08 March 2021

News Flash

‘नॉस्टॅल्जियामध्ये मजा असते’

‘अंताक्षरी’चा शो खूप गाजला. त्याचं स्क्रीप्ट कधी लिहिलं गेलं नाही. गाणी कोणती असावीत याची रूपरेषा थोडीशी ठरायची. बाकी सारे उत्स्फूर्त होतं. ‘अंताक्षरी’ने रिअ‍ॅलिटी शोज्ना एक

| July 11, 2015 01:01 am

ch24‘अंताक्षरी’चा शो खूप गाजला. त्याचं स्क्रीप्ट कधी लिहिलं गेलं नाही. गाणी कोणती असावीत याची रूपरेषा थोडीशी ठरायची. बाकी सारे उत्स्फूर्त होतं. ‘अंताक्षरी’ने रिअ‍ॅलिटी शोज्ना एक वेगळी ओळख दिली. मग जीवनात आलं एफ.एम. रेडिओचं पर्व! ९२.७ बिग एफ.एम.वर ‘सुहाना सफर वुईथ अन्नू कपूर’चे ५०० भाग सादर झाले आहेत. रेडिओवर माझ्यासमोर कोणीही नसतं. मायक्रोफोन असतो. याही कार्यक्रमाचं स्क्रीप्ट बनत नाही. मी बोलत जातो.. आणि सफर घडत जाते.
ज गणं हा आनंदाचा प्रवास आहे. ज्याच्या वाटय़ाला जसं जगणं येतं तसा त्याचा प्रवास सुरू असतो. या प्रवासावर मुसाफिराचं नियंत्रण नसतं. ज्या त्या वाटांची, त्यांची त्यांची वळणं असतात. माझ्याही जीवनप्रवासात वेगवेगळय़ा वाटा आल्या, त्यांची त्यांची वळणं आली. काही ठिकाणी रेंगाळलो, काही ठिकाणी भरधाव धावलो. काही वळणांवर विसावलो तर काही ठिकाणी दुरूनच रामराम करून पळालो. या वळणवाटांवर कुठं फुलं पसरलेली होती तर कुठे काटय़ांचे ढीग होते. ते सारं सारं नियतीचं दान म्हणून उपभोगलं. या दानानंच माझं घर सजलंय.
खरं तर मला अभिनेता बनायचंच नव्हतं. मला डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचं होतं. ४०-४५ वर्षांपूर्वी वर्गात ९०-९२ टक्के गुण मिळवणारा मी विद्यार्थी होतो. पण आयुष्यानंच मला अभिनयाच्या वळणावर आणून सोडलं. वर्गातला हुशार विद्याथीं असूनही घरची, कुटुंबाची गरज म्हणून शालेय शिक्षणाला रामराम ठोकून मला वडिलांच्या नाटक मंडळीत जावं लागलं. नाटक मंडळी म्हणजे आमची नौटंकी होती. महाराष्ट्रात जशी तमाशाची परंपरा आहे, तशी उत्तर हिंदुस्थानात नौटंकीची प्रदीर्घ परंपरा आहे. माझे वडील नौटंकीचे मालक होते. ते कलाकार, दिग्दर्शक वा गायक वगैरे नव्हते. तसे आम्ही श्रीमंत होतो. खाऊनपिऊन सुखी होतो. पुरेसा पैसा होता. फारशा कटकटी नव्हत्या. पिताजी त्यांच्या खुल्या स्वभावामुळे मित्रांमध्ये प्रिय होते. त्यांच्या एका मित्राने त्यांना नौटंकी कंपनी सुरू करायच्या भरीस पाडलं व ते त्यात पडलेही. दोनेकशे माणसांचा पसारा होता. तो पसारा घेऊन आम्ही गावोगाव, राज्याराज्यांत फिरत होतो. अगदी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, बंगाल म्हणाल तिथे बोलवाल तिथे आम्ही जात असू. त्यामुळे माझं शालेय शिक्षण एका गावात, एका ठिकाणी झालं नाही. हातात फारशी मिळकत उरत नसे आणि नाटकाच्या धंद्याचीही नशा जबरदस्त असते. ती ज्याला चढते तो सातव्या आसमानातच असतो. व्यावहारिक जगाचे नीतिनियम या जगाला मंजूर नसतात.
