15 August 2020

News Flash

जोडीने बहरली सृष्टिजिज्ञासा

‘‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये कामाला लागल्यानंतरची दहा वर्षे हा आमच्या कुटुंबाच्या व शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा. मी मान्सूनवरील संशोधन अधिकच जोमाने चालू ठेवले.

| August 23, 2014 01:01 am

‘‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये कामाला लागल्यानंतरची दहा वर्षे हा आमच्या कुटुंबाच्या व शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा. मी मान्सूनवरील संशोधन अधिकच जोमाने चालू ठेवले. माधवने सैद्धान्तिक कामाबरोबर; जंगले, हत्ती, बांबू इत्यादींचा प्रत्यक्ष निरीक्षण करून अभ्यास केला. शिवाय आम्ही जोडीने उत्क्रांतीशास्त्रावर सैद्धान्तिक काम केले. आम्हा दोघांच्याही आपापल्या क्षेत्रातील संशोधनाच्या बळावर आमच्या संस्थेत वातावरण व सागरशास्त्र आणि परिसरशास्त्र अशा दोन स्वतंत्र विभागांची १९८२ साली स्थापना झाली. आम्ही नेहमीच एकमेकांच्या कामात रस घेत, ते समजावून घेत राहिलो.’’ सांगताहेत प्रसिद्ध संशोधक, लेखिका सुलोचना गाडगीळ आपले पती पर्यावरणतज्ज्ञ, संशोधक डॉ. माधवराव गाडगीळ यांच्याबरोबरच्या ४९ वर्षांच्या सहजीवनाविषयी..

५० वर्षांपूर्वीची गोष्ट. मी पुणे विद्यापीठात गणित विषयात एम.एस्सी. करत होते. अचानक प्रमिलाबाई (अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळांच्या पत्नी) प्रत्यक्ष ओळख नसूनही आईला भेटायला आल्या. त्याचे कारण असे- इंग्लंडमध्ये शिकताना त्यांच्या मधल्या मुलाने, पुरुषोत्तमने एका ब्रिटिश मुलीशी लग्न ठरवले होते. धाकटा मुलगा माधव, पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये बी.एस्सी. करून मुंबईत प्राणिशास्त्रात एम.एस्सी. करत होता; त्यालाही पुढील शिक्षणासाठी परदेशी जायचे होते. पण आणखी एक परदेशी सून नको म्हणून त्यांची इच्छा होती की माधवने लग्न करूनच परदेशी जावे. माधवने सांगितले की कॉलेजमध्ये माझ्याबरोबर असलेली सुलोचना फाटक जर तयार असेल तर तीही नक्कीच जोडीने उच्च शिक्षण घेऊ  शकेल, तिच्याशी मी खुशीने लग्न करेन. त्यावेळी माझी व माधवची ओळखही नव्हती, त्याने मला पाहिले होते इतकेच. त्यानंतर माधव गणपतीच्या सुट्टीत पुण्याला आल्यावर वडिलांबरोबर आमच्याकडे येऊन गेला. मलाही लग्नानंतर एखाद्या चांगल्या विद्यापीठात शिक्षण चालू ठेवण्यात रस होता. अर्थातच माझ्या आई-वडिलांना व मला सर्व पसंत पडले आणि जून १९६५ मध्ये आमचे लग्न झाले.
आज हा योग कसा आला याचा विचार करताना माझ्या अभ्यासाच्या आवडीचा, त्यामुळे मिळालेल्या परीक्षेतील यशाचा व हुल्लडबाजी करण्याच्या प्रवृत्तीचा मोठा वाटा होता असे वाटते. हे सर्व गुणावगुण कुटुंबातल्या वातावरणावर अवलंबून असतात. माझे लहानपण गेले सदाशिव पेठेतल्या फाटक वाडय़ात. तेथील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व होते माझे आजोबा, डॉ. व्ही. डी. फाटक. त्यांना वैद्यकीय व्यवसायाबरोबर राजकारणात रस होता, त्यामुळे आमच्या घरी नेहमीच सेनापती बापटांसारख्या कार्यकर्त्यांची वर्दळ असे. मुळशी सत्याग्रहाची खलबते या घराच्या ‘लिबर्टी हॉल’मध्ये झाली असे म्हणतात. माधवच्या बाबांना त्यांच्याबद्दल खूप आदर होता, व्ही. डी. फाटकांची नात आपली सून होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांना विशेष आनंद झाला. माझे वडील चतुरस्र बुद्धीचे डॉ. य. वि. फाटक. त्यांनी अ‍ॅलोपॅथीबरोबरच आयुर्वेद व होमिओपॅथीचाही सखोल अभ्यास केला होता. माझी आई इंदुमती सुसंस्कृत, आनंदी वृत्तीची होती. ती लेखिका होती, नाटकांची रसिक होती. रोज रात्री जेवताना आई व आम्ही चौघी बहिणी काव्यशास्त्र विनोदाचा आनंद लुटायचो. माधवच्या घरातही असेच खेळीमेळीचे, आनंदी वातावरण होते.
