कामेरकराचं कुटुंब म्हणजे नाटक, चित्रपट, संगीत याला वाहून घेतलेलं घर. संपूर्ण कुटुंब, तेही चार पिढय़ांसह.. असं कलेचा ध्यास घेणारं असणं फारच क्वचित घडतं. त्यातही त्यांचे जोडीदारही जेव्हा यात सहभागी झाले तेव्हा या कुटुंबाचा कलाविष्कार अधिकच व्यापक झाला, पण त्यांनी ही कला केवळ स्वत:पुरती न ठेवता ‘आविष्कार’ आणि ‘चंद्रशाला’ च्या माध्यमातून पुढच्या पिढीतल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचवली. नवे कलाकार घडवले. कलाशीर्वाद लाभलेल्या या कामेरकर कुटुंबीयांविषयी..
नवी दिल्ली.. अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीचा सन्मान सोहळा. त्या दिमाखदार गंभीर वातावरणात अचानक एक सत्कारमूर्ती, शोभा गुर्टू उठल्या आणि शेजारच्या आसनावरच्या दुसऱ्या सत्कारमूर्तीला- सुलभा देशपांडें यांना त्यांनी कडकडून मिठी मारली. लहानपणीच्या आठवणींचा धबधबा ओसंडून वाहायला लागला. त्या सोहळ्यातला असा अनौपचारिक जिव्हाळ्याचा क्षण.. साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. एकाच वर्षी शोभा गुर्टू, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, आणि सुलभा देशपांडे या तिघांचा सन्मान होत होता. बोलता बोलता शोभाताईंना कळलं की सुलभाताई म्हणजे एचएमव्हीच्या वसंतराव कामेरकरांची कन्या अन् औपचारिकतेचे सारे बांध गळून पडले.
असाच एक कार्यक्रम, आशा भोसले यांचा. तिथेही आठवण निघाली वसंतराव कामेरकरांची. मग  ‘कामेरकरांनी आपलं पहिलं रेकॉर्डिग कसं केलं, माईकपर्यंत पोहचण्यासाठी छोटय़ा आशाला कसं स्टूलवर उभं केलं. कामेरकरांच्या दादरच्या घरात कशा तालमी रंगत, किती तऱ्हेतऱ्हेचं गाणं ऐकायला मिळे.़?’ आठवणींची पोतडीच उघडली आशाताईंनी. अशी काय जादू केली अनेक कलाकारांवर कामेरकरांच्या घरानं? की ते घर एक दंतकथाच बनून राहिलं..
बऱ्याच वर्षांपूर्वी कोकणातलं आपलं सासवणे गाव सोडून भिकाजी बाबाजी कामेरकर मुंबईला आले. त्यांना गाण्याची, नाटकात काम करण्याची खूप आवड होती. मुंबईत आल्यावर गिरगावात, मुगभाटात एका चाळीत, एका खोलीत त्यांनी संसार थाटला. भिकाजीपंत नाटकांमध्ये स्त्रीपार्ट करत. हळूहळू स्त्रिया नाटकात कामं करू लागल्या तशी नाटकातल्या कमाईला मर्यादा पडली. हरहुन्नरी भिकाजीपंत कीर्तनही उत्तम करीत. प्रपंचासाठी कीर्तन आणि आवडीच्या ओढीनं नाटक असा मेळ त्यांनी घातला. कीर्तनसाथीला त्यांचीच चार मुलं. आपोआप वाद्यं शिकून घेतली मुलांनी. त्यातला यशवंता उत्तम हार्मोनियम आणि व्हायोलिन वाजवी. वसंताही साथ करत असे. वसंताला गाण्याची उत्तम समज. तेच हे वसंतराव कामेरकर. एचएमव्हीचे रेकॉर्डिस्ट. नाटकाचं प्रेम रक्तातूनच आलं अन् गाण्याचा कान त्यांनी तपश्चर्येनं तयार केला.
