News Flash

व्यर्थ चिंता नको रे : बेचैनीच्या आजारांचा उगम

चिडचिड, वैफल्य, नैराश्य नि आत्महत्या हे याच मन:स्थितीचे परिणाम असतात.

डॉ. आशीष  देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com

बेचैनीचे आजार होणाऱ्या व्यक्तींपैकी बऱ्याच जणांना वयाच्या ८-९ व्या वर्षांपासून काही ना काही अडचणी  असल्याचं दिसतं. वैयक्तिक वंचितता आणि अप्रिय अनुभवांबरोबरच मैदानी खेळांपासून ताटातूट, समवयस्क सोबती न मिळणं, आभासी जगाचा अतिरेक यांमुळेदेखील भविष्यात बेचैनीचे आजार होण्याची शक्यता वाढते. आताच्या ‘करोना’ काळात आपल्या कु टुंबांनी पाहिलेल्या, सहन के लेल्या गोष्टी, अगदी अनपेक्षित असे प्रसंग अनुभवणारी लहान मुलं, या सगळ्याचा विचार के ला, तर मनावर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांची संगती लावता येईल. बेचैनीचे आजार मनात कसे तयार होत जातात आणि त्यावर मात करताना मनाला कसं सावरता येईल, याविषयी..

अ‍ॅलेक्झांडर पोप या  इंग्लिश कवीनं  १७११ मध्ये एक भन्नाट कविता लिहिली. ‘अ‍ॅन ऐसे ऑन क्रिटिसिझम’ नावाची. त्या काळातल्या लेखक नि टीकाकारांच्या विळ्या-भोपळ्याच्या नात्याबद्दल आहे ती. साधारण आपल्या भारूडाप्रमाणे वागण्यातल्या चुका दाखवण्याचा प्रयत्न त्यात दिसतो, पण थोडा रामदास स्वामींच्या ‘मूर्खाच्या लक्षणां’प्रमाणे निरूपण/ निबंधासारखा विस्तार आहे. ६०० हून अधिक ओळींची ही ‘निबंध’कविता त्यातील ३ ओळींसाठी विशेष करून गाजली. ‘Little knowledge is a dangerous thing!l, ‘Fools rush in where angels fear to tread!l आणि ‘To err is human; to forgive, divine!l वरकरणी टीकाकारांसाठी मारलेली ही टपली, सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातही चपखल बसते.

गेल्या लेखात आपण पाहिलेले हॅम्लेटनं वापरलेले नियम आठवतायत? भ्रम, भ्रांति नि अज्ञानापासून दूर राहून ‘सत्य’ काय ते शोधा, झटपट आनंदाच्या फंदात न पडता दूरदृष्टी ठेवा, आपल्या ध्येयापासून ‘नजर हटी, दुर्घटना घटी’!, ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’- पण ते करताना आपल्या जवळच्यांना समजून-समजावून केलेलं बरं! या पाचांपैकी तीनपेक्षा अधिक नियम पाळणारा विचार विवेकी असण्याची शक्यता जास्त. मानसशास्त्र म्हणतं, होता होईस्तोवर असा सारासार विचार करा. पण असा सारासार विचार नाही हो सतत सगळ्यांना जमत!

तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे आम्हा भांडवल चित्त, देवोनि दुश्चित्त पाडियले।’

हे ‘दुश्चित्त’ म्हणजे ‘नियमभंग’. पोपच्या कवितेतदेखील याच ‘दुश्चित्ता’पासून देवदूत (सुखी) सतत दूर राहातात, असं म्हटलं आहे. दुश्चित्त आपल्याला सत्य परिस्थितीपासून दूर नेतं, स्वास्थ्य/ सुखापासून दूर नेतं, ध्येय- उद्दिष्टांपासून आणि आपल्या माणसांपासून दूर नेतं. आणि सुरू होतात ताणतणाव.

