08 August 2020

News Flash

..आणि ‘बाटली आडवी’ झाली

राजकीय दबाव, धमक्या यांना बळी न पडता सलग तीन वर्षे लढा देत लखमापूर गावात पूर्णपणे दारूबंदी आणत गावचा विकास करणाऱ्या ज्योती देशमुख. त्यांच्या धडाकेबाज

| December 8, 2012 05:35 am

राजकीय दबाव, धमक्या यांना बळी न पडता सलग तीन वर्षे  लढा देत लखमापूर गावात पूर्णपणे दारूबंदी आणत गावचा विकास करणाऱ्या ज्योती देशमुख. त्यांच्या धडाकेबाज कारकीर्दीचा आलेख त्यानंतर वाढतच गेला. सरपंचपदी विराजमान झालेल्या ज्योतीताईंनी त्यानंतर अनेक विकासकामांना गती देत गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्या समर्थ स्त्रीविषयी ..

इतिहासाची पाने चाळली की लक्षात येईल स्त्रियांचा लढा ही नवीन गोष्ट नाही. पूर्वी त्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि अन्यायाविरोधात लढा दिला तर आता त्यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी आणि समानतेसाठी  लढाई सुरू आहे.
लखमापूरच्या सरपंच ज्योती देशमुख यांनीही असाच यशस्वी लढा दारूबंदीसाठी दिला. या लढय़ानंतर गावात दारूबंदी झाली, सोबतच गावाच्या विकासाने जोर धरला. गावात सुखी आणि शांत जीवन नांदू लागले. त्यामुळेच गावाने शासनाचे ‘आदर्श गाव’ आणि ‘विकासरत्न’ असे दोन मोठे पुरस्कार मिळविले आहेत.
नाशिकच्या जवळच वसलेलं लखमापूर हे छोटंसं गाव. गावाच्या बाजूलाच मोठी औद्योगिक वसाहत असल्यानं गावकऱ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत्या. त्यामुळे गावकऱ्यांच्या हाती मुबलक पसा यायचा, सोबतच शेतीही. त्यामुळे गाव सधन म्हणावे अशीच सगळी परिस्थिती. पैसे खर्च करण्याचे पर्याय फारच थोडे असल्याने, मग हा पैसा दारूच्या प्रेमात खर्च होऊ लागला.
गाववस्ती अंदाजे दोन हजार. यात दारूच्या गुत्त्यांची संख्या सात. म्हणजेच एकूण लोकवस्तीचा विचार केला तर तीनशे लोकांमागे एक दारूचा गुत्ता आणि अधिक खोलात गेलं तर त्यातील महिलांची संख्या वगळल्यास प्रत्येकी १२० पुरुषांमागे एक दारूचे दुकान, असे भयावह वास्तव होते. यामुळे गावात सगळ्यात बिकट परिस्थिती होती ती महिलांची. दिवसा शेतात राबायचं आणि संध्याकाळी दारुडय़ा नवऱ्याचा मार खायचा हाच त्यांचा दिनक्रम. अनेकदा टॉमेटो, कांदे, कोबी अशा फळभाज्या कच्च्या खाऊनच दिवस काढावे लागायचे. सारे पैसे दारूवर उधळणाऱ्या नवऱ्यांमुळे बायकांचं आयुष्य खडतर झालं होतं. पण गावाचं हे चित्र बदललं ज्योतीताईंच्या अथक परिश्रमामुळे.
ज्योतीताई मूळच्या नांदगावच्या. दारूमुळे होणारी कुटुंबाची वाताहत त्यांनी लहानपणीच जवळून पाहिली होती. अजाणत्या वयातच आई-बाबांचे छत्र हरपल्यामुळे िदडोरी येथील तीसा गावात मावशीकडे त्यांचे बालपण गेलं. त्यांना आठ भावंडं. आईबाबा नसल्याने त्यांची रवानगी विभागून नातेवाईकांकडे केली गेली.
