बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. म्हणूनच वाचिक अभिव्यक्तीकडे गांभीर्याने पाहायला हवे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वक्तृत्वाची साधी, सोपी आणि सरळ व्याख्या केलेली आहे. ते म्हणत, ‘एखाद्याचे बोलणे ऐकत राहावे असे ऐकणाऱ्याला वाटते तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारे, आविष्कृत होणारे आणि प्रकट होणारे ते वक्तृत्व.’
  एखाद्याजवळ उदंड ज्ञान असते; पण ते इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेली शब्दशक्ती नसते. अनेकांजवळ शब्दशक्ती असते, पण ज्याच्यासाठी ती वापरायची ते ज्ञान नसते. ग्रंथांचा उदय होण्यापूर्वी वक्तृत्वाने फिरती ज्ञानपोई चालवली. बोलणे हे साहित्याचे पहिले रूप आहे. आरंभीचे बहुतांशी साहित्य खऱ्या अर्थाने वाङ्मयच होते. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी आधी सांगितली नंतर सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. ‘ऐसी अक्षरे रसिकें। मेळवीन’ अशी प्रज्ञा असणाऱ्या ज्ञानेश्वरांनीदेखील साहित्याचे पहिले रूप प्रधान मानले. कौरव पांडवांच्या युद्धात हतबल झालेल्या अर्जुनाला उभे करण्यासाठी श्रीकृष्णाने सगळी शस्त्रे बाजूला ठेवून शेवटी वक्तृत्वाचे शस्त्र हाती घेतले आणि अर्जुनाला गीता सांगितली इतके वक्तृत्वाचे मोठेपण आहे.
शब्द हे वक्तृत्वाचे शरीर, विचार हा आत्मा आणि वक्त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नानाविध रस ही वक्तृत्वाची आभूषणे असतात. शब्दशक्तीचे गर्वयुक्त प्रदर्शन करण्यापेक्षा वक्त्यांनी आपली ज्ञानशक्ती वाढवली, तर त्या ज्ञानशक्तीपुढे श्रोते आदराने नतमस्तक होतात.
यातच वक्तृत्वाचा खरा आनंद आहे. त्यातूनच वक्तृत्वाला अभिप्रेत असणारे काम होणार आहे. गोमांतक कवी सोहिरोबा आंबिये म्हणत,
विवेकाची ठरेल ओल । जे बोलायचे ते ऐसे बोल ।
आपुले मते उगीच चिखल । कालवू नको रे ॥
उत्तम वक्ता होण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्याने प्रथम उत्तम श्रोता झाले पाहिजे. अनेकांची व्याख्याने ऐकली पाहिजेत. वक्तृत्वाचे नानाविध आकार आणि प्रकार अनुभवले पाहिजेत. श्रवणभक्ती मनोभावे केली पाहिजे. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचक होता आले पाहिजे.
वाचून, थांबून, विचार करून पुढचे वाचले पाहिजे. जसे खाल्लेले पचविल्याशिवाय माणसाची प्रकृती सुदृढ होत नाही, तसे वाचलेलेही पचवावे लागते. काय वाचले, कुठे वाचले, कशात वाचले, याच्या नोंदी ठेवण्याची सवय असेल तर एखाद्या विषयाची व्याख्यानासाठी तयारी करताना त्याचा खूप फायदा होतो. ‘सर्वसारसंग्रह’ या नावाची अनेक पृष्ठांची स्वातंत्र्यवीर सावरकरांची टिपणवही पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो. सावरकर म्हणत, ‘माझ्या वक्तृत्वाचा पाया या टिपणवहीने मजबूत केला आहे.’ वाचनातून मनाच्या गाभाऱ्यात काही विचार शिरले की त्यांना नवे धुमारे फुटू शकतात. म्हणून गंभीरपणाने वाचन केले पाहिजे.
