30 September 2020

News Flash

जगण्याची कला

संवेदनशीलतेच्या आड प्रामुख्याने येणारी गोष्ट म्हणजे संघर्ष.

| October 19, 2013 01:01 am

संवेदनशीलतेच्या आड प्रामुख्याने येणारी गोष्ट म्हणजे संघर्ष. मानसिक पातळीवरील कोणताही संघर्ष हा ऊर्जेचा अपव्यय तर करतोच, शिवाय तो माणसाला असंवेदनशील बनवतो. संघर्षग्रस्त मन हे दुसऱ्यांच्या बाबतीत नेहमीच असंवेदनशील असते.
आपण जगत असलेल्या आपल्या रोजच्या जीवनाकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला आढळून येईल की, आपले जीवन हे अत्यंत संघर्षमय आहे. अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात सातत्याने काही ना काही झगडा सुरू असतो. घरात असताना घरातील व्यक्तींशी संघर्ष, घराबाहेर पडल्यावर बाहेरच्या व्यक्तींशी संघर्ष, ऑफिसमध्ये गेल्यावर तेथे संघर्ष. मनुष्य जेथे जाईल तेथे संघर्ष निर्माण करत असतो. हा संघर्ष केवळ व्यक्तिगत पातळीवर न राहता तो सामूहिक रूपदेखील धारण करतो. दोन कुटुंबातील संघर्ष, दोन जातींमधील संघर्ष, दोन धर्मामधला संघर्ष, दोन देशांमधला संघर्ष. खरेच संघर्षांशिवाय माणूस जगूच शकत नाही का? कारण कोणताही संघर्ष माणसाच्या जीवनात दु:ख निर्माण करत असतो, त्याला असुरक्षित बनवत असतो, त्याची झीज घडवून आणत असतो.
तसे पाहिले तर जगण्यासाठी प्रत्येक जीव हा धडपडत असतोच. किंबहुना ही धडपड हेच त्याचे जीवन असते. परंतु या धडपडीतून कलह हा फक्त मानवी जीवनातच निर्माण होताना दिसतो. सामूहिक स्तरावर या कलहाचे रूपांतर युद्धात होते. मानवी इतिहास हा विविध प्रकारच्या युद्धांच्या तपशिलांनी खच्चून भरलेला आहे. युद्ध, त्यातून घडणारा विनाश व होणारी दु:खनिर्मिती वारंवार अनुभवूनसुद्धा मानव अजून शांततेत जगण्यास शिकलेला दिसत नाही. मानवाने विज्ञानाची कास धरून आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी ते तो पूर्णपणे संघर्षमुक्त करू शकलेला नाही. आणि कोणत्याही संघर्षांशिवाय जगणे हीच तर खरी जगण्याची कला आहे. विशिष्ट प्रकारे श्वास घेणे, विशिष्ट पद्धतींचे अवलंबन करणे म्हणजे जगण्याची कला नव्हे. तसे करणे म्हणजे अमर्याद संभावना असलेल्या मानवी जीवनाला अत्यंत संकुचित करून टाकणे होय. आणि या संभावना तोपर्यंत उन्मीलित होऊ शकत नाहीत, जोपर्यंत माणसाचे जीवन पूर्णपणे संघर्षमुक्त होत नाही.
आपल्या जीवनात संघर्ष का आहे, असा प्रश्न तरी आपण स्वत:ला कधी विचारला आहे का? की हा संघर्ष आपण गृहीतच धरला आहे? जगण्यासाठी झगडणे हे आपल्या इतके अंगवळणी तर पडलेले नाही ना, की त्यामुळे असा प्रश्नच आपल्या मनात उद्भवत नाही? संघर्षांमुळे जीवनास एक प्रकारची धार येते, संघर्षांशिवाय जीवन अगदीच अळणी व सुस्त होते, अशी तर आपल्या मनाची धारणा झालेली नाहीये ना? माणसाच्या जीवनातील संघर्ष म्हणजे फक्त माणूस व त्याच्या भोवतालची परिस्थिती यांच्यातीलच संघर्ष नव्हे, तर माणसाच्या आत, त्याच्या मनातदेखील सातत्याने संघर्ष चाललेला असतो. परस्परविरोधी विचार, परस्परविरोधी भावना व त्यातून निर्माण होणारा विसंवाद हे सर्व मानवाच्या आंतरिक संघर्षांचेच द्योतक आहे. हा आंतरिक संघर्षच तर बाहेर प्रक्षेपित होत नाहीये ना? माणूस अंतर्बाह्य इतका संघर्षमय का आहे?
