News Flash

गद्धेपंचविशी : आणि शिल्प घडत गेलं..

माझ्या आयुष्यात तीन गुरू आले. त्यांचा वचक आणि दरारा असा होता की मी घडत गेलो

संजय नार्वेकर

माझ्या आयुष्यात तीन गुरू आले. त्यांचा वचक आणि दरारा असा होता की मी घडत गेलो.. अभिनयाचं कसलंही ज्ञान, अनुभव नसलेला मी, पण विनय आपटे या गुरूचे स्वावलंबनाचे पाठ, चंद्रकांत कुलकर्णी या गुरूमित्राचं आव्हान देत राहाणं आणि डॉ. राजीव नाईक या मित्राचा तर आयुष्याला पुरून उरणारा पाठिंबा या सगळ्यांमुळे मी घडत गेलो.. माझ्यातल्या शिल्पाला ऐन पंचविशीत आकार येत गेला..

‘..आणि संजय नार्वेकर’ हे शब्द  कानावर पडले, पोटात गोळा आला, हात-पाय थरथरू लागले, सर्वागाला घाम फुटला, मी विंगेतच थंडगार पडलो. बापजन्मात कधीही रंगमंचावर गेलो नव्हतो. माझ्या घराण्यात कुणाचाही दुरूनही नाटकाशी संबंध आला नव्हता. मारामाऱ्या, खोडय़ा, उनाडक्या करण्यातच मी रमायचो. माझं कोणी नाव घ्यावं, असं काही माझ्या हातून घडलं नव्हतं. ‘केलं नव्हतं’ असंच म्हणणं जास्त रास्त ठरेल; पण ती संधी मिळाली, ‘रुईया कॉलेज’ मुळे.

‘रुईया’मध्ये अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर योगायोगानं माझी एकांकिकेत निवड झाली आणि पदार्पणातच मला ‘हिरोची’ भूमिका मिळाली. (खरं तर प्रमुख भूमिका असं मला म्हणायचं होतं; पण ‘हिरो’ या शब्दानं त्या काळी मी हुरळून गेलो होतो.) त्या एकांकिकेचं नाव होतं ‘कोळीया राजा’ आणि त्याचे दिग्दर्शक होते जगतकुमार पाटील. हिरोची भूमिका असल्यामुळे मी मन लावून काम करत होतो. या एकांकिकेनं सर्व स्पर्धेत प्रथम पारितोषिकं पटकावली. मला मात्र साधं ‘उत्तेजनार्थ’देखील बक्षीस मिळालं नाही. याचं दु:ख मला होत होतं, पण एकांकिकेच्या यशामुळे मनाला एक प्रकारचं समाधानही लाभत होतं.तेव्हाच ठरवून टाकलं, की आता दरवर्षी कॉलेजच्या एकांकिकेत भाग घ्यायचा. सारं शिकून घ्यायचं.