पिताजींचे पैसे संपत आले होते, त्यात त्यांचा हात सढळ व स्वभाव हळवा. त्यामुळे त्यांना कोणीही सहज फसवू शके. ते लाहोर लॉ कॉलेजातून वकील झाले होते. पण त्यांनी प्रत्यक्ष वकिली कधी केली नाही. तो त्यांचा स्वभावही नव्हता. सतत शाळा बदलत गेल्यामुळे अखेरीस १९७३ च्या सुमारास मी पिताजींच्या नौटंकीत काम करू लागलो. माझी आई अतिशय हुशार व व्यवहारी होती. औपचारिकरीत्या मला शिक्षण देता येत नाही, हे लक्षात आल्यावर तिनं मला लहानपणीच पुस्तकांकडे वळवलं. ती मूळची बंगाली होती, बहुभाषाकोविद होती. बंगालीबरोबरच, पिताजींसमवेत सर्वदूर फिरल्यामुळं तिला हिंदी, पंजाबी, हरियाणवी, मराठी, अरबी , पार्शिअन अशा अनेक भाषा सहजपणे त्या त्या लहेजात बोलता येत होत्या. ती स्वत: संगीताची जाणकार होती. आईच्या प्रोत्साहनामुळे आम्ही वाचत गेलो. मला वाचनाची विलक्षण गोडी लावली. ती नेहमी साहित्याच्या गोष्टी करायची, पुस्तकांबद्दल बोलायची. नववीत येईपर्यंत मी संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, तुकोबा, मीराबाई, तुलसीदास, पतंजली, गालीब, डिकन्स, शेक्सपीअर, वर्डस्वर्थ आदी श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे वाचन केले होते. चारी वेद, अठरापुराणं, उपनिषदे, भगवद््गीता, रामायण- भारतासारखी महाकाव्ये, तुराग, धम्मपदं वाचून काढली होती. घडत्या वयात एक लहान मुलगा जेवढं करू शकतो तेवढं सर्व मी करत होतो. नव्या गावातली प्रेक्षणीय स्थळं शोधायच्या आधी आम्ही वाचनालये शोधत असू. कारण जवळ पैसे नसायचे, पुस्तके वाचनालयातूनच आणली लागायची. आजही ती सवय आहे. माझ्या जीवनप्रवासातलं हे एक मनमोहक वळण आहे.
वयाच्या विशीत नौटंकी करू लागल्यावर आणि माझ्यातील कलेचा अंदाज आल्यावर मोठा भाऊ म्हणाला, ‘तू कितीही दूर पळायचा प्रयत्न केलास, तरी आता नाटक तुझा पिच्छा सोडणार नाही. तुला जर तेच करावं लागणार असेल तर मग नाटकाचं औपचारिक शिक्षण घे.’ त्यानं मला दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेशासाठी अर्ज करायला सांगितला. मी पदवीधर नव्हतो, तरीही मुलाखतीसाठी बोलावणं आलं. मुलाखत घ्यायला केवढी मोठी माणसं होती, ते नंतर कळलं. फ्रँक ठाकूरदास, हबीब तन्वीर, रति बार्तिलोमिओ, इब्राहिम अल्काझी! त्यांनी मला, ‘काही सादर कर’ असे सांगितलं. मला जे करता आलं, ते मी प्रामाणिकपणे केले. एनएसडीची फी देण्याइतकेही पैसे माझ्याकडे नव्हते. त्यात मी नाखुशीनेच तिथे गेलो होतो. त्यांनी ‘स्कॉलरशिप मिळाली नाही, तरी तू तिथे शिकशील का?’ असं विचारलं, मी अर्थातच नकारार्थी मान डोलावली. कारण ते मला शक्य नव्हतं. त्या सर्व थोर कलावंतांनी मला स्कॉलरशिप दिली व माझं एनएसडीमधलं शिक्षण सुरू झालं. मी त्यात रमलो.
