योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

जसं न अडखळता इंग्रजी बोलणारी व्यक्ती काहींच्या मते आयुष्यात जिंकलेली असते, तसंच ‘एसी’ असलेलं, ‘इंटिरिअर’ चांगलं असलेलं, ‘लॅण्डस्केपिंग’ केलेलं महाविद्यालयच उत्तम असतं, असं काही जणांचं ठाम मत असतं. महाविद्यालयातलं वातावरण चकचकीत आणि ‘ड्रेस कोड’ रुबाबदार असला म्हणजे तिथले विद्यार्थीही गुणवान, असं म्हणता येईल का? म्हणूनच नोकरीसाठी योग्य व्यक्ती निवडताना आपण आपल्या निवडींना घालून घेतलेली ‘नेहमीचे यशस्वी’ची चौकट आता विस्तारायला हवी.

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

रोजच्यासारखा सकाळी तो ऑफिसमध्ये शिरला आणि ध्यानीमनी नसताना मोगऱ्याच्या सुवासानं त्याला अलगद मिठी मारली. ऑफिसमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या तीन-चार ‘रुम फ्रेशनर्स’ची त्याच्या नाकाला सवय झाली होती, पण या अनपेक्षित सुवासामुळे त्याची तंद्री भंग पावली. आज नेमकं काय वेगळं घडलं आहे हे पाहण्यासाठी त्यानं आजूबाजूला बघितलं, तर जागोजागी बहरलेल्या फुलांच्या कुंडय़ा ठेवल्या होत्या.

ऑफिसमधल्या क्युबिकल्सच्या भिंती मोगऱ्याच्या फुलांच्या माळांनी सजवल्या होत्या. अनेक वर्षांनी कामाच्या दिवशी ऑफिसमधली वातानुकूलन यंत्रणा पूर्ण बंद करून खिडक्या उघडलेल्या होत्या. अशा प्रसन्न वातावरणात तो आपल्या टेबलापाशी आला, तर तिथे चाफ्यांनी भरगच्च भरलेला द्रोण ठेवलेला होता. एकूणच त्या कमालीच्या आटोपशीर सजावटीत आजवर कधीही न अनुभवलेला टवटवीतपणा होता. आज काय विशेष आहे, याचा विचार करत असतानाच ती त्याच्या टेबलापाशी येत म्हणाली, ‘‘आपल्या कंपनीतला ‘ट्रॅडिशनल डे’ हा कपडे आणि जेवण यापुरता मर्यादित न ठेवता वेगळ्या पद्धतीनं साजरा करावा, असं अनेक र्वष डोक्यात होतं. कंपनीचे नेहमीचे ‘इव्हेंट’ मॅनेज करणाऱ्या लोकांकडे काहीही चांगली कल्पना नव्हती, म्हणून मग या वर्षी त्यांना सुट्टी दिली. गेल्या आठवडय़ापासून माझ्या मनुष्यबळ विभागातले सहा-सात जण आणि कंपनीतल्या अजून काही मंडळींनी सगळ्या गोष्टी हातात घेतल्या. त्याचा हा परिणाम आहे.’’

‘‘फारच मस्त! काही क्षणांसाठी का होईना, पण मी ऑफिसमध्ये आहे हे विसरू शकलो.’’ त्यानं मनापासून दाद दिली.

खरं तर पुढच्या पाचच मिनिटांनी त्या दोघांची एकमेकांबरोबरच मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये भरपूर वादविवाद होणार होते. तेव्हा त्याआधी शक्य होईल तेवढं खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचा ते दोघंही प्रयत्न करत होते. कदाचित अनेक र्वष एकमेकांबरोबर काम केलं असल्यामुळे कोणताही स्फोटक विषय हाताळण्याआधी नेमकं काय करावं, याचे त्यांचे काही अलिखित नियम होते. ठरलेल्या वेळी दोघं जण ‘कॉन्फरन्स रुम’मध्ये आले. लॅपटॉप उघडताना थेट विषयाला हात घालत तो म्हणाला, ‘‘व्यवस्थापनाचा एक प्रतिनिधी म्हणून तुला काही प्रश्न विचारणार आहे. हे प्रश्न विचारताना तुमच्या विभागाच्या गुणवत्तेवर कोणतीही शंका नाही. पण खर्च झालेला वेळ आणि पैसा पाहता त्याबद्दल चर्चा होणं आवश्यक आहे.’’