शालान्त परीक्षेनंतर फग्र्युसन महाविद्यालयात  बी. एस्सी.ला प्रवेश घेतला. पण कॉलेज जीवन हे मुख्यत: मजा करण्यासाठी असते असा ठाम समज असल्याने कंटाळवाणा तास असल्यास हजेरी दिल्यावर प्रचंड फ्रेंच खिडक्यांतून उडय़ा मारून आम्ही मैत्रिणी मुलींच्या वसतिगृहात पिंगपॉंग खेळायला किंवा डोंगरावर फिरायला जायचो. हे उपद्व्याप करताना माधवने आम्हाला पाहिले होते. तेव्हा त्याला हुशार, विज्ञानात रस घेणारी व खेळकर स्वभावाची म्हणून मी एकदम पसंत पडले. लग्न ठरल्यावर भेटी, पत्रे सुरू झाली, आमची मैत्री जमली. जोडीने चांगल्या विद्यापीठांकडे डॉक्टरेटच्या शिक्षणासाठी अर्ज केले, आणि लग्नाआधीच दोघांनाही जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला. लग्नानंतर  माधवच्या आईबाबांनी मोठय़ा प्रेमाने मला कुटुंबात सामावून घेतले. पावसाळा होता. बागेत जुई, बकुळ, पारिजातक बहरले होते. मी रोज सकाळी बकुळीच्या फुलांचा एक भलामोठा गजरा करून तो माळायची. माधवने एका लेखात या दिवसांचा ‘बकुलतरूची फुले वेचुनी, बनवुन त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले, किती आनंदे दिन गेले!’ असा मोठय़ा खुशीत उल्लेख केला आहे.
   हार्वर्ड विद्यापीठात माधवने जीवशास्त्रीय व मी भौतिक समुद्रशास्त्रात संशोधन करायचे ठरवले व सप्टेंबर १९६५ मध्ये अमेरिकेत पोचलो. अमेरिकेतील सहा वर्षांत समुद्र आणि त्यातले प्रवाह, वारे, ढग, आपला नेमेचि येणारा पण अतिचंचल पावसाळा यांसारख्या जटिल प्रणालींचा, त्यामागच्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास कसा करायचा, तो समज वापरून कसे गणितीय मॉडेल/प्रारूप बनवायचे व पुढे काय होईल याचे भाकीत करण्यासाठी कसे मार्ग धुंडाळायचे याचा घट्ट पाया तयार झाला. पहिल्यांदा मला अभ्यासक्रम झेपतील का अशी शंका होती, पण माधवच्या व तेथील प्राध्यापकांच्या प्रोत्साहनामुळे मलाही तेथे उत्तम दर्जाचे संशोधन करता आले. तेव्हापासूनच आम्ही एकमेकांच्या कामात रस घेऊ  लागलो. माधव जीवशास्त्रज्ञ होता तरी त्याला गणिताची खूप आवड होती, आणि मी तर गणित विषयाची विद्यार्थिनी होते. त्यामुळे आमच्या सहजीवनाला हाही एक आधार मिळाला. माधवने हार्वर्डला उत्क्रान्तिशास्त्राच्या संदर्भात एक गणितीय प्रबंधच पुरा केला. त्या कामात मी त्याला वेळोवेळी मदत करू शकले. ती चर्चा करता करता मीही जीवशास्त्राचा जो गाभा, उत्क्रान्ती, त्याबद्दलही खूप समजावून घेतले. समुद्रशास्त्र, वातावरणशास्त्राच्या बरोबरीने जीवशास्त्रातील सेमिनारांना मी जाऊ  लागले व या सर्व विषयातील विद्यार्थी आमचे दोस्त झाले. भारतीयांच्या एका छान कंपूबरोबरच जगभरातल्या लोकांशी मैत्री केली. मराठी व संस्कृतचे खास रसिक रवी कुलकर्णी, अशोक, विद्युत अकलुजकर यांच्याबरोबर तासन्तास गप्पा मारल्या, सुरेश तेंडुलकरकडून थोडेसे अर्थशास्त्रही शिकलो. माधवला निसर्ग निरीक्षणाची व आम्हा दोघांना मोकळ्या हवेवर भटकंतीची जबरदस्त आवड होती. अगदी कडाक्याच्या थंडीत, बर्फातही आम्ही पायी हिंडायचो, उन्हाळा आला की हार्वर्ड विद्यापीठाच्या मोठमोठय़ा बागांत भटकायचो. अशा सगळ्या अनुभवांतून आमची मोकळ्यावर खेळण्याची, भटकण्याची, निसर्ग निरीक्षणाची आवड एकत्र बहरत गेली.
