अभिराम भडकमकर

abhiram.db@gmail.com

‘एनएसडी’ला जायचं ठरलं तेव्हा प्रायोगिक नाटकातल्या एका ज्येष्ठ रंगकर्मीना भेटायला गेलो होतो. ‘‘या क्षेत्रात येण्यासारखी उंची, चेहरा आहे का ते बघ आधी.’’ ते म्हणाले. नटाला असं काही असतं? रंग, चेहरा, दिसणं, उंची? कितपत गरजेचं? मी ओम पुरी वगरेंची उदाहरणं दिली. त्यांनी झिडकारलंच. त्यावरचं उत्तर नंतर ‘एनएसडी’त असताना मिळालं. सरांनी एक किस्सा सांगितला. अल पचिनो रूढार्थाने ‘हॉलीवूडीय’ देखणेपण नसलेला नट. त्याला त्याच्या सरांनी म्हटलं होतं, ‘‘हे बघ निसर्गानं तुला दिलेलं शरीर ही तुझी मर्यादा किंवा चौकट नाही. त्याला कॅनव्हास समज आणि पुरेपूर वापर कर.’’ हे भन्नाट होतं. माझ्या मनातला, नाटकातला पुरुष याबद्दलचे सर्व आडाखे आणि अपेक्षा कायमच्या संपल्या..

कधी कळलं मला माझं हृदय हे पुरुषाचं आहे? मला माझ्यातला पुरुष केव्हा कळला? मी मुलगा आहे हे मला समज येण्याच्या काळातच कळलं. ‘तिन्ही मुलगेच. बहीण नाही?’ हेही ऐकलंय तेव्हा. काहींच्या स्वरात कौतुक तर काहींच्या स्वरात तसं काहीच नाही. पण घरात हळुहळू सगळीच कामं करायची सवय लागली. स्वत:चे कपडे धुण्यापासून वेळ पडली की भांडी घासणं, केर अगदी कोल्हापूरला आम्ही अंगणही सारवायचो, शेण गोळा करून वगैरे. गाद्या तर मुलांनीच घालायच्या आणि काढायच्यासुद्धा. घरात ही कामे बायकी वगैरे कधीच ऐकलं नाही.

वडील फिरतीवर. त्यामुळे हिशोब किंवा बाहेरची काही कामे आईच पाहायची. त्यामुळे ती पुरुषी कामे नव्हती आमच्या दृष्टीनं. नंतर तुम्हाला आलं पाहिजे मोठे झालात आता, म्हणून ही कामंही आमच्या मागे लागली. वडील घरी असले की तेही सर्वासाठी चहाबिहा करायचे. त्यामुळे असं बायकी किंवा पुरुषी घरातल्या वातावरणात नव्हतं. बाहेर मात्र जरा वेगळं वातावरण होतं. मुस्लीम वस्ती असल्यामुळे आजूबाजूच्या खेळगडय़ांमध्ये मुली कमीच किंवा नगण्यच. आणि जरा मोठय़ा होत नाहीत तोवर त्या लग्न करून जायच्या किंवा घरातल्या संसाराच्या प्रशिक्षणात राबायला लागायच्या. पण सोबतच्या काही मुली भोवरा, क्रिकेट, लंगडी, पतंग असं सगळं खेळायच्या. शाळेत मुलं मुली वेगवेगळ्या बेंचवर असायचो. एखाद्या विनोदावर मुली ‘अव्वा ऽऽऽ’ म्हणून एकसुरात किंचाळायच्या तेव्हा ते भारी वाटायचं. त्या आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत याची जाणीव व्हायला लागली होती. पण वेगळ्या म्हणजे कमी किंवा दुय्यम याची नव्हे. मुलींशी बोलल्यावर मुलं चेष्टा करायची म्हणून शेजारची एक मुलगी, रोज एकत्र खेळणारी, एकाच क्लासमध्ये असूनही आम्ही रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूंनी चालत जायचो. क्लासमध्ये एकमेकांशी बोलायचो नाही. मुलं मुलींशी बोलतात ते मुंबईत किंवा सिनेमातच हे घट्ट मनावर बिंबलं होतं.

