मी लहानपणापासून अबोल, मितभाषी, अंतर्मुख, एकलकोंडा, पुस्तकातला किडा, लोकांपासून दूर राहणारा. मला दोन भाऊ. पण घरी कोणी पाहुणे आले की मी घराबाहेर. त्यामुळे लोकांना वाटायचं की यांना फक्त दोनच मुले आहेत. जर मी एखाद्या घरी पूजेला वगैरे गेलो तर तिथले एखादे पुस्तक किंवा मासिक उचलून वाचत बसायचो. एका घरी तर मी ‘स्वामी’ कादंबरी एका बैठकीत अर्धी वाचून काढली होती. मी कोणाशी फारसा बोलायचो नाही. भाषण तर दूरच.  
मिठीबाई महाविद्यालयात बी.एस्सीच्या पहिल्यावर्षी  एन.एस.एस.मध्ये भाग घेतला. हळूहळू प्रामाणिकपणे काम करीत असताना आमच्या रावळसरांच्या गळ्यातला ताईत झालो. त्यांनी मला ‘लीडर’ बनवले. एकदा सरांनी आमच्या महाविद्यालयात मानसशास्त्र शिकवणाऱ्या एका सरांचे आस्तिकतेवर व्याख्यान ठेवले होते. मला सरांनी मागे बसवले होते. जसे व्याख्यान संपले तसे सरांनी मला इशारा केला. तेव्हा मला कळले की मला आभार प्रदर्शनासाठी बसवले होते. कसाबसा हिय्या करून आभार प्रदर्शनासाठी उभा राहिलो.  माझ्यासमोर बसलेल्या मित्रांनी मला बघून टाळ्या वाजवल्या. त्यामुळे हुरूप आला. मी जमेल तसे आभारप्रदर्शन केले. तेव्हा त्या सरांना पडल्या नाहीत एवढय़ा टाळ्या मला मिळाल्या. तोच माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट. एक अबोल माणूस आता ‘बोलणार’ होता..
आणि खरेच मी त्यानंतर गप्प बसलो नाही. भाषणं सुरूच झाली. आणि थोडी-थोडकी नाही तर ७०० विद्यार्थासमोर भाषणे केली. छात्रभारती विद्यार्थी संघटनेत असताना मढ बेटावरील कोळी समाजासमोर  भाषण केले. नंतर नोकरी सुरू केली ती शाळेत. तिथे बोलण्याशिवाय पर्यायच नसतो. पण शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर पहिला तास घेताना भीती वाटलीच. पण विचार केला की, आपण महाविद्यालयात असताना ७०० विद्यार्थ्यांचा नेता म्हणून वावरलोय. हे तर नववीचे विद्यार्थी. त्यानंतर अनेक ‘शिक्षकांसाठी’ असलेल्या वक्तृत्व स्पर्धात भाग घेतला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. तेव्हापासून आजतागायत मी मागे वळून पाहिले नाही. आता मला बोलताना ‘थांब’ म्हणून सांगावे लागते. हे सर्व मिठीबाई कॉलेजच्या तेव्हाच्या एन.एस.एस.प्रमुख रावळ सरांमुळे घडले. त्यांना धन्यवाद.