News Flash

गद्धेपंचविशी : समृद्ध तरुणाई!

आजूबाजूचं वातावरण सतत बदलतं असेल तर त्याच्याशी जुळवून घेणं आपल्याला भाग पडतं.

डॉ. रवी बापट

‘‘डॉक्टर त्याच्या विषयात तज्ज्ञ असणं आवश्यक, हे खरंच; पण त्याचा जगण्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा असतो. हा दृष्टिकोन तयार होण्यात आपण बालपणी ज्यांच्या सान्निध्यात वाढतो, तरुणपणी ज्यांच्या हाताखाली शिकतो, ज्यांच्याबरोबर काम करतो, त्यांचं मोठं योगदान असतं. प्रचंड प्रयत्नांती एखादा अतिगंभीर रुग्ण जेव्हा वाचतो, तेव्हा डॉक्टरला होणाऱ्या आनंदाचं मोजमाप होऊ शकत नाही. थक्क करून सोडणारे अनुभव याच काळात मिळत गेले. त्यातून माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावत गेल्या. आयुष्याच्या टप्प्यावर योग्य माणसं भेटली, त्यांचं मार्गदर्शन आणि माझे योग्य निर्णय यातून माझ्या तरुणाईत मी समृद्ध होत गेलो.’’ 

आजूबाजूचं वातावरण सतत बदलतं असेल तर त्याच्याशी जुळवून घेणं आपल्याला भाग पडतं. ही जुळवून घेण्याची वृत्ती एकदा अंगात भिनली, की भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित,    प्रतिकूल परिस्थितीचा आपण नक्की सामना करू शकू , असा आत्मविश्वास नकळत मनात तयार होत जातो. माझ्या बाबतीत मनाची अशी घडण होण्याची सुरुवात लहानपणीच झाली होती. त्याला एक स्थिर चौकट मिळाली, ती तारुण्यात; डॉक्टर होऊन ‘के .ई.एम.’ रुग्णालयात काम करायला लागल्यावर. आधी माझी थोडी कौटुंबिक, शैक्षणिक पार्श्वभूमी सांगतो. माझं आडनाव बापट, पण मी काही मूळचा महाराष्ट्रात राहाणारा नाही! आम्ही मध्य प्रदेशमधल्या होशंगाबादचे. हरदा हे आमचं गाव. आजोबा रेल्वेत नोकरी करणारे. त्यांना मी कधी पाहिलं नाही, पण ते वैद्यराज होते असं सांगितलं जातं. माझे आई-वडील दोघेही जुन्या काळातले ‘एम.बी.बी.एस.’ डॉक्टर. वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे मी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी, सात वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकलो. गाव बदललं की प्रत्येक वेळी सगळंच बदलायचं. नवीन ठिकाणी नवं जगणं, भाषेचा बाज वेगळा, संस्कृती वेगळी, मित्र वेगळे. पण यामुळेच मी जगात कु ठेही व्यवस्थित राहू शकीन, असं वाटायला सुरुवात झाली. मी पुढे जो पेशा स्वीकारणार होतो त्यासाठी ही फार उपयोगी पडणारी गोष्ट ठरेल, यावर मात्र मी त्या काळी काही विचार के ला नव्हता.

घरी आई-वडील डॉक्टर आहेत म्हणून मीपण डॉक्टर होणार, असं काही डोक्यात नव्हतं. बरं, वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांचा दवाखाना मुलानं पुढे चालवायचा, असंही काही नव्हतं. मला सैन्यात जाण्याचं आकर्षण होतं. त्यानुसार मी ‘एन.डी.ए.’मध्ये (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) प्रवेश मिळवला. हवाई दलात जायचं ठरवून टाकलं, कारण त्यात थरार होता, एक प्रकारचं ‘ग्लॅमर’ही होतं. ‘पायलट अ‍ॅप्टिटय़ुड बॅटरी टेस्ट’मध्ये उत्तीर्ण झालो, पण भावी पायलटसाठीच्या डोळ्यांच्या सूक्ष्म तपासणीत मात्र मी रंगांधळा असल्याचं समोर आलं आणि अर्थातच हवाई दलात जाण्याचा रस्ता बंद झाला. १९५७ मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास मी मुंबईला आलो, तोवर तेव्हाच्या लोकप्रिय आणि बहुचर्चित महाविद्यालयांचे प्रवेश झालेले होते. मग मी ‘रुईया’ महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मुंबईत मावशीकडे राहू लागलो. मावशीचे यजमान अभियंता असल्यामुळे मी अभियांत्रिकीला जावं अशी त्यांची इच्छा होती. त्याच वेळी वैद्यकीय शाखेचाही विचार मनात सुरू होता. शेवटी डॉक्टर व्हायचं पक्कं  के लं आणि मुंबईतील ‘के ईएम’ रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ‘जी. एस. मेडिकल कॉलेज’मध्ये मला प्रवेश मिळाला. ही माझ्या विशीची सुरुवात. यापुढच्या वर्षांमध्ये मी खऱ्या अर्थानं आयुष्यासाठी घडलो. डॉक्टर म्हणून रोज नवे, आव्हानात्मक अनुभव घ्यायला सुरुवात झाली. या प्रक्रियेत ज्ञानात भर पडत गेलीच, पण या पेशाविषयी माझी एक विचारधारा तयार होत गेली.

