News Flash

सायक्रोस्कोप : विस्मरणाची कला

आपला मेंदू म्हणजे जुन्यानव्या आठवणींचं आगरच. कधी कुठली आठवण डोकं  वर काढेल ते सांगता येत नाही.

भूतकाळातल्या काही अप्रिय घटना आणि आठवणी अशा असतात, की त्या आपल्याला वारंवार आठवत राहतात, किं वा खरंतर आपणच त्या वारंवार उगाळत बसतो.

डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आपला मेंदू म्हणजे जुन्यानव्या आठवणींचं आगरच. कधी कुठली आठवण डोकं  वर काढेल ते सांगता येत नाही. भूतकाळातल्या काही अप्रिय घटना आणि आठवणी अशा असतात, की त्या आपल्याला वारंवार आठवत राहतात, किं वा खरंतर आपणच त्या वारंवार उगाळत बसतो. परंतु त्यामुळे वर्तमानकाळात असणारं आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडतं. स्मरणशक्ती ही गोष्ट एरवी महत्त्वाची मानली जात असली, तरी अशा अप्रिय आठवणींच्या बाबतीत टप्प्याटप्प्यानं विस्मरण शिकावं लागतं. त्याअर्थी ती एक कला आहे.

प्रमिलाच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आकस्मिक निधन झालं. या विकाराची कुठलीही पूर्वलक्षणं त्याला नव्हती किंवा इतर विकारही नव्हते. ध्यानीमनी नसताना त्याला अचानक झटका आला आणि वैद्यकीय मदत मिळण्याअगोदरच त्याची जीवनयात्रा संपली. समोर हसतखेळत असणारा आपला नवरा काही क्षणांतच या जगातून नाहीसा होतो, हे सत्य पचवणं प्रमिलाला अजूनही अवघड जातंय. तो प्रसंग तिला आजही तपशिलांसकट जसाच्या तसा आठवतो आणि ती अस्वस्थ होते.

समीरच्या आधीच्या नोकरीतल्या आठवणी सुखद नाहीत. याचं मुख्य कारण तिथले वरिष्ठ होते. ते त्याला अपमानास्पद बोलायचे. पदानुरूप असलेल्या कामाव्यतिरिक्त इतर जबाबदाऱ्याही त्याच्यावर ढकलायचे. त्याच्या कामाची प्रशंसा तर दूरच राहो, पण ते काम आपण स्वत:च केलं आहे, असा आव इतरांसमोर आणायचे. यावर कहर म्हणजे पदोन्नतीच्या वेळीही त्यांनी समीरला डावललं. शेवटी समीरनं दुसरी नोकरी शोधली. तिथे स्थिरस्थावर होऊन दोन र्वष झाली तरी त्या अन्यायाची आठवण समीर विसरू शकत नाही.

प्रमिला आणि समीर यांच्या जीवनाची पुढची वाटचाल चालू झाली आहे. त्यांनी अनुभवलेले दु:खद प्रसंग आता मागे पडले आहेत. पण त्यांच्या मनातून या कटू प्रसंगांची स्मृती काही केल्या पुसली जात नाही. त्यांना ते प्रसंग सतत आठवतात आणि त्यांच्या दु:खाच्या जखमेवर खपल्या धरण्याऐवजी परत परत उघडल्या जातात. या दोघांप्रमाणे आपल्या सगळ्यांच्याच मनात भूतकाळातल्या कुठल्या ना कुठल्या अप्रिय घटना थमान घालत असतात. कुणीतरी मनाला लागेल असं बोललेलं असतं, कुणी जिव्हारी लागेल असा अपमान केला असतो, काहींनी असंस्कृत वागणूक दिली असते, तर काही वेळा आपण दुर्दैवी परिस्थितीच्या तडाख्यात सापडलेलो असतो. जसजसा काळ जाईल तसा या अप्रिय घटनांचा आपोआपच विसर पडेल, अशी आपली अपेक्षा असते. पण उलट जास्त जोमानं त्या आपल्याला आठवत राहतात आणि मानसिक प्रक्षुब्धता वाढवतात.

स्मरणशक्ती टिकवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात किंवा स्मरणशक्ती वाढवण्याची अनेक तंत्रं असतात, हे आपल्याला माहीत असतं. पण प्रमिला अणि समीरप्रमाणे जेव्हा काही घटनांचं सततचं स्मरण मानसिक स्वास्थ्यास बाधा आणतं, तेव्हा मात्र आपल्याला विस्मरणासाठीही मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी ‘विस्मरणाची कला’ आत्मसात करणं गरजेचं आहे. ही कला आनंदी राहाण्यास शिकवते आणि ती पायरीपायरीनं जोपासता येते. ती सरसकट सगळ्या गोष्टींचं विस्मरण करावयास सांगत नाही, तर केवळ आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या स्मृतीचंच विस्मरण करावयास  शिकवते. म्हणजेच ‘निवडक विस्मरण’ (‘सिलेक्टिव्ह फरगेटिंग’) करावयास सांगते.

