जिआन हुअँग़ ग्रुप या बलाढय़ कंपनीची संस्थापक आणि संचालक अ‍ॅनी गॅन.
पुरुषांचा वरचष्मा असलेल्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात तग धरून राहणे एका स्त्रीसाठी कठीण असते, पण ती यशस्वी ठरली, असे ती सांगते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेलेले बालपण, न कळत्या वयात अंगावर पडलेली कुटुंबीयांची जबाबदारी, अपुरे शिक्षण या सर्वावर मात करत या क्षेत्रात गाठलेली उंची लक्षणीय आहे. त्या अ‍ॅनीविषयी..
जगभरातील एकूण रबर उत्पादनाच्या ७२ टक्के रबराचे उत्पादन मलेशियात होते. त्यामुळे रबर टॅपिंग (रबराच्या झाडांतून, बुंध्यातून सुई आणि धारदार चाकूच्या आधाराने द्राव बाहेर काढणे) हा उद्योगही इथे मोठय़ा प्रमाणावर चालतो. आता बहुतांश ठिकाणी आर्टिफिशल रबर टॅपिंग सिस्टीम या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी मलेशियातील अशिक्षित किंवा अल्पशिक्षित लोकांचे हेच रोजगाराचे प्रमुख साधन होते.
अशाच रबर टॅपिंग करणाऱ्या आणि अतिशय गांजलेल्या एका महिलेची अ‍ॅनी गॅन ही मुलगी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत आज ती ‘बिल्डिंग आणि डिझाईन’ या क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या ‘जिआन हुअँग़ ग्रुप’ या सिंगापूरस्थित बलाढय़ कंपनीची संस्थापक संचालक बनली आहे.
मलेशियाच्या क्वालालम्पूरजवळील कॅम्पुंग या एका छोटय़ाशा गावात जन्मलेली ही अ‍ॅनी सहा भावंडांत सर्वात मोठी! तिचे वडील एका रबर टॅपिंग व्यावसायिकाकडे सुपरवायझर म्हणून काम करत, तर आई रबर टॅपिंग मजूर म्हणून तिथेच काम करीत असे. अ‍ॅनी जेव्हा पाच वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांना अपघात झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सहा मुलांची जबाबदारी अ‍ॅनीच्या आईवर येऊन पडली. रबर टॅपिंगमध्ये तिला अगदीच मामुली पसे मिळत, त्यात सात जणांचा प्रपंच चालवणे अवघड होते.
 अपुऱ्या उत्पन्नामुळे अ‍ॅनीच्या आईने आणखी एका पाम ऑइल कंपनीत मजुरीचे काम सुरू केले. पहाटे चार वाजता उठून सर्वाचा स्वयंपाक करून ती कामावर जात असे. दुपारी २ वाजता घरी परतल्यावर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक आटोपून दुसऱ्या कामावर जात असे. यात अ‍ॅनीच्या आईची खूप ओढाताण होऊ लागली आणि तिची प्रकृतीही खालावली. अ‍ॅनी सर्व भावंडांत मोठी असल्याने हळूहळू सकाळ- संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. परिस्थिती फारच प्रतिकूल होऊ लागली आर्थिक चणचण तर होतीच, त्यात भावंडांची जबाबदारी, त्यामुळे तिला शाळादेखील सोडावी लागली. ती सांगते, ‘‘मला या गोष्टीचे खूप दु:ख झाले. मला शाळा आवडत होती. अभ्यासातही मी चांगली होते. वर्गात माझा पहिल्या दहात नंबर असायचाच; पण एके दिवशी आईने सांगितले की, तिच्याने आता माझ्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही, त्यामुळे मी शाळा सोडली पाहिजे.’’ तिच्या इतर मत्रिणी जेव्हा माध्यामिक शाळेत गेल्या तेव्हा अ‍ॅनी आपल्या आईप्रमाणेच रबर टॅपिंगच्या कामाला जाऊ लागली; पण तिला पुढे शिकायचे होतेच, कसेही करून. ती जेव्हा १४ वर्षांची झाली तेव्हा दूरच्या नात्यातल्या एका काकांकडे तिने मदत मागितली आणि आपल्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची विनवणी केली. त्याने तिला क्वालालम्पूर येथील ‘क्युएन शेंग गर्ल्स स्कूल’मध्ये प्रवेश मिळवून दिला व तिच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलला; पण आपला स्वत:चा इतर खर्च भागवण्यासाठी तिने ‘केन्टकी फ्राइड चिकन’मध्ये अर्धवेळ नोकरी धरली.  
