आनंद इंगळे

मी ‘गद्धेपंचविशी’त होतो तेव्हा अभिनय आणि कला क्षेत्रातली परिस्थिती आताच्यापेक्षा खूपच वेगळी होती. भरभरून टीव्ही वाहिन्या, ‘ओटीटी’ व्यासपीठं नव्हती, पण दर्जेदार नाटकं , मालिका बघायला आणि करायला मिळत होत्या. एखादी कलाकृती एखाद्याला आवडली नाही, तरी लगेच लोकांच्या भावना दुखावत नव्हत्या आणि दुखावल्या तरी, तेव्हा नाटकावर विश्वास असलेले प्रेक्षक आमच्या पाठीशी उभे राहिल्याचा अनुभव याच काळात मी घेतला. काही बाबतींत वेडेपणा आणि चुकाही के ल्या; पण ऐन गद्धेपंचविशीत अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा माझा निर्णय आजही आनंद देतो आहे..   

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

‘गद्धेपंचविशी’ हा माझ्या तरुणपणाला अगदी चपखल शब्द होता असं मला वाटतं. म्हणजे खरोखरीच त्याला ‘गद्धेपंचविशी’ म्हणावी तसाच मी माझ्या पंचविशीत होतो. माहीत नव्हतं काय होणार?.. (कारण, २५ वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वाहिन्या, वेब मालिका अशा पद्धतीचं फार काही नव्हतं.) तरीही या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेणं हे खरं तर थोडंसं ‘गद्धेपंचविशी’चंच लक्षण होतं. असे अनेक प्रसंग आहेत, की आता असं वाटतं की, ज्यातून कसा निभावून गेलो मी? चांगलेही, वाईटही. म्हणजे कारकीर्दीच्या दृष्टीनं आणि व्यक्तिगत जीवनातही. त्या विशिष्ट काळामध्ये काम करण्याची एक उमेद असते. त्या वेळी

जरा तब्येतीकडे लक्ष दिलं असतं तर फार बरं झालं असतं असं आज वाटतं.

मॉडर्न महाविद्यालयात शिक्षण घेत असताना फार काही केलं नाही. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत एकदाच काम केलं, तेही कुठे तरी मागे उभा राहिलो होतो. त्या वेळी ‘अभिजात’ नावाची संस्था होती. त्याचबरोबरीनं आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये कामं करत होतो. ‘परिचय’ या संस्थेमध्ये उपेंद्र लिमये, दिग्दर्शक सुबोध पंडे, अभय गोडसे, मंजूषा गोडसे असे कलाकार होते. त्या काळी बाहेरगावी खूप एकांकिका स्पर्धा व्हायच्या. पुण्यामध्ये ‘सोहम एकांकिका स्पर्धा’ होती. कणकवली, सोलापूर, वाई, सांगली अशा स्पर्धामध्ये संस्थेकडून भाग घेता यायचा. त्या स्पर्धामध्ये खूप नाटकं केली. ‘विषय एक आविष्कार अनेक’ याअंतर्गत मुंबईच्या एका स्पर्धेमध्ये ‘पायरीचा पाषाण’ असा विषय मिळाला होता. (वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या कथेचं ते शीर्षक होते.) आमची ‘पाषाणकर, तुमचं काय चाललंय’ ही एकांकिका स्पर्धेत पहिली आली. त्यामध्ये मी आणि उपेंद्र लिमये होतो आणि मला ‘सवाई अभिनेता’ असं बक्षीस मिळालं होतं.