पुढच्याच वर्षी बारावीला असताना मला एक चांगली संधी मिळाली. आमच्या कॉलेजच्या एकांकिकेचं दिग्दर्शन करायला विनय आपटे आले. सरांचा नाटय़ क्षेत्रात, ‘दूरदर्शन’वर मोठा दबदबा होता. मी ठरवलं की, आपण असं काही तरी विशेष करावं की, ज्यामुळे सर माझी दखल घेतील. त्या एकांकिकेत जवळपास पन्नास जण होते; पण त्यातल्या कुठल्याही प्रमुख भूमिकांना मी पात्र ठरलो नाही. त्यामुळे मला मॉबमध्ये उभं राहायला लागलं. मी हिरमुसलो, खूप रडावंसंही वाटलं. तो दिवस शांतपणात गेला; पण त्या शांतपणात मी मनातच मनाशी खूप बोललो. ठरवलं, मॉबमध्ये का असेना, पण आपण सरांच्या नजरेत भरायचं. मग सतत सरांच्या समोर उभं राहायचं, काही हवं असेल तर मी स्वत: जाऊन त्यांना आणून द्यायचो, स्वत: पुढाकार घेऊन एकांकिकेच्या इतर कामांची जबाबदारी माझ्यावर घेतली. सरांचा शब्द खाली पडणार नाही याची काळजी घेत होतो. या सगळ्या कृतीला कॉलेजमध्ये एक सुंदर शब्द होता, ‘लोंबतेपणा’. त्या लोंबतेपणाला एके दिवशी फळ लागलं. सरांनी मला बोलावून विचारलं. मी त्यांना म्हणालो, ‘‘मला तुमच्या हाताखाली शिकायचंय.’’ ते हसले. म्हणाले, ‘‘शिकवणार नाही. शिकावं लागेल आणि त्या दिवशी मला माझा ‘गुरू’ मिळाला. पहिल्या वाक्यातच शिकवलं, ‘स्वावलंबन’. त्या दिवसांपासून सरांचा असिस्टंट बनून मी सरांबरोबर ते जिथे जातील तिथे जाऊ लागलो. सर तेव्हा ‘अफलातून’ नावाचं व्यावसायिक नाटक करत होते. त्याचं दिग्दर्शन सरांनीच केलं होतं आणि त्यात एक महत्त्वाची भूमिकाही करत होते. ते नाटक कित्येकदा मी पाहिलं. एकदा काही कारणास्तव त्या नाटकाचा संगीत संयोजक (म्युझिक ऑपरेटर) आला नाही. आता काय करावं? सगळ्यांना प्रश्न पडला. तेव्हा सर म्हणाले, ‘‘काही हरकत नाही, हा संज्या ऑपरेट करेल. काय रे, पाठ आहे ना नाटक? करशील ना?’’ मला नाटक पाठ होतं, पण ऑपरेट काय आणि कसं करावं हे माहीत नव्हतं; पण कानात शब्द होते, ‘शिकवणार नाही. शिकावं लागेल.’ तो प्रयोग रेटला. नंतर मात्र त्या नाटकाचे

पन्नास-साठ प्रयोग मीच ऑपरेट केले. त्या वेळेला म्युझिक ऑपरेट हे आतासारखं ‘फे दर टच’ बटनावर नसायचं, ‘स्पूल’ असायचं. ते ऑपरेट करायला कसब लागायचं. नंतर विनय सरांनी ‘रानभूल’ नाटकात भूमिका केली आणि साहजिकच त्याही नाटकाचा मीच ऑपरेटर झालो. आमच्या नाटकाच्या भाषेत म्युझिक ऑपरेटरला ‘टेपऱ्या’ म्हणत. तर माझा व्यावसायिक नाटय़ क्षेत्रात ‘टेपऱ्या’ म्हणून प्रवेश झाला. त्याच काळात सरांनी ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘पार्टनर’, ‘डिटेक्टिव्ह प्रभाकर’सारख्या मालिका दिग्दर्शित केल्या. मी सरांना ‘दिग्दर्शक सहाय्यक तिसरा’ (पहिला-दुसराही नाही!) म्हणून होतो. ‘चाळ..’ मालिकेचं चित्रीकरण आम्ही खऱ्या चाळीतच केलं होतं. एखाद्या खोलीत चित्रीकरण असलं की ती खोली शूटिंगबरहुकूम लावायची. शूटिंग संपलं की सर दुसऱ्या खोलीत शूटिंग करायला जायचे. मग मी ही खोली शूटिंगआधी कशी होती तशी लावून तिथल्या रहिवाशांना द्यायचो. कचरा काढून खोली साफ करायचो आणि सर हमखास चपला विसरलेले असायचे, त्या चपला उचलून परत सरांना द्यायचो. हेच माझं काम असायचं; पण हे काम मी आनंदानं करायचो, कारण ही कामं करण्यासाठी मला कॅमेऱ्याच्या मागे कुठेही कोपऱ्यात उभं राहाण्याची संधी मिळायची. त्यामुळे मला त्या मालिकेत जे दिग्गज काम करत होते त्यांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची ढब, इत्यादी गोष्टी अगदी जवळून अभ्यासता आल्या. अगदी सुलोचनाबाईंपासून ते नीना कुलकर्णीपर्यंत आणि अशोक सराफांपासून ते अतुल परचुरेपर्यंत. नाटकातही टेपऱ्या म्हणून समोर पिटात बसून मी विक्रम गोखले, दिलीप कुलकर्णीपासून महेश मांजरेकर, सुनील बर्वेपर्यंत. सगळ्यांना मी मनापासून पाहात होतो. सगळ्यांकडून काही ना काही तरी शिकत होतो. सरांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. ते मला त्यांचा ‘मानसपुत्र’ मानत. विनय आपटेंनी, माझ्या गुरूं नी मला नाटक म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, याची ओळख करून दिली.

