवस्थेने उत्क्रान्त केलेल्या राष्ट्रवादी संकल्पनेतून जन्मलेल्या सत्ताधीशांना तोपर्यंत मानवी रक्ताची चटक लागली होती. त्यांच्या नरसंहारक पिलावळीची जमात जगभरात फोफावली होती. पृथ्वीच्या अतूट, अखंड भूपृष्ठावर स्वत:च्या वकुबानुसार सीमांचे चर खणून त्यांनी त्याआधी कधीही अस्तित्वात नसलेल्या राष्ट्रांचे नकाशे आखले होते. त्यांचे नामकरण केले होते. तेथील मूळ रहिवाशांना ठार मारून किंवा गुलाम करून स्वत:चा मालकी हक्क सिद्ध केला होता. आणि आखलेल्या विविध सीमांच्या चौकटीत अडकलेल्यांना एकमेकाविरुद्ध झुंजवण्यासाठी राष्ट्रवाद नावाचा नवा अहंकारिबदू निर्माण केला होता. तो अहंकारिबदू दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसात उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा ही सत्तापिपासूंची नरसंहारक पिलावळ वर्णवाद, धर्मवाद, प्रांतवाद, जातीयवाद रुजवू आणि जोपासू लागली.

संत-महात्म्यांनी मानवी समुदायास दिलेली मूल्ये या नवयुगात कधी विस्मृतीत गेली कळलेही नाही. श्रेष्ठत्वाचे मूल्यमापन फक्त सत्ता आणि संपत्तीच्या फूटपट्टीने होऊ लागले. सत्ता आणि संपत्तिप्राप्तीसाठी धर्म, जाती, प्रांत, समुदाय एकमेकांशी लढू लागले. तत्कालीक स्वार्थासाठी एकमेकांना ओरबाडण्याचे लोण कुटुंबव्यवस्थेपर्यंत पोहोचले. नांगराचा शोध लागल्यानंतर जन्मास आलेली अविभक्त कुटुंबव्यवस्था विज्ञानाच्या प्रगतीने उद्ध्वस्त केली. वीस-पंचवीस माणसांची कुटुंबे विभक्त होऊन चार-पाच जणांच्या ‘फॅमिली’ची स्वतंत्र गोमटी घरटी बनू लागली. विज्ञान अधिक प्रगत झाले. शिक्षण अधिक प्रगल्भ झाले. आई, वडील, मुले, साऱ्यांनाच कायद्याने, शिक्षणाने स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवले. सारे एकाच घरात स्वतंत्रपणे राहू लागले. किंवा स्वतंत्र घरात स्वतंत्रपणे राहू लागले. आता काही आईवडिलांचा घटस्फोटही झालेला असतो. काहींचा नाइलाजाने झालेला नसतो. काही एकत्र असून एकत्र नसल्यासारखे असतात. सारे सकाळी लवकर घरटय़ाबाहेर पडतात आणि रात्री उशिरा परततात. साऱ्याचे अहंकारिबदू भिन्न असतात. त्यात धर्म, जात, राष्ट्र, प्रांत असला तर असतो. मात्र स्वत:चे करिअर, स्वत:चे भविष्य, स्वत:चा बँक बॅलन्स आणि स्वत:चे सुख सगळ्यात महत्त्वाचे असते.

प्रकृती आणि पुरुष मिळून होणारे ब्रह्माचे-विश्वाचे एकसंध रूपही पृथ्वीवरील विज्ञानाच्या प्रगतीमुळे विभक्त होण्याची वेळ येतेय तिथे स्त्रीपुरुष नात्याच्या एकरूपतेचे काय! मॅटर आणि एनर्जी, प्रकृती आणि पुरुष याप्रमाणे मानवी प्रजातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या स्त्री-पुरुषाच्या नात्याच्या अभंगत्वाच्या फाळणीस नक्की सुरुवात कोणी, का, कुठे केली या मुद्दय़ांपेक्षा या नात्याच्या भंगलेल्या अभंगत्वामुळे होणारे परिणाम अधिक विचार करायला लावणारे आहेत. आज जगातील बहुतेक प्रगत देशांतील सुशिक्षित आणि तरुण पिढीस विवाहाची आवश्यकता वाटेनाशी झाली आहे. विवाह केलाच तर त्यांना मूल किंवा कुटुंबाचं लोढणं नकोय. विवाहानंतर एकत्र राहण्याचीही गरज त्यांना वाटेनाशी झालीय. प्रपंचाची अभंग लाट आता ओसरली आहे. ते दोघेही आता जोडीदार नाहीयेत तर आपापल्या दिशेने जाणारी भिन्न अस्तित्व आहेत. ते दोघेही नि:संग आहेत. दोघेही स्वयंसिद्ध आहेत. आणि दोघेही अनावर आहेत. स्वत: स्वत:चा अहंकार आहेत. सत्ताधीशांनी निर्माण केलेली राष्ट्रे ते अधिक श्रीमंत बनवत आहेत. राष्ट्रांचा, विविध कंपन्यांचा, भांडवलदारांचा जीडीपी ते वाढवत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, सर्वच क्षेत्रांच्या प्रगतीस ते दोघेही तेवढाच हातभार लावत आहेत. ऐहिक सुखांचे विश्व ते निर्माण करत आहेत आणि उपभोगत आहेत.

