बरेचसे पालक अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टवर विश्वास ठेवतात. माझ्या प्रदीर्घ अनुभवातून मी हे ठामपणे सांगू इच्छितो की या सगळ्या बाह्य़ घटकांवर सर्वस्वी अवलंबून राहणं चुकीचंच नाही तर धोक्याचंही आहे. मानसशास्त्राने निर्माण केलेल्या अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट वापरून आपण मुलांच्या क्षमतेवर शिक्का मारणं योग्य आहे का?
सा धारणपणे मुलं १०वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आजकालचे थोडेसे जागृत, उच्चशिक्षित पालक आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करू लागतात. मात्र बहुसंख्य पालकांची मन:स्थिती गोंधळलेली असते त्यात भर म्हणजे ते आजूबाजूच्या नुकत्याच त्या परीक्षांना बसलेल्या, उत्तीर्ण झालेल्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकांचा सल्ला घेतात. त्यानंतर हा गोंधळ कमी होण्याऐवजी अधिकच वाढत जातो. सध्या शैक्षणिक विश्वात, सरकार एक धोरण निश्चित करतं त्याला राज्यं विरोध करतात. मग प्रकरण न्यायालयात जातं. त्यानंतर येणारा न्यायालयाचा निर्णय आणखी वेगळा असतो. मेडिकलसाठी आयोजित केलेल्या ‘नीट’ या परीक्षेबद्दल जो घोळ चालला आहे तो बघितला तर इंजिनीयरिंगच्या परीक्षेबद्दलही असंच होईल की काय अशीही शंका त्यांना वाटते. हे सगळेच प्रश्न योग्यच आहेत, सूचित करणारे आहेत. आजकाल १२वीनंतर Jee मेन्स आणि I.I.T.च्या प्रवेशासाठी Jee अ‍ॅडव्हान्स अशा दोन संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत. त्यापैकी प्रशिक्षणासाठी कुठला पर्याय योग्य आहे. I.I.T.च्या अ‍ॅडव्हान्स Jeeसाठी जर तयारी केली तर त्यामुळे १२वीचे मार्क्‍स कमी तर होत नाही ना? कारण I.I.T. त फारच थोडय़ा मुलांना प्रवेश मिळतो. तेव्हा तिथे अ‍ॅडमिशन मिळाली नाही तर घेतलेलं प्रशिक्षण इतर परीक्षांना उपयुक्त ठरेल ना? अशा तऱ्हेच्या अनेक प्रश्नांच्या मालिकांना मला बऱ्याच वेळा सामोरं जावं लागतं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करण्याचा हा  प्रयत्न.
सर्वप्रथम आपल्या पाल्याची क्षमता ठरवण्यासाठी माझ्या मते दोन प्रकारचे घटक विचारात घ्यायला हवेत बाह्य़ घटक  (External factors)  आणि अंतर्गत (Internal factors) बाह्य़ घटकांमध्ये त्या मुलाची किंवा मुलीची आत्तापर्यंतची कामगिरी, आतापर्यंत मिळत असलेले मार्क्‍स, संपूर्ण शैक्षणिक इतिहास, आवडी-निवडी, सवयी वगैरे यांचा समावेश होईल. तर अंतर्गत घटकांमध्ये त्या मुलाची किंवा मुलीची मानसिक जडणघडण म्हणजे चिकाटी, संयम, स्वत:वरचा विश्वास, हवं ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी, निग्रही वृत्ती किंवा तिचा अभाव, आपल्याला काय करायचं आहे, याचा सुस्पष्ट विचार किंवा अभाव याचा समावेश होतो. बाह्य़ घटक सर्वानाच कळतात, माहीत असतात. त्यामुळे बरेचसे पालक त्याच्यावरच पूर्णपणे विसंबून राहतात. बरेचसे पालक अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टवर विश्वास ठेवतात. माझ्या प्रदीर्घ अनुभवातून मी हे ठामपणे सांगू इच्छितो की या सगळ्या बाह्य़ घटकांवर सर्वस्वी अवलंबून राहणं चुकीचंच नाही तर धोक्याचंही आहे. मला अशी अनेक मुलं माहीत आहेत जी होमी भाभा, नॅशनल टॅलेंट सर्च या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होती. परंतु आयआयटी काय, बारावीतदेखील त्यांची कामगिरी यथातथाच होती. याउलट यापैकी एकाही स्पर्धापरीक्षेत यश न मिळालेले पण आयआयटीत यशस्वी झालेले विद्यार्थीदेखील मला माहीत आहेत. अर्थात या सगळ्या परीक्षांमध्ये आणि आयआयटीतही यशस्वी होणारे अनेक विद्यार्थी असतील. थोडक्यात दोन्ही-अंतर्गत आणि बाह्य़ घटक अस्तित्वात असतील किंवा एखाद वेळेस बाह्य़ घटक दिसतही नसतील पण चिकाटी, दृढनिश्चय, यशासाठी वाटेल तेवढे परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतं. आपल्या