त्याच कालखंडात ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’तर्फे डॉ. मोहन आगाशे आणि श्रीरंग गोडबोले यांनी पुण्यात ‘ग्रिप्स’ रंगभूमी चळवळीची नाटकं सुरू केली होती. त्यामध्ये मी खेचला गेलो. पहिल्यांदा वेगळ्या स्वरूपाचं बालनाटय़ समोर आलं. रसिका जोशी (त्या वेळच्या रसिका ओक), परेश मोकाशी, विभावरी दीक्षित (आताची विभावरी देशपांडे), राधिका इंगळे असे बरेच कलाकार त्या वेळी श्रीरंग गोडबोले यांच्याबरोबर होते. ‘पहिलं पान’, ‘पण, आम्हाला खेळायचंय’, ‘नको रे बाबा’, ‘आम्ही घरचे राजे’ या नाटकांत काम केल्यामुळे खूप ‘एक्सपोजर’ मिळालं. यापैकी ‘आम्ही घरचे राजे’ हे नाटक जर्मन दिग्दर्शक व्होल्फगॅन कोल्नेडर यांनी तिकडून येऊन बसवलं होतं. बंगळूरु, दिल्लीपासून ते त्या वेळच्या सगळ्या महोत्सवांमध्ये एकांकिका झाल्या.

मुंबईमध्ये फार मस्त नाटकं केली जातात हे मला माहीत होतं. मग अनेकदा मुंबईच्या स्पर्धा असायच्या किंवा ‘आविष्कार’ तसंच इतर नाटय़ स्पर्धा असायच्या तेव्हा पुण्यातून जाऊन मी ते प्रयोग बघितले आहेत. अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, अजित भुरे, सचिन खेडेकर या कलाकारांना मी त्या स्पर्धामध्ये पाहिलं. ‘मृगजळ’सारखी एकांकिका स्पर्धा बघायला जायचो. वेगवेगळ्या लोकांची चांगली नाटकं पाहिली. मुंबईतील संस्थांच्या चांगल्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग ‘बालगंधर्व रंगमंदिर’ येथे पाहिले आहेत. काय काम करतात, कसं काम करतात, हे पाहिलं. बघणं आणि वाचन यातून मी घडलो. अजूनही दररोज किमान सव्वा तास वाचनासाठी देतो. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (एनएसडी) ही संस्था दिल्लीमध्ये असते, असं मला कळलं होतं, त्याची परीक्षा मी दिली होती; पण उत्तीर्ण झालो नाही. ती परीक्षा नंतरही देता आली असती; पण ती का दिली नाही हे सांगता येणार नाही. चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे हे दिग्दर्शक पुण्यामध्ये आमची नाटकं बघायला येत असत. त्यामुळे ते हळूहळू ओळखीचे झाले. ‘चंद्रलेखा’ संस्थेचं ‘आम्ही जगतो बेफाम’ हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी यांनी बसवलं होतं. त्यामध्ये काम करणाऱ्या अतुल परचुरे यांना दौऱ्यावर येणं शक्य होणार नव्हतं.  गोव्याचा दौरा ‘रिप्लेसमेंट’ म्हणून करशील का? अशी विचारणा करणारा दूरध्वनी मला आला आणि व्यावसायिक रंगभूमीवर माझं पदार्पण झालं. त्या नाटकाचे पुढे मी अनेक प्रयोग केले. त्या वेळी या नाटकात संजय नार्वेकर, संजय मोने, रोहिणी हट्टंगडी आणि जयंत सावरकर हे कलाकार होते. हे नाटक केल्यानंतर पुढे काम सुरूच झालं. ‘सुयोग’चे सुधीर भट निर्मित ‘झालं एकदाचं’ हे नाटक विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलं होतं. त्यामध्ये अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याचे काही प्रयोग केले. हे नाटक सुरू होतं तेव्हा ‘ऑल द बेस्ट’च्या नवीन टीममध्ये मला विचारलं गेलं. सतीश राजवाडे, श्रेयस तळपदे, प्रज्ञा जावळे आणि मी, असे चौघे जण या नाटकाच्या दुसऱ्या संचामध्ये होतो. भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर करतच होते. त्या वेळी गंमत अशी असायची, की एकाच वेळी दुपारी ४ वाजता ठाण्यात आणि बोरिवलीमध्ये ‘ऑल द बेस्ट’चे प्रयोग असायचे.