डॉक्टरकीचं शिक्षण घेताना विद्यार्थी म्हणून मी इतरही अनेक गोष्टी करत होतो. निवासी डॉक्टर म्हणून ‘इंटर्नशिप’ करताना मी मला ‘ज्युनिअर’ असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवत असे. आपण चांगला शिक्षक होऊ शकतो, अवघड विषय सोप्या शब्दांत समजावून देऊ शकतो, असं मला तिथे जाणवलं आणि मी ते पुढेही करत राहिलो. ज्या डॉक्टर विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नसे, त्यांना मी शिकवायला सुरूवात के ली. प्रत्येक जण शिक्षक होऊ शकत नाही, असं मला वाटत आलं आहे. आजही स्वत:ला आवर्जून ‘शिक्षक डॉक्टर’ म्हणवून घेणं मला आवडतं आणि माझ्या डॉक्टर विद्यार्थ्यांचं यश, त्यांना नाव मिळालेलं पाहून मला श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. त्याचा पाया मी शिकत असताना घातला गेला.

प्रत्येक डॉक्टर हा आधी चांगला माणूस हवा, हा विचार माझ्या मनात पक्का होण्यामध्ये अर्थातच माझ्यावर असलेला आई-वडिलांचा प्रभाव कारणीभूत होता. अतिशय प्रामाणिकपणे डॉक्टर म्हणून सरकारी नोकरी करणाऱ्या वडिलांना मी पाहिलं होतं. पुढे ‘के .ई.एम.’मध्येच नोकरी करण्याचा मी जो निर्णय घेतला, तो त्या वैचारिक बैठकीतूनच घेतला असावा. माझी आईदेखील डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होती. ती जाणीवपूर्वक अतिशय कमी फी घेत असे. इतकं च नव्हे, तर ज्या रुग्णांकडे औषधांसाठी पैसे नसत त्यांना औषध घ्यायला पैसे देत असे, स्त्रियांमध्ये संतती नियमनाच्या साधनांबद्दल जागरूकता यावी म्हणून स्वत:हून प्रयत्न करत असे. डॉक्टरकडे समोरच्याचं ऐकू न घेण्याची, त्यांना मायेनं वागवण्याची हातोटी आणि सगळ्यांना समान मानण्याची दृष्टी हवी, हे मला पटत गेलं आणि ते मी आत्मसात करत गेलो.

निवासी डॉक्टरांना ‘शिकाऊ डॉक्टर’ म्हणतात, ते मला अजिबात आवडत नाही. शिकत असले तरी ते पूर्ण डॉक्टर असतात. ‘एम.बी.बी.एस.’ झालेले असल्यामुळे त्यांना खरं तर स्वतंत्र प्रॅक्टिस करायला मान्यता असते. सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या, त्यांच्यातलं वैविध्य, अनेकदा अचानक येणारी आव्हानात्मक स्थिती, काही वेळा जाणवणारा वैद्यकीय वस्तू आणि साहित्याचा तुटवडा या परिस्थितीचा अनुभव घेत ते शिकत असतात. मी पदव्युत्तर पदवी घेत असताना निवासी डॉक्टर म्हणून आम्हाला १५७ रुपये विद्यावेतन मिळत असे. आताही ठिकठिकाणी निवासी डॉक्टर संप करत असतात, पण त्या वेळी या तुटपुंज्या विद्यावेतनाबद्दल आम्ही १७ दिवसांचा संप के ला होता. तेव्हा मोबाइल फोन नव्हते. मग आमचे सहकारी राज्यभर आणि देशातही ठिकठिकाणी स्वत: गेले. तिथल्या निवासी डॉक्टरांचा पाठिंबा आमच्या संपाला मिळाला. या संपात मी इतर काही जणांबरोबर आघाडीवर होतो. ‘आम्ही एम.बी.बी.एस. पूर्ण झालेले डॉक्टर आहोत, तेव्हा ते लक्षात घेऊनच विद्यावेतन ठरवायला हवं,’ असा आमचा मुद्दा होता. आमची भूमिका आम्ही सोडली नाही आणि त्यावर विचार होऊन आमच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली. ठोस मुद्दे मांडून आम्ही न्याय मिळवला यासाठी तेव्हा झालेला आनंद मोठा होता.