लहानपणापासूनच ज्योतीताईंचा स्वभाव जिद्दी आणि धाडसी. शाळेत असतानाचा त्यांचा एक अनुभव तर त्याचं लख्ख उदाहरणच म्हणावं लागेल. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक दारू पिऊन शिकवायला येत आणि प्रसंगी वर्गातील मुलांवर हात टाकत. मुलांच्या ते इतके अंगवळणी पडले होते की त्याची वाच्यताही होत नसे. लहानग्या ज्योतीला एके दिवशी हे सहन झाले नाही. त्यांनी त्या ‘िझगे’ गुरुजींना चांगलीच अद्दल घडवली. (त्यांचे प्रत्यक्षातील आडनावही हेच आहे) गुरुजी ‘तर्र’ असताना त्यांच्या पायजम्याच्या नाडय़ाला फटाक्याची लड लाऊन ती पेटवून दिली. संपूर्ण गावात या प्रकरणाचा गाजावाजा झाला. त्यानंतर मात्र िझगे गुरुजी दारू पिऊन कधी िझगले नाहीत. लहानग्या ज्योतीचा दारुबंदीचा हा पहिला यशस्वी प्रयत्न.
ज्योतीताई आठवीत शिकत होत्या. वार्षकि परीक्षेचा भूगोलाचा पेपर सुरू होता. एवढय़ात, मावशीच्या घरच्यांनी सांगितले की, ‘ज्योती घरी चल. तुला बघायला आले आहेत. हवे असेल तर १५ मिनिटांनी परत येऊन राहिलेला पेपर सोडव.’ ज्योतीताई सायकलवरून घरी गेल्या. कांदेपोह्य़ाचा कार्यक्रम आटोपून परत शाळेत आल्या आणि पेपर पूर्ण केला. घरी आल्यावर विजय देशमुख यांनी पसंती कळविल्याचे समजले व लग्न करून त्या लखमापूरला आल्या.
सासरी वातावरण शिस्तीचे होते. मात्र थोडय़ाच दिवसांत आपले पतीदेव दारूच्या आहारी गेल्याचे ज्यातीताईंच्या लक्षात आले. काही वर्षे त्यांनी निमूटपणे हा त्रास सहन केला. मग मात्र गावात दारूबंदी होईपर्यंत हा प्रश्न त्यांनी नेटाने लावून धरला.
दारूबंदीची सुरुवात पतीपासूनच करायची असे त्यांनी ठरविले. पतीराजांना ‘आपण दारू का घेता’ असा थेट सवाल करत त्यांनी विषयाला हात घातला. पैशांचे टेन्शन कमी करण्यासाठी गुत्त्यावर जातो, असे उत्तर विजय यांनी दिले. मात्र दारूने कोणताच प्रश्न सुटणार नाही, उलट आíथक स्थिती अधिक बिकट होईल, असे ज्योती यांनी वारंवार समजावून सांगितले. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांच्यासमोर मांडले. त्यानंतर हळूहळू स्थिती बदलली. घरचा हा अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी गावातील दारूचे गुत्ते बंद करण्याचा निश्चय केला.
 सगळ्यात आधी गावातील महिलांना एकत्र केलं. आज नवरा दारू पितो, उद्या मुलगाही असेच वागेल, हे वास्तव त्यांच्यासमोर मांडलं. हे थांबविण्यासाठी आपणच पुढे आले पाहिजे, हे कळकळीने सांगितले. वणीच्या सप्तशृंगीदेवीचा आशीर्वाद घेऊन येथील पोलिसांच्या मदतीने, ग्रामसभेचे आयोजन केले. यासभेत ज्योतीताईंनी दारूच्या दुष्परिणामांवर धाडसी व प्रभावी भाषण केले. याचा सकारात्मक परिणाम झाला. गावातील तरुणांची मनं वळली. आपले व घराचे नुकसान करणाऱ्या विनाशकारी दारूला दूर लोटण्याचा निग्रह झाला व दुसऱ्याच दिवशी गावातले दारूचे गुत्ते फोडण्यात आले.
