News Flash

.. आणि ‘सह’वास वाटय़ाला आला

‘‘मला वेळ मिळतो आणि करायला काही नसतं ही गोष्ट वसंतरावांच्या लक्षात आली आणि आपले हात बांधल्याने हिच्यासाठी आपण काही करू शकत नाही ही जाणीवही होत

| January 11, 2014 06:36 am

‘‘मला वेळ मिळतो आणि करायला काही नसतं ही गोष्ट वसंतरावांच्या लक्षात आली आणि आपले हात बांधल्याने हिच्यासाठी आपण काही करू शकत नाही ही जाणीवही होत होती. एक दिवस ‘सायन्स टुडे’ मधल्या लेखांचं भाषांतर कर, असं त्यांनी मला सुचवलं. वाटलं, विज्ञान न शिकलेल्या मला ते लेख समजून घेऊन भाषांतर करणे जमेल का? पण मग मला आणि त्यांना एकत्र बसून बोलायला एक कारण मिळालं. ‘सह’चा अभाव थोडा कमी झाला. त्या लेखमालेत इस्रोची ओळख करून देणारं एक प्रकरण घालून मी भाषांतर पूर्ण केलं. पुढे ते लेख पुस्तकरूपात प्रसिद्धही झाले.’’ सांगताहेत लेखिका सुधा गोवारीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्याबरोबरच्या आपल्या ४९ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
व संतराव आणि माझे सहजीवन पारंपरिक रीतीने सुरू झाले आणि जबाबदाऱ्यांची वाटणीही पारंपरिक आणि सरळ! त्यांनी अर्थार्जन आणि मी घरसंसार. पहिली दोन वर्षे परदेशात सहजपणे निघून गेली. एकमेकांचा परिचय झाला आणि मला नवीन जगाचे दर्शन झाले. आमची पहिली मुलगी अश्विनी तिथेच जन्मली. भारतात परतल्यावर आमची खरी कसोटी लागली. सहवास नसलेलं सहजीवन सुरू झालं. ते भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्रिवेंद्रमला दाखल झाले, त्यांच्या मागोमाग मीही! आम्ही दोघंही आपापल्या परीने आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करू लागलो.
   वसंतरावांचं काम अवघडच होतं. जिथे काही नव्हतं तिथे काही तरी घडवायचं होतं; पण या कामात संवादभाषा आणि विषयातले ज्ञान या दोन्हींत अडचण नव्हती. कामाचे तास साधारण १२ ते १४ इतके असत. माझी स्थिती दयनीयच होती. कामवाल्या, भाजीवाले, वाणी, इतर दुकानदार यांच्याशी माझी गाठ होती. त्याकरिता स्थानिक भाषेची गरज होती. मला तर त्या भाषेचा गंधही नव्हता. मग थोडं इंग्रजी, थोडं हिंदी आणि बाकी हातवारे यांच्यावर काम भागवावं लागे. माझ्यासाठी ते फारच अवघड होतं, पण ते सांभाळत जीवन पुढे रेटत होते आणि त्यात हवाहवासा वाटणारा ‘सह’वास वाटय़ाला येत नव्हता.
   त्या वेळी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे वसंतराव मुळात कुटुंबवत्सल होते. त्यांना वेळ मिळत नाही हे मला कळू शकलं, पण मुलींचे काय? त्यांना काय वाटलं असतं? घरी कितीही उशिरा आले तरी मुलींना गाडीत बसवून एक फेरफटका मारायचा असा त्यांनी एक अलिखित नियम केला. त्या वेळी एखादं आईस्क्रीम किंवा काही सरबत वगैरे व्हायचंच. याला मुलींनी ‘भटक्या मारणं’ असं नाव दिलं होतं. तसंच शनिवार-रविवारी त्यांना काम असे. त्याकरिता स्वतंत्र खोली असूनही वसंतराव घराच्या मध्यान म्हणजे जेवणाच्या टेबलावर काम घेऊन बसत. आजूबाजूला आरडाओरडा, पळापळी चाले, पण त्यांची समाधी कधी भंग होत नसे. एखाद्या शनिवार-रविवारी त्यांना ऑफिसमध्ये जावं लागे. अशा वेळी एक तर आम्हाला प्राणिसंग्रहालयात सोडून जात आणि काम झालं की परत घरी नेत. कधी कधी तर ते चक्क आम्हा सगळ्यांना ऑफिसमध्ये घेऊन जात. तिथला परिसर अत्यंत रम्य होता. समुद्रकिनारा, मस्त बगीचा वगैरे. मुली तर त्यांच्या खोलीतल्या फळ्यावरसुद्धा खूश असत. त्यानंतर कॅन्टीनमध्ये जेवण. पोरींना धम्माल!