मला अभिनयाची ओळख नौटंकीत झाली. नौटंकीत खूप लाऊड अभिनय करावा लागतो. सर्वसामान्य थरातल्या माणसाचं घटकाभर मनोरंजन असं त्याचं स्वरूप असतं. पण रंगभूमीची वेगळी ओळख मला एनएसडीमध्ये झाली. अभिनयाच्या वेगवेगळय़ा शैली, त्यातील प्रयोग, रंगमंचाचा इतिहास, जागतिक रंगभूमीचा परिचय इथेच झाला. माझी कलेविषयीची जाण विकसित होत गेली. अल्काझींसारख्या गुरूमुळे विचारात शिस्त आली. नेमकेपणाचं भान आलं. प्रत्येक दिग्गजाकडून नवनवीन शिकायला मिळालं. माझ्या वृत्तीतील गांभीर्य वाढू लागलं. त्यांनी दिलेल्या पाथेयात मी माझी भर घालत गेलो. या महावृक्षांकडून मी बीज घेतलं, ते बीज माझ्यात रुजवून घेण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं आपण नेहमीच अनुकरण करण्यापेक्षा गाभा स्वत:त रुजवून घ्यावा, त्या गाभ्याला आपल्यासारखं करावं. मग तो गाभा स्वत:चा आकार धारण करतो.
एनएसडीतलं शिक्षण पूर्ण केल्यावर, मोठय़ा भावानं १९८०-८१मध्ये एक महत्त्वाचं नाटक निर्माण केलं, ‘एक रुका हुआ फैसला.’ त्यात काम करण्याची संधी मला मिळाली. सर्व मोठय़ा शहरात त्याचे प्रयोग झाले आणि या नाटकाचा बोलबाला सुरू झाला. जाणकार ओळखू लागले. एकदा मंडी हाऊसमध्ये पंकज कपूर मला म्हणाला की शाम बेनेगल एक चित्रपट तयार करत आहेत. तिथे तुझ्या नावाची चर्चा आहे. तू त्यांना एक पत्र टाक. तेव्हा मोबाइल थोडेच होते. साधा फोन करणंही दुरापास्त होतं. मी श्याम बेनेगलना पत्र धाडलं आणि काय आश्चर्य! दहा दिवसांत त्यांचं पत्र आलं व त्यांनी मला भेटायला बोलावलं. त्यांचं पत्र येणं हीच खूप मोठी गोष्ट होती. २५ जून १९८२ चा तो दिवस होता. दिल्लीतून चंबुगवाळं आवरून मी निघालो आणि २९ जून रोजी बोरिवलीत अस्मादिकांची स्वारी रेल्वेतून उतरली. बेनेगलजींना भेटलो. २९ ऑगस्ट १९८२ रोजी मिनार एक्स्प्रेसने सिकंदराबादला पोचलो. २ सप्टेंबर १९८२ रोजी ‘मंडी’ चित्रपटाचा पहिला शॉट दिला. बेनेगलजींनी पहिलाच टेक ओके केला. चित्रनगरीनं मला स्वीकारलं!
काही दिवसांनी शबाना आझमींनी मला जावेद अख्तरसाहेबांचा निरोप दिला. राहुल रवैल यांच्या ‘बेताब’मध्ये त्यांनी माझ्यासाठी एक पात्र निर्माण केलं होतं. हळूहळू हिंदीतल्याच नव्हे तर देशातील सर्व मोठय़ा दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी नियतीने मला दिली. मृणाल सेन यांच्याबरोबर ‘खंडहर’ केला, गिरीश कर्नाडांसोबत ‘उत्सव’ केला. प्रत्येक भूमिका इमानदारीने साकारण्याची मी पराकाष्ठा केली. (एक गोष्ट सांगू? मी माझे चित्रपट कधीच पाहात नाही.) केवढय़ा दिग्गजांबरोबर अभिनयाची संधी मला मिळाली. अमिताभ बच्चन, अमरिश पुरी, डॅनी, नसीरभाई, अनिल कपूर, श्रीदेवी.. सर्वाचीच नावं घेता येणार नाहीत..
‘मंडी’मध्ये अमरीशभाईंबरोबर पहिल्यांदा करत होतो. त्या भूमिकेच्या गेट अपमध्ये त्यांनी मला पाहिलं. अगदी आपादमस्तक. गबाळा पोशाख होता आणि पायात मात्र चकचकीत नवे बूट होते. त्यांच्या लगेच लक्षात आलं. त्यांच्या गहिऱ्या आवाजात ते म्हणाले, ‘ओये, तेरे जुते तो नये लगते है! पुराने लगने चाहिये!’ आणि त्यांनी लगेच स्वत:च्या हातात शेजारचा एक दगड घेतला व खाली वाकून त्या महान कलावंतांनं त्या दगडानं माझ्यासारख्या नवशिक्या कलावंताच्या पायातील बूट घासले आणि त्या भूमिकेसाठी आवश्यक होते तसे जुनाट केले. केवढा मोठा कलावंत! केवढी मोठी विनम्रता आणि केवढी मोठी रंगनिष्ठा! आजही तो प्रसंग आठवला की डोळय़ात पाणी उभं राहतं. ‘योद्धा’ चित्रपटामध्ये डॅनी डेंग्झोपांसोबत एक सीन होता. त्या प्रसंगामध्ये माझी जी भूमिका होती, तिचा आवाका पाहून ते स्वत: सरळ दिग्दर्शकाला म्हणाले, ‘हा सीन अन्नूचा आहे. तो त्याच्यावरच केंद्रित करून पूर्ण करा.’