दुसरा टप्पा मी कॉलेजला दुसऱ्या वर्षांला होतो तेव्हा आला. तोपर्यंत मी रुईया नाटय़वलयाचा ‘सीनियर मेंबर’ झालो होतो. त्या वर्षी कॉलेजतर्फे कुठली एकांकिका करायची याचा शोध सुरू होता आणि एके दिवशी ज्यांना आम्ही दिग्दर्शनासाठी भेटलो होतो त्यांनीच आम्हाला सांगितलं की, ‘हा मुलगा करेल तुमची एकांकिका.’ ‘तो’ मुलगा नुकताच औरंगाबादहून आला होता. आम्ही त्याला नकार देऊ शकलो नाही, कारण तेव्हा आमच्याकडे वेळच कमी होता.  तालमीला सुरुवात झाली. एकांकिकेचं नाव होतं ‘आरण्यक’, लेखक- लक्ष्मण लोंढे. ती खरं तर विज्ञान-गूढकथा होती. त्याचं नाटय़ रूपांतर त्या मुलानं केलं होतं. त्या एकांकिकेचं सादरीकरण विचित्र पद्धतीचं होतं. आम्हालाच कधी कधी काय चाललंय ते कळत नव्हतं; पण तो मुलगा मात्र आत्मविश्वासानं ती एकांकिका दिग्दर्शित करीत होता. माझ्यावर विनय सरांचा बऱ्यापैकी पगडा होता. त्यामुळे माझी

संवादफे कीची पद्धत, हावभाव, उभं राहाण्याची पद्धत, शब्दांवरचं वजन, संवादामधील पॉज हे सरांसारखं होतं. सर जसे अभिनय करायचे तसंच करायचा मी प्रयत्न करत असे. त्या मुलानं याचा वापर एकांकिकेसाठी अगदी हुशारीनं करून घेतला; पण काही काही ठिकाणी तो मला अडवायचा, वेगळं काही तरी करायला सांगायचा. जमलं नाही तर हट्टीपणे परत परत करवून घ्यायचा. मला खूप राग यायचा; पण काय करणार? स्पर्धा दोन दिवसांवर आली होती.