वसंतरावांना एचएमव्हीची नोकरी मिळाल्यावर हे कुटुंब मुगभाटातील चाळीतून दादरच्या प्रशस्त घरात आलं. २-३ ब्लॉक्सचा एक संपूर्ण मजला त्यांनी भाडय़ानं घेतला. २४x२४ फुटांचा हॉल आणि ८x४० फुटांची गॅलरी. घरात ३०-३५ माणसांचा अखंड राबता. सर्व भावंडांमध्ये फक्त वसंतरावांचीच वंशवेल बहरली. त्यांना अकरा मुलं झाली आणि सर्वानी आपापल्या क्षेत्रात नाव कमावलं. या भावंडांमध्ये एक गोष्ट समान ती म्हणजे नाटक आणि संगीताचं प्रेम.
मुंबईत एचएमव्हीत रेकॉर्डिगसाठी आलेले सर्व कलाकार कामेरकरांच्या घरी जरूर येत. गणपतीत त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये सर्व नामवंत गायकांच्या मैफली रंगत. नाटकाच्या तालमी तर नेहमीच्याच. नटश्रेष्ठ केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर विठ्ठल, दुर्गाबाई खोटे यांचे कित्येक संवाद मुलांना पाठ व्हायचे. ग. दि. माडगूळकर यांचा मुक्काम नेहमीचाच. नवीन काव्य केलं की ते रंगून जाऊन वाचून दाखवायचे. सुधीर फडके लगेच धावत यायचे. चाल बांधली जायची. त्यावर चर्चा.. कामेरकरांच्या सूचना. संस्कार संस्कार म्हणतात त्यांची लूटच केली कामेरकरांच्या मुलींनी.
तशी कला साऱ्या मुलांमध्ये झिरपली, पण आपण अजूनही ज्यांचा अभिनय आपण पाहतो त्या चार प्रसिद्ध कामेरकर भगिनी म्हणजे प्रेमा साखरदांडे, डॉ. ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते.
सुलभाताई सांगतात, ‘‘नाटकाचं प्रेम फक्त आजोबा आणि वडिलांनाच नाही तर आजीलाही फार होतं. एकदा आजीकडे एक गृहस्थ आले आणि मुलींना नाटकापासून दूर ठेवायचा अनाहूत सल्ला देऊ लागले. त्या गृहस्थासाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले.’’ सुलभाताई पुढे खटय़ाळपणे सांगतात, त्या माणसासाठी बनवून पुढय़ात आलेला चहाही आजीनं स्वयंपाकघरात परत पाठवला. केवळ नाटकच नव्हे तर प्रेमाताई कथ्थक शिकल्या, ज्योत्स्ना भरतनाटय़म् शिकली. आशाताईंनी नाटक, चित्रपटात ठसा उमटवलाच. नाटकासाठी आवश्यक तिथे आणि तेवढं गाणंही साऱ्यांना येतच होतं.
डॉ. ज्योत्स्ना वैद्यकीय व्यवसायात रमल्या, बाकी तिघी शिक्षणक्षेत्रात, पण नाटक हेच खरं ही भावना साऱ्यांमध्ये अजूनही आहे. ‘‘प्रत्येकाचं फुलण्याचं म्हणून एक साधन असतं. कुणी रेषा छान काढतं. कुणी गातं. कुणाच्या शरीरातच ताल असतो. ते रक्तातूनच येतं.’’ सुलभाताई म्हणतात.. मुलाला काय आवडतंय हे ओळखलं – फुलवलं की झालं.