पाल्याकडे दोन्ही घटक असतील तर उत्तमच. अन्यथा अंतर्गत घटकांमध्ये तरी तो समर्थ असला पाहिजे. बाह्य़ घटक असतील पण अंतर्गत नसतील तर त्याला यशस्वी होणं कठीण आहे. मुख्य मुद्दा मुलांची तयारी किंवा क्षमता ठरविण्यासाठी आपण जे पर्याय वापरतो त्यामुळे त्याच्या भवितव्यावर, एकंदर व्यक्तिमत्त्वावर जो परिणाम होणार असतो त्याचा संपूर्ण विचार आपण करतो का? उदा. मानसशास्त्राने निर्माण केलेल्या अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट वापरून आपण मुलांच्या क्षमतेवर शिक्का मारणं योग्य आहे का? मुळात या टेस्टवर व्यक्तिश: माझा आजिबात विश्वास नाही. उदाहरणच जर द्यायचं तर माझा स्वत:चा अनुभव अतिशय बोलका आहे. ११वी परीक्षा पास झाल्यांनंतर घेतल्या जाणाऱ्या अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टला मी सलगपणे ७-८ दिवस गेलो. त्यांनी दिलेला निर्णय तेव्हा तरी धक्कादायक वाटला. मला असं सांगण्यात आलं की मी गणितात अतिशय कच्चा आहे. पण विरोधाभास हा की माझं पुढचं सगळं आयुष्य गणित शिकण्यात आणि शिकवण्यात गेलं. गणित येणं म्हणजे काय? गणित येण्यासाठी कुठल्या मानसिक प्रक्रिया कारणीभूत असतात की ज्याचं मूल्यमापन या टेस्ट करू शकतात ते कळत नाही. बऱ्याच वेळा अंकगणित किंवा वेगाने गुणाकार/भागाकार किंवा कुठल्याही तऱ्हेची आकडेमोड करणाऱ्यांना गाणित चांगलं येतं असा एक गैरसमज असतो. खरं म्हणजे एखाद्याला उत्तरं वेगाने देता येत नसतील पण भरपूर वेळ असेल तर तो अद्वितीय संशोधन, जर त्या विषयात त्याला आवड असेल तर, नक्कीच करू शकेल. तेव्हा वयाच्या १५/१६व्या वर्षी एखाद्या व्यक्तीला एखादा विषय किंवा एखादी करीयर सुटेबल आहे की नाही हे केवळ काही टेस्टस्द्वारे ठरविणं अयोग्य आहे. जरी क्षणभर गृहीत धरलं की या टेस्ट योग्य आहेत तरीदेखील त्या वयात त्या वेळच्या त्याच्या मानसिक क्षमतेची ती चाचणी असेल. माणसाची क्षमता ही स्थिर कधीच नसते. ती सतत बदलत असते. एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा जर आपण सतत करत राहिलो तर त्याला आपल्याला गती प्राप्त होते. आपली प्रगती होते. तेव्हा कुठल्याही व्यक्तीला तू आयआयटीत कधीच जाऊ शकणार नाहीस किंवा तू आर्किटेक्ट होऊ शकणार नाहीस किंवा तुला डॉक्टर होणं अशक्य आहे. अशा तऱ्हेचे निर्णय काही परीक्षांच्या आधारावर घेणं हे अनुचित आणि अवसानघातकी आहे. चिकाटी, संयम, समोरच्या लक्ष्यावरचं लक्ष अजिबात ढळू न देता ते साधण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असलेला माणूस आयुष्यात काहीही घडवून आणू शकतो. एडिसन, बेंजामिन, फँ्रकलीन, लिंकन अशी अनेक उदाहरणं देता येतील. अमिताभ बच्चन रेडीओ निवेदक म्हणून सिलेक्ट होऊ शकला नाही. कारण त्याचा आवाज चांगला नाही असं सांगण्यात आलं. लता मंगेशकरच्या सुरुवातीच्या काळात तुझा आवाज फारच बारीक आहे म्हणून गायिका होऊ शकणार नाही असं सांगण्यात आलं. पुढे काय झालं ते सर्वाना ज्ञात आहेच. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
खरं म्हणजे आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, आपल्याला काय साध्य करण्यात स्वारस्य आहे, आपल्या आयुष्यात काय घडेल म्हणजे आपल्याला धन्य वाटेल असे प्रश्न स्वत:ला विचारलं पाहिजे. त्यातून आणि आपल्याला प्रिय असलेल्या स्वप्नांमधून आपल्याला आपली दिशा आणि ध्येय सापडतं. ते एकदा सापडलं की ते कितीही दुर्गम, अप्राप्य वाटलं तरी ते मिळवण्यासाठी परिश्रम करण्याचं स्वत:ला प्रशिक्षण देणं हाच योग्य मार्ग आहे. मला परत परत हे सांगावंसं वाटतं की मी काय होणार, काय करणार आणि कुठलं ध्येय गाठणार हे ठरवण्याची जबाबदारी कृपया ते तुमचे पालक असोत, शिक्षक असोत की नातेवाईक आणि परीक्षांमध्ये मिळणाऱ्या मार्कानाही हा अधिकार देऊ नका, कुठलीही परीक्षा किंवा टेस्ट तुमच्या भूत व वर्तमानकालीन क्षमतेचं मोजमाप असू शकतं.