मुंबईमध्ये राहायला गेल्यानंतर विनय आपटे यांनी ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकासाठी मला विचारलं. चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, देवेंद्र पेम अशा चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळाल्यामुळे हे सगळं माझ्यापर्यंत झिरपत गेलं. याच काळात अमोल पालेकर यांनी मला पहिल्यांदा दूरचित्रवाणी मालिकेत घेतलं. ‘पाऊलखुणा’ या मालिकेमध्ये ‘सुशीलेचा देव’ या दोन भागांसाठी मी आणि अमृता सुभाष ही जोडी पालेकर यांनी निवडली. प्रतिमा कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रपंच’ मालिके त काम केलं. स्मिता तळवलकर यांच्या मालिका केल्या. प्रतिमा कुलकर्णी यांनी ‘तुझ्या माझ्यात’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. महेश मांजरेकर त्याचे निर्माते होते. सचिन खेडेकर, मीरा वेलणकर, निवेदिता सराफ आणि मी असे आम्ही चौघे त्या नाटकात होतो. ज्यांच्याबरोबर मी काम केलं त्यांनी पुन्हा त्यांच्या नाटकात, चित्रपटात किंवा मालिकेमध्ये मला घेतलं. प्रतिमा कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा आनंद अवर्णनीय होता. त्यांच्याबरोबर मी ‘४०५ आनंदवन’, ‘प्रपंच’, ‘झोका’ अशा तीन मालिका केल्या. स्मिता तळवलकर यांच्याबरोबर ‘अवंतिका’, ‘घरकुल’ मालिका केल्या. राकेश सारंग यांच्याबरोबर ‘कुंकू’, ‘फू बाई फू’ तसंच श्रीरंग गोडबोले यांची ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ ही मालिका केली.

गद्धेपंचविशीमध्ये मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मी चित्रपटामध्ये कधीही नायकाच्या मित्राची भूमिका केली नाही. मला माहीत होतं की, ते मला करायचं नाही. आता चरित्र भूमिका मिळतात त्यात मी खूश आहे; पण मी त्या वेळी अशा भूमिका कधी केल्या नाहीत. ‘माकडाच्या हाती शँपेन’, ‘लग्नबंबाळ’ ही नाटकं आली. ‘माकडाच्या हाती शँपेन’ हे नाटक आधी प्रायोगिक रंगभूमीवर केलं होतं. दरवर्षी एखादी छोटी एकांकिका, वाचन, अभिवाचन असं काही ना काही करत प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं आहे. मुंबई, पुणे, गोव्यापासून ते सांगली येथेही अभिवाचनाचे कार्यक्रम केले आहेत. अनेकदा पैसे कमी मिळायचे. राहाण्याची व्यवस्था बरीसुद्धा नसायची. मी एका उच्च मध्यमवर्गीय घरातून आलेला आहे. नाटक कंपनी नटांना राहाण्यासाठी जी  व्यवस्था करायची ती पाहून तेव्हाही वाईट वाटायचं, आताही वाईट वाटतं. नाटक चांगलं चाललं आहे ना. मग, कलाकारांसाठी चांगली व्यवस्था करायला काय हरकत आहे? पण नाही. त्यामुळे वाटेल तसे कुठूनही, कसेही प्रवास केलेले आहेत. मला जी मंडळी मी खूप ‘स्ट्रगल’ केला, असं सांगतात त्यांच्याविषयी किंवा आपल्या स्ट्रगलचं कौतुक करून घेतात त्यांच्याविषयी अजिबात कौतुक नाही. याचं एकमेव कारण म्हणजे, स्ट्रगल कोणासाठी केला? मग त्याचं कौतुक कशासाठी?  मुंबईत दररोज एक लाख माणसं कामासाठी बाहेर पडतात. तुझ्यासारखेच लोकलनं प्रवास करतात आणि अर्धपोटी झोपतात. ते करताहेत का कौतुक स्वत:च्या कष्टाचं? मग आपण का करून घ्यायचं? या गोष्टीचा मला आत्यंतिक तिटकारा आहे, की ‘मी गावाकडे राहात होतो.. गावाकडून मुंबईत आलो आणि आज मी इतकं सारं केलं..’ कामाचं कौतुक जरूर व्हावं. त्यासाठी घेतलेल्या कष्टाचं कौतुक कसं करता येईल? त्या बाबतीत माझं डोकं अजून तरी जमिनीवर ठेवण्यात मित्र, घरचे, परिवार यांचं मोठं योगदान आहे. रसिका जोशी, पराग वाघमोडे, विनयकाका (विनय आपटे) असे मित्र आकस्मिक गेले. त्याचा धक्का बसला. पूर्वी काम करण्याची उमेद भरपूर होती. आता वाटतं, की त्या वेळी चुकल्या काही गोष्टी- म्हणजे रात्री-अपरात्रीपर्यंत जागरणं करायची. तरी सकाळी लवकर उठून चित्रीकरणाला जायचं. मग त्याचे जे परिणाम होतात- कधी अपचन, कधी तब्येत बिघडते ते टाळता आले असते. त्यामानानं आजचे नट जास्त शहाणे, समंजस आणि सजग आहेत. मी तसा नव्हतो.