स्पर्धेत एकांकिका सादर झाली. आम्हाला निकालाची उत्सुकता लागलेली. परीक्षकांनी निकाल सांगण्यास सुरुवात केली आणि आयुष्यात पहिल्यांदा मला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय’ पारितोषिक मिळालं. पहिल्यांदा आपण मेहनत करून काही तरी कमावलं याचा आनंद झाला. या मेहनतीला कारणीभूत होता माझ्या शेजारी बसलेला तो औरंगाबादचा मुलगा. मी अत्यंत आनंदानं त्याला करकचून मिठी मारली. नंतर दिग्दर्शनाचा निकाल जाहीर झाला. नाव जाहीर केलं, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी’. तो औरंगाबादचा मुलगा उठला आणि पारितोषिक घेण्यासाठी रंगमंचावर गेला. चंद्रकांत कुलकर्णी- आजचा अत्यंत यशस्वी, आघाडीचा, प्रयोगशील, नावाजलेला दिग्दर्शक ‘आरण्यक’नंतर माझा मित्र झाला; पण चंदूनं खरी कमाल केली दुसऱ्या वर्षी. माझ्या शेवटच्या वर्षांला आम्ही ‘सती’ नावाची एकांकिका केली. या एकांकिकेनं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि सगळ्या स्पर्धात पहिला नंबर काही सोडला नाही. त्यात मी ‘मुखेडकर’ हे पात्र रंगवत होतो. हे पात्र अत्यंत बुळचट, नेभळट,  घाबरट असं होतं, जे माझ्या आवाजाला, चेहऱ्याला, शरीरयष्टीला अजिबातच जुळत नव्हतं; पण तरीही चंदूनं मला ते करायला सांगितलं. एका अर्थी मला आव्हान दिलं आणि स्वत:ही आव्हान स्वीकारलं. आम्ही मेहनत करायला लागलो. त्या पात्रासाठी लागणारी देहबोली, आवाज, त्याचे हावभाव, प्रतिक्रिया सगळं चंदूनं माझ्याकडून काढून घेतलं. माझ्याकडून नक्कल करून नाही घेतली, तर माझ्याकडून मुखेडकर बाहेर काढून पेश केला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग माझ्याकडून करवून घेतले. हळूहळू मला जाणवू लागलं, की हा माझा मित्र आता माझा ‘गुरु मित्र’ झाला आहे. विनय आपटे सरांनी नाटक म्हणजे काय? अभिनय म्हणजे काय? हे शिकवलं, तर माझ्या या गुरुमित्रानं नाटक म्हणजे काय याची जाणीव करून दिली. ‘सती’ एकांकिकेनं जसा प्रत्येक स्पर्धेत पहिला नंबर सोडला नाही, तसंच ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता – संजय नार्वेकर’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम – सोनिया मुळे’ (आताची परचुरे), ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय – गजेंद्र अहिरे’ हीसुद्धा पारितोषिकं कुठेच सोडली नाहीत. या एकांकिकेत गीतांजली कुलकर्णी, विराज राजे, अभिजीत पानसे ही मंडळीही होती जी आता आपापल्या क्षेत्रात प्रचंड नाव कमावत आहेत. पुढे याच गुरुमित्रानं मला पहिलं व्यावसायिक नाटक दिलं, ‘आम्ही जगतो बेफाम’. दिग्दर्शन चंदूचं आणि मोहन वाघकाकांच्या ‘चंद्रलेखा’ नं निर्मिती केली होती.

कॉलेजच्या एकांकिकेत काम करत असताना कॉलेजमधील इतर गोष्टींमध्येही मी खूप सक्रिय होतो. बारावीला असताना कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘जी. एस.’ (जनरल सेक्रेटरी) आणि दुसऱ्या वर्षांला असताना सीनियर कॉलेजचा ‘जी. एस.’ होतो. ‘जी. एस.’ होण्यासाठी आधी कॉलेजची निवडणूक जिंकावी लागते. तुम्ही कॉलेजमध्ये प्रसिद्ध असाल, मुलांना आवडत असाल, तरच

मुलं-मुली तुम्हाला मतं देतात. आमच्या रुईया कॉलेजमध्ये इलेक्शनच्या वेळेस कधीच मारामारी, राडे वगैरे झाले नाहीत. आमच्या कॉलेजचं वैशिष्टय़ होतं, की ‘ब्रेनवॉश’ करून किंवा इतर काही इंटरेस्टिंग आयडिया काढून, ‘अ‍ॅड कॅम्पेन’ बनवून विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि इलेक्शन जिंकायचं. त्या वेळची गोष्ट. आमचं कॉलेज तीन मजली. गोलाकार वळणं घेत पायऱ्या वर जातात. त्यामुळे मधल्या जागेत खालून वपर्यंत खूप मोठी मोकळी जागा आहे. माझ्या इलेक्शनच्या आदल्या रात्री तिसऱ्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत एक सलग भलं मोठ्ठं पोस्टर बनवून लावलं. त्यावर माझं आणि माझ्या पॅनेलच्या मुलामुलींची नावं. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला आल्या आल्या सगळ्यांची एकच चर्चा, ‘एवढं मोठं पोस्टर म्हणजे खूप पैसा खर्च झाला असणार, कसं परवडत असेल यांना..’ वगैरे. खरं सांगू, त्या पोस्टरला फक्त शंभर रुपये खर्च झाले होते! ते पोस्टर होतं पतंगाच्या कागदाचं. एक काइट पेपर पंचवीस पैशांत मिळायचा. शंभर रुपयांचे चारशे काइट पेपर एकमेकांना चिटकवले आणि आमच्यातल्या ड्रॉइंग चांगलं असलेल्या एका मुलानं ते ‘फ्री फ्लो’मध्ये रंगवले.