‘‘अर्थातच,’’ त्याच्या बोलण्यावर एका शब्दात उत्तर देत ती म्हणाली. तो म्हणाला, ‘‘दोन महिन्यांपूर्वी किमान पंधरा ‘फ्रेशर्स’ तरी आपण कंपनीत घ्यायला हरकत नाही, असं व्यवस्थापनानं सांगितलं होतं. पण परिस्थिती ही आहे, की जेमतेम पाच जण मिळाले आहेत. कालच त्यातल्या दोघांनी आपली ‘ऑफर’ नाकारल्याचा ई-मेल केला आहे. चांगली गोष्ट इतकीच, की दुसरी कंपनी त्यांना अजून किती जास्त ‘पॅकेज’ देते आहे, ते ई-मेलमध्ये लिहिलं आहे. तेव्हा किमान आपण प्रामाणिक लोक निवडले होते, असं म्हणायला तरी हरकत नाही.. काय?’’

त्याच्या उपहासात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक कागद पुढे सरकवत ती म्हणाली, ‘‘आपण गेल्या दोन महिन्यांत काय-काय प्रयत्न केले, त्याची माहिती यात लिहिली आहे. आठ ते दहा महाविद्यालयांमधल्या आणि ‘प्लेसमेंट एजन्सी’नं सुचवलेल्या ‘फ्रेशर्स’ची आपण परीक्षा घेतली. जवळजवळ आठशे जणांनी परीक्षा देऊनही त्यातून जेमतेम पंचवीस जण मुलाखतीसाठी निवडले गेले. त्यातले फक्त पाच फ्रेशर्स आपल्या तांत्रिक परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले. मला मान्य आहे, की ठरवले होते त्याच्या निम्मेही लोक आपल्याला मिळालेले नाहीत. पण आमचं काम हे जसं योग्य ‘फ्रेशर्स’ची निवड करणं आहे तसं योग्य नसलेल्यांची निवड न करणं हेही आहे. उगाच आकडा जुळवायचा म्हणून कोणाचीही निवड करण्यात काय अर्थ आहे?  गेली दोन र्वष चांगले ‘फ्रेशर्स’ मिळतच नाहीत, त्याला आपण तरी काय करणार?’’

‘‘हे शेवटचं वाक्य सोडलं तर बाकी सगळं मला मान्य आहे. नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले चांगले ‘फ्रेशर्स’ मिळत नाहीत हे आपलं अपयश आहे, की चांगल्या ‘फ्रेशर्स’पर्यंत आपण पोहोचू शकत नाही हे आपलं अपयश आहे?’’ कोणताही आडपडदा न ठेवता त्यानं आपला मुद्दा मांडला. त्यावर आपली बाजू स्पष्ट करत ती म्हणाली,‘‘म्हटलं तर दोन्ही. शहरातल्या सर्व नामांकित महाविद्यालयांबरोबर आणि प्लेसमेंट एजन्सीज्शी आपण जोडलेले आहोत. तेव्हा दरवर्षी या महाविद्यालयांमधून शिक्षण पूर्ण करणारे किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेले विद्यार्थी पडताळून बघण्याची संधी आपल्याला बाकीच्या बऱ्याच कंपन्यांच्या आधी मिळते. शिवाय आपण देतो ते ‘पॅकेज’ही चांगलं आहे. तेव्हा आपण निवड करूनही आपली ऑफर मुलांनी नाकारली हे फार कमी वेळा घडतं.’’

तिचं बोलणं अध्र्यात तोडत तो म्हणाला, ‘‘ठीक आहे.  या महाविद्यालयांमुळे आणि एजन्सीज्मुळे आपलं काम सोपं होतं म्हणून आपण त्यांना प्राधान्य देतो, हे समजलं. मात्र हे ‘नेहमीचे यशस्वी’, गेल्या दोन वर्षांपासून आपल्या अपेक्षा पूर्ण करत नसतील तर सगळी निवड त्यांनी पाठवलेल्या मुलांमधूनच केली पाहिजे, असं काहीही बंधन नाही. उलट सर्वाना काही काळ विश्रांती देऊन इतर मार्गाचा विचार केला पाहिजे.’’