असो. तर नाटकाविषयी सांगत होतो, ‘माकडाच्या हाती शँपेन’ नाटकाचं नाव आधी ‘मारुती आणि शँपेन’ असं होतं. त्या नाटकामध्ये पात्रांची नावंसुद्धा पेन्सिल, चाकू, पुस्तक आणि मारुती अशी होती. त्यानंतर एका व्यक्तिरेखेचं नाव ‘माकड’ केलं गेलं. मुळातच त्याचे संदर्भ नाटकामध्ये पूर्णपणे वेगळे होते; पण काही लोकांच्या भावना अचानक दुखावल्या गेल्या आणि त्यांना असं वाटलं की, हे सगळं चुकीचं आहे. हे धर्माविषयी किंवा श्रद्धास्थानाविषयी आहे, अशी त्यांची समजूत झाली. ते नाटक बंद करायला आले. खरोखरीच असं काही म्हणायचं असतं, तर आम्ही नाटकाचं नाव बदललं नसतं. आपल्याला जे म्हणायचं ते म्हणायचंच आहे, असं आम्ही ठरवलं होतं.  नाटकामध्ये धार्मिक स्वरूपाची टिप्पणी नव्हती. ते प्रतीकात्मक म्हणून केलं होतं. नाटक बंद पडून नाटकाचं नुकसान होण्यापेक्षा नाव बदलून काहीच फरक पडणार नसेल, तर नाटकाचं नाव बदलू या, हा निर्णय  नाटकाचे लेखक डॉ. विवेक बेळे यांनी घेतला. नाटकात त्यांच्यासह शर्वाणी पिल्ले, संदेश कुलकर्णी आणि मी होतो. गिरीश जोशी दिग्दर्शक होते. डोस देऊन नाटक बंद केलं गेलं. पोलीस येऊन आंदोलनकर्त्यांना घेऊन गेले.  शेवटी ‘जाऊ द्या ना. ताब्यात घेतलेल्या लोकांना सोडून द्या,’ अशी विनंती त्यांच्यापैकी एकानं केली. ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्यासह प्रेक्षागृहात हजर असलेले १३० प्रेक्षक पोलीस ठाण्यात आम्हाला समर्थन देण्यासाठी आले होते. ‘हे असं काही चालणार नाही,’ असं प्रेक्षकांनीच पोलिसांना सांगितलं. त्यानंतर या नाटकाचे ८८० प्रयोग आम्ही केले. ‘माकडाच्या हाती शँपेन’ हा माझ्यासाठी टर्निग पॉइंट होता. मग ‘लग्नबंबाळ’ के लं.