माणसाच्या भविष्याचा वेध घेणारी परीक्षा माझ्या मते अजून अस्तित्वात यायची आहे. थोडक्यात आपले सगळे प्रयत्न त्याचे अंतर्गत घटक चिकाटी, संयम, ध्येयाच्या आड येणाऱ्या सर्व प्रकारच्या मानसिक अडचणींवर मात करण्याचं प्रशिक्षण देण्याकडे असले पाहिजेत. करियरचा निर्णय पाल्याच्या आवडीवर सोडून द्या पण जे काही तो निवडेल त्यात तो अत्युच्चपदावर जाऊ शकेल अशी त्याची मानसिकता घडवण्याचं प्रशिक्षण देणं हे आपल्या हातात आहे.
ते करण्यासाठी आज अनंत पर्याय उपलब्ध आहेत. उदा. N.C.P म्हणजे न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आपला मेंदू मज्जारज्जूचा बनलेला असतो. आपण लहानपणापासून काय करायचं ते ऐकत असतो. त्याचं स्वसंमोहनात रूपांतर होतं. थोडक्यात वारंवार उच्चारलेलं ध्येय साध्य करणारे प्रोग्रॅमिंग मज्जारज्जूत होत असते. दुर्दैवाने बरीच र्वष ही प्रक्रिया आपल्या नकळत होते. परंतु हे आपल्याला स्वेच्छेने घडवून आणायचं असेल तर ध्येयाचा उच्चार वारंवार करून (Linquistic) मज्जारज्जूंना संमोहित (Autosugestims) करून इच्छित ध्येय साध्य करता येतं. आपल्या भावनांवर ताबा ठेवणं त्यांना योग्य त्या ध्येयाच्या दिशेनं वळवणं त्यासाठी आपल्या व ध्येयाच्या मध्ये असलेली डिस्ट्रॅक्शनस् दूर करण्याचं तंत्र मानसशास्त्राचा ट्रान्झॅक्शनल अ‍ॅनालिसिस या शाखेचा वापर करून करता येतं. N.L.P आणि T.A आत्मसात केलं तर प्रभावीपणे व्यक्ती ध्येयाचा पाठपुरावा करू शकते.
एक लक्षात ठेवलं पाहिजे की सल्लाच घ्यायचा असेल तर तो यशस्वी विद्यार्थ्यांचा घ्या. अयशस्वी विद्यार्थ्यांचा घेऊ नका. समजा एखादा चाळीत जन्माला आलेला मुलगा जेव्हा आपल्या बाजूच्या माणसाला सांगतो की,‘मला ना करोडपती व्हायचे आहे.’तर तो त्याला काय सांगेल,‘हे बघ जमिनीवर राहा. आमचं आयुष्य या चाळीत गेलं. साधा एक बेडरूम हॉलचा फ्लॅट घेणंही जमलं नाही. नको ती स्वप्नं बघू नकोस.’ हाच मुलगा जर नेपीयनसी रोडवरच्या टोलेजंग इमारतीच्या पायथ्याशी उभा राहून एखाद्या तिथे राहणाऱ्या इसमाला म्हणाला,‘मला ना करोडपती व्हायचं आहे’. तर त्याचं उत्तर असेल,‘जरूर होशील काही वर्षांपूर्वी मीदेखील तुझ्याच अवस्थेत होतो. आजचं माझं हे वैभव तुलाही मिळवायचं असेल तर मी सांगतो ते कर..    
 pmjakatdar@gmail.com

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…