घरी आल्यावर पाहुण्यांनाही संध्याकाळच्या भटक्यांचा आस्वाद मिळे. फक्त त्या भटक्या शहराच्या मुख्य रस्त्यावरून असत. त्यानंतर आईस्क्रीम किंवा मिल्कशेक व्हायलाच हवे. माझ्या आईला तर मिल्कशेक जायचा नाही, पण जावयांना नाही कसं म्हणायचं म्हणून ती तो रिचवायची. माझी आई माझ्या घरी फक्त एकदाच आली. त्या वेळी एक रात्र वसंतराव घरीच आले नाहीत. मला माझ्या आईची काळजी. तिला काय वाटेल, घरी जाऊन ती काय आठवेल, हेच विचार रात्रभर छळत होते. शेवटी ती आई होती व तिला आपल्या मुलीची चिंता वाटणारच. त्यादिवशी साहेब सकाळी ७ नंतर उगवले आणि आल्याबरोबर ‘रेडिओ लाव’ म्हणाले. बातम्यांत जावयाचं नाव ऐकून आई रात्रीची गोष्ट विसरली. मी सुटकेचा नि:श्वास टाकला. भारत आपल्या इंधनाच्या जोरावर अग्निबाण अंतरिक्षात पाठवू शकेल हे सिद्ध करणारा एक छोटा अग्निबाण त्या पहाटे उडविला गेला होता. साल होतं १९६९.
    भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम प्रगतिपथावर चालला होता. माझेही दिवस भाषा शिकण्यात, मुलींना शिकवण्यात, त्यांचे कपडे शिवण्यात, घर सजविण्यात, पाहुण्यारावळ्यांच्या आगतस्वागतात चालले होते. जुजबी मल्याळम मला येऊ लागले होते. त्यामुळे जीवन सुलभ होऊ लागले होते. त्या रामरगाडय़ात १९७६ साल उजाडले. त्या वर्षी आमची सगळ्यात धाकटी मुलगी पूर्णवेळ शाळेत जाऊ लागली. सकाळी नऊ ते संध्याकाळी चार संपूर्ण वेळ मोकळा. घर खायला उठू लागलं. शिवण, भरतकाम, सजावट यात तितकंसं मन रमेना. गेली काही वर्षे मुलांच्या संगोपनात गेल्याने आपल्याला वाचायला आवडतं आणि येतंही हे बहुधा मी विसरले होते. ते आता डोकं वर काढू लागलं होतं. तेव्हा मी वाचनालयाचा रस्ता धरला. नगर वाचनालय, ब्रिटिश वाचनालय आणि मुलींकरिता आणखी एक अशी तीन वाचनालये गाठली. चार पुस्तके वाचून झाल्यावर मला जरा शांत वाटू लागलं. एवढंच नाही, पुन्हा शिवण वगैरेतही मन लागू लागलं.