इथं सारखं अन्नू कपूर लिहिलं जातंय. पण माझं मूळ नाव अनिल कपूर आहे. मी चित्रपटात प्रवेश करत होतो, त्याच वेळा चित्रपटात अनिल कपूरचाही नायक म्हणून प्रवेश झाला. शबाना म्हणाली, ‘दोन दोन अनिल कपूर’ ही गोंधळाची स्थिती होईल. ‘तो’ अनिल कपूर ‘नायक’ होता व मी चरित्र अभिनेता. मी म्हणालो, ‘मीच नाव बदलतो. मला घरात सारे अन्नू म्हणतात, तेच नाव इंडस्ट्रीत लावू या.’ आणि त्या दिवसापासून झाला अनिल कपूरचा अन्नू.
चित्रनगरीने या अन्नूला खूपच चांगल्या व्यक्तिरेखा करायची संधी मिळाली. ही कामं करताना अभिनय करण्यापेक्षा त्या त्या व्यक्तिरेखांना काय म्हणायचं आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. अभिनय म्हणजे प्रतिक्रिया. पात्राने, पात्रांना दिलेल्या प्रतिक्रिया. पात्राने जीवनाला दिलेल्या प्रतिक्रिया. या प्रतिक्रियांच्या शोधाचा प्रवास म्हणजे अभिनय! मी अनेक पात्रे रंगवली, पण पुरस्कारांची मान्यता सर्वाधिक मिळाली ती सुजित सरकारच्या ‘विकी डोनर’मधील डॉक्टरच्या व्यक्तिरेखेमुळे. २० एप्रिल २०११ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातल्या माझ्या व्यक्तिरेखेला राष्ट्रीय पुरस्कारासह सात महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. मी प्रामाणिकपणे अभिनयाची शिदोरी रसिकांसमोर खुली करतो. त्यामुळेच ‘तेजाब’मधला गुलदस्ता, ‘मिस्टर इंडिया’मधला संपादक, ‘काला पानी’ मधले सावरकर आणि ‘सरदार’मधले गांधीजी साकारता आले. सावरकर व गांधी या दोन परस्परभिन्न विचारधारा आहेत. पण त्या साकारताना असं लक्षात आलं की या भिन्न भिन्न विचारधारा असल्या तरी त्यांचा उद्देश या देशाचं भलं व्हावं हाच आहे. ‘सजा-ए-काला पानी’ या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करताना, मला अचानकपणे सावरकरांची एक कविता आठवली. ती अंदमानातल्या ‘लाईट अ‍ॅण्ड साऊण्ड’ कार्यक्रमात ऐकलेली. तिचा अनुवाद करून आम्ही ती वापरावी असं दिग्दर्शकाला सुचवलं. तो प्रसंग असा होता की दोन मल्याळी कैदी सावरकरांना प्रश्न विचारतात, ‘काळय़ा पाण्याचा शिक्षेचा काळ तुम्ही कसा व्यतीत केला?’ ते कवितेतून उत्तरतात, त्याचा त्रय तर्जुमा असा आहे, ‘अत्याचार आणि दडपशाही यंत्रणेच्या या दमघोटू वातावरणात माझ्यासमोर आशेचा एकच किरण होता, तो म्हणजे छोटय़ाशा खिडकीबाहेरून ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट. त्या किलबिलाटात मला देशभक्तीचं गीत ऐकू येत होतं.’ माझे पणजोबा, शहीद भगतसिंह यांच्याआधी आठ वर्षे ब्रिटिशांविरोधी लढताना त्यांच्या गोळय़ा खाऊन मारले गेले. माझ्या पिताजींच्या नौटंकीतल्या बायकांची चेष्टा करणाऱ्या आठ गोऱ्या सोजिरांना पिताजींनी पारतंत्र्यात असताना झोडपून काढले होते. त्याचा वसा माझ्या धमन्यांतून वाहतो आहे. म्हणूनच माझ्या बदलापूरच्या फार्म हाऊसमध्ये दररोज सकाळी तिरंगा ध्वज फडकावला जाताच ‘जयहिंद’ बोलताना माझा ऊर भरून येतो. माझ्या कोणत्याही कार्यक्रमाचा समारोप ‘जय हिंद’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषानेच मी करतो. निरपेक्ष राष्ट्रभक्तीचं हे बीज नव्या पिढीत रुजायला हवं. माझ्या भूमिकांनी मला हे सुचवलं!