जनरल सेक्रेटरी असल्यामुळे रुईयामधील सर्व प्रकारच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व प्रकारचे ‘डेज्’ माझ्या हाताखाली (म्हणजे मी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली) व्हायचे. हे सांगायचं कारण, की एखादी गोष्ट तयारी करून कशी पूर्णत्वाला न्यायची याचं शिक्षण मला मिळालं. कॉलेजने दिलेल्या बजेटमध्ये सगळं कसं बसवायचं ते समजलं, पैशांचा विनिमय कळला. ते करताना बरोबरच्या टीमला कसं खूश ठेवायचं, त्यांचे ‘इगो’ सांभाळून, योग्य तो मान राखून कामं कशी

पूर्ण करायची ते मला कळलं. एखादा ‘इव्हेंट’ करायचा म्हटल्यावर कामं करण्यासाठी मुलामुलींची फौज लागायची. विद्यार्थी दिवसभर मेहनत करायचे, सगळ्यांना भुका लागायच्या. साहजिकच त्यांच्या खाण्याची व्यवस्था करणं माझंच काम असायचं. मग तो खर्च बजेटच्या ‘इतर खर्च’ या नावाखाली यायचा. एकदा विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख प्रोफेसर साहुराजा सर मला म्हणालेही होते, ‘‘ए शाला शंजय, तुजा इव्हेन्टच्या खर्चापेक्सा तुजा इतर खर्चच जास्ती अशे!’’ ते पारशी. आमचे सर्वात आवडते. त्यांनी आम्हाला कशातही कधी अडवलं नाही. प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देत, पण चुकीचं काही आमच्या हातून घडू नये म्हणून अगदी करडी नजर ठेवत.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत माझ्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आल्या आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. एक म्हणजे असिता, जी ‘सती’ या एकांकिकेत एक छोटीशी भूमिका करायची. तेव्हा आमची मैत्री झाली, मग मैत्री घट्ट झाली, काही दिवसांनी ती माझी प्रेयसी झाली आणि काही वर्षांनी बायको. आता ती माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या आई-बाबांची आई झाली आहे! कॉलेज संपल्यानंतर मी दडपणाखाली होतो. नोकरी करावी की अभिनयात करिअर? आई-बाबांनी काटकसर करून, प्रसंगी स्वत:ची हौसमौज मारून आम्हा भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं. आता मात्र मला त्यांच्यावर आणखी भार द्यायचा नव्हता. तेव्हा असिता माझ्यामागे खंबीर उभी राहिली. तिनं मला सांगितलं, की तुला जे वाटतं ते तू कर, हवं तर मी नोकरी करीन. पहिल्या वर्षांला असलेली मुलगी मला म्हणते की, वेळ पडली तर मी नोकरी करीन! केवढा तिला माझ्यावर कॉन्फिडन्स होता. माझा आत्मविश्वास आणखी भक्कम झाला. मी रुईयाच्या एकांकिका बसवायचं ठरवलं. आतापर्यंत जे जे गुरूकडून, गुरुमित्राकडून शिकलो आणि नंतर जे जे पाहिलं, अनुभवलं ते सगळं रुईयाचं दिग्दर्शन करत असताना मी माझ्या माझ्या पद्धतीनं, माझ्या कुवतीनुसार वापरत गेलो. लागोपाठ तीन वर्ष मी दिग्दर्शित केलेल्या एकांकिकांना पारितोषिकं मिळाली आणि मग मी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा मी गजेंद्र अहिरेने लिहिलेली ‘मातीच्या चुली’ नावाची एकांकिका दिग्दर्शित केली. (आम्ही दोघं कॉलेजमध्ये एकाच वर्गात होतो.) पण तो प्रयत्न फसला. लेखन चांगलं होतं, पण माझं दिग्दर्शन फसलं होतं. काय चुकलं? काय फसलं? कुठे कमी पडलो?.. स्वत: विचार केला. नंतर मात्र ‘सातच्या आत घरात’, ‘आलो रे बाबा’ आणि ‘संगीत मूकनायक’ या तीनही एकांकिकांना खूप यश मिळालं. यातल्या पहिल्या दोन एकांकिकांचं दिग्दर्शन मी केलं, तर ‘संगीत मूकनायक’चं दिग्दर्शन माझा मित्र पराग वाघमोडेनं (आज तो आपल्यात नाही.) केलं होतं. मी फक्त त्याला मदत केली होती; पण मी त्या एकांकिकेत एवढा गुंतलो होतो की, ती एकांकिका मला माझीच वाटायला लागली होती. खरं तर हे चुकीचं आहे. असो. पण या तीन वर्षांत मला समीर बांदल, विशाल अहिरे, श्रीहर्ष जोशी, प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत (हे सगळे आज हयात नाहीत.) शिल्पा तुळसकर, सोनिया परचुरे, सुलेखा तळवलकर, मंगेश सातपुते, शारिवा नाईक, अभिजित पानसे, क्रांती रेडकर, कमलाकर सातपुते, पूर्णिमा अहिरे, क्षिती जोग, मनवा नाईक यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आता हे सगळे आपापल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत.