आज इतकी र्वष झाली तरी ‘शांतता कोर्ट चालू आहे’ मधली सुलभाताईंची बेणारेबाई अजून आपली मान पकडून आहे. ‘सखाराम बाइंडर’चं सुलभाताईचं दिग्दर्शन, त्या स्वत: चंपा आणि प्रेमा साखरदांडे लक्ष्मी.. ज्योत्स्नाताईंची गौराई किंवा ‘सत्या’ मधली आई अजून आपल्या डोळ्यांसमोर आहे. आशाताई दंडवतेंची चांगुणा एवढंच नाही तर पुढे सुलभाताईंची सून झालेल्या अदितीचं ‘झुलवा’मधलं कामही आपल्याला आठवतं. पण ही रंगभूमी गाजवलेली ठळक नावं, याशिवाय बापू अशोक, विश्वनाथ, मुकुंद या बंधूंनीही रंगभूमी, चित्रपट, आणि टीव्ही क्षेत्रात भरपूर काम केलं. अशोक कामेरकरांनी ‘दुर्गा झाली गौरी’ अमेरिकेत करून वाहवा मिळवली. तर कुमुदनं ऑस्ट्रेलियात राहून गाणं जपलं.
या कुटुंबाचं नाटक प्रेम हे, त्यांच्या भूमिका आठवणं किंवा अभिनय उत्तम करण्यापुरतं मर्यादित नाही. एखाद्याच्या जगण्याचं ध्येय म्हणावं इतक्या गंभीरपणे या साऱ्यांनी नाटकाकडे पाहिलं. सुलभाताईंनी अरविंद देशपांडेंशी लग्नगाठ बांधली. ती ही ‘निजखूण’ ओळखूनच बहुधा.‘आविष्कार’ आणि पुढे ‘चंद्रशाला’ संस्थेची स्थापना करून त्यांनी हे सिद्ध केलं. दादरच्या मोठय़ा घरात वसंतरावांना मुलांसाठी संस्कारवर्ग चालवायचे होते. गदिमांनी त्यांचं तत्परतेनं नामकरण केलं. ‘चंद्रशाला’ १९७८ साली सुलभाताईंनी व्ही. शांताराम यांच्या हस्ते ‘चंद्रशाले’चं उद्घाटन करून वडिलांची इच्छा तर पूर्ण केलीच. पण चंद्रशालेच्या ‘दुर्गा झाली गौरी’नं अनेक मानदंड निर्माण केले.
चंद्रशालेचं अन् निगडित कलाकारांचं भाग्य असं की अरविंद-सुलभा, प्रेमा-माधव साखरदांडे, आशा-वंृदावन दंडवते आणि इतर कामेरकरांनी आपापल्या जोडीदारासह ‘चंद्रशाले’त जीव ओतला. नाटकाचं पूर्ण घडणं हे मुलांना इथं अनुभवायला मिळालं. ‘चंद्रशाले’नं किती कलाकार घडवले याची गणतीच नाही. सुलभाताईंबरोबर आशाताईंनीही अगणित शिबिरं घेतली. छबिलदास, साने गुरुजी विद्यालय, शारदा सदन या शाळांना याचा खूप फायदा झाला. शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे या तर आता ‘शालेय रंगभूमी’हे पुस्तकच लिहीत आहेत. नाटक हे माध्यम म्हणून अध्यापनात वापरावं असा त्यांचा आग्रह आहे.
या कुटुंबाचा आणि ‘छबिलदासचा’ गेल्या जन्मीचा काहीतरी ऋणानुबंध असावा. ‘आविष्कार’ला मध्यवर्ती जागा हवी होती. नाटय़विषयक उपक्रमांना माधव साखरदांडे यांनी छबिलदास शाळेत ती मिळवून दिली. आणि तीस र्वष नाटकावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला हे केंद्र खुणावत राहिलं. ‘छबिलदास’ ही एक चळवळ बनली. प्रायोगिक रंगभूमीची, नवनिर्मितीची पताका फडकत राहिली.