माधवचा प्रबंध चार वर्षांतच संपला. त्याचे जीवशास्त्रातले सैद्धान्तिक काम अशा दर्जाचे होते, की लगेच त्याला हार्वर्डमध्येच फॅकल्टीवर राहायचा आग्रह करू लागले. आम्हाला पुढे भारतात कोठे नोकरी मिळेल याची कल्पना नव्हती. तरीही आम्हा दोघांवरही लहानपणी झालेल्या देशप्रेमाच्या, सामाजिक बांधीलकीच्या संस्कारांमुळे पक्के ठरवले, की शिक्षण संपल्यावर मायदेशी परत येऊन शास्त्रीय काम चालू ठेवायचे. मी गल्फस्ट्रीम या अटलांटिक महासागरातील एका समुद्रप्रवाहाच्या मॉडेलवर काम केले होते; भारतात परतल्यावर मान्सूनवर काम करण्याची इच्छा होती. मला हवामानशास्त्रातील अग्रगण्य शास्त्रज्ञ एमआयटीतल्या जूल चार्नीबरोबर काम करण्याची संधी होती. म्हणून माधवने हार्वर्डची फक्त दोन वर्षांची नोकरी घेतली. ती संपल्यावर १९७१च्या उन्हाळ्यात मला इंग्लंडात बॅंगरला विद्यापीठात एक चांगला अभ्यासक्रम घ्यायचा होता, माधवलाही तिथेच संशोधनासाठी आमंत्रण होते. मग भारतात परतताना वाटेत केनिया, युगांडा, टान्झेनियात वन्यजीव अभयारण्यांत  राहिलो. माधवला सगळीकडे तिथे वन्यजीव संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून भेटीचे आमंत्रण होतेच. तेव्हा आम्ही या निसर्गरम्य प्रदेशात खूप भटकंती केली.
 आम्ही १९७१ साली बिनधास्त पुण्याला परतलो, आणि परदेशाहून आलेल्या शास्त्रज्ञांसाठीच्या भारत सरकारच्या एका योजनेअंतर्गत दरमहा ६०० रुपये पगारावर गुजराण करू लागलो. मी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) मध्ये कामाला लागले. तिथे सिक्का, अनंतकृष्णन यांसारखे हवामानशास्त्रातील दर्दी भेटले व जोरात जो मोसमी पावसाचा अभ्यास सुरू केला तो अजूनही चालूच आहे. १९७२ मध्ये आमच्या मुलीचा-गौरीचा जन्म झाला. त्याच वर्षी अचानक एक उत्तम संधी चालून आली. बंगलोरच्या सुप्रसिद्ध इन्डियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे निर्देशक सतीश धवन यांना हवामानशास्त्रात रस होता, या विषयात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या शोधात ते होते. मी लागलीच अर्ज केला व कळवले की माधवनेही जीवशास्त्रात सैद्धान्तिक संशोधन केले आहे. त्यालाही फॅकल्टीवर घेणे शक्य असल्यास मी तिथे येऊ  इच्छिते. हार्वर्डला जोडीने प्रवेश मिळण्यासारखेच आमचे सुदैव म्हणजे धवनही माधवसारख्या शास्त्रज्ञाला शोधत होते. नुकतेच त्यांच्या संस्थेत एक सेन्टर फॉर थिऑरिटिकल स्टडीज स्थापले होते. या सेन्टरमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वातावरण-समुद्रशास्त्र असे निरनिराळ्या विषयात सैद्धान्तिक संशोधन करणाऱ्यांना एकत्र आणण्याची कल्पना होती. आमचे दोघांचे काम त्यांना आवडले व आम्ही दोघे इन्डियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये असिस्टंट प्राध्यापक म्हणून १९७३ साली रुजू झालो.
१९७४ जुलैमध्ये सिद्धार्थचा जन्म झाला. माझे वडील डॉक्टर व आई बालसंगोपनात विशेष जाणकार, यामुळे दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळी व ती लहान असताना त्या दोघांनी सर्वतोपरी मदत केली. आमची संस्था व बंगळुरू खूप आवडले व आम्ही तिथेच राहायचे ठरवले, जवळच एक घर बांधले. त्या वेळी तिथे आसपास झाडे होती, मोकळे आकाश होते. रात्री गच्चीत मोकळ्यावर जेवायचो, उन्हाळाभर गच्चीवरच झोपायचो. घरासमोरील अंगणात मुले व अनेकदा त्यांच्याबरोबर माधव, भरपूर खेळायचे. संस्थेत एक छान पोहायचा तलाव होता. आम्ही दोघांनी मिळून मुलांनाही शिकवले. मुले जसजशी मोठी झाली तसतशी आमची त्यांच्याशी मैत्री वाढत गेली. चौघे भारतभर अनेक ठिकाणी फिरलो. शिर्सीजवळील सुपारीचे मळे, बांबूची बेटे आणि हळेबिडबेलूरची पुरातन मंदिरे पाहिली. चंडीप्रसाद भट यांच्या गढवालमधील पर्यावरण विकासाच्या श्रमदान शिबिरालाही गेलो. आमच्या आईवडिलांनी आमच्यावर जसे काहीही लादले नव्हते, तसेच आम्ही आमच्या मुलांवर काहीही लादले नाही. गौरी पत्रकारिता शिकली व सिद्धार्थने अगदी लहानपणीच ठरवल्याप्रमाणे तो गणितज्ञ झाला. गौरीने एक कर्तबगार इंजिनीयर जोडीदार निवडला. सिद्धार्थ आपखुशीने कॅल्टेकचे शिक्षण आटोपून भारतात परतला. त्याचे एका व्यवस्थापनशास्त्रात काम करणाऱ्या हुशार मुलीशी लग्न झाले. दोन्ही मुले सुखासमाधानानं संसार करत इमानेइतबारे आमच्या तीन नातींना वाढवत आहेत.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये कामाला लागल्यानंतरची दहा वर्षे हा आमच्या कुटुंबाच्या व शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा. तेथे पहिल्यापासूनच आम्हाला वेगवेगळ्या शास्त्रात संशोधन करणाऱ्या विशेष हुशार लोकांशी आमच्या व त्यांच्या कामाची चर्चा करण्याची संधी मिळाली. मी मान्सूनवरील संशोधन अधिकच जोमाने चालू ठेवले. उपग्रहांच्या छायाचित्रांच्या सहाय्याने भारतभूवरील ढगांच्या व समुद्रावरील मेघपटलांच्या सिक्कांबरोबर केलेल्या विश्लेषणातून, तसेच मान्सूनमागच्या पायाभूत भौतिक प्रक्रियांच्या अभ्यासातून आपल्या ज्ञानात चांगली भर टाकू शकले. माधवने सैद्धान्तिक कामाबरोबर;  जंगले, हत्ती, बांबू इत्यादींचा प्रत्यक्ष निरीक्षण करून अभ्यास केला. शिवाय आम्ही जोडीने उत्क्रांतिशास्त्रावर सैद्धान्तिक काम केले. आम्हा दोघांच्याही आपापल्या क्षेत्रातील संशोधनाच्या बळावर आमच्या संस्थेत वातावरण व सागरशास्त्र आणि परिसरशास्त्र अशा दोन स्वतंत्र विभागांची १९८२ साली स्थापना झाली. यानंतर संशोधन, विद्यार्थी व इतर कामाचा व्याप खूप वाढल्याने आम्ही जोडीने फारसे संशोधन करू शकलो नाही. परंतु एकमेकांच्या कामात नेहमीच रस घेत, समजावून घेत राहिलो. मान्सूनवर काम करताना मान्सूनची चंचलता समजावून घेणे व त्याचे भाकीत करणे या हवामानशास्त्रातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या आव्हानाला सामोरे जायची खुमखुमी तर होतीच, पण त्याबरोबरच