‘‘हे व्यवस्थापनानं मान्य केलं आहे का?,’’ तिनं त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. ‘‘नाही. अजून मी सगळ्यांशी बोललेलो नाही. का?..’’ त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. ‘‘कारण सहा महिन्यांपूर्वीच, मी शहराबाहेर असलेल्या काही महाविद्यालयांची नावं व्यवस्थापनातल्या दोन-तीन जणांना ईमेल केली होती. तेव्हा त्यावर मला असं सांगितलं गेलं, की ही महाविद्यालयं ‘ब’ किंवा ‘क’ श्रेणीतली आहेत आणि आपल्या कंपनीची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा बघता अशा महाविद्यालयांमध्ये जाण्यातही काही अर्थ नाही.’’ ती स्पष्टपणे म्हणाली.

‘‘पण महाविद्यालयांना श्रेणी मिळते, तेव्हा त्यात अनेक गोष्टींचा विचार केला जातो. महाविद्यालयामधल्या सुविधा, गोष्टींची उपलब्धता, शिकवणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता, अशा बऱ्याच गोष्टी असतात. महाविद्यालयाची श्रेणी कमी आहे म्हणून तिथले विद्यार्थी चांगले नाहीत, असं इथे बसून म्हणण्याला अर्थ नाही.’’ तो काहीसा वैतागून म्हणाला.

त्यावर मंदपणे हसून ती म्हणाली, ‘‘पण हे आपल्याकडे सगळ्याच विषयातलं सगळं समजणारे जे ‘नेहमीचे यशस्वी’ आहेत. त्यांना कोण समजावणार?’’ तिच्या बोलण्याचा रोख त्याला नेमका समजला. पण त्यावर काय बोलावं हे न समजून तो गप्प राहिला. मग तीच म्हणाली, ‘‘माणसांची निवड करण्यासाठी ठोकताळे हे असायलाच हवेत, पण परिस्थितीनुसार त्यात बदल करणं गरजेचं आहे आणि ते करताना आमच्यासारखे जे लोक महाविद्यालयातली परिस्थिती बघत असतात, प्रत्यक्ष मुलांशी, शिक्षकांशी बोलत असतात, त्यांचं मत विचारात घेणं आवश्यक आहे. अगदी खरं सांगायचं, तर कंपनीची प्रतिमा ही या महाविद्यालयांच्या नावावर अजिबात अवलंबून नसते. एकदा माणूस कंपनीत आला आणि त्यानं जर माती खाल्ली, तर खापर कंपनीच्याच नावानं फुटतं. त्या वेळी तो कोणत्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे हे बघून सूट मिळत नाही.’’

‘‘मान्य आहे. मग करायचं काय?’’ त्याला तिचा मुद्दा पटला होता. त्यावर विचार करून ती म्हणाली, ‘‘ज्या महाविद्यालयामधलं फक्त वातावरण चकचकीत आहे, जी महाविद्यालयं मुलांना भारीतले ‘ड्रेस कोड’ देऊन फक्त वातावरणनिर्मिती करतात, आपली गुणवत्ता वाढवण्यापेक्षा जी महाविद्यालयं कोणती ना कोणती, कुठेही न ऐकलेली मानांकनं स्वत:ला चिटकवत राहतात, अशांना पहिलं आपल्या यादीतून बाहेर काढायचं. हो, मात्र तसं केल्यानं एक होईल, की आपल्या व्यवस्थापनामधल्या लोकांना या महाविद्यालयांच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून जाता येणार नाही.’’ तिचा टोमणा ऐकून तो मोकळेपणानं हसला.

त्यावर ती जरा गंभीरपणे म्हणाली, ‘‘या सगळ्यात आणखी एक मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझं काम हे फक्त आपल्या कंपनीची मनुष्यबळाची गरज पूर्ण करणं, इतकं मर्यादित नाही. म्हणजे तंत्रज्ञानाच्या ज्या क्षेत्रात आपण काम करतो, त्या क्षेत्राशी आपल्या सर्वाची एक बांधिलकी आहे, असं किमान मी तरी मानते. तेव्हा त्या क्षेत्रासाठी योग्य माणसं निवडणं हाही जबाबदारीचा एक भाग आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा तोल सांभाळला जातो. अर्थात फक्त विचार करून गोष्टी साध्य होत नाहीत. त्या विचाराला सर्वाची साथ मिळणंही तितकंच गरजेचं असतं.’’