वक्त्याच्या ठायी एखाद्या सुगरणीचे कौशल्य असणे आवश्यक आहे. सुगरणीजवळ स्वयंपाकघरात सर्व प्रकारची सामग्री आणि वस्तू उपलब्ध असतात; पण ‘स्वयंपाक’ ही तिचीच मिरासदारी असते. अनेकदा तो पदार्थ वर्षांनुवष्रे अस्तित्वात असल्यामुळे कृतीही माहीत असते, पण तिची कल्पकता आणि सर्जनशीलता यांतून रुचकर पदार्थ तयार होतो. हे कसब वक्त्याला साधता आले पाहिजे. आजवर केलेले वाचन, घडलेले श्रवण यांवर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे, विचारांचे काही संस्कार ज्याला करता येतात त्याचे वक्तृत्व इतरांपेक्षा वेगळे उठून दिसते. ही कला एका दिवसात आत्मसात करता येत नाही. स्वयंपाक हा जसा करता करता येतो, सराव करून खेळ जमतो, रियाज करून गाणे जमते, तालमी करून नाटक जमते तसेच वक्तृत्वाचे देखणे रूप साधनेतूनच आकाराला येते. वक्तृत्व ही केवळ शब्दांची आतषबाजी नसते, तर ती जीवनाची उपासना असते. ही उपासना निष्ठापूर्वक करणाऱ्यांनाच वाग्देवता प्रसन्न होते.
मनात एकदा विषयाचा आराखडा तयार झाला की, त्याचे ‘चिंतन’ केले पाहिजे. जशी पॉलिशमुळे सोन्याला झळाळी येते तसे चिंतनामुळे वक्तृत्व तेजस्वी होते. श्रवण आणि वाचन, मनन आणि चिंतन यांना एकांताचे कोंदण लाभले तर वक्त्याचे वक्तृत्व झळाळून निघते.
अनेक वक्त्यांना हातात मुद्दय़ांचे टिपण घेऊन बोलणे सोयीचे वाटते किंवा अपरिहार्यही असते; पण कागद किंवा टिपण हा वक्ता आणि श्रोता यांच्यातला मोठा अडसर ठरू शकतो. वक्ता टिपणात अडकून राहतो. श्रोत्यांच्याही वाटय़ाला एकाग्रता येत नाही. त्यामुळे जो टिपणाशिवाय संवाद साधतो, त्याचा अधिक प्रभाव पडतो. मनन आणि चिंतन प्रभावीपणे करता आले तर स्मरणात सर्व काही उत्तम राहू शकते. स्मरणशक्ती ही एखाद्या वेलीसारखी असते. सर्व घटक योग्य प्रमाणात मिळाले की जशी वेलीची वाढ होते, तसेच लेखन, वाचन, मनन आणि चिंतन मन:पूर्वक केले की स्मरणशक्तीची वेल गगनाला जाऊन भिडू शकते.
 स्वामी विवेकानंदांना एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे सर्वच्या सर्व खंड मुखोद्गत होते. कोणताही संदर्भ कोणत्याही टिपणाशिवाय ते देऊ शकत होते. जशी आपण शरीरसंपदा कमावतो, तशीच स्मरणशक्तीही कमावता येऊ शकते. ज्या वक्त्यांपाशी स्मरणशक्ती असते त्यांचे वक्तृत्व अधिक नेटके, सुडौल आणि सुरस होते.
वक्ता ज्यावेळी बोलत असतो तेव्हा एकाच वेळी दोन क्रिया घडत असतात. स्वत:शी विचार करीत करीत तो बोलत असतो, त्याच वेळी तो श्रोत्यांशी संवाद साधत असतो. त्याच्या विचाराचा वेग आणि प्रतिपादनाचा वेग या दोन्ही वेगाला खूप महत्त्व आहे. वक्तृत्वात वेग आवश्यक आहे. कारण त्याशिवाय भाषण प्रभावी आणि प्रवाही होत नाही; पण प्रचंड वेगाने बोलणारे वक्ते स्वत:चे आणि श्रोत्यांचेही नुकसान करतात. धपधप पडणारा पाऊस जमिनीच्या पृष्ठभागावरून लगेच वाहून जातो; पण हळुवार येणाऱ्या पावसाच्या सरी जमिनीमध्ये खोलवर जातात आणि त्यावर पिकांचे चांगले भरणपोषण होते. हळुवार तरीही प्रवाही वक्तृत्व श्रोत्यांच्या अंत:करणाच्या तारा छेडू शकते.
