News Flash

अवघे पाऊणशे वयमान : मनी धरावे ते होते..

वयाच्या ८५ व्या वर्षीही ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या संस्थेमार्फत अनेक लोकोपयोगी कामं करतोच आहे.. करत राहीनच..

(संग्रहित छायाचित्र)

आनंद भागवत

‘‘ वयाच्या पंचाहत्तरीत ‘कॉर्पोरेट ट्रेनर’ म्हणून कार्यरत असताना अचानक माझी दृष्टी गेली. मग मी मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणं सुरू केलं तिथली तहानलेली गावं पाहिल्यावर समविचारी लोकांना एकत्र करून काम सुरू केलं आजवर १२५ वनराई बंधारे व दहा चेक डॅम्स बांधण्यात आम्हाला यश आलंय. तसंच चार तलावांचा गाळही काढण्यात आलाय. वयाच्या ८५ व्या वर्षीही ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या संस्थेमार्फत अनेक लोकोपयोगी कामं करतोच आहे.. करत राहीनच..

वयाच्या पंचाहत्तरीतही मी ऐन उमेदीत होतो. ‘कॉर्पोरेट ट्रेनर’ हा माझा व्यवसाय बहरात होताच, त्याशिवाय समाजातील सर्व थरांतील माणसांसाठी, अनेक विषयांवर व्याख्यानं देत गावोगाव हिंडण्यात मला वेळ अपुरा पडत होता. वाचन ही माझी हवा, पाणी, अन्न यांच्याइतकीच जीवनावश्यक गरज होती. अशा वेळी  ध्यानीमनी नसताना माझी दृष्टी गेली. निष्णात डॉक्टरांनी काहीही उपाय नाही, हे स्पष्ट केलं.

या परिस्थितीत व्यवसाय बंद करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यानंतर वर्षभरातच माझ्या ध्येयाकडे नेणारी वाट मला शोधत आली. ‘विद्या भारती प्रतिष्ठान’ या शिक्षणासाठी देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेने माझ्यासमोर मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा पर्याय ठेवला. या कामासाठी गावोगाव फिरताना, शिक्षकांशी, गावकऱ्यांशी बोलताना, डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अनेक गोष्टी माझ्या मनाने, कानांनी टिपल्या. लक्षात आलं, की उजाड दिसणाऱ्या या तालुक्यांमध्ये खरंतर महाराष्ट्रात कुठेही नाही एवढी जलसंपदा आहे. ११ नद्या, २०० तलाव आहेत. पण हे सर्व जलाशय गाळाने भरल्याने पावसाळी भातशेतीनंतर दुबार शेती नाही. साहजिकच शेतीपूरक उद्योगही नाहीत. १३२ गावं टँकरग्रस्त आहेत. स्त्रिया पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन वणवण फिरताहेत. तेव्हाच माझा निश्चय झाला, यापुढचं जीवन द्यायचं या दोन तालुक्यांना सुजलाम-सुफलाम करण्यासाठी!

कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्षे वावरल्याने बरेच दिग्गज माझ्या संपर्कात होते. अशा १५-१६ समविचारींना मी एकत्र करून त्यांना माझा मनोदय सांगितला. ही सर्वच उच्च पदावरून निवृत्त झालेली, अनुभवसमृद्ध मंडळी. ग्रामीण भागातील ‘पाणी’ समस्येवर लढण्यासाठी सर्व तयार झाली आणि ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. या दुर्लक्षित गावांत परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही ११ कलमी कार्यक्रम आखला. ही घटना २०१६ ची. त्यानंतर या भागात आम्ही ग्रामीण संघटना उभी केली. पुढे ही सेना आणि आमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन यांच्या एकत्रित प्रयत्नातून आजवर १२५ वनराई बंधारे व दहा चेक डॅम्स बांधण्यात आम्हाला यश आलंय. तसंच चार तलावांचा गाळही काढण्यात आलाय. ‘कनकवीरा नदीचं पुनरुज्जीवन’ ही संस्थेच्या प्रयत्नांची एक लक्षणीय फलश्रुती. वर्षांनुवर्ष गाळ साठत गेल्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी ही नदी उन्हाळ्यात कोरडी पडत असे. या नदीच्या

५ किलोमीटर क्षेत्रातील गाळ (जवळजवळ ४० हजार घनमीटर) काढल्यामुळे ‘कनकवीरा’ तर प्रवाहित झालीच, आजूबाजूच्या विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळीही वाढली.

लोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग ही आमच्या कामाची त्रिसूत्री आहे. अगदी आत्ताचं म्हणजे २०१९ च्या मेमधलं एक उदाहरण सांगावंसं वाटतं. शहापूरमधील लेनाड या गावातील शिक्षकाच्या बोलावण्यावरून तिकडे गेलो होतो. १६ एकरांचा तो विस्तीर्ण तलाव गाळाने पूर्ण भरलेला होता. मी म्हटलं, ‘‘आमची संस्था हा गाळ काढेल, पण तुम्ही काय करणार ते सांगा..’’ मी नुसता प्रश्न टाकून थांबलो नाही तर या संदर्भात काय करता येईल याचं मार्गदर्शन केलं. संध्याकाळी सहा वाजता मी ते गाव सोडलं आणि त्याच रात्री १० वाजता त्या शिक्षकाचा फोन आला. सांगत होता, ‘‘आम्ही ठरवलंय, लोकवर्गणी काढणार. ग्रामपंचायत आपला वाटा उचलणार. गावातील ट्रॅक्टर मालक ट्रॅक्टर द्यायला तयार आहेत. आमच्या गावातील शिक्षणासाठी व नोकरीनिमित्ताने बाहेर गेलेली माणसं रजा काढून श्रमदानाला यायला तयार आहेत.. वगैरे.’’ सांगितल्याप्रमाणे ८-१० दिवसांत त्यांनी त्या पाऊण एकरांच्या पट्टय़ातील गाळ श्रमदानाने काढला. पुढची जबाबदारी माझी होती. त्यासाठी अलीकडेच मी आमच्या टीमसोबत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. या १६ एकरांतील गाळ काढल्यावर साठू शकणाऱ्या कोटय़वधी लिटर्स पाण्याचं गणित मी त्यांच्यासमोर मांडलं. परिणामी, त्यांनी या कामी लागेल ती मदत देण्याचं ठोस आश्वासन दिलंय. शिवाय, हा गाळ शेतातून टाकल्यावर जे दामदुप्पट पीक निघेल, तो ‘बोनस’ वेगळाच! जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे ठाण्याचे पालकमंत्रीही आमच्या पाठीशी आहेत. या दोघांनीही तिथलं परिवर्तन प्रत्यक्ष पाहिलंय, गावकऱ्यांशी संवाद साधलाय. शेतकरी त्यांना सांगत होते, ‘‘आता दुबार पीक घेऊ लागल्याने आमच्या हातात थोडाफार पसा येऊ लागलाय. आधी दाराशी सायकलही नव्हती आता मोटारसायकल आहे. पूर्वी आम्ही दुसऱ्यांच्या शेतात राबायचो, आता आमच्या शेतात दहा माणसं काम करतात.’’

‘वसुंधरा संजीवनी मंडळा’चं काम आता बोलू लागल्याने आता आम्हाला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळू लागलाय. या वर्षी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमानेही आमच्या कामावर मोहर उमटवलीय. पाणी प्रश्न सोडविण्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठीही उद्युक्त करत आहोत. सेंद्रिय शेतीच्या कार्यशाळा सुरू आहेत. मुलींना आणि स्त्रियांना शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं जातंय. तीन-चार मल चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली दिल्यात. या कामात मला घरच्यांचा कायम पाठिंबा मिळाला, मिळतोय. दोन वर्षांपूर्वी पत्नीची साथ सुटली. तिची स्वत:ची अशी जी गंगाजळी होती, त्यातून आम्ही मुरबाडमधील खेवारे या गावी १० गुंठे जमीन घेऊन तिथे एक नर्सरी सुरू केलीय. या ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ संचालित ‘कै. सुधा भागवत रोपवाटिके’त जांभळाची ३००० रोपं तयार आहेत. त्यातून जांभूळ वन तयार होईल.

अत्यंत अंधूक दिसत असूनही मी आजही एकटा प्रवास करू शकतो. पुढच्या आठ दिवसांचं माझं वेळापत्रक ठरलेलं असतं. मुक्ता, मिलिंद या माझ्या मुलांनंतर आता ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या माझ्या तिसऱ्या अपत्याला वाढवण्यात वेळ कुठे जातो ते मला कळत नाही. यानिमित्ताने मला माझ्या समवयस्कांना सांगावंसं वाटतं, की बरेचदा आपण आपल्या मनाला सांगत राहतो, आता माझं वय झालं. आता माझ्याच्याने काही होत नाही. त्यामुळेच आपलं वय वाढतं. त्याऐवजी जर मनाला बजावलं, ‘आपल्याला अजून बरंच काही करायचंय, तर तुमची अंत:प्रेरणा तुम्हाला निश्चितपणे मदत करते.’

समर्थ म्हणतात..

‘मनी धरावे ते होते

विघ्न अवघेची नासुनि जाते

कृपा केली रघुनाथे

प्रचीती येते।’

आज पंचाऐंशीव्या वर्षीही मी पुढील पाच वर्षांच्या कामाची आखणी करू शकतोय, ते या अंत:प्रेरणेच्याच बळावर !

आनंद भागवतांप्रमाणेच त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळकृष्ण भागवत हेही तितकेच उत्साहीपणे कार्यरत आहेत. ते हाडाचे शिक्षक. नोकरीतून १९८९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र आता वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षीही त्यांचे अध्यापन सुरूच आहे. याशिवाय गेली अनेक वर्षे राज्यभरातील अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी ते निधी संकलित करतात. आतापर्यंत लाखो रुपये त्यांनी स्वयंसेवी संस्थांना मिळवून दिले आहेत.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 4:18 am

Web Title: anand bhagwat chaturang avaghe paunshe vayaman abn 97
Next Stories
1 आरोग्यम् धनसंपदा : ऋणानुबंध आहारतत्त्वाशी
2 तळ ढवळताना : माझ्या मनाची बारव
3 ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : स्पर्धाचं ‘व्यासपीठ’
Just Now!
X