‘‘सगळ्यांची म्हणजे व्यवस्थापनाची?’’ गोष्टीचा उलगडा झाल्याच्या आविर्भावात तो म्हणाला. त्यावर ती म्हणाली, ‘‘नाही. सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचीच. म्हणजे अगदी माझ्या टीममधल्या लोकांचीही. जरा थोडय़ा वेगळ्या महाविद्यालयात जा म्हटलं की लोकांच्या कुरबुरी सुरू होतात. ‘एसी’ असलेलं, ‘इंटिरिअर’ चांगलं असलेलं, ‘लॅण्डस्केपिंग’ केलेलं महाविद्यालयच उत्तम असतं, असं काही जणांचं ठाम मत आहे. अर्थशून्य असलं तरीही न अडखळता इंग्रजी बोलणारी व्यक्तीच काहींच्या मते आयुष्यात जिंकलेली असते. चांगले कपडे, उत्तम परफ्यूम हे रेशनवर सर्वानाच सारख्या प्रमाणात मिळतात, असाही विचार करणारे लोक माझ्या अवतीभोवती आहेत.’’

‘‘बरोबर आहे. लोकांची मानसिकता हा अवघड विषय आहे.’’ विषयाचा पूर्ण आवाका लक्षात आल्यामुळे तो  सुस्कारा सोडत म्हणाला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘..आणि शेवटचा मुद्दा, या ‘फ्रेशर्स’च्या बाबतीत माझं एक स्पष्ट मत आहे. ज्याला मिळणाऱ्या नोकरीची किंमत आहे, अशा व्यक्तीलाच संधी मिळायला हवी. पगार महत्त्वाचा नक्कीच असतो, पण मी ‘फी’चे इतके पैसे भरले, म्हणून मला इतका पगार मिळायलाच पाहिजे, ही अपेक्षा चुकीची आहे. तेव्हा आपण आपल्या शोधाचा परीघ वाढवायला हवा. जुनाट वाटणाऱ्या, चर्चेत नसणाऱ्या महाविद्यालयांपर्यंतही जायला हवं.’’

क्षणभर विचार करून तो म्हणाला, ‘‘स्वत:च्या घरचा पंखा वर्षांनुर्वष दुरुस्त न करणारे, पण कंपनीची वातानुकूलन यंत्रणा दहा मिनिटं बंद झाली तरी आरडाओरडा करणारे आपल्याकडचे लोक मला माहिती आहेत. अजून काही असे आहेत जे ‘डिओडरंट’नं अक्षरश: आंघोळ करतात, पण फुलाच्या कुंडीमुळे, माळांमुळे त्यांना अ‍ॅलर्जी होते. अशा नमुनेदार लोकांना ‘ट्रॅडिशनल डे’च्या निमित्तानं, संपूर्ण दिवसभर त्यांच्या स्वभावाविरुद्ध वागायला तू जर तयार करू शकतेस, तर व्यवस्थापनाचं मन वळवणं तुझ्यासाठी फार कठीण नाही.’’

‘‘हे तू व्यवस्थापनाचा एक भाग असतानाही म्हणतो आहेस?’’ तिनं आश्चर्यानं विचारलं. ‘‘हो, म्हणून तर जास्त आत्मविश्वासानं सांगतो आहे. सगळे मुद्दे बिनधास्त आकडय़ांसकट मांड.  काही लपवून ठेवायची गरज नाही. मला माझ्या बाजूनं जे काही सांगायचं आहे, ते मी सांगेनच. व्यवस्थापनाला दर वेळी फक्त चांगल्या बातम्याच सांगायला पाहिजेत, असा काही नियम नाही. त्याचबरोबर तुला ज्या महाविद्यालयांमध्ये जाऊन चाचणी घ्यायची आहे, अशा महाविद्यालयांची नावं पण समोर ठेव. त्यातल्या दोन-तीन महाविद्यालयांमधल्या ‘फ्रेशर्स’ना भेटण्याची संधी मिळाली तरी अनेकांचे ‘मेंटल ब्लॉक’  तुटतील.. आणि हो, जाता जाता अगदी सहज म्हणून हेही विचार, की आज यशस्वी करिअर करत असलेले व्यवस्थापनातले किती जण अशा चकचकीत महाविद्यालयातून आले आहेत? म्हणजे मी विचारलं म्हणून नाही हं.. फक्त तुझी उत्सुकता म्हणून,’’ असं म्हणत तो मिश्कीलपणे हसला आणि त्यानं आपला लॅपटॉप बंद केला.