मी गिरीश कर्नाड लिखित ‘नागमंडल’ हे प्रायोगिक नाटक करत होतो. ‘डबल कास्टिंग’ मध्ये होतो मी. म्हणजे धनंजय गोरे- माझा छान मित्र आणि अत्यंत सज्जन माणूस, तो जी भूमिका करत होता तीच भूमिका धनंजय नसला की मी करणार, असं होतं. माझं नाव राजा देशपांडेनं सुचवलं होतं. डबल कास्टिंगमध्ये असलो तरी मी आवर्जून सगळ्या तालमींना जायचो. कधी कधी त्या तालमीला एक प्रतिभावान तरुण यायचा. मग तिथे तो तरुण, प्रदीप मुळे, आमचे दिग्दर्शक दिलीप कुलकर्णी यांची चर्चा होई. तो तरुण  काही गोष्टी मांडायचा, कधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण करायचा. मी ऐकत बसायचो. त्याच्या तोंडून माझ्या कानावर शॉ, ब्रेख्त, शेक्सपिअर, स्तानास्लावस्कि, इब्सेन, पीटर वूड, ग्रोटाव्स्की, सात्र, पीटर ब्रुक ही नावं पडायला लागली. भारतातलीही रतन थियम, गिरीश कर्नाड, शमिक बंदोपाध्याय, सत्यदेव दुबे, बादल सरकार, इब्राहिम अल्काझी, विजया मेहता, दामू केंकरे या मंडळींची नावं पडू लागली. मनात म्हटलं, या माणसाकडून नखभर जरी ज्ञान मला मिळालं तरी खूप झालं. मला त्याच्याबरोबर राहायला आवडू लागलं आणि त्यानंही मला कधी मित्र केला हे कळलंच नाही. त्या प्रतिभावान तरुण मित्राचं नाव डॉ. राजीव नाईक. भाषाविज्ञान आणि सौंदर्यशास्त्र (नाटय़विषयक) या विषयासाठी त्याला डॉक्टरेट मिळाली आहे. राजीव हा कथाकार, कवी, नाटककार, अनुवादक, समीक्षक आणि आता शिक्षकही आहे. इतक्या विद्वान माणसानं माझ्यासारख्या फाटक्या माणसाला का मित्र करून घेतलं हे एक कोडंच. कदाचित राजीवला शिल्पं घडवण्याचा छंद असल्यामुळे असेल!