खूप माणसांकडून खूप गोष्टी शिकलो. वेगवेगळे प्रयोग पाहिले. नसीरुद्दीन शाह, बेंजामिन गिलानी हे एक वेगळं थिएटर करत होते. चांगल्या पद्धतीनं थिएटर अ‍ॅकॅडमीची नाटकं सुरू होती. मुंबईमध्ये आंतरनाटय़ स्पर्धा, आविष्कार संस्थेची नाटकं सुरू होती. सत्यदेव दुबे, विजया मेहता यांच्या कार्यशाळांमध्ये सहभाग घेता आला. कायिक, वाचिक अभिनय म्हणजे काय? व्यावसायिक नाटकं कशी होतात? हे समजलं. तेव्हा पहिल्यांदा परदेशात जाण्याचा योग आला. दुबईला ‘माकडाच्या हाती शँपेन’ नाटक घेऊन गेलो होतो. सुधीर भटांचं ‘लव्ह स्टोरी’ नाटक घेऊन परदेशात गेलो. मी, मुक्ता बर्वे, निखिल रत्नपारखी होतो. अमेरिका, लंडन येथे चित्रीकरणासाठी गेल्यानंतर परदेशी रंगभूमी पाहिली. तिशीमध्ये ब्रॉडवे, म्युझिकल थिएटर हे सगळं पाहायला मिळाल्यानंतर हे आपल्यापेक्षा किती वेगळं, मोठं आहे याचं भान आलं.

माझ्या गद्धेपंचविशीमध्ये मजा होती. आतासारखी भयंकर अवस्था नव्हती. विचारांचं स्वातंत्र्य होतं. काम करताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य जास्तच होतं.  एकमेकांना मान होता. कशावरूनही कु णीही चिडायचा नाही. कलाकृती एखाद्याला आवडली नाही, म्हणून ती करायचीच नाही, असं नसायचं. ‘मला आवडली नाही; पण तुला करायचं तर तू कर’ असं आवर्जून सांगितलं जायचं. हे सारं हरवलं आहे. आता जर कोणाला कलाकृती आवडली नाही, तर ती कलाकृती बंद पाडायला काही जण पुढे येतात. हे खूप कमी होतं. विचारांची मोकळीक होती. मालिकासुद्धा चांगल्या असायच्या. मराठीत चांगल्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. माझ्या गद्धेपंचविशीमध्ये दूरचित्रवाणी नुकतीच बहरत होती. त्यामुळे माझी पिढी या साऱ्या गोष्टीची साक्षीदार आहे असं वाटतं. सेलफोन ते स्मार्टफोन हा प्रवास सजगतेनं पाहाता आला. ‘सुशीलेचा देव’ कथेचा एक भाग झाला तेव्हा फक्त दूरदर्शन होतं. माझ्या घरच्या दूरध्वनीवर लोकांचे फोन आलेले आठवताहेत.

माझ्या कळत्या वयात प्रसारित होणाऱ्या ‘चिमणराव गुंडय़ाभाऊ’, ‘तमस’, ‘हमलोग’, ‘श्वेतांबरा’, ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’अशा मालिका हेच माझ्या गद्धेपंचविशीचं सोनं आहे. त्या काळात वेडेपणा खूप केला. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी खिशात पैसे नसताना पुण्यातून रात्रीची लोकल पकडून लोणावळ्याला आणि तिथून बस पकडून मुंबईला पोहोचल्यानंतर पहिल्या लोकलनं जाऊन किशोरीताई आमोणकर यांची मैफल ऐकली आहे.

व्यावसायिक चुका असतील किंवा बरोबर असतील. एखादं नाटक चाललं किंवा पडलं.. या सगळ्यातून मला आनंदच मिळत गेला. ‘हे क्षेत्र सोडून द्यावं, आता याच्यामध्ये काही नाही,’ असं कधीही वाटलं नाही. त्या काळातही वाटलं नाही, आजही नाही. पंचविशीतला तो निर्णय आजही योग्यच ठरतो आहे.. आनंदच देतो आहे.

 शब्दांकन – विद्याधर कुलकर्णी

anandingale@yahoo.com