कामेरकरांच्या तिसऱ्या पिढीत असा एखादाच अपवाद असेल ज्याचा नाटक-संगीताशी संबंध नाही. चौथ्या पिढीनंही हीच परंपरा जपली आहे. प्रेमाताईंची मुलगी क्षमा साखरदांडेनं प्रारंभी नाटकात कामं केली. पुढे अध्यापन सांभाळून ‘चंद्रशाले’ला वाहून घेतलं. हे करताना स्वत:चं गाणंही फुलवत ठेवलं. ज्योत्स्नाताईंच्या यतीन कार्येकरनं नाटक-चित्रपट आणि मालिकांमधून सातत्यानं काम करून घराघरांत स्थान पटकावलं. सुलभाताईंच्या निनाद देशपांडेनं ‘शापित’ चित्रपट केला. त्याखेरीज निर्मिती छायाचित्रणात रस घेतला. त्याची पत्नी अदितीनं तर ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’च्या निर्मितीतून राष्ट्रीय पुरस्कार खेचून आणला. बापूंच्या ऋषिकेश कामेरकरनं संगीत दिग्दर्शनात महत्त्वाचं स्थान पटकावलं तर अविनाशच्या मुलानं, अमूल्यनं पाश्चात्त्य संगीत व ध्वनिमुद्रणाचं क्षेत्र काबीज केलं आहे. यतीन कार्येकर सांगतात. ‘‘हा सारा अनेक गुणांचा वारसा.. हे ९० टक्के आनुवंशिक आहेच. हे आमचं भाग्य आहे. शिवाय त्यात लहानपणापासूनच्या संस्कारांची भर पडली.’’ निनाद देशपांडेनंही तेच सांगितलं. ‘आनुवंशिकता आहेच, पण बीज फुलायला संधी पाहिजेच. ते संस्कार लाभले.’
या चौथ्या पिढीतले अनेक जण दिग्दर्शन आणि निर्मितीत उतरले आहेत. त्यांच्या पाठी या संस्कारांचं आणि अनुभवांचं पाठबळ आहे. राहुल आणि अश्विनी दंडवते हे चित्रपट जाहिरात क्षेत्रात काम करताहेत. निनाद अनेक फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्ससाठी लिहितो आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सारे जण नाटकाशी निगडित आहेत आणि निगडित राहू इच्छित आहेत आणि ते पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपड करत आहेत.
‘चंद्रशाले’ची स्थापना करताना बालरंगभूमीबाबत एक स्पष्ट भूमिका, नव्हे ध्यासच घेतला होता सुलभाताईंनी. त्यांनी देशोदेशी फिरून तिथल्या रंगभूमीचा.. बालरंगभूमीचा अभ्यास केला आहे. ‘जपानमध्ये एक कलादालन आहे. तिथे २८ वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण होत असतं. मुलांना तिथे सोडलं की ते मूल कोणत्या कलेच्या दालनात वारंवार जातं त्याचं निरीक्षण करून पालकांना सुचवलं जातं. आणि मुलांना तिथेच फुलायची संधी मिळते.’ हे सांगताना सुलभाताईंचे डोळे चमकत असतात. प्रेमाताई सांगतात, ‘आपल्या एनएसडीच्या स्नातकांना शाळांमध्ये इंटर्नशिप सक्तीची करायला हवी. आज या वयात त्यांची ही जिद्द पाहिली की थक्क व्हायला होतं.’
या लेखाचा केंद्रबिंदू आहे एकाच क्षेत्रातल्या चार पिढय़ा. पण आपण केंद्रबिंदू जरी ‘छबिलदास चळवळ’ किंवा ‘बालरंगभूमी’ किंवा ‘बाइंडर-गिधाडेचे दिवस’ किंवा ‘शालेय अध्यापनातील माध्यमाच्या नव्या गरजा’  ठेवल्या तरी या संपूर्ण कुटुंबाकडे आपल्याला परत परत यावंच लागेल एवढं मौलिक कार्य या मंडळींनी करून ठेवलं आहे आणि पुढेही करत राहतील असा विश्वास निर्माण केला आहे.
vasantivartak@gmail.com

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे