डॉ. रोहिणी पटवर्धन

वयाच्या साठीनंतर मी माझे आयुष्य कसे व्यतीत करणार आहे याबद्दल घरातल्यांना कल्पना द्यायला हवी. दिनक्रमापासून ते आजारपण, परावलंबित्व अगदी मृत्यूसंदर्भातही प्रथम ज्येष्ठांनी विचार करून तो मुलांना सांगायला हवा. मृत्यूसंदर्भातच नव्हे तर एकूणच साठीनंतर आपल्या भूमिकेबद्दल, जबाबदाऱ्या, कर्तव्याबद्दल बोलले पाहिजे. कारण रामदासस्वामी सांगून गेले आहेत, मृत्यास न ये चुकविता।

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

‘मनाचे दीप उजळतात तेव्हा अडचणी संधी बनून येतात आणि मग पानगळही सुंदर होते.’ जवळजवळ २० वर्षे वृद्धकल्याणासाठी तन-मनाने काम केल्यानंतर अनेक समृद्ध म्हातारपण जगलेली आणि दु:खी माणसेही पाहिल्यानंतर लक्षात आले की म्हातारपण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मर्यादा किंवा दु:ख म्हणा हवं तर परिस्थितीची सजगपणे जाणीव न करून घेतल्यामुळे निर्माण होतात, दिसतात आणि म्हणून महत्त्वाची ठरते ती मनाचे दीप, मनाची शक्ती, मनाची चिकाटी आणि कोणत्याही परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्याची माणसाकडे असणारी निसर्गदत्त देणगी! जे आहे त्याचा फक्त वापर करायचा आहे, उपयोगात आणायचे आहे हे लक्षात घेतले तर आयुष्य खूप सुरळीत जाते. पानगळसुद्धा रंगीबेरंगी आकर्षक होते.

वयाचे आकडे जसजसे पुढे जात जातात तसतसे आयुष्याच्या पुढच्या शक्यता स्पष्ट होत जातात. त्यापैकी एक जन्मल्याबरोबर निश्चित होणारा एक टप्पा म्हणजे मृत्यू! जे ढळढळीत त्रिकालाबाधित सत्य आहे ते म्हणजे आपल्याला येणारा मृत्यू! तो अपरिहार्य आहे, पण तो कसा येणार हे निश्चित नाही. पण तो कसा यावा किंवा कसा येऊ नये याबाबत मात्र एका अर्थाने मर्यादित स्वातंत्र्य आपल्याला आहे.

मी ‘समृद्ध जीवन’ ही कार्यशाळा घेते. त्यामध्ये साधासा उपक्रम असतो. एका कागदावर वाढदिवसाच्या केकचे चित्र असते. ते सहभागी असणाऱ्या लोकांना देऊन सांगते की समजा देव प्रसन्न झाला आहे आणि तुमच्या वाढदिवशी तुम्ही केलेली इच्छा तो पूर्ण करणार आहे. ती तुमची इच्छा लिहा. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ज्येष्ठ मला कोणत्याही प्रकारचे हाल न होता घरी शांतपणे मृत्यू यावा, असे लिहितात. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयत्नांबद्दल विचारले असता त्यांच्याकडे उत्तर नसते. मृत्यू-मोक्ष-मुक्ती, शेवटचा दिस गोड व्हावा.. अशा अनेक आध्यात्मिक, धार्मिक संकल्पनांमध्ये मृत्यूबद्दल खूप चांगले विचार मांडलेले दिसतात. पण सर्वसामान्य माणूस (येथे वृद्ध या अर्थाने) मात्र मृत्यूचा विचार करायला घाबरतो आणि म्हणूनच टाळतो. इतके टाळतो की स्वत:च स्वत:च्या वारसांना खूप त्रास आणि कटकटी निर्माण करतो. त्या ज्येष्ठाची मृत्यूबद्दलची भीती पर्यायाने मुलांमध्येही निर्माण होते आणि म्हणून समजा ज्येष्ठ जरी काही बोलायला लागले तर मुले त्यांना असं काही बोलू नका म्हणून बोलू देत नाहीत. आणि मग तो विषय वíजत होतो.

मुळात महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणे ही मोठी गरज आहे. आपल्या कुटुंबपद्धतीत ती अभावाने आढळते. कारण ज्येष्ठांच्या मनात काय चाललंय याची नोंद घेतली जात नाही. मुले निर्णय घेत असताना ज्येष्ठांशी सल्लामसलत करीत नाहीत, कारण ज्येष्ठ, नवे वारे जाणून न घेता त्यांच्या वेळच्या परिस्थितीनुसार सल्ला देतील आणि सल्ला मानला गेला नाही तर नाराज होतील अशी भीती तरुणांना वाटते. तरुण मुले, त्यांचे निर्णय हे तूर्तास बाजूला ठेवू. पण वयाच्या साठीनंतर मी माझे आयुष्य कसे व्यतीत करणार आहे याबद्दल आपल्या घरातल्यांना कल्पना द्यायला हवी. त्यामुळे मुलांनापण त्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवाव्या, कोणते सहकार्य आपण करू शकतो, कोणता भार उचलू शकतो अथवा नाही याची कल्पना मिळू शकते. त्यामुळे नातेसंबंधात मोकळेपणा राहतो. अगदी आपल्या दिनक्रमापासून ते आजारपण, परावलंबित्व अगदी मृत्यूसंदर्भातही प्रथम ज्येष्ठांनी विचार केला पाहिजे आणि तो मुलांशी बोलला पाहिजे. दोघांनीही आवश्यकतेनुसार त्यात बदल करायची तयारी ठेवली पाहिजे. मृत्यूसंदर्भातच नव्हे तर एकूणच साठीनंतर आपल्या भूमिकेबद्दल, जबाबदाऱ्या, कर्तव्याबद्दल बोलले पाहिजे.

आपण जगतो ते एका अर्थाने दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात जगत असतो. आपल्या आजूबाजूचे लोक हे आपल्या जगण्याचा भाग असतात. त्यांचे अस्तित्व हे आपल्या जगण्याला अर्थ देत असतात. हे सर्व अगदी खरं आहे, पण ते तसंच राहणार नाही आहे, त्यात बदल होणार आहेत ते महासत्य आहे. पती-पत्नीच्या बाबतीत तर एकमेकांच्या अस्तित्वाला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. आणि जणू काही यात बदल होणार नाही या सोयीस्कर समजुतीमध्ये अनेक पती-पत्नी राहताना आढळतात. त्यातून खूप समस्या निर्माण होतात. जो मागे राहतो त्या व्यक्तीला तर खूपच कठीण जाते, पण अनेकदा पुढच्या पिढीलाही त्याचा त्रास होतो. हे टाळायला हवेच आहे. त्यासाठी गरज आहे ती शक्य तेवढय़ा अलिप्तपणे त्याचबरोबर स्थिर बुद्धीने आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करण्याची!

मृत्यूसंदर्भात ३ पातळ्यांवर विचार करण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट- स्वत:चे आपल्या आयुष्याबद्दल विचार काय आहेत? आपले आरोग्य कसे आहे? काही व्याधी असल्यास त्याचे पुढे काय कसे स्वरूप होण्याची शक्यता आहे? ते मी कसे टाळू शकेन किंवा आजारपण एकदम आले ते गंभीर असेल तर माझी त्याला सामोरे जाण्यासाठी तयारी आहे का? माणसं, पैसे, माझे मनोबल या सर्वाचा विचार प्रथम स्वत:शी आणि नंतर आपल्या माणसांशी केला पाहिजे.

दुसरा विचार केला पाहिजे- माझ्यावर जे कोणी अवलंबून आहेत, जोडीदार, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण अगदी नातू, नातसुद्धा. त्यांचे आयुष्य मी जरी नसलो तरी शक्य त्या प्रमाणात चांगले जावे. त्यासाठी योग्य ती व्यवस्था कशी करता येईल त्याचा!

तिसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपले आपल्या पुढच्या आयुष्याबद्दलचे विचार आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीशी व्यक्त केले पाहिजेत. मोकळेपणाने, खुल्या दिलाने त्यावर चर्चा केली पाहिजे. तेवढे जिवलग मग ते नातेवाईक असोत की मित्र- मैत्रिणी असोत, त्यांच्यापाशी आपले विचार बोलून दाखवले तर आपल्या विचारांची दिशा योग्य आहे की नाही, आपल्यापेक्षा वेगळे विचार लक्षात घेऊन त्यात काही तथ्य आहे का हेही बघता येते. या वेळी आपल्या वैयक्तिक गोष्टींबाबत बोलण्याचीही आवश्यकता नसते. हवापाणी, राजकारण, क्रिकेट, टी.व्ही.वरचे कार्यक्रम यावर जशी मुक्तपणे चर्चा करतो तशी ‘तिऱ्हाईता’च्या भूमिकेतून आपल्या पुढच्या आयुष्याची चर्चा व्हायला हवी. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर आवर्जून ‘समाचाराला’ जायची आपली प्रथा आहे. त्या वेळी आपण असे केले असते तर, नसते तर वगैरे बोलतो. तेवढीच काय ती मृत्यूबद्दलची चर्चा होते. एरवी कधीच होत नाही.

वैचारिक पातळीवर जे जे काही आवश्यक आहे त्याची तयारी केली की पुढे ते विचार कृतीत उतरवणे तितकेच महत्त्वाचे असते. कृती म्हणजे आपले विचार प्रचलित कायद्याच्या चौकटीत बसवून त्यानुसार प्रत्यक्ष लिहिले पाहिजेत. तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतात. त्यासाठीही तीन प्रकारचे दस्तऐवज करावे लागतात. पहिले म्हणजे आपल्याला जर नेत्रदान, त्वचादान, अवयवदान आणि देहदान यांसारख्या काही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी आवश्यक ते फॉर्म भरणे आणि योग्य व्यक्ती, संस्थेच्या हवाली करणे.

त्यानंतर आपण आपल्या प्रकृतीसंदर्भात निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसलो तर आपल्यावर कोणत्या मर्यादेपर्यंत कोणते उपचार केले जावेत किंवा कोणते उपचार करूच नये यासंदर्भात केलेले वैयक्तिक वैद्यकीय इच्छापत्र करणे योग्य ठरते.

तिसरी गोष्ट सर्वाना माहीत असते ती आपल्या मालमत्तेची व्यवस्था करणारे इच्छापत्र म्हणजेच मृत्युपत्र किंवा सोप्या भाषेत आपले ‘विल’.

तिन्ही विषय स्वतंत्र लेखाचे आहेत ते या पुढच्या ‘संहिता साठोत्तरी’मध्ये क्रमाक्रमाने येतील.

शेवटी श्री समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे –

मृत्याभेणें पळों जाता।

तरी मृत्य सोडिना सर्वथा।

मृत्यास न ये चुकविता।

काही केल्या।।

हे लक्षात ठेवून विचार आणि कृती करावी हे सर्वांत चांगले!

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com