चित्रपटात काम करताना १९९३ च्या उन्हाळय़ात मला गजेंद्र सिंहचा फोन आला. त्याने माझ्याकडून एका नव्या शोचा प्रोमो करवून घेतला. नंतर दोन-तीन वेळा आमची चुकामूक झाली. शेवटी मी दुसरी फिल्म करायला घेतली. असरानींची ‘उडान’ करत होतो. सलग १५ दिवस शूटिंग केल्यावर असरानीजींनी मला एक दिवसाची सुट्टी दिली. मी एका सलूनमध्ये फेशियल करायला बसलो होतो. तिथे गजेंद्रचा फोन आला. तो दिवस होता ५ ऑगस्ट १९९३. माझ्या तारखा जमत नव्हत्या म्हणून दुसऱ्या एका व्यक्तीकडे त्याने त्या कार्यक्रमाची धुरा सोपवली होती आणि शूटिंगच्या पहिल्याच दिवशी ती व्यक्ती तो सेट सोडून गेली होती. गजेंद्र सांगत होता, ‘माझा पहिलाच शो आहे. काहीही करून तुम्ही या.’ मला दुसऱ्या दिवसाचं शूटिंग दिसत होतं. मी टाळत होतो. पण तो ऐकेच ना! त्याची मोठ्ठी अडचण झाली होती. शेवटी पार्लरवाल्याला सांगितलं, ‘बाबा रे, चेहऱ्यावरचा मास्क काढ’ ड्रायव्हरला सांगून गाडी वरळीला नॅब स्टुडिओकडे वळवली.
तिथे सेट लागला होता. गजेंद्रशी बोलणं झालं, दुर्गा जसराज होत्या. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना म्हटलं, ‘हे तुमचं स्क्रिप्ट वगैरे ठीक आहे. पण माझ्या डोळय़ात ते घुसत नाहीये. आता मी बोलेन तेच स्क्रिप्ट. पाहा जमलं तर. नाइलाजाने त्यांनी ते मान्य केलं.
७ ऑगस्टला ‘उडान’चे शूटिंग होतं. ते टाळलं. सलग ७, ८, ९ ऑगस्ट रोजी शूटिंग केलं. स्टुडिओत सारे खूश होते. ८ ऑगस्टला शूटिंग आटोपून मी एका मित्राकडे पत्ते खेळत होतो. मला पत्ते खेळायला खूप आवडतं. तेवढय़ात झी टी.व्ही.वर ‘अंताक्षरी’ सुरू झाली. पहिला एपिसोड होता. माझी टी.व्ही.कडे पाठ होती. पंडित सुदर्शन नाग ओरडले, ‘अरे अन्नू, ये तो तेराही प्रोग्राम है!’ मी म्हणालो, ‘असू दे, पत्ते खेळा.’ पण ते माझ्याकडे दुर्लक्ष करून तो शो पाहत बसले. मी मुळीच पाहिला नाही. (मी माझे शोजही कधी पाहत नाही.) पंडित सुदर्शन नाग म्हणाले, ‘‘ब्राह्मण की जुबान है! झुठी नहीं होगी। अब हसके बाद तुम्हे पिछे देखना नही पडेगा! ’ तसंच झालं. ‘अंताक्षरी’चा शो खूप गाजला. त्याचं स्क्रीप्ट कधी लिहिलं गेलं नाही. गाणी कोणती असावीत याची रूपरेषा थोडीशी ठरायची. बाकी सारे उत्स्फूर्त होतं. ‘अंताक्षरी’ने रिअ‍ॅलिटी शोज्ना एक वेगळी ओळख दिली. माझ्या जीवनातलं ते एक महत्त्वाचं निर्णायक वळण ठरलं. तसे टी.व्ही. वर मी मोजकेच कार्यक्रम केले. ‘मेरी आवाज सुनो’, ‘गोल्डन एरा वुईथ अन्नू कपूर’ यासारखे रिअ‍ॅलिटी शोज् मी केले. त्याचबरोबर सत्यजित रे प्रेझेंटस्, परमवीर चक्र, दर्पन, किले का रहस्य अशा अनेक मालिकांमध्येही मी काम केलं. टी.व्ही. वर खरं समाधान दिलं ते ‘कबीर’ या मालिकेनं. मी त्या दृष्टीने भाग्यवान आहे. कोणत्या ना कोणत्या कलाप्रकारात मला महान व्यक्तिरेखांना साकारता आलं.
