शरीराच्या वाढीसाठी आणि एकंदर आरोग्यासाठी उपयुक्त असलेलं सफरचंद हे चविष्ट, रसदार आणि दळदार फळ आहे. ते सालासकट खावं कारण सालातच महत्त्वाचे क्षार असतात. हे फळ लो कॅलरी असून पोटाच्या अनेक विकारांवर विशेषत: अतिसारावर गुणकारी आहे, तसंच त्यातल्या चोथ्यामुळे ते मलावरोधासाठीही उपयुक्त आहे. मधुमेही खाऊ शकतात असं हे फळ असून, ते रक्तातली साखर तसंच कोलेस्टोरॉल नियंत्रणात ठेवतं. ते चावून खाल्लय़ामुळे लाळ सुटते आणि दाताचं आरोग्य सुधारतं. त्यात क जीवनसत्त्व असून ब्रेन टॉनिकही आहे. अगदी लहान मुलांनाही सफरचंद वाफवून द्यावं.

अ‍ॅपल क्रम्बल
साहित्य :
सफरचंदाची साल न काढता केलेले काप ३ वाटय़ा, अर्धी वाटी साखर, चिमूटभर मीठ, अर्धी वाटी लोणी, पाव चमचा बेकिंग पावडर, अर्धी वाटी ओट्स, प्रत्येकी एक मोठा चमचा पिठीसाखर आणि दूध पावडर, अर्धी वाटी कणीक, अर्धा चमचा जायफळ पावडर, चिमूटभर केशर
कृती :
ओट्स, कणीक, मीठ, बेकिंग पावडर, जायफळ पावडर, पाव वाटी लोणी, पिठीसाखर, दूध पावडर एकत्र करावं. एका मोठय़ा बेकिंग पॅनमध्ये उरलेलं लोणी वितळवून घालावं, त्यावर सफरचंदाचे काप पसरावे, वर साखर आणि केशर पसरावं. त्यावर पिठाचं मिश्रण पसरून १८० सें.वर तापलेल्या ओव्हनमध्ये ३० ते ४० मिनिटं- वरचा क्रस्ट सोनेरी होईपर्यंत क्रम्बल भाजावं.
सफरचंदाऐवजी आंबा, पिअर, पीच, स्ट्रॉबेरी यांचाही वापर करता येईल.
वसुंधरा पर्वते