पु. ल. देशपांडे यांच्या ‘वंगचित्रे’ व ‘मुक्काम शांतिनिकेतन’ या लिखाणामुळे बंगाली भाषा, संस्कृती बद्दल खूप ओढ निर्माण झाली होती. तर त्यांनीच लिहिलेले ‘रवींद्रनाथ- तीन व्याख्याने’ हे पुस्तक वाचून तर रवींद्रनाथ टागोरांच्या एकूणच सर्वस्पर्शी प्रचंड आवाक्याच्या प्रतिभेचे दर्शन होऊन मन स्तिमित व भारावून गेले होते. या सगळ्यात कधी तरी आपणही बुडी मारून पाहावे असे मनात यायचे. मूळ बंगालीतल्या त्या कथा-कविता-कादंबऱ्या यांची अनुवादातून मजा आली तरी वरवरची वाटायची. त्या भाषेचा, साहित्याचा खरा गोडवा जाणवायचा नाही. त्यासाठीच मग शोध घेतला आणि गोरेगाव येथे ‘वंग भाषा प्रसार समिती’तर्फे भाषा शिकण्याचे काही वर्ग चालत असत, याची माहिती मिळाली. लागलीच त्यात प्रवेश घेतला.
तीन वर्षांच्या या कोर्समध्ये पहिल्या वर्षी अक्षरओळख, छोटय़ा गोष्टी व कविता झाल्या. पुढच्या दोन वर्षांत श्रीकांत, रजनी, मेघनादवध-काव्य, गीतांजली या श्रेष्ठ कलाकृतीतील काही निवडक भाग अभ्यासले. प्रत्येक वर्षअखेरीस परीक्षाही होत्या. त्यामुळे का होईना जरा मनापासूनच सगळे वाचले व लिहिले. अर्थात परीक्षा देणे हे माझे मूळ उद्दिष्ट कधीच नव्हते. असो.
या सगळ्या प्रवासात बंगाली भाषा-साहित्याची निदान चांगली तोंडओळख तरी झाली. तिथला परिसर, तिथला निसर्ग, समाजाच्या वेगवेगळ्या थरातील माणसे, त्यांची राहणी-विचारसरणी, चालीरीती, आपसांतील संबंध, बोलीभाषा या सर्वाचे दर्शन झाले. मनाने त्या जगात वावरत असताना त्या वातावरणाचा स्पर्श झाल्यासारखे वाटले. बंगालीच्या अंतरंगात थोडा शिरकाव केल्याने त्या कलासक्त, रसिक व भावनोत्कट लोकांशी परिचय झाला व मनोरंजनाचे एक आणखी समृद्ध दालन उघडले.
रवींद्रनाथांची गीतांजली वाचून त्यांच्या सहज वैश्विकतेचा प्रत्यय आला व आपल्या ज्ञानदेवांच्या ‘विश्वाचे आर्त’शी त्याची भावनिक नाळ जोडल्यासारखे वाटले. त्यांच्या इतर कवितांमधूनही त्यांची प्रसन्न व रमणीय शब्दकळा, कल्पनेची उत्तुंगता व मर्मग्राही; परंतु रसात्मक तत्त्वज्ञान सांगण्याचे कौशल्य जाणवून मन आनंदून गेले.
बंगाली साहित्य-सागरात मारलेल्या या छोटय़ाशा बुडीनेसुद्धा माझ्या ओंजळीत हे थोडेसे रत्न-कण आले. पुन:पुन्हा ते आठवताना आनंदाचा पुन:प्रत्यय येतो. शब्द्प्रभूंनी निर्माण केलेल्या या अफाट धनातला हा कणभर ठेवा अमूल्यच आहे. मनाला आनंदाची निवृत्ती शिकवणारा आहे. मनाला तजेला देणारा हा भाषेचा अमूल्य ठेवा चिरंतन आहे, याचा प्रत्यय आला.     

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र