जेव्हा आपल्या परिस्थितीत असे काही बदल घडतात किंवा बदल घडण्याची शक्यता निर्माण होते, ज्यामुळे अपेक्षाभंग होतो किंवा होऊ शकतो, ती मानसिक स्थिती म्हणजे ‘ताणतणाव’ किंवा ‘स्ट्रेस’! कधी हे बदल अचानक घडतात तर कधी हळूहळू. हे हळूहळू घडणारे बदल जर आपल्या जाणिवांतच नसतील, तर ‘अज्ञानात सुख असतं’सारखी स्थिती होते. उदा. स्वास्थ्याकडे केलेलं दुर्लक्ष, जागतिक तापमानवाढ वगैरे. अचानक घडणारे बदल म्हणजे अपघाती मृत्यू, शेअर बाजारातलं नुकसान, नैसर्गिक संकटं, अचानक परतलेला ‘करोना’ इत्यादी. आईनस्टाईननं म्हटल्याप्रमाणे- ‘देव फासे टाकत नसतो’. जगातल्या प्रत्येक ‘अचानकाला’ काहीतरी कारण असतं, नि ते माहीत नसलं की आपण म्हणतो, ‘देवाची मर्जी, दुसरं काय?’.

१९२२ मध्ये ‘क्रिएटिव्ह युनिटी’ या निबंधमालिकेत रवींद्रनाथ टागोरांनी ‘द रिलिजन ऑफ द फॉरेस्ट’ हा निबंध लिहिला. त्यात ते म्हणतात, ‘भारतीय संस्कृतीनं घेतलेला सत्याचा शोध ‘ सत्चिदानंद’ या एका शब्दात सामावतो.’ ‘सत्’- त्रिकालाबाधित, चिरंतन, सर्वव्यापी नि अज्ञात- जे माहीत नाही, पण आहे. ‘चित्’- ते ‘सत्’ समजून घेण्याचा माझा/ आपला/ मनाचा/ शास्त्राचा अविरत प्रयत्न, आणि ‘आनंद’ म्हणजे त्या प्रयत्नातल्या यशात नि अपयशातसुद्धा असणारं निखळ, निरपेक्ष समाधान- कारण ते ‘सत्’ दाखवणारं आहे. ‘सत्य’ निरखून, समजून, पडताळून मान्य वा अमान्य करण्याच्या/ शोधण्याच्या प्रयोगशीलतेस जपणं म्हणजे ‘विवेकी’ असणं. आईनस्टाईनने ‘I would like to know, what God thinks!’ म्हणायच्या खूप आधीच हे सत्य आपल्या पूर्वजांनी समजून घेतलं आहे.

शाळेत बालभारतीच्या पुस्तकात सहा आंधळे आणि हत्तीची गोष्ट होती. हत्ती कसा असतो? यावरून भांडणारे हे आंधळे जंगलात जाऊन, हत्तीस गाठून, त्याला चाचपडून या प्रश्नाची शहानिशा करायचं ठरवतात. सोंड, पाय, दात, कान, पोट, शेपटीला हात लावून हत्ती हा खांब, सूप, दोरी वगैरेंसारखा आहे असं ठरवून परत भांडत राहातात. कल्पनेतलं वेगळेपण समजणं सोपं, पण प्रत्यक्ष अनुभवातसुद्धा वेगळेपण असू शकतं, हे समजावणारी ही गोष्ट ‘डोळस’ वृत्तीबद्दलच तर सांगते आहे. १९५० मध्ये ‘राशोमान’ हा अकिरा कुरोसावा दिग्दर्शित चित्रपट झळकला. एका सामुराईचा खून होतो नि त्याच्या पत्नीवर बलात्कार. ‘फ्लॅशबॅक’च्या तंत्राचा भन्नाट वापर, चित्रपट पाहाताना डोळे मिटायचीही भीती वाटावी अशी ‘सिनेमॅटोग्राफी’, प्रत्यक्ष घटनेच्या तिघा साक्षीदारांनी दिलेली वेगळी साक्ष आणि खून केल्याची स्वीकृती. नक्की काय घडलं हे गोष्टीत समजेल, हा विश्वास ठेवून पाहाणाऱ्या चाहत्याला शेवटपर्यंत गुंगवून, आत्मप्रौढी फसवेपणातनं अनुभवाची मोडतोड करण्याची माणसाची अनाकलनीय वृत्ती दाखवून ही गोष्ट संपते. एकाच घटनेबद्दल तिघा साक्षीदारांचा वेगवेगळा दृष्टिकोन ‘तीन सत्य’ तयार करतो. चित्रपट जगतातील अजरामर कलाकृतींमध्ये गणल्या जाणाऱ्या कलाकृतींपैकी ही एक समजली जाते, ती याच कारणानं.