या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी आपल्याला स्वत:च्या जीवनाकडे बघणे आवश्यक आहे. बाह्यत: आपण इतरांपेक्षा कितीही वेगळे वाटत असलो तरी आंतरिकदृष्टय़ा आपण वेगळे आहोत का? काय आहे आपल्या आत जे इतरांपेक्षा वेगळे आहे? भीती, ती तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माणसाच्या मनात असते. कशाची भीती, हे तपशील वेगवेगळे असले तरी भीतीची प्रत्यक्ष भावना ही कोणत्याही मानवात सारखीच असते. त्याचप्रमाणे माझ्या आत मला जाणवणारा क्रोध हा- तपशील सोडला तर- इतर कोणत्याही माणसास जाणवणाऱ्या क्रोधासारखाच असतो. मानसशास्त्रीय पातळीवर माझ्या आत जे-जे काही आहे, ते ते सर्व इतर कोणत्याही माणसाच्या आतदेखील आहे. भौतिक पातळीवर मी इतरांपेक्षा कितीही वेगळा असलो तरी मानसशास्त्रीय पातळीवर मी इतरांसारखाच आहे. हे विधान स्वीकारण्यास कितीही अवघड वाटले तरी ते मानवी जीवनाचे एक वास्तव आहे. असे असूनही मी स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे का समजत असतो?
प्रत्यक्षात वेगळे असणे व स्वत:ला वेगळे समजणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. प्रत्यक्षातले वेगळेपण जीवनात विविधता आणते, वैविध्यपूर्ण समृद्धी आणते. परंतु स्वत:ला वेगळे समजण्याची भावना ही जीवनात विभाजन आणते. मानसशास्त्रीय पातळीवर वास्तविकरीत्या वेगळा नसलेला माणूस जेव्हा स्वत:ला वेगळा समजू लागतो, तेव्हा तो स्वत:ला इतरांपासून विभक्त करतो. आणि जेथे असे मानसिक विभाजन होते तेथे संघर्ष हा अटळ असतो. मनुष्य जेव्हा स्वत:ला वेगळा मानू लागतो, तेव्हा त्याच्यात आपपरभाव निर्माण होतो. मी व माझे आणि तो व त्याचे असे द्वैत निर्माण झाले, की माणसाच्या अंतरंगातील गोष्टींचे त्याप्रमाणे विभाजन होते. माझ्या भावना, माझे विचार, माझी तत्त्वे, माझ्या कल्पना हे सर्व त्याच्या भावना, त्याचे विचार, त्याची तत्त्वे व त्याच्या कल्पना यांपेक्षा वेगळे आहेत. जे जे माझे त्या त्या सर्वाविषयी मला आपुलकी वाटते व जे जे दुसऱ्याचे त्याबद्दल मला उदासीनता वाटते. मला आलेला राग हा योग्य असतो तर दुसऱ्याचा राग विनाकारण असतो; माझ्या कृतींचे मी समर्थन करतो तर दुसऱ्यांच्या कृतींवर मी टीका करतो. अशा परिस्थितीत माझा इतरांशी संघर्ष अपरिहार्य बनतो.
एखादा माणूस मानसशास्त्रीयदृष्टय़ा स्वत:ला इतरांपेक्षा इतका वेगळा का समजत असतो? भौतिक पातळीवर स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजण्याची सवय झाल्यामुळे तर नव्हे? त्याला दिल्या गेलेल्या शिक्षणामुळे तर नव्हे? इतरांशी तुलना करून, गुणक्रमांक देऊन अगदी बालपणापासूनच माणसाच्या मनावर तू वेगळा आहेस, इतरांपेक्षा तू अधिक सरस बनले पाहिजेस असे ठसवले जाते. अशा प्रकारे संघर्षांच्या बीजांना अगदी बालपणापासूनच खतपाणी दिले जाते. असा घडविला गेलेला माणूस जगात संघर्षच घडवून आणेल. मग माणसामाणसातील संघर्ष टाळायचा असेल तर प्रत्येकाने स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजणे सोडून दिले पाहिजे का?