विस्मरणाची कला स्मृतीचं दमन करायला सांगत नाही, दमन म्हणजे अप्रिय स्मृती दाबून टाकणं. दमनात अप्रिय स्मृतीचं महत्त्व कमी होत नाही. त्यामुळे काही काळानंतरही ती आपल्याला अस्वस्थ करते. याउलट विस्मरणाची कला अप्रिय स्मृतीचं महत्त्व कमी करण्याची शिकवण देते. त्यामुळे केंद्रस्थानावर असलेली स्मृती पिछाडीला जाऊन नवीन स्मृतींना वाट करून दिली जाते. ही कला अवगत करण्याची पहिली पायरी म्हणजे भूतकाळातल्या अप्रिय घटनांतून आपण काही बोध घेऊ शकतो का याचा आढावा घेणं. प्रमिला असा बोध घेऊ शकते, की जीवनातल्या अनेक घटना माझ्या नियंत्रणात नाहीत, त्यांचा स्वीकार करण्याची माझी क्षमता मी वाढवली पाहिजे. समीर असा बोध घेऊ शकतो, की अन्याय करणाऱ्या माणसांना यशस्वीपणे हाताळण्याचं कौशल्य मी स्वत:मध्ये विकसित केलं पाहिजे. अशी माणसं मला जीवनात इतरत्रही भेटतील. त्यांना हाताळताना मला या कौशल्याचा उपयोग होऊ शकेल.

दुसऱ्या पायरीवर स्वत:ला हे पटवून देणं गरजेचं आहे की अप्रिय स्मृतीचं विस्मरण आपोआप होणार नाही. त्यासाठी स्वत:ला पावलं उचलून विस्मरणासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतील. प्रमिला आणि समीरला वाटतंय, की आपल्या आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांची तीव्रता जास्त असल्यामुळे त्या आपल्याला आपोआप आठवतात. म्हणजे या घटना हे आपल्या अस्वस्थतेचं मुख्य कारण आहे, असं त्यांना वाटतंय. तसं असतं तर त्या घटना संपल्याक्षणी त्यांची अस्वस्थताही संपुष्टात यायला हवी होती. पण तसं होत नाही, कारण या घटना घडून गेल्यानंतरही त्यासंबंधी स्वत:शी किंवा इतरांशी परत परत बोलून किंवा उगाळून त्यांची स्मृती ते मनात जागती ठेवतात. थोडक्यात त्या घटना त्यांना आपोआप आठवत नसून त्या आठवण्यात व त्यांची तीव्रता वाढवण्यात त्यांचा स्वत:चा सहभाग आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं तर त्या घटनांचा विसर पडण्यासाठी ते सक्रिय प्रयत्न करतील.

या प्रयत्नातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे विचारांची छाननी. प्रमिला विचार करते, की मी पतीच्या मृत्यूच्या घटनेचं स्मरण करणं सोडून दिलं तर मी कृतघ्न ठरेन. तो या जगात नसताना मी आनंद घेणं अयोग्य आहे. प्रमिलानं जर या विचाराची छाननी केली तर तिला कळेल, की जरी मोठा काळ तिनं पतीसमवेत घालवला असला तरी तिचं अस्तित्व पतीपेक्षा वेगळं आहे. तो भेटण्यापूर्वीही ती जीवनातला आनंद घेऊ शकत होती. तसंच तो नसल्यावरही ती तो घेऊ शकते. ते अयोग्य नसून तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी  आवश्यक आहे. तसंच पतीला खरी श्रद्धांजली आनंदी स्मृतींनी मिळेल, दु:खद स्मृती आळवून नाही.

समीर विचार करतोय, की त्या घटनांचं स्मरण करून मी माझ्या कोंडमाऱ्याला वाट करून देत आहे. समीरनं जर या विचाराची छाननी केली तर त्याला कळेल की त्या घटनांचं स्मरण त्याचा कोंडमारा कमी न करता उलट सूड, राग अशा विघातक भावनांची पदास करत आहे. इतकंच नाही तर अशा प्रसंगांशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणारा त्याचा आत्मविश्वासही खच्ची करत आहे.

थोडक्यात, आपले सध्याचे विचार मानसिक स्वास्थ्यसंवर्धनासाठी मदत करत नाहीत आणि त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे, हे प्रमिला आणि समीर या दोघांनाही पटलं तर  विस्मरणाचा मंत्र त्यांना शिकता येईल. हा मंत्र आहे, ‘लेट गो.’ म्हणजे सोडून द्या किंवा घट्ट पकडून बसू नका. हा मंत्र भूतकाळाबद्दल असंवेदनशील होण्यास सांगत नाही तर त्याबद्दलची अतिसंवेदनशीलता कमी करण्यास सांगतो. जर आपण भूतकाळाशी स्वत:ला जखडून घेतलं तर वर्तमानकाळातल्या प्रसंगांची मुळं किंवा कारणं भूतकाळात शोधत बसण्याची सवय लागते आणि आपण भूतकाळात अधिकाधिक गुरफटत जातो. वर्तमानात जगण्यासाठी भूतकाळाचं ओझं कमी करण्याची गरज आहे. जर घडलेली घटना पुढे न नेता तिथल्या तिथे सोडून दिली तर हे ओझं कमी होऊ शकतं. हा मंत्र अप्रिय भूतकाळातून आपली सोडवणूक करतो.

चारचाकी चालवताना आपण लक्ष प्राधान्यानं पुढे दिसणाऱ्या रस्त्यावर ठेवतो. मागचं दिसणाऱ्या आरशावर नाही. मागच्या आरशावर मध्ये मध्ये नजर ठेवणं ठीक आहे. पण पुढे न पाहता मागचं दिसणाऱ्या आरशाकडेच नजर लावून बसलो तर अपघात होऊ शकेल. तद्वतच जीवनाचा रस्ता चालताना पुढे नजर ठेवली पाहिजे. अधूनमधून मागे नजर टाकणं म्हणजे भूतकाळातल्या घटनांतून योग्य तो बोध घेणं. पण बोध घेतल्यानंतरही आधीच्या घटनेकडं नजर लावून बसलो तर पुढील जीवनप्रवास सुखकर होणार नाही, असं हा मंत्र सांगतो.

सोडून देणं म्हणजे त्या अनुभवातून बाहेर पडणं आणि नवीन अनुभवांना वाट करून देणं. आपल्या ओंजळीत जर आपण भूतकाळातली टरफलं घेऊन बसलो, तर नवीन अनुभवांना सामावून घ्यायला आपले हात रिक्त असणार नाहीत. आपल्याला नवीन दिसू शकणार नाही. आपण नवीन ऐकू शकणार नाही. नवीन अनुभवू शकणार नाही. आज उगवलेला दिवस नवा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तो कालच्यापेक्षा निराळा आहे हे पुन्हा पुन्हा मनावर ठसवलं पाहिजे. तो अनुभव मला काल खूप महत्त्वाचा होता, आज तितका नाही. आज मला वेगळे अनुभव महत्त्वाचे आहेत. माझ्या अनुभवांच्या कक्षा जेवढय़ा विस्तारत जातील, तेवढं कालच्या अनुभवांचं आज मोठं वाटणारं वर्तुळ छोटं होत त्याचा िबदू होत जाईल, हे स्वत:ला सांगितलं पाहिजे.

विस्मरणाची कला आत्मसात करण्याची शेवटची पायरी म्हणजे एक तंत्र आहे. या तंत्राचं नाव आहे, ‘लाल फुलीचं तंत्र’. लाल फुली ही ‘धोका’ किंवा ‘पुढे जाऊ नका’ या संकेताची निदर्शक आहे. प्रमिला आणि समीरला जर या तंत्राचा अवलंब करायचा असेल तर जेव्हा अप्रिय घटना आठवतात, तेव्हा मन:चक्षूंसमोर लाल फुली पाहण्याचा सराव त्यांनी केला पाहिजे. त्यासाठी प्रथम सहज नजर जाईल अशा जागा उदाहरणार्थ, मोबाइल किंवा संगणकाचा होम स्क्रीन, पशांचं पाकीट, इत्यादी त्यांनी शोधल्या पाहिजेत. तिथं लाल फुलीचं प्रत्यक्ष चित्र त्यांनी लावलं तर अप्रिय घटनांची स्मृती मनात थमान घालत असताना ते चित्र त्यांना धोक्याचा सिग्नल देईल. प्रत्यक्ष चित्राचा अनेकदा सराव केला की हळू हळू अप्रिय स्मृती आणि लाल फुली यांच्यात साहचर्य प्रस्थापित होऊन प्रत्यक्ष चित्राशिवायही ती मन:पटलावर रंगवणं त्यांना शक्य होईल.

प्रमिला आणि समीर जेव्हा या पायऱ्यांचा अवलंब करून विस्मरणाची कला आत्मसात करतील तेव्हा कदाचित असंही होईल की अप्रिय स्मृतीचं संपूर्ण विस्मरण त्यांना शक्य होणार नाही. पण ‘मी का विसरू शकत नाहीए?’ असं नवीन ओझं मात्र ते घेणार नाहीत. कटू आठवणीचं थोडं फार स्मरण झालं तरी त्याला फार महत्त्व न देता तिथल्या तिथे सोडून देऊन ते प्रयत्न चालू ठेवतील. त्या वेळी विस्मरणाचा आणखी एक फायदा त्यांच्या लक्षात येईल.

जेव्हा आपण स्वत:ला आणि इतरांना माफ करतो, तेव्हाच ती गोष्ट विसरून जाऊ शकतो. जेव्हा ते हा टप्पा गाठतील तेव्हा त्यांना कळेल की विस्मरणाच्या चार पायऱ्यांबरोबर आत्मविकासाची नवीन पायरीही ते चढले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 1:09 am

Web Title: art of forgetting psychroscope dd70
Next Stories
1 मैत्र जीवाचे!
2 जीवन विज्ञान : रोगप्रतिकारशक्तीची ताकद
3 यत्र तत्र सर्वत्र : गुप्तहेर स्त्रियांची हेरगिरी
Just Now!
X