मुलाला हे आलंच पाहिजे. आणि मुलींना हे जमलंच पाहिजे, हे बिंबवलं जायचा काळही आला. घरात तसा दबाव नसला तरी बाहेर होता. मुलीला काय ते जड सामान उचलायला लावता? मुलींना ते काय करायला लावता? अशा बाबीतून मुलांची कामं आणि जबाबदाऱ्या ठसल्या गेल्या. त्यात शारीरिक व साहसी कामं आपल्याला आली पाहिजेत हे मनावर ठसलं. आपल्या जशा मुलींकडनं काही अपेक्षा असतात तशा त्यांच्याही आपल्याबद्दल अपेक्षा असतात हेही कळू लागलं. दोघंही समाजव्यवस्थेनं ठरवून दिलेल्या आपापल्या भूमिकांमध्ये फिट बसायच्या प्रयत्नाला लागलो. शाळेबाहेरच्या जगात हळवेपणा हा दोष असला तरी शाळा साने गुरुजींची! ‘आंतरभारती.’ त्यामुळे पुरुषाच्या डोळ्यातल्या अश्रूंना एक सन्मान होता. तोही मनावर ठसला. पण पुढे पुढे हळवेपणा हा दोष नसला तरी आपण हळवं असता कामा नये, कारण लोक बुळ्या समजतात, असं वाटायचं. पण तो हळवेपणा काही गेला नाही. काही प्रसंगी चटकन डोळ्यात पाणी येणं हा व्यक्तिमत्त्वाचा भाग झालाच. नंतर तणावमुक्तीमध्ये रडून घेणं हाही एक भाग असतो हे कळल्यावर अश्रू आणि लिंग यांचा काहीच संबंध नसतो हे मनानं घेतलं. पण ते खूप उशिरा.

कोल्हापूरनंतर पुण्यात आलो तेव्हा मुलांमुलींतला मोकळेपणा दिसला. नाटकांच्या तालमीत तर तो अधिकच वाढला. ‘एनएसडी’ला जायचं ठरलं तेव्हा प्रायोगिक नाटकातल्या एका ज्येष्ठ रंगकर्मीना भेटायला गेलो होतो त्यांचा सल्ला घ्यायला. ‘‘या क्षेत्रात येण्यासारखी उंची, चेहरा आहे का ते बघ आधी.’’ ते म्हणाले. नटाला असं काही असतं? रंग, चेहरा, दिसणं, उंची? कितपत गरजेचं? मी ओम पुरी वगरेंची उदाहरणं दिली. त्यांनी झिडकारलंच. उगाच वेळ वाया जाईल, असा त्यांचा सल्ला मिळाला. संध्याकाळी एका मित्राशी बोलत होतो. त्यानं उत्तम अभिनेता असूनही उंची आणि चेहरा नाही, असं म्हणत नाटकाचा नाद सोडून दिला होता. त्याला विचारलं तर तो मित्र म्हणाला, ‘‘आपल्याकडे सिनेमा म्हणजे कपडे घालून केलेल्या ब्ल्यू फिल्म्स असतात. त्यामुळे दिसणं महत्त्वाचंच. आपण रात्री बायकांच्या स्वप्नात येण्यासारखे आहोत का? याचा विचार करून मी मुकाटय़ानं एमबीए करायला घेतलं.’’ नाटकातला पुरुष कसा असावा याचेही आडाखे असतात तर! पण ‘एनएसडी’त असताना सरांनी एक छान किस्सा सांगितला. अल पचिनो रूढार्थाने ‘हॉलीवूडीय’ देखणेपण नसलेला नट. त्याला त्याच्या सरांनी म्हटलं होतं, ‘‘हे बघ निसर्गानं तुला दिलेलं शरीर ही तुझी मर्यादा किंवा चौकट नाही. त्याला कॅनव्हास समज आणि पुरेपूर वापर कर.’’ हे भन्नाट होतं. माझ्या मनातला, नाटकातला पुरुष याबद्दलचे सर्व आडाखे आणि अपेक्षा कायमच्या संपल्या आणि जबाबदारी वाटली की या कॅनव्हासचं आपण काय करू शकतो?

