सकाळी साडेआठच्या सुमारास बसेसना बऱ्यापैकी गर्दी असते. लगेच बस मिळाली की खूप बरं वाटतं. पण बसमध्ये शिरल्यावर जाणवतं की ‘स्त्रियांसाठी’  राखून ठेवलेल्या सहा आसनांपाशी, एखादे मंदिर अर्धा-एक तास बंद असल्यावर बाहेर दर्शनासाठी जेवढी रांग जमते, तेवढी गर्दी जमली आहे. त्या गर्दीतून पुढे जायचा प्रयत्न करणं भाग असतं..
एखाद्या ‘जागरूक नागरिका’प्रमाणे मी नेहमीच सार्वजनिक वाहनांचा वापर केला. वरळी येथे रेल्वे स्थानक नसल्याने बस प्रवासच जास्त. त्यामुळे शाळा, कॉलेज, नोकरी सगळ्यासाठी बसच. बस क्र. ३७चा आणि माझा असा वर्षांनुवर्षांचा संबंध! इतक्या वर्षांच्या या प्रवासात मीही त्यातल्या अनुभवांनी समृद्ध झाले. तसे पुरुषाचेही विविध गमतीदार अनुभव आले, पण हा लेख खास स्त्रियांच्या अनुभवांवरचा.
सकाळी साडेआठच्या सुमारास बसेसना बऱ्यापैकी गर्दी असते. लगेच बस मिळाली की खूप बरं वाटतं. पण बसमध्ये शिरल्यावर जाणवतं की ‘स्त्रियांसाठी’ राखून ठेवलेल्या ६ आसनांपाशी, एखादे मंदिर अर्धा-एक तास बंद असल्यावर बाहेर दर्शनासाठी जेवढी रांग जमते, तेवढी गर्दी जमली आहे.  गर्दीतून पुढे जायचा प्रयत्न करणं भाग असतं. ‘एक्स्यूज मी -जरा बाजूला होता का?’चा पाढा म्हणत पुढे जाण्याचा प्रयत्न करून, कितीही नाजूक स्वरांत असं बोलूनही एखादीही मुलगी/स्त्री सूतभरसुद्धा जागची हलत नाही. इतक्यात घट्ट चापून-चोपून बसवलेल्या वेणीचा एक फटकारा आपल्या डोळ्यावर बसतो. मग आपल्याला त्या कानांमध्ये खुपसलेले इयर-फोन्स दिसतात. त्या व्यक्तीला आपण काही वावगं केलंय याची जाणीव असण्याची शक्यता नसतेच. तेव्हा हातवारे करतच मार्ग मोकळा करणे इष्ट.
एखादे आसन रिकामे झालेच तर लागलीच बसायला मिळेल असे मुळीच नाही. संगीत खुर्चीप्रमाणे किमान तीन-चार जणींची नजर त्या रिकाम्या होणाऱ्या आसनाकडे असतेच. त्यात जर एखादा मुलगा/पुरुष स्त्रियांसाठीच्या आसनावर बसला असेल तर मग त्याची काही खैरच नाही. त्याच्याकडे असा काही जळजळीत कटाक्ष टाकण्यात येतो की, कोल्हापूरचा तांबडा रस्साही त्यापुढे फिका! मात्र हाच कटाक्ष टाकणारी ती स्त्री रिकाम्या बसमध्ये सुरुवातीलाच आपणहून स्त्रियांसाठीच्या आसनावर बसेल असे नाही.
  एवढय़ा सगळ्या प्रकारात बसायला जागा मिळालीच तर आपण लकी. खिडकीपाशी बसायला मिळालं तर अजूनच लकी! टक लावून, तंद्रीत बाहेर पाहात असताना अचानक पायावर कचकन पाय देऊन; किंवा अतिशयोक्ती नाही पण अक्षरश: घाई-घाईत मांडीवरच कोणती बाई येऊन बसली तर नवल नाही. त्यात जर बसचालकाने करकचून ब्रेक दाबला तर पुढचे तीन-चार तास आपला तो पाय ठणकणार हे निश्चित! आसनावर बसताना किमान दोन-तीन रिश्टर स्केलचा हादरा बसलाच पाहिजे, असं व्रत या बायका का घेतात हे देवच जाणे! या धक्क्यातून सावरता सावरता अजून दोन-चार वेळा कोपर/ढोपर लागलं तर आश्चर्य वाटू नये. काही जणी पटकन सावरतात. मात्र काही जणी एखाद्या क्रिकेटच्या टेस्ट मॅच खेळाडूलाही लाजवतील इतका वेळ त्यांची घोड-दौड चालूच ठेवतात.
 पूर्णपणे ‘सेट’ झाल्यावर पर्सचं उत्खनन चालू होतं. कंडक्टर येत नाही म्हणून इतका वेळ शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या त्या तो आल्यावर मात्र सहजी ५-१० मिनिटं आपल्या पर्समध्ये डोकं खुपसून बसतात. काही वेळा काही जणी फारच गंमत करतात. कंडक्टर ‘बोला’ असा म्हणताच कुठला बस-थांबा ते न सांगता ‘तिकीट द्या’ सांगतात. कुठे बसलात, असं विचारलं की ‘इथेच मागे’ असं म्हणतात. अशा सुसंवादानंतर बऱ्याचदा असा कुठला तरी  बस-थांबा सांगतात की तो त्या बसमार्गाच्या पंचक्रोशीतही नसतो! मग त्या बस कंडक्टरलाच नावं ठेवत ‘पेहले क्यो नाही बताया’ असा आश्चर्यजनक सवाल करून बस भर रस्त्यात मध्येच थांबवायला लावतात. बसमध्ये चढण्यापूर्वीच बसमार्ग का विचारत नाहीत, हे कोडं मला अजूनही सुटलेलं नाही.
   बसचालकांची तुलना मी डॉक्टर किंवा पोलिसांशी करेन. कितीही उत्कृष्ट कामगिरी बजावली तरी ‘नागरिकांच्या अपेक्षा’ ते कधीच पूर्ण करू शकत नाहीत. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी लोक त्यांना नावं ठेवायला पुढे-मागे पाहात नाहीत. आता हेच    घ्या.. बस प्रवासाच्या सुरुवातीस आणि अखेरीस थोडय़ा कालावधीकरिता बसचालकाला गाडी आयडलिंग (कमी) वेगाने चालवायला लागते. पण ‘काय मेला गाडी चालवतोय’ अशी स्तुतिसुमने बायकाच काय पुरुषही लागलीच उधळतात. त्याच बसचालकाने मोकळ्या रस्त्यावर जरा गाडी चौथ्या गीयरवर टाकली, की पुन्हा ‘काय मेला फास्ट गाडी चालवतोय’ म्हणून बोलायला मोकळे!
याच्यावर कडी म्हणजे या स्त्रियांचे बसमधून उतरणे. बसच्या पायऱ्यांवरून उतरताना या स्त्रियांच्या मागून उतरणाऱ्या व्यक्तीस मिळते, त्यांच्या साडय़ांचे पदर, दुपट्टे, ओढण्यांची ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेण्ट! आणखी काय हवे?