दारू विक्रेत्यांनी पोलिसांत चोरी व हल्ला केल्याच्या तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी गावकऱ्यांच्या बाजूने कौल देत ही दारूची सातही दुकाने बंद करण्यास मदतच केली. काही महिने चांगले गेले. मात्र पुन्हा गावात दारुडय़ांची संख्या वाढली. शोध घेतल्यावर गावाबाहेरच्या दारूच्या दुकानाचा पत्ता मिळाला. मग ज्योतीताईंनी आपला मोर्चा गावाबाहेरील सरकारमान्य दारूच्या दुकानाकडे वळविला. हे दुकान गावापासून तीन किमीटरवर असल्याने गावकरी तेथे जाऊन दारू पिऊन येत. हे सरकारी दुकान असल्याने ते बंद करणं सोपं नव्हतं. मग ज्योतीताई कामाला लागल्या. सर्वात आधी तसा ‘जी आर’ मिळवणे गरजेचे होते. त्याकरिता नियमानुसार गावातील सुमारे ७०० महिलांच्या सह्या घेतल्या व काम तडीस गेले. त्यानंतर गावात ‘बाटली आडवी’ करण्यासाठी म्हणजे दारुबंदी करण्यासाठी तहसील, जिल्हा परिषद, पोलीस, गृहमंत्री यांच्यापर्यंत पत्रापत्री केली. अर्ज, निवेदने आदी सादर केले. मात्र चित्र बदलत नव्हते. शेवटी ज्यातीताईंनी थेट मुंबईला जाऊन तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेण्याचे ठरविले. याकरिता शंभर महिला कार्यकर्त्यांसह त्या मंत्रालयात गेल्या. त्यावेळी आबांची भेट झाली नाही. मग शिवाजी पार्क येथील एका कार्यक्रमानंतर महिलांनी आबांना गाठलंच. आबांकडे निवेदन दिलं. त्यांच्याकडून आश्वासनही मिळवलं. शेवटी ज्योतीताईंनी नाशिकच्या जनवादी महिला संघटना आणि गावातील महिलांना एकत्र करून १६ ऑगस्ट २००६ला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी परवानगी मागितली, पण ती नाकारली गेली. तरीही ज्योतीताईंनी माघार घेतली नाही. सोबतच्या लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन करण्याचे ठरवलेच. आंदोलनाच्या सकाळी माजी सरपंचाच्या घरी ज्योतीताई यांना बोलावणं आलं. तिथे दारूबंदी अधिकारी हजर होते. अर्थात त्यांना असंही सांगण्यात आलं, ‘बाई, तू या नादी लागू नकोस, तुझा संसार बघ, हाती काही लागणार नाही, उगाच तुझा जीव जाईल.’
पण ‘जगेन तर वाघासारखे’ असे ठाम उत्तर ज्योतीताईंनी दिलं. ‘माझ्या एकीचा संसार तुम्ही वाचवायचा बोलताय, या दारूने हजारो मुलींचे संसार रोज उद्ध्वस्त होतात, त्याचे काय?’ असा थेट सवालही त्यांनी केला. त्यांचा हा पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी नमते घेतले. दुसरीकडे ज्योतीताईंचे सहकारी फोडण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने त्याला यश आले नाही.
 दारूबंदीचा ठराव करण्यासाठीच्या मतदानाच्या वेळीही इथे येणाऱ्या महिलांना धमकाविले गेले. सह्य़ांवरून वादही झाला. मात्र प्रत्येक विरोध महिलांनी एकजुटीने मोडून काढला.
आंदोलनाच्या वेळी लखमापूर फाटय़ाजवळ सुमारे तीन हजार लोक जमा झाले होते. त्यावेळी महिलांना पकडण्यात येणार होते, मात्र पोलिसांनी जेव्हा त्यांची बाजू ऐकली तेव्हा त्यांचाही विरोध कमी झाला. त्यावेळी िदडोरीचे तहसीलदार सुनील वाघ तेथे उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून निर्णय दिला. आणि लखमापूर येथील शेवटची ‘बाटली आडवी’ झाली. दारूबंदी झाली. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश आले.
ज्योतीताईंच्या कामाची पूर्ण गावाने दखल घेतली.  दारूबंदीसाठी त्यांनी  गावकऱ्यांना एकत्र आणले. म्हणूनच गावच्या सरपंच म्हणून त्यांची बहुमताने निवड झाली.
सरपंच झाल्यावर आता ज्योती ताईंनी आपला मोर्चा गावातील विकासकामांकडे वळवला आहे. त्यासाठी पर्यावरणासह अनेक विषयांवर त्यांनी काम सुरू केलंय. याचाच एक भाग म्हणून गावातील प्रत्येक घरासमोर त्यांनी एक नारळाचे झाड लावलंय. त्यामुळे ‘दारू’चे लखमापूर अशी गावाची ओळख पुसली जाऊन ‘नारळी लखमापूर’ अशी नवी ओळख होऊ लागलीय. गावात आजघडीला सुमारे बारा हजार झाडांची लागवड झाली आहे. त्याबरोबरच अर्धा हेक्टर जमिनीवर त्यांनी पन्नास हजार रोपांची रोपवाटिका बनविली आहे. गावाचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ओझरखेड धरण ते लखमापूर अशी पाण्याची पाईपलाईन त्यांनी टाकून घेतली. गावात क्रीडांगणासह वाचनालयही हवं, यासाठी पाठपुरावा केला. अंगणवाडी व शाळांच्या विकासासाठी योजना आखल्या. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी ज्योतीताईंनी गावात अभिनव योजना सुरू केलीय. दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालकांना दहा हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे याची सुरुवात त्यांनी स्वतपासूनच केली आहे. सोबतच स्वताचे अर्धवट राहिलेले शिक्षण ज्योतीताईंना पूर्ण करण्याची आस लागली आहे. त्या म्हणतात, ‘आधी मॅट्रीक पास व्हावं आणि मग एम.एस.डब्लू ची पदवी घ्यावी, असं वाटतंय. जग किती पुढे चाललंय ताई, आपणही वेगाने नवं शिकलंच पाहिजे ना. म्हणूनच मी माझ्या मुलींच्या मदतीने फेसबुकवर माझं खातं उघडलंय.’
ज्योतीताईंच्या कामगिरीविषयी पती विजय भरभरून बोलतात. ‘आमची गाडी ह्य़ांनीच रुळावर आणली, नाहीतर आम्ही भटकलोच होतो’ अशी कबुलीही देऊन मोकळे होतात. ज्योतीताईंचा आतापर्यंतचा प्रवास प्रामाणिकपणा व अथक परिश्रम यांच्या जोरावर झाला.
 अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच त्यांचे पाय जमिनीवर आहेत. विकासाची नवनवी शिखरे गाठण्यासाठी प्रयत्नांची कास त्यांनी सोडलेली नाही. आतापर्यंतच्या प्रवासाबाबत ज्योतीताई सांगतात की, ‘मी नेहमीच प्रामाणिक काम करीत आले. माझ्या मनाला जो रस्ता योग्य वाटला तीच वाट मी धरली, त्यामुळे हे काम मी करू शकले. व पुढेही करणार.’   
फक्त आठवी पास असणाऱ्या व्यक्तीची ही धडाडीची कारकीर्द आपल्याला अवाक्  करून सोडते हे मात्र नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2012 5:35 am

Web Title: and liquor stop
Next Stories
1 सर्वव्यापी ईश्वर
2 र.धों.च्या निमित्ताने : राखीव जागेचा आग्रह
3 शंभर वर्षांचं संचित
Just Now!
X