हे ज्ञान शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यावश्यक आहे असा जो दावा सतत केला जातो तोही पडताळून पाहायचा होता. तेव्हा लक्षात आले की मान्सूनचे महत्त्वाचे पैलू कुठले, आणि शेतकरी त्याबद्दलच्या माहितीचा, भाकितांचा नक्की वापर कसा करू शकतात हे काहीच स्पष्ट नव्हते. मी शेषगिरी राव आणि त्याच्या भागातल्या शेतकऱ्यांबरोबर हे नीट समजावून घ्यायचे प्रयत्न सुरू केले. अगदी कमी पावसाच्या रायलसीमा भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या शेषगिरीने कृषिविज्ञानात एम.एस्सी. केली होती; मग तो माधवबरोबर परिसरशास्त्रात पीएच.डी. करत होता. त्याच वेळी त्याच्यावर कुटुंबाची भुईमुगाची शेती करायची जबाबदारी पडली होती. तो माझ्याशी मोठय़ा कुतुहलाने पावसाच्या निरनिराळ्या पैलूंबाबत, या ज्ञानाचा शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी नक्की उपयोग कसा होऊ  शकेल याबाबत चर्चा करत असायचा. माधव व मी अनेकदा त्याच्या गावी गेलो. आम्ही दोघेही उत्तम कानडी बोलायला शिकलो होतो, तेव्हा तिथल्या शेतीशी, शेतकऱ्यांशी समरस झालो. शेषगिरी व मी मिळून भुईमुगाच्या जीवनचक्राचे एक चपखल संगणकीय मॉडेल बनवले व त्या मॉडेलच्या व पूर्वीच्या १०० वर्षांच्या पावसाबद्दलच्या माहितीच्या बळावर शेतकऱ्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ  शकलो. या संशोधनातून हवामानशास्त्र व कृषिशास्त्र ह्य़ा दोन्हींचा जोडीने वापर करून शेतकऱ्यांच्या कळीच्या प्रश्नांवर उत्तरे कशी शोधावीत, याचा पायंडा भारतात प्रथमच पाडला गेला. माधवकडून शेषगिरीने आत्मसात केलेल्या लोकाभिमुख संशोधनाच्या पद्धतीचा व माधवबरोबर केलेल्या चर्चेचा या यशात मोठा वाटा आहे.
आठ-दहा वर्षांपूर्वी निवृत्त होऊन पुण्यात वेताळच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका इमारतीत राहायला आलो. माझे संशोधन, निरनिराळ्या परिसंवादात भाषणे इत्यादी जोरात चालू आहे. माधव त्याचे परिसरशास्त्रातील लोकांच्या सहभागाने चाललेले निरनिराळे काम, त्यावर लिखाण, भाषणे, मुलाखतींत मग्न असतो. शिवाय मराठीत खूप लेखन करतो. मलाही मराठीची आवड आहे. मी त्याला त्याची भाषा सरळ व सुबोध, मांडणी ओघवती कशी करावी हे मोठय़ा खुशीत सुचवत राहते. आपले आवडते काम जन्मभर इतक्या चांगल्या वातावरणात करायला मिळाल्याने व सत्तरीनंतरही जोमाने चालू असल्याने दोघेही मजेत आहोत. घरालगतचा वेताळच्या डोंगराचा रम्य परिसर, डौलात चालणारे मोर, रात्री गच्चीतून दिसणारे तारे, निरामय वातावरण, शिवाय आमच्या चुणचुणीत व गोड नातींचा सहवास यामुळे अनंतहस्ते कमलाकराने देता किती घेशील दो करांनी अशा स्थितीत आहोत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 1:01 am

Web Title: article about 49 year of life of sulochana gadgil with madhav gadgil
टॅग Madhav Gadgil
Next Stories
1 ग्रॅका
2 मन शांत-शांत झालं
3 गीताभ्यास – चित्ताची एकाग्रता
Just Now!
X