शाळेतली तीन वष्रे जेमतेम पूर्ण झाली नव्हती तोच अ‍ॅनीच्या आईने तिला निरोप धाडला की, नोकरी आणि मुलांना बघताना तिची फारच ओढाताण होत असून तिचे दोन भाऊ अगदी वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असून तिने परत माघारी यावे. आईचा असा निरोप आल्यावर अ‍ॅनीचाही धीर सुटला आणि कुटुंबीयांच्या काळजीने ती परत आपल्या घरी गेली; पण तिने शिक्षण मात्र सोडले नाही. चुंग हुआ हायस्कूलमधून तिने ‘ओ’ लेव्हलचे शिक्षण पूर्ण केले. मग मात्र लगेचच तिने सिंगापूरला प्रयाण केले. आपण सिंगापूरमध्ये नोकरी करून घरच्यांना हातभार लावावा आणि जमल्यास इतर कोस्रेस करावेत, हा विचार करूनच नोकरीच्या शोधात तिने सिंगापूर गाठले.
नोकरी मिळायला तिला फार त्रास झाला नाही. ‘सी अ‍ॅन्ड एस’ या कंस्ट्रक्शन कंपनीत तिला अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क म्हणून ८०० डॉलर प्रतिमहिना एवढय़ा पगारावर नोकरी मिळाली. आपली गरज भागवण्यासाठी जेमतेम ३०० डॉलर स्वत:जवळ ठेवून उरलेले पसे ती आपल्या कुटुंबीयांना पाठवत असे. यापकी ८० डॉलर्स राहण्यासाठीच्या खोलीचे भाडे म्हणून जात. ही खोली इतर सहा जणांबरोबर ती शेअर करीत होती. ‘‘बिकट परिस्थितीत वाढलेली माझ्यासारखी मुले जात्याच कष्टाळू असतात. आम्हाला लढवय्ये बनावेच लागते. मला या व्यवसायातले काहीएक ज्ञान नव्हते; पण ते आत्मसात करण्याची मला इच्छा होती. सुदैवाने इथे मला खूप चांगले वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी मिळाले. या व्यवसायाशी संबंधित खाचाखोचा ते मला समजावून सांगत. मला जे कोस्रेस शिकण्याची इच्छा होती त्यासाठी त्यांनी पसेदेखील दिले,’’ असे ती सांगते.
साधारण तीन वर्षांनंतर तिचा पगार १८०० डॉलर्स प्रति महिना इथपर्यंत पोहोचला आणि एक छोटेसे घरही तिने घेतले; पण काही दिवसांतच ही नोकरी तिने सोडून दिली. कंपनीच्या व्यवस्थापनात अचानक झालेला बदल आणि एका सहकाऱ्याने तिच्यासमोर ठेवलेला एक प्रस्ताव अशी दोन कारणे त्यामागे होती. तिच्या एका मलेशियाच्या सहकाऱ्याला ‘प्रोप्रायटरशिप’खाली आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता आणि बँकिंग व्यवहारांसाठी आवश्यक ‘पीआर’ नव्हता. म्हणून कंपनी  अ‍ॅनीच्या नावे सुरू करून तिला २००० डॉलर्स पगार त्याबदल्यात दिला जाईल, असा प्रस्ताव त्याने ठेवला आणि तिने तो स्वीकारला. यामागच्या धोक्यांची त्या वेळी तिला कल्पना आली नाही.
दोन वष्रे सगळे सुरळीत सुरू होते आणि एके दिवशी अचानक त्या माणसाने आपण आता हा व्यवसाय सोडून आपल्या गावी परत जात आहोत हे जाहीर केले. अ‍ॅनीला आता या गोष्टीला कसे सामोरे जावे हे कळेना. नुकतेच त्यांनी पोलीस हेडक्वार्टर्सच्या बेसमेंट कार पाìकगचे काँट्रॅक्ट ‘साइन’ केले होते. त्याचे कसे करायचे ही चिंता तिला लागली. मित्रांनी तिला धोक्याची सूचना दिली की, जर तिने हे काम पूर्ण केले नाही, तर तिच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ‘‘मला जर दिवाळखोर घोषित केले गेले, तर मी माझी विश्वसनीयता गमावून बसेन, असेही त्यांनी मला सांगितले. त्या वेळी मला खूप जोराने रडावेसे वाटत होते,’’ असे ती सांगते.