मराठीत एक म्हण आहे, ‘दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळही दिसत नाही’. ताणतणावांच्या साम्राज्यातसुद्धा नेमकी ‘दुखरी नस’ खरंच परिस्थितीत आहे, की आपल्या परिस्थितीच्या समजुतीत? की ती समजून घेण्याच्या आपल्या दृष्टिकोनात? हे समजणं कठीण होऊन बसतं. त्यातून होणाऱ्या संभ्रमात अनिश्चिततेची भर पडते नि ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ उभा राहातो. एखाद्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विवेकाचा डोलारा कोसळतो आणि असहाय्यता, बेचैनी, अस्वस्थता, काळजीची रसायनं मनात उतू जायला लागतात. भावनेचा मेंदू ओव्हरटाइम करायला लागतो आणि विचारी मेंदू भेदरून जातो. त्या दोघांमधला मेंदूचा भाग ‘थॅलॅमस’- ‘भान’मेंदू भावनांची साथ देतो आणि त्याचे पडसाद देह-भानावर (hypothalamo-pituitory Axis) पडतात. मनातले ताणतणाव शरीरावर आघात करायला लागतात आणि विविध व्याधी जडवतात. मानसशास्त्रात आता असं समजलं जातं, की बेचैनीचे आजार, औदासीन्य हे एकूण ताणतणावाच्या रासायनिक प्रक्रियांतील मानसिक अनुभव आहेत, तर उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, स्मृतिभ्रंश आणि  इतर बरेच आजार हे त्यांचे शारीरिक परिणाम.

विवेकाचे साधे नियम न पाळून ‘दुश्चित्त’ जेव्हा सवयीसारखं परत परत डोकं वर काढतं, तेव्हा बेचैनीच्या वेगवेगळ्या तऱ्हा व्यक्त होतात.

१) भ्रम, भ्रांती, अज्ञान, सत्यापासून फारकत- ‘फोबिया’- व्यर्थ भीती (उंची, प्राणी, सुई, गर्दी, बंद खोली वगैरेंची)

२) ‘सुख-स्वास्थ्या’पासून दुरावा- पॅनिक अटॅक, अँटिसिपेटरी अँग्झाइटी, व्यसनाधीनता

३) ध्येय, उद्दिष्टांकडे दुर्लक्ष- जनरलाइज्ड अँग्झाइटी

४) नात्यांवर अन्याय- न्यूनगंड, वैफल्यावस्था, आक्रमकता

या सगळ्याच आजारांत बेचैनीची भावना, अस्वस्थता, भीती, असहाय्यता दिसतेच दिसते. काही शारीरिक लक्षणंही दिसतात- छातीत धडधडणं, गुदमरल्यासारखं वाटणं, हातपाय थरथरणं, अशक्तपणा जाणवणं, तोंडाला कोरड पडणं. ‘फोबिया’त विशिष्ट गोष्ट, वस्तू, परिस्थिती ही माणसाच्या मनाला गोठवून टाकते, तर ‘पॅनिक अटॅक’मध्ये आपल्याला हृदयविकाराचा झटका आलाय की काय, अशी भीती वाटते. हे नकारात्मक अनुभव टाळण्यासाठी ती व्यक्ती अनंत युक्त्या शोधून काढते. असं संकुचित आयुष्य जगणारी बरीचशी माणसं मग व्यसनांचा आधार घेतात किंवा विकृतींना बळी पडतात. चिडचिड, वैफल्य, नैराश्य नि आत्महत्या हे याच मन:स्थितीचे परिणाम असतात.

काही वेळा अनाहूतपणे अशा चुका आपल्याकडून होतात, किंवा झाल्यानंतर कळतं की आपल्याकडून चूक झाली. अशा वेळी अ‍ॅलेक्झांडर पोपची ‘To err is human; to forgive is divinel’ ही ओळ जरूर आठवणं आवश्यक आहे. स्वत:ला माफ करणं नि पाटी पुसून पुन्हा नवा अभ्यास करणं जमलंच पाहिजे. झालेल्या चुकांमध्ये गुरफटून काहीच साध्य होत नाही.