बारा हजार वर्षांपूर्वीपर्यंत नांगराचा शोध लागण्याआधी कळपसंस्कृती होती. कळपात ना बाप होता, ना काका-मामा. आई हे एकच नाते असायचे. तेही तात्पुरते. पिलू स्वावलंबी होईपर्यंत. त्यानंतर तेही उरत नसे. पण सारा कळप एकसंध असे. सारे पुरुष, साऱ्या स्त्रिया कळपाच्या असत. आणि त्यांनी प्रसवलेली पिलेही साऱ्या कळपाचीच असत. कळपातील साऱ्या स्त्रिया त्यांची आई असत आणि सारे पुरुष त्यांचे बाप असत. ते एकमेकांसाठी जगत आणि मरत. कळप हा त्यांचा एकुलता एक अहंकारिबदू होता. अविभक्त कुटुंब हा कळपसंस्कृतीचा पुढचा टप्पा. तिथे पणजी-पणजा, आजी-आजा, काका-काकी, आई, बहिणी, अनेक स्त्रिया, मुले, वृद्ध एकत्र जगत. कुटुंब हाच त्यातील प्रत्येकाचा अहंकारिबदू होता. एकमेकांशी असणारे घट्ट नाते हा जगण्याचा आनंद होता. अशा कुटुंबातील व्यक्ती जेव्हा घराबाहेरच्या जगात वावरत तेव्हा त्या जगातील अनोळखी स्त्रिया-वृद्ध-बालके यांच्यात त्याला स्वत:च्या कुटुंबीयांचे प्रतिबिंब दिसे. त्यांचा तो स्वत:च्या कुटुंबीयांप्रमाणे आदर करे. त्यांना मदतीचा हात देई. वेळ आली तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तो उभा राही. तसे न करणे त्याला अपमानास्पद, लाजिरवाणे वाटे. जगाचा प्रत्येक कानाकोपरा तेव्हा सॅटेलाइटने जोडला नव्हता. माणसांना एकमेकांशी चोवीस तास जोडणारा मोबाइल फोन तेव्हा नव्हता. पण नात्यांचे अदृष्य बंध एवढे चिवट होते की अनोळखी वृद्धांतही आजी-आजोबा, आई-वडील दिसत. अनोळखी स्त्रियांत आई-बहीण दिसे. आणि जिथे मत्रीचे, स्नेहाचे, प्रीतीचे नाते जुळे तिथे जिवाला जीव देण्याची तयारी असे. जीव घेणारी, अ‍ॅसिड फेकणारी, जिवंत जाळणारी देहासक्तीची भूक तेव्हा दुर्मीळ होती.

‘कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही’ हे आज जगाचे तत्त्व झाले आहे. ओझॉन लेअरपासून कुटुंबव्यवस्थेपर्यंत प्रत्येक स्तराला भगदाड पाडण्याचे काम कुठल्या ना कुठल्या वादाच्या बासरीच्या सुराने बेभान झालेला घोळका आपल्यामागे खेचणाऱ्या पाइड पायपरने पार पडले आहे. जिथे हे पाइड पायपर पोहोचत नाहीत तिथे टीव्ही, नेट, व्हॉट्सअ‍ॅप पोहोचतो. बंधुत्व नाही पण द्वेष निश्चित पसरवतो. आत्ममग्न, आत्मकेंद्रित अहंकाराचा व्हायरस पसरवतो. माणसाला माणसाकडे माणूस म्हणून बघण्याऐवजी एखाद्या धर्माचा, जातीचा, नागरिकत्वाचा, अगदी काहीच नाही तर पुरुषाला स्त्रीकडे मादी म्हणून आणि स्त्रीला पुरुषाकडे निव्वळ नर म्हणून बघायला शिकवतो. भाग पाडतो. तो तिचा कोणी उरलेला नसतो. ती त्याची कोणी उरलेली नसते. दोघेही मॉलमध्ये काचेपाठी ठेवलेल्या विकाऊ वस्तू असतात. किंमत पटली तर विकत घ्यावी, नाहीतर चोरावी किंवा काच फोडून लुटावी. उद्देश देहाची भूक भागवणे एवढाच मर्यादित.