 पण तिची धडपडी वृत्ती हार मानायला तयार नव्हती. अ‍ॅनी म्हणते, ‘‘माझ्याकडे त्या वेळी २० माणसे कामाला होती. आता हे काम आपण पूर्ण केले नाही, तर आपण संपलो या भीतीपोटी मी ते काम पूर्ण करण्याचा ध्यास घेतला.’’  

 या दरम्यान २० पकी दोन जणांनी तिच्याकडे काम करायला नकार दिला. या व्यवसायातील इतर लोकांचीही तिने मदत घेतली. ‘जिआंग हुआन कंस्ट्रक्शन्स’ या नावाने कंपनीचे नाव तिने नव्याने पंजीकृत केले. जरी ती या क्षेत्रात काम करीत असली तरी प्रत्यक्ष ‘साइट’वर कसे काम चालते आणि प्रोजेक्ट कसा पूर्णत्वाला न्यायाचा याबाबत ती अनभिज्ञ होती.
 त्या दिवसांच्या आठवणीने आजही अ‍ॅनीच्या अंगावर काटा येतो. ती सांगते, ‘‘मजूर आणि इतर मंडळी मला हसत असत. माझी खिल्ली उडवत. काँट्रॅक्टर्स माझ्यावर सतत ओरडत; पण मी बधले नाही आणि माझ्या निश्चयावर ठाम राहिले. बूट आणि जीन्स असाच माझा पेहराव बनून गेला. ते दिवस फार फार कठीण आणि निराशाजनक होते.’’ एक लाख डॉलरचे कर्ज घेऊन तिने तो प्रोजेक्ट पूर्ण केला. हे काम करीत असतानादेखील इन्श्युरन्स एजंट म्हणूनही तिने काम केले. याच दरम्यान ली चोंग चिन हा तिचा शालेय जीवनातील वर्गमित्र जो आता इंजिनीयर झाला होता तो तिच्याच गावी आला आणि त्याने तिच्या व्यवसायात तिला बरीच मदत केली आणि पुढे त्याच्याशीच तिने विवाह केला.
हळूहळू तिच्या व्यवसायाने बाळसे धरले आणि पाहता पाहता अनेक परदेशी कंपन्यांचे काँट्रॅक्ट्स त्यांना मिळत गेले. ‘जिआन हुआंग’ हिचा एक सब-काँट्रॅक्ट कंपनीपासून सुरू झालेला हा प्रवास आज सिंगापूरमधील पहिल्या तीन मुख्य काँट्रॅक्ट्स कंपन्यांपकी एक इथपर्यंत झाला आहे. डिझाईन आणि बिल्डिंग क्षेत्रांत ही कंपनी अग्रगण्य मानली जाते. निप्पॉन एक्स्प्रेसचे डिस्ट्रिब्युशन सेंटर आणि झुएलिंग फार्मा बिल्डिंग्ज हे चांगी येथील प्रोजेक्ट्स हे तिच्या उद्योगातील मैलाचे दगड.
 हे सगळे अगदीच सहज होत गेले असे नाही. २००७ सालचा ‘वाळू तुटवडा’ हा कन्स्ट्रक्शन व्यवसायासाठी अतिशय कठीण होता. यात या कंपनीला बराच आíथक तोटा सहन करावा लागला. ७ दशलक्ष डॉलरचे कर्ज झाले; पण ‘‘पसा पुन्हा कमावता येतो, पण एकदा तुम्ही विश्वास गमावला, की तो परत मिळवणे कठीण,’’ असे ती सांगते.
अ‍ॅनीला चार मुली आहेत. तिची सासू आणि आई दोघी मिळून मुलींची देखभाल करतात. अ‍ॅनीची एक बहीण हेअर स्टायलिस्ट, तर दुसरी फ्लोरिस्ट आहे. तिचे दोन्ही भाऊ तिच्याच कंपनीत काम करतात.
बहुतांश पुरुषांचा वरचष्मा असलेल्या या व्यवसायात तग धरून राहणेही एका स्त्रीसाठी कठीण असते, असे ती म्हणते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेलेले बालपण, न कळत्या वयात अंगावर पडलेली कुटुंबीयांची जबाबदारी, अपुरे शिक्षण या सर्वावर मात करत या क्षेत्रात गाठलेली उंची लक्षणीय आणि प्रशंसनीय आहे.