वेगळेपणाची भावना अशी ठरवून सोडता येत नाही. म्हणूनच जगण्याची कला ही जगण्याच्या विज्ञानापेक्षा भिन्न आहे. विज्ञानाने कितीही नवनवे शोध लावले तरी ते सर्व ज्ञानाधिष्ठित असतात. परंतु कला ही मुळातच सर्जनात्मक असते. कलेची अभिव्यक्ती ही ज्ञानाधिष्ठित असू शकते. कला विविध माध्यमांच्या द्वारे व्यक्त करण्याचे तंत्र शिकता/शिकवता येऊ शकते; त्याचे अनुकरण करता येते; पण प्रत्यक्ष कला ही शिकता/शिकवता येऊ शकत नाही; तिचे सर्जन व्हावे लागते. आणि जगण्याची कला तर सर्वश्रेष्ठ कला आहे. कोणत्याही कलेपेक्षा ती अधिक व्यापक व सूक्ष्म आहे. ती आत्मसात करण्यासाठी एक प्रकारची तरलता व संवेदनशीलता आवश्यक आहे. एखादी कला आत्मसात केलेला कलावंत त्याच्या जीवनातील दुसऱ्या गोष्टींच्या बाबतीत अगदीच सामान्य व असंवेदनशील असू शकतो. परंतु जगण्याची कला आत्मसात केलेला कलाकार त्याच्या जीवनात जे जे काही करतो ते ते सर्व कलात्मकच असते. अशी ही जगण्याची कला कशी आत्मसात करायची?
जगण्याची कला ही कोणत्याही विशिष्ट पद्धतीने अथवा प्रणाली वापरून मिळवता येत नाही. ती सर्जनात्मक असल्याने कोणतीही पुनरावृत्ती, सवय अथवा यांत्रिक कृती तिच्याप्रत पोहोचू शकत नाही. तिच्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता व तरलता असली, की तिचे स्वाभाविकरीत्या अवतरण होते. ही संवेदनशीलता व तरलता मिळवता येत नाही तर तिच्या आड येणाऱ्या गोष्टी दूर झाल्या, की ती आपोआप वृिद्धगत होते. संवेदनशीलतेच्या आड प्रामुख्याने येणारी गोष्ट म्हणजे संघर्ष. मानसिक पातळीवरील कोणताही संघर्ष हा ऊर्जेचा अपव्यय तर करतोच, शिवाय तो माणसाला असंवेदनशील बनवतो. संघर्षग्रस्त मन हे दुसऱ्यांच्या बाबतीत नेहमीच असंवेदनशील असते. संघर्षांप्रमाणेच भय, क्रोध, िहसा, मानसिक दुखापत, सुखाचा पाठपुरावा व दु:खापासून पलायन तसेच विचाराने निर्माण केलेले मानवी चेतनेतील अन्य घटक हे संवेदनशीलतेच्या आड येत असतात. आवड निवड रहित अशा प्रखर अवधानाने जेव्हा या सर्व गोष्टींचा निचरा होऊ लागतो तेव्हा सर्जनासाठी पोषक अशी भूमी आपल्या अंतरंगात तयार होऊ लागते. शरीर, विचार व भावना यातील परस्परविरोध संपून त्यांच्यात एक प्रकारची सुव्यवस्था, प्रमाणता प्रस्थापित होते. त्यामुळे मानवी जीवनाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. माणसाला बद्ध करून ठेवणाऱ्या मानसिक घटकांचा निचरा झाल्याने जीवनात एक प्रकारचा मोकळेपणा व उन्मुक्ततेचा आनंद येतो. जीवनाचे सूक्ष्म स्तर उलगडत जाऊन जीवनाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तो विचाराने आपल्या तर्कबुद्धीने दिलेला अर्थ नसतो, तर आपल्या अस्तित्वाचे सूक्ष्मतर स्तर उलगडत गेल्याने स्वाभाविकरीत्या उद्घाटित झालेला अर्थ असतो. असे अर्थपूर्ण जीवन जगणे हीच खरी जगण्याची कला होय.                                                                    
kkishore19@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2013 1:01 am

Web Title: art of living
Next Stories
1 एकमेकां साहय़ करती सव्यंग-अव्यंग
2 स्वराधीन होताना..
3 कोण होतीस तू?
Just Now!
X