राजीवच्या सहवासात राहून वरील दिग्गज मंडळींनी नाटय़ क्षेत्रात काय काय योगदान दिलंय हे हळूहळू कळू लागलं. पौर्वात्य रंगभूमी, पाश्चिमात्य रंगभूमी कशा प्रकारच्या आहेत. काय वेगवेगळे प्रयोग रंगभूमीवर झालेत?,कशी रंगभूमी बदलत गेली? अभिनयाचे प्रकार, सात्त्विक अभिनय, वाचिक अभिनय, आंगिक अभिनय म्हणजे काय? नाटकाचे प्रकार, नाटय़ अवकाश, नाटकासाठी महत्त्वाचे असणारे सूर, त्याचं ज्ञान.. खूप मोठी यादी. हे सगळं त्याच्या सहवासात राहून शिकत गेलो. बघता बघता तोही माझा ‘गुरुमित्र’ कधी झाला हे कळलंच नाही.

राजीवनं मला नाटकाची, अभिनयात मी काय करू शकतो याची जाणीव करून दिली. मी काय करायला नको, हे तर त्यानं सांगितलंच; पण मी काय करायला हवं, तेही सांगितलं; नाही, ते माझ्याकडून करवून घेतलं. त्याचंच फळ म्हणजे ‘अधांतर’, ‘अशी पाखरे येती’, ‘खेळीमेळी’, ‘हमिदाबाईची कोठी’ अशी दर्जेदार नाटकं माझ्या वाटय़ाला आली. राजीवनं मला ज्ञान दिलं, प्रेम दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं करिअर राजीवनं डिझाईन केलं. आज मी जो काही आहे, जे काही थोडंफार यश मिळालंय, त्यात राजीवचा खूप मोठा हात आहे आणि हे मी अभिमानानं सांगतो. आजही हा गुरुमित्र माझ्या मागे उभा आहे. मी अडचणीत असलो, गोंधळात असलो किंवा काही प्रश्न मनात उभे राहिले की, आजही मी त्याच्याकडे जातो.

आज जेव्हा माझ्याकडे नवीन काम येतं, तेव्हा ते काम मी जास्तीत जास्त अचूक करण्याचा प्रयत्न करतो, कारण माझ्यावर या तीन गुरूंचा वचक आणि दरारा आहे. जर त्या कामात माझ्याकडून काही कमतरता राहिली तर हे गुरू डोळ्यासमोर दत्त म्हणून उभे राहतात. राजीवचं एक वाक्य आजही माझ्या कानात आहे, ‘कुठल्याही इमेजमध्ये न अडकता उत्तम अभिनेता अशी ओळख निर्माण कर.’  ‘ऑल द बेस्ट’ नाटक, त्याचे दौरे, त्या नाटकानंतरचे दिवस, ‘वास्तव’ चित्रपट आणि तो प्रदर्शित झाल्यानंतरचे दिवस, महेश मांजरेकरांनी मला दिलेली संधी आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास, ‘अगं बाई अरेच्चा’ सिनेमातले क्षण, ‘चिंतामणी’च्या लता नार्वेकरांनी मला दिलेला पाठिंबा, या प्रत्येकावर थोडक्यात बोलणं अशक्य आहे. प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहायला लागतील. असो.

‘गद्धेपंचविशी’त ज्या चुका होतात त्या चुका माझ्या हातूनही झाल्या. कदाचित इतरांपेक्षा मी जास्तच केल्या असतील! पण इथे शब्दमर्यादा असल्यामुळे मांडता येत नाही. ते नंतर कधी तरी.. (हाऽ हाऽ हा!)

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:03 am

Web Title: article about actor sanjay narvekar sanjay narvekar movies zws 70
Next Stories
1 आनंद मिळवण्यामागचं ‘व्यवस्थापन’
2 ‘किताब’विश्व!
3 सुख म्हणजे नक्की काय असतं?
Just Now!
X