मग जीवनात आलं एफ.एम. रेडिओचं पर्व! ९२.७ बिग एफ.एम.वर ‘सुहाना सफर वईथ अन्नू कपूर’चे ५०० भाग सादर झाले आहेत. रेडिओवर माझ्यासमोर कोणीही नसतं. मायक्रोफोन असतो. त्यावेळी मनात गावोगावचे वेगवेगळय़ा प्रकारचे श्रोते हा कार्यक्रम ऐकत आहेत ही जाणीव असते. याही कार्यक्रमाचं स्क्रीप्ट बनत नाही. माझी संशोधक टीम कार्यक्रमाची बाह्य़ रूपरेषा ठरवून देते व नंतर मी बोलतो. आनंद असतो. एवढे सारे कार्यक्रम आम्ही कलाकार करत असतो. माझ्या प्रत्येक कार्यक्रमातून रसिकांना केवळ आनंद नाही तर ज्ञानही मिळावं, जीवनादर्शाचं जतन व्हावं असा प्रयत्न मी करत राहतो. या प्राचीन देशाची सभ्यता, परंपरा आणि संस्कृतीचा योग्य पद्धतीने प्रचार व प्रसार व्हावा हा त्यामागे हेतू असतो. या आग्रहापोटी माझं अनेकदा नुकसान होतं. त्याची मला पर्वा नाही. आजवर जे मनाला पटलं तेच केलं पण सभोवतालची जी मूल्यहानी चालू आहे ती पाहिली की मन अस्वस्थ होतं. माझी पत्नी अनुपमा अमेरिकन भारतीय आहे. तिचं मला सहकार्य लाभतं. तिला विविध कलांची आवड आहे. तिने घरात रझा, हुसेन, जहांगीर सबावाला, जे. स्वामीनाथन, मनजिता बावा यांची चित्रं गोळा केली आहेत.
या जीवन प्रवासात मी नास्तिक झालोय. कबीर म्हणतात,
‘ना कुछ देखा भावभजन में, ना कुछ देखा पोथी में
कहे कबीर सुनो भाई साधो, जो देखा सो रोटी में’
हे तत्त्वज्ञान मला पटलंय. ‘परमेश्वर’ ही संकल्पना ही केवळ मानसिक आहे. सभोवतालच्या निसर्गाला न समजू शकणाऱ्या मानवानं भयभीत होऊन ‘परमेश्वरा’ला जन्म दिला असावा. आज वैज्ञानिक विकासाच्या या युगात ‘परमेश्वर’ मानणं हे थोडंसं हास्यास्पदच वाटतं मला.
हमको मालूम है जन्नत की हकीकत
लेकीन दिल बहलाने को गालिब यह खयाल अच्छा है!
बस. आज एवढंच. या निमित्ताने, मराठीतला कवी व आमचा अभिनेता मित्र सौमित्र त्याच्या एका कवितेत सांगतो, ‘आठवण, आठवण, आठवण.. आठवणींची एकच रांग,’ तशी एक गतजीवनातील आठवणींची मनात एक रांग सुरू झाली. म्हणतात ना- ‘नॉस्टॅल्जियामध्ये मजा असते.’ तुमच्यासोबत त्या जुन्या, सुगंधी आठवणींची एक सफर घडली.
अन्नु कपूर
शब्दांकन – नितीन आरेकर – nitinarekar@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2015 1:01 am

Web Title: annu kapoor
Next Stories
1 पायांची काळजी
2 हवेत मानसिक आरोग्यरक्षक सैनिक!
3 आईपण सांभाळताना…
Just Now!
X