वक्त्याच्या ठायी शब्दशक्ती, विचारशक्ती, स्मरणशक्ती याचबरोबर एक अवधानशक्ती असली पाहिजे. आपण कुठे बोलतो आहोत, श्रोत्यांची मानसिकता कशी आहे, समारंभाचा उद्देश काय आहे, याचे आकलन वक्त्याला व्यासपीठावर येताना आणि व्यासपीठावर बसल्यावर झाले पाहिजे. आपले तेच खरे असे मानणारे आणि श्रोत्यांवर प्रत्येक गोष्ट लादणारे वक्ते लवकर कालबाह्य़ होतात. प्रत्येक वक्त्याला स्वत:ची म्हणून शैली असावी लागते.  कोता आवाज वक्तृत्वाचा प्रभाव पाडू शकत नाही. गायक आवाज कमावतात. त्यासाठी नानाविध प्रकारचे व्यायाम, प्राणायाम, ॐकाराचे उच्चारण करतात. आवाज कमावण्यासाठी हे सारे मार्ग वक्त्यानेही चोखाळले पाहिजेत.
वक्ता होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपकी एकही गुण नसलेला डेमॉस्थेनिस महान वक्ता झाला. त्याचे चरित्र प्रत्येक वक्त्याने अभ्यासले पाहिजे. त्याचा आवाज कोता, कमकुवत आणि कापरा होता. तो रोज धावण्याचा सराव करू लागला. टेकडय़ांवरून चढ-उतार करू लागला. त्याची श्वसनशक्ती मजलेदार झाली. पल्लेदार वाक्ये धाप न लागता त्याला पेलता येऊ लागली तरीही एक अडचण जाणवली. त्याचा आवाज पल्लेदार झाला; पण दमदार झाला नाही. त्याला वजन, विस्तार आणि व्याप्ती नव्हती. तो सागरतीरावर जाऊन मोठय़ाने बोलू लागला. लाटांनाच श्रोते मानून तो बोलत राहिला. त्याची वाणी खणखणीत झाली. गालावरचे, मुद्रेवरचे आणि जिभेचे स्नायू बळकट व्हावेत म्हणून काही काळ लोकभ्रमाच्या आहारी जाऊन तो तोंडात गारगोटय़ा धरून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यात थोडी गंमत आणि बराचसा वेडेपणा होता. आवाज तयार झाला. शब्दसामथ्र्य आणि भाषावैभव संपादन करण्यासाठी त्याने थुसिडिडिज या लेखकाचा इतिहासग्रंथ अनेकदा वाचला. काही वेळा तो अक्षरश: आणि विरामश: उतरवून काढला. त्याच्या ओठात आणि बोटात भाषा भिनली. एक जिव्हाजड माणूस महान वक्ता झाला. ग्रीस देशातल्या वक्तृत्व पंढरीचा पांडुरंग झाला.
वक्तृत्व आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. एक-दीड तास सलग बोलण्यासाठी अंगात मोठी रग असावी लागते. पल्लेदार वाक्ये उच्चारताना श्वास टिकवून ठेवावा लागतो. अनेकदा परगावी एक तासाचे व्याख्यान देण्यासाठी बारा-चौदा तासांचा प्रवास करावा लागतो. त्याचा शीण बाजूला ठेवून प्रसन्न मुद्रेने सभेला सामोरे जावे लागते.
व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची आज मोठी पीछेहाट होत असली तरी बोलण्याचे किंवा नेटक्या बोलण्याचे महत्त्व कदापिही कमी होणार नाही. उलट ते वाढतेच आहे. संवाद, मुलाखती, परिसंवाद, चर्चासत्रे, निवेदन अशा अनेक रूपात भरजरी थाटात ते वावरते आहे. उत्तम बोलता येणाऱ्याचे हे दिवस आहेत. गुजगोष्टी करण्यापासून कॉर्पोरेट जगतात उच्चरवात आपली भूमिका मांडण्यापर्यंत प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींशी बोलणे निगडित आहे.
बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. म्हणूनच वाचिक अभिव्यक्तीकडे गांभीर्याने पाहायला हवे.     
joshi.milind23@gmail.com

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?