एकूणच बरोबरच्या मुली जशा एका रूढ साच्यात फिट बसू बघत होत्या, आम्ही मुलंही त्याच प्रयत्नात होतो. बरं त्यातच आमचा दिग्दर्शक मित्र सुहास कुलकर्णीनं एकदा एका नाटकाची तालीम घेताना, ‘‘लहान पडता तुम्ही या भूमिकांत. अजून तुमच्यात तो पुरुषी इगो नाही डेव्हलप झालेला,’’ असं म्हटलं. आता हे काय असतं अजून? असा प्रश्न पडल्यावर त्यानं, ‘‘कळेल कळेल’’ म्हटल्याचं आठवतं. दरम्यान, स्त्रीविषयक काम करणाऱ्या मित्रांबरोबरही गप्पा व्हायच्या. त्यांच्या बोलण्यात आपण पुरुष म्हणून स्त्री जातीवर केलेल्या अन्यायाबाबत एका गिल्टचं प्रकटीकरण असायचं. त्यात सतीप्रथा, केशवपन वगैरे बाबींची चर्चा व्हायची. या आता कालबाह्य़ झालेल्या अन्यायांवर पोटतिडकीनं बोललं जायचं, पण आता त्याचं काय? तेच तेच का उगाळायचं? असं कुणी विचारलं की त्याच्याकडे सर्व अन्यायकर्त्यांच्या समर्थकाच्याच भूमिकेत पाहिलं जायचं. आपण त्या संस्कृतीचा एक भाग आहोत असं म्हटलं जायचं. पण त्याच संस्कृतीसोबत कर्वे पिता (व खासकरून) पुत्र, फुले दांपत्य, जगन्नाथ शंकरशेट, हमीद दलवाई, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतही वाचन वाढत होतं. आणि आपण दोहोंपैकी कुठल्या पुरुषात असणार आहोत याचा विचार होत चालला होता. केशवपनाच्याच काळात सुनेला लिहायला, वाचायला शिकवून आलेल्या पाहुण्यांसमोर वाचायला लावणारा सासरा वाचनात यायचा. मग आपल्याकडच्याच नव्हे, तर बाहेरचं जग, समाज, मानवी संस्कृती, अगदी वेगेवगळ्या देशातल्या जात, पंथ, रंग, भाषांच्या संस्कृतीसुद्धा स्त्रियांबाबत असहिष्णुच होत्या हे लक्षात येऊ लागलं होतं. आणि ‘तसे’ पुरुष आणि आपण यात अंतर असायला हवं हे मनावर ठसत चाललं होतं. त्यासाठी कंठाळी वा कर्कश होण्याची गरज भासत नव्हती. उलट आपल्या जगण्यात हा सहजभाव असायला हवा, असं जाणवत राहायचं. एकदा एका मत्रिणीनं एकांकिकेत काम करशील का? असं विचारून, तुला स्त्री दिग्दर्शिकेच्या हाताखाली काम करायला लाज नाही ना वाटणार? असा मनातही न आलेला प्रश्न विचारून चकित केलं होतं. नंतरही अनेक स्त्रीदिग्दर्शिकांच्या हाताखाली काम करताना हे असलं काही जाणवलं नव्हतं. त्या ना शारीरिक कष्टात मागे असायच्या ना सर्जनशीलतेत. त्यांनी सेटवर, तालमीत कधी स्त्री असल्याची सूट मागितली नाही की त्याचं शस्त्र केलेलं दिसलं नाही. मला वाहन चालवायचा कंटाळा. एकदा एक मत्रीण रस्त्यात भेटली. तिच्या स्कूटीमागे मी मजेत रस्त्यावरून फिरलो, तर म्हणाली, ‘तुला ऑकवर्ड नव्हतं ना झालं?’

पुरुषीपणाच्या रूढ व्याख्यांशी मी मला का आणि कसं जोडलं नाही, याचं मला उत्तर सापडत नाही. म्हणूनच या विषयावर बोलताना माझ्याकडे खरंच काही वेगळं आहे का सांगायला असं वाटत राहतं. आजही घरी काम करायला येणारी मुलगी मोठय़ा सुटीवर असेल तर मी संडासही साफ करून टाकतो. फरशी पुसणं वगैरे तर मला कामच वाटत नाही. याचा आणि पुरुष असण्याचा काही संबंध सुरुवातीपासूनच, घरापासूनच जोडला गेला नसल्याचा हा परिणाम असेल का?