मुली मोठय़ा झाल्या म्हणून मला वेळ मिळू लागला, पण ह्य़ांचं काय? ते आपल्या कामात अधिकच गुरफटू लागले. त्यांच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. त्रिवेंद्रमला आल्या आल्या त्यांनी ‘सायन्स टुडे’ या मासिकाकरिता ‘अग्निबाण’ या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. मला वेळ मिळतो आणि करायला काही नसतं ही गोष्ट वसंतरावांच्याही लक्षात आली आणि आपले हात बांधल्याने हिच्यासाठी आपण काही करू शकत नाही ही जाणीवही होत होती. एक दिवस ‘सायन्स टु डे’मधल्या लेखांचं भाषांतर कर, असं त्यांनी मला सुचवलं. प्रथमदर्शनी हे अवघड वाटले. विज्ञान न शिकलेल्या मला ते लेख समजून घेऊन भाषांतर करणे जमेल का? पण मग लगेचच वाटलं, जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. मला न समजलेल्या गोष्टी त्यांनीच समजावून द्याव्यात. ही दुसरी गोष्ट आमच्या दोघांच्या फायद्याची होती. मला आणि त्यांना एकत्र बसून बोलायला एक कारण मिळालं. मुली, घर, शाळा, वसंतरावांचं जेवण आणि झोप यापेक्षा वेगळा विषय! मग अधूनमधून माझे पाठ सुरू झाले. ‘सह’चा अभाव थोडा कमी झाला. मला आपली बुद्धी वापरायची संधी मिळाली. त्या लेखमालेत इस्रोची ओळख करून देणारं एक प्रकरण घालून मी भाषांतर पूर्ण केलं. सुदैवाने पुणे विद्यापीठाच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमांतर्गत ते लेख पुस्तकरूपात प्रसिद्धही झाले.
  लिखाणाचा हा अनुभव गाठीशी बांधल्याने मला आत्मविश्वास आला. १९८० भारताने स्वत:च्या अग्निबाणातून एक छोटा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडला. त्याकरिता आपल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्रिवेंद्रममध्ये चाललेल्या अंतरिक्ष कार्यक्रमाची होत असलेली नेत्रदीपक प्रगती आपल्या मराठी बांधवांना कळावी या हेतूने मी लेख लिहू लागले. एव्हाना वसंतरावांबरोबरचा माझा संवाद केवळ गुरुशिष्य पातळीवर राहिलेला नव्हता. मी कधी कधी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही बारकावे मला तिथे दिसत. व्यवस्थापन, आपल्या गटाला पुढे घेऊन जाण्याचे कौशल्य, कामाची जिद्द हे पैलूही दिसत, पण मला सर्वात भावलेला त्यांचा गुण म्हणजे सहृदयता. अगदी सुरुवातीच्या काळात स्फोटके वापरताना काळजी घेण्याकरिता लागणाऱ्या सुविधा फारच अपुऱ्या होत्या. त्या वेळची एक गोष्ट. इंधन बनत असताना लहानसा स्फोट झाला. रात्रीची गोष्ट, त्यांना फोन आला. ते लगेच निघाले. पोहोचेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली होती. सगळेच त्याकरिता झटत होते. एकाचा हात भाजला होता, तोही आपली दुखापत विसरून त्यांना मदत करीत होता. वसंतराव पोहोचले तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले. त्यांनी त्या माणसाच्या पाठीवर हात फिरवला. झालं! त्याला रडूच फुटलं. इतका वेळ त्याला आपल्या हाताकडे लक्ष द्यायला वेळच झाला नव्हता.
   सुट्टी घेऊन कुठे तरी जाणं हे आमच्या क्वचितच वाटय़ाला येई. बऱ्याच सुट्टय़ा आम्ही त्रिवेंद्रममध्येच घालवल्या. अशा वेळी मुलींसाठी काही कार्यक्रम तयार करणे हे माझे काम असे. त्यांना कशाने मजा येईल याचा अंदाज घेत घेत मी काही तरी करत असे. कधी पुण्या-मुंबईला लग्नकार्य निघालं तर मग तिकडे जाण्याची संधी मिळे आणि मुलींच्या सुट्टय़ा चालू असताना वसंतरावांना कुठे जायची वेळ आली, तर मात्र आम्ही गाडी काढून जात असू. अवधी मिळत नाही म्हणताना त्या काळात उटकमंड, अलवाई, श्रीहरीकोटा आणि बंगलोर-म्हैसूर या ठिकाणांना आमच्या भेटी झाल्या. तसंच त्रिवेंद्रमजवळचे समुद्रकिनारे, प्राणिसंग्रहालये, धरणे इत्यादी ठिकाणीही आम्ही जाऊन आलो.
मुली मोठय़ा होत होत्या आणि आम्ही दिल्लीला गेलो. कल्याणी आणि इरावती पुण्याला शिक्षण पूर्ण करण्याकरिता राहिल्या आणि अश्विनीला घेऊन आम्ही दिल्ली गाठली. पहिले वर्ष नवीन ठिकाण, लोक, काम यांच्या परिचयातच गेली, पण नंतर थोडी फुरसत मिळू लागली. एकमेकांबरोबर घालवण्याचे प्रसंग वाढले. दिल्लीला गेलो तेव्हा ‘भारतीय मौसम विभाग’ हा वसंतरावांच्या अखत्यारीत होता. पावसाची अनुमाने अचूक येत नाहीत. सर्वत्र त्याची चर्चा होते, हे वसंतरावांना सहन होत नसे. मौसम विभागात काम करणारे अधिकारी तज्ज्ञ होते. असे असूनही पावसाचे अंदाज बरोबर का येऊ नयेत, हा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्याची परिणती म्हणजे चर्चा, पूर्वीच्या १०० वर्षांतली अनुमाने आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी आणि नव्याने संशोधन. रोज रात्री कामाच्या वेळेनंतर त्या सगळ्याचा अभ्यास होई. शेवटी मंडळींनी पावसाकरिता लागणारे १६ घटक निश्चित केले. त्यावर आधारित एक मॉडेल तयार झाले. त्यानुसार पहिले अनुमान प्रसिद्ध केले. साल होते १९८८. ते तर अचूक ठरलेच, पण त्यानंतर १३-१४ वर्षे त्या मॉडेलनुसार केलेले अनुमान बहुतांशी बरोबर येत गेले. सहकाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे, त्यांच्याबरोबर कामात झोकून द्यायचे हा वसंतरावांचा गुण पुन्हा सिद्ध झाला.
    पाहाता पाहाता १९९३ साल उजाडले. निवृत्तीची वेळ झाली आणि आमच्या स्वाऱ्या पुण्यात येऊन धडकल्या. निवृत्त झाले म्हणून काम संपले असे आजपर्यंत झालेले नाही. १९९८ पर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. त्यानंतर लगेचच खतांवर विश्वकोश करण्याचे काम हाती घेतले. आजपर्यंतच्या आणि या कामात एक फरक होता. या कामात मी अधिकृतपणे सहभागी झाले. पाचांपैकी एक लेखिका झाले. मग मात्र आमचा सहवासच सुरू झाला आहे.
गेल्या ४९ वर्षांवर नजर टाकली, तर आमचे स्वभावगुण एकमेकांना पूरक होते असे लक्षात येते. दोघंही रागीट नसल्याचा आम्हाला खूप फायदा झाला. ते वेळ देऊ शकले नाही म्हणून त्यांना पर्वा नाही, असं मला कधीच वाटलं नाही. तसंच आम्ही दोघं सोशिक आहोत म्हणून आमच्यात गैरसमज, वादावादी, भांडणं सहसा झाली नाहीत आणि म्हणून सुरुवातीची उमेदीची वर्षे सहवासाविना घालवावी लागली तरी आम्ही अवास्तव दु:खी न होता नेहमी पुढे पाहात राहिलो.
     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 6:36 am

Web Title: and we become companion for life
Next Stories
1 हा इतिहासाचा कौल आहे!
2 भावनांची ताकद
3 शब्दांचे भरले रांजण!
Just Now!
X