बेचैनीचे आजार साधारणपणे ६-९ टक्के  लोकांना होतात. ज्यांना हे आजार होतात त्यातील बऱ्याच लोकांना वयाच्या ८-९ व्या वर्षांपासून काही ना काही अडचणी जाणवतात. गरिबी, अस्थिरता, घरगुती कलह/ हिंसा, लहान वयातच शाळेशी/ मित्रांशी बिघडलेलं नातं, अपंगत्व यांमुळे बेचैनीचे आजार होण्याची शक्यता वाढते. मैदानी खेळांपासून ताटातूट, समवयस्कर सोबत्यांपासून दुरावा, आभासी जगाचा अतिरेक यांमुळेदेखील भविष्यात बेचैनीचे आजार होण्याची शक्यता वाढते. करोनाच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, ज्यांमुळे बेचैनीचे आजार वाढण्याची खात्री वाटते. प्रत्यक्ष आजाराची भीती काही महिन्यांत जाईलही, पण आजारातल्या इतर अनुभवांनी होरपळलेल्या लहानग्यांच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार होणं आवश्यक आहे. जागतिक अनुभव असा आहे की अशा साथीनंतर मुलांना शाळेत आणणं जिकिरीचं होतं. गरिबीनं शिक्षणाची संधी हिरावली जाण्याची शक्यता असते. शाळेबद्दल किंवा अभ्यासाबद्दल फारसं प्रेम नसलेली ही मुलं कट्टय़ांवर दिसतात नि गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकतात. मुलांना शाळेत आणणं हे करोनानंतरच्या काळातलं मोठं आव्हान असणार आहे.

मुलं शाळेत आली तरीही त्यांना शाळेत थांबवून ठेवणं हेदेखील कठीण जाणार आहे. अशा वेळी अभ्यासाचा अनाठायी अतिरेक मुलांना शिक्षणापासून परावृत्तच करेल. मुलांच्या मनाची लवचीकता वाढण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर फक्त त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करून चालणार नाही. त्यांना शिकायच्या मन:स्थितीत पहिल्यांदा आणायला लागेल. संगीत, नृत्य, खेळ, चित्र-नाटय़कला, समूह समुपदेशन या माध्यमांतून त्यांना प्रथम ‘बोलतं’ करून मग ‘शिकतं’ करायला लागेल.

महात्मा गांधींनी ‘नई तालीम’ मध्ये ‘मन-मनगट-मस्तिष्क’चं महत्त्व आणि सूत्र सांगितलं आहे. या समुपदेशनात आहार, व्यायाम, विविध कला, छंदांचं महत्त्व सांगितलं जातंच, पण त्याचबरोबर मोजका धोका पत्करण्याची निकड (रिस्क टेकिं ग), नवीन शिकण्याचा खटाटोप (न्यू लर्निग), संवादकौशल्य आणि परस्परसंबंध (सोशल स्किल्स अँड इंटरपर्सनल रिलेशनशिप्स), अनंत हस्ते ‘देणाऱ्या’ निसर्गाबद्दल कृतज्ञता, श्रद्धा (नीड फॉर द सॅक्रे ड इन लाईफ) आणि या सगळ्या गोष्टींची सतत जाण राहावी, समतोल राहावा यासाठी ज्ञानधारणा/ चिंतन (मेडिटेशन)  या सगळ्याचा वापर असतो. पण मुलांना या गोष्टी शिकवणं म्हटलं तर कठीण, म्हटलं तर सोपं. मुलं फक्त १० टक्के गोष्टी ऐकून शिकतात. ९० टक्के गोष्टी पाहून शिकतात. करोनाच्या काळात आपण सर्वच भरडले जातोय. आपल्या सर्वानाच आपल्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मग या गोष्टी आपणच आपल्या व्यवहारात आणायचा प्रयत्न घराघरांतून केला तर?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:33 am

Web Title: anxiety disorders ways to beat anxiety and become mentally strong zws 70
Next Stories
1 मी, रोहिणी.. : भूमिकांमधील नव्या ‘जागा’!
2 वसुंधरेच्या लेकी  : व्यक्तीपासून अभिव्यक्तीपर्यंत..
3 लिंगाधारित तफावत वाढतीच
Just Now!
X