स्त्री वा पुरुष असणे याचे फायदे-तोटे यावर एकदा गप्पा सुरू होत्या. ‘मुलींचं बरं असतं, या क्षेत्रात नाही काही जमलं तर लग्न करून सेटल होता येतं. मुलांना मात्र स्वत:ला सिद्ध केल्याशिवाय घरीदारी सन्मान मिळत नाही,’ कुणी असा विचार मांडला. कुणी म्हटलं, ‘स्त्रीच्या वाटय़ाला निसर्गानं फारच त्रासाचा काळ आणलाय. पाळीच्या वेदना, बाळंतपण वगैरे. त्यात धार्मिक पुस्तकात या वेदना व बाळंतपणातला पुनर्जन्म हे तिनं परमेश्वराची आज्ञा न जुमानल्याची शिक्षा आहे, असं म्हणून कसं पवित्र व जस्टीफाय करून टाकलंय.’ मी म्हटलं, ‘‘आणि या अशा अन्यायांबाबतीत मात्र ‘सर्वधर्मसमभाव’ आहे. तिथे कुठे एकाच धर्माला वेगळं काढता येत नाही.’’ अशा वेळी धर्मालाही न जुमानता स्वत:ला वेगळं काढता आलं पाहिजे, असंही बहुतेकांनी म्हटलं. तेव्हा मला ते माझ्यासारखेच वाटले. मजा म्हणजे मी दुसऱ्या दिवशी आमच्या एका डॉक्टरांशी या गप्पांबद्दल बोलत असताना त्यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले, ‘पण स्त्रीच्या प्रत्येक अवस्थेचा सोहळा करायची परंपरा आहे. नहाण आलं की सोहळा. गर्भवती झाल्याचा, बाळंत झाल्याचा.. पुरुषांना मात्र सर्व अवस्थांना भीत भीत किंवा चोरून चोरून सामोरं जावं लागतं. अवस्थांतराबाबत मित्र- जे याच अवस्थेत असणार व ऐकीव ज्ञान देणार- पिवळी पुस्तकं वगैरेतून. कधी पहिली स्वप्नावस्था याबद्दल आहे एखादा सोहळा? कुठला बाप आमच्या मुलाला स्वप्नावस्था झाली हे अभिमानानं सांगतो? अरे अन्याय तर आपल्यावरही झालाय.’ म्हणत खूप हसवलं होतं.

एकुणात माझ्यातल्या मुलाचा पुरुष होताना आजूबाजूचा समाज, झिरपत आलेल्या समजुती, धारणा-कल्पना, माझं वाचन, विचार, समंजस मित्रमत्रिणींशी होणाऱ्या गप्पा यातून घडत गेला. मनोरंजनाची माध्यमं, वृत्रपत्रांतील बातम्या यातून दिसणारं पुरुषाचं भयावह रूप मला विचलित, स्तिमित करतं आणि काळजीही करायला लावतं. त्याच्या त्या कृत्यात मला पुरुष नाही पशू दिसतो आणि त्याचबरोबर समाजाच्या नजरेतली आणि नजरियाँतली स्त्री आपल्यातून घडवण्याचा आटापिटा करणाऱ्या आमच्या क्षेत्रातल्या काही मुली पाहूनही तसंच दुख होतं. मग एक बाब लक्षात आली ‘युवर नेचर इज डेस्टीनी.’ असं शेक्सपियर म्हणतो तसं आहे ते. लिंग हा तपशील आहे. त्या पलीकडेच तुम्ही असता. आणि तसेच असायला हवात. आणि प्रत्येक काळात हे पटवून देणारी उदाहरणं दिसतात. शंकराचार्याबरोबर वाद घालणारी मंडनमिश्र यांची पत्नी दिसते. आणि तिचाही त्या वादात उतरण्याचा हक्क मान्य करणारी जी माणसं त्याही काळात आजूबाजूला असतील मी मला त्यात पाहातो. मुद्दे महत्त्वाचे, मग ते कुणी का मांडेनात. निसर्गानं केलेला भेद वा दिलेली जबाबदारी या पलीकडे कसलाच फरक का असावा? त्यापल्याडचा प्रत्येक फरक मानवनिर्मित नाही का? मुळात हृदयाला लिंगच नसते. ते असलेच तर मेंदूला असेल, असं मला वाटतं. आणि मेंदूचं कंडिशनिंग झालेलं असतं हेही लक्षात ठेवायला हवं. सेक्स ही मेंदूतून घडणारी पण शरीराच्या माध्यमातून होत जाणारी क्रिया आहे. हृदयाचं काम प्रेम करण्याचं. निरपेक्ष प्रेम करण्याचं. लिंगनिरपेक्ष नजरेनं प्रेम करण्याचं.

माझा सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक परिसर, माझं बॅग्राऊंड, शिक्षण, जुने झिरपत आलेले संस्कार, नव्याने घडलेले व चिंतन, मननातून स्वीकारलेले विचार, अनुभव, आजूबाजूचं जग पाहणं, पुस्तकं, यातून मी चुकतमाकत, बदलत, घडत वा बिघडत जात राहतो. माझं पुरुष असणं हे तपशिलापुरतंच राहावं अशा प्रयत्नात..

कधी यश मिळतं कधी अपयश..