कत्तलखान्यात नेताना मेंढरांच्या देहावर त्यांचा मालक आपापल्या रंगाचे धब्बे रंगवतो. स्वत:चा मालकी हक्क पक्का करण्यासाठी. तसे आता जगभरातील सर्व माणसांच्या देहावर विविध रंगांचे धब्बे आहेत. धर्माचा रंग, वर्णाचा रंग, जातीचा रंग, देशाचा रंग, प्रांताचा रंग आणि जगातील एकही व्यक्ती कुठल्याही रंगाच्या धब्ब्याशिवाय राहू नये म्हणून अखेरीस पुरुषजातीचा धब्बा आणि स्त्रीजातीचा धब्बा! ‘फ्लेश ट्रेड’ जोरात सुरू आहे. ज्याच्या मेंढरांचा कळप अधिक मोठा तो अधिक श्रेष्ठ!

हे लिहीत असताना माझ्यापासून दहा फुटांवरल्या गार्डनमध्ये अशा तेरा-चौदा वर्षांपासून वीस-पंचवीस वर्षांपुढील नर-माद्या एकमेकांना ओरबाडत बसल्यायत. रोज बसतात. त्यांना प्रकृती-पुरुष, मॅटर-एनर्जी, ओझॉन लेअर, स्त्रीमुक्ती, पुरुषी बळजबरी, जीडीपी, विज्ञान कशाचीही जाणीव नाही. पर्वा नाही. त्यांच्याकडे सेल-फोन आहे. ते यूटय़ूब बघतात, ते व्हॉटस्अ‍ॅप जगतात. गली बॉय-गली गर्ल होतात. सभोवतालच्या भ्रामक जगाला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. इथे सेक्स-ड्रग्ज-दारू सगळं राजरोस चालतं. त्यांच्याकडे सत्ता नसते, संपत्ती नसते. असतो फक्त स्त्रीदेह, पुरुषदेह. तोच त्यांचा अहंकारिबदू असतो. तोच ते मिरवतात, कुरवाळतात, ओरबाडतात, ओरबाडू देतात. त्यांना समजवायचा प्रयत्न केला तर ते ‘नो प्रॉब्लेम अंकल, व्वी आर ओके!’ म्हणतात. पोलिसांना सांगितलं, नगरपालिकेला सांगितलं, नगरसेवकांना सांगितलं. कुणालाच काही प्रॉब्लेम नाहीये असं दिसतंय. अनावराला अधिक अनावर करणं हाच हेतू दिसतोय सर्वत्र. कारण हे अनावर जर भानावर आले तर त्यांचे शिक्षण-नोकरी-आयुष्य, जगणं साऱ्याचाच विचार करावा लागणार आहे कोणाला तरी. त्यापेक्षा चाललेय ते बरे चाललेय. घालू देत त्यांना शिव्या एकमेकाला. फेकू द्या अ‍ॅसिड एकमेकांवर. खुपसू द्या सुरे देहांत. तीही एक अफूचीच गोळी!

पुरुष हा स्त्रीचा आत्मा असतो. स्त्री हा पुरुषाचा आत्मा असते. आत्मा हरवलेलं शरीर प्रेत असतं आणि शरीर हरवलेला आत्मा भूत असतो. या पिशाचांचा, प्रेतांचा नंगा नाच दिवसभर सभोवताली सुरू असतो. वृत्तपत्रातील अनाचार-अत्याचाराच्या बातम्या हे केवळ हिमनगाचं टोक असतं. तरीही अजून आशा वाटते. नव्हे खात्री वाटते, की शरीरांना कधी ना कधी त्यांचा आत्मा गवसेल. आत्म्याला शरीराचा गाभारा सापडेल. राष्ट्र, प्रांत, धर्म, जात, वर्ण या मानवनिर्मित संकल्पना आहेत. पण स्त्री-पुरुष नाते हे मॅटर आणि एनर्जी, पदार्थ आणि चेतना, प्रकृती आणि पुरुषाएवढेच निसर्गनिर्मित आहे. ते चराचराचा अविभाज्य भाग आहे. ते नातं आहे तोपर्यंतच पृथ्वीवरील मानवी प्रजातीच्या अस्तित्वाची निश्चिती आहे. अतूट-अभंग प्रवासणाऱ्या दिवस-रात्रींप्रमाणेच स्त्री आणि पुरुष तेवढेच अनादि आहेत.

आजही मी ‘स्वतंत्र पुरुषजात’ असा विचारही करू शकत नाही. माझ्या आजी-आईपासून माझ्या पत्नीपर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री माझ्या अभंग अस्तित्वाचा भाग आहे. मी तिच्यासकट पुरुष आहे. अन्यथा मी अपूर्ण आहे. आणि माझी खात्री आहे की, त्या प्रत्येक स्त्रीलाही माझ्याबद्दल तसेच वाटत असावे. नाहीतर माझ्या आयुष्याचा अर्थ तो काय? ज्या पुरुषाचे हृदय ‘स्त्री’ नाही तो मला अपूर्ण वाटतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 4:09 am

Web Title: anadi anant chaturang article purush hruday bai abn 97
Next Stories
1 अपयशाला भिडताना : जुगाड
2 निरामय घरटं : नि:स्पृह ‘देणं’
3 मनातलं कागदावर : या कातरवेळी पाहिजेस तू जवळी..
Just Now!
X