विद्यार्थिदशेत मला या क्षेत्रातले जे कर्तृत्ववान लोक भेटत होते, त्यांचाही डॉक्टर म्हणून माझ्यावर प्रभाव पडत होता. ‘एमबीबीएस’च्या परीक्षेत मी उत्तम गुण मिळवून झळकलो होतो. त्यानंतर ‘एफ.आर.सी.एस.’ (फे लोशिप ऑफ द रॉयल कॉलेजेस ऑफ सर्जन्स) ही पदव्युत्तर पदवी घेणं फार प्रतिष्ठेचं मानलं जातं. शिवाय त्या काळात या क्षेत्रातले विद्यार्थी  शिक्षणासाठी परदेशी जाण्यास मोठीच सुरुवात झाली होती. हे सोडलं तर इथेच राहून सरकारी रुग्णालयात काम करत ‘एम.एस.’चं शिक्षण घेणं किं वा सरळ स्वत:ची प्रॅक्टिस थाटणं हे पर्याय होतेच. मी ‘एफ.आर.सी.एस.’ करावं असा सर्वाचं म्हणणं होतं. त्याच वेळी मला इंटर्नशिपमधील सर्वात्तम विद्यार्थी डॉक्टर म्हणून रोटरी क्लबतर्फे  गौरवण्यात आलं. प्रसिद्ध सर्जन सी. एस. व्होरा यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला होता.

डॉ. व्होरांना मी ‘एफ.आर.सी.एस.’ करावं की नको, याबद्दल मत विचारलं. त्यांनी मला जे उत्तर दिलं ते माझ्या कायम लक्षात राहिलं आणि ते मी वारंवार सांगतोही. त्यांनी मला प्रतिप्रश्न के ला होता, ‘‘बाजारामध्ये दिवसाला १०० दाढय़ा करणारा हजाम हा ‘ताज’मध्ये ६ दाढय़ा करणाऱ्यापेक्षा चांगला की वाईट?..’’ त्या प्रश्नातच त्यांनी मला उत्तर दिलं होतं. पुस्तकी ज्ञानापेक्षा अधिकाधिक शस्त्रक्रिया करण्याच्या अनुभवातूनच चांगला सर्जन तयार होतो. तो अनुभव आपल्या देशात सरकारी रुग्णालयांपेक्षा इतर कु ठे चांगला मिळणार? अर्थातच मी इथेच राहून ‘एम.एस.’ के लं.

याच काळात मी डॉ. वसंत शेठ यांच्या हाताखाली काम करून शस्त्रक्रिया शिकलो. ते प्रयोगशील होते, पण बोलण्यात शिव्या असत. त्यांच्या हाताखाली काम करणं अवघड होतं खरं, पण त्यांनी सर्जन म्हणून मला घडवलं.      के वळ इतकं च नाही, तर त्यांनी माझ्या विचारांना दिशा दिली. अन्ननलिका, यकृत, पित्ताशय, पित्तनलिका, स्वादुपिंड, मोठं आतडं, या शस्त्रक्रियांमध्ये मी पुढे जी प्रगती के ली, त्याचं बीज डॉ. वसंत शेठ यांच्याबरोबर झालेल्या प्रत्यक्ष शिक्षणात आहे. पुढे मी ‘गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी’ विषयात काम करायचं ठरवलं. १९७५ मध्ये मला कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती मिळाली आणि ‘ग्लासगो रॉयल इनफरमरी’मध्ये डॉ. लेस्ली ब्लूमगार्ट यांच्याकडून मी गॅस्ट्रोएंटेरॉलॉजीतील सर्जरीचं शिक्षण घेतलं. त्यांच्यामुळे माझ्या विचारांच्या कक्षा आणखी रुंदावल्या आणि माझ्यात चिकित्सक आणि संशोधनात्मक दृष्टिकोन वाढीस लागला. तिथून परत आल्यानंतर मी पुन्हा ‘के.ई.एम.’मध्ये काम करू लागलो. अजूनही या रुग्णालयाशी माझा असलेला स्नेहबंध जसाच्या तसा आहे.

निवासी डॉक्टर म्हणून आपण काम करू लागतो तेव्हा सुरुवातीला अनेक आव्हानात्मक स्थितीतले रुग्ण पहिल्यांदाच पाहात असतो. रेल्वे किं वा रस्त्यावरचे अपघात, पिस्तुलानं किं वा धारदार शस्त्रांनी झालेला हल्ला, मारामाऱ्या, असे काही रुग्ण तर इतके  वाईट स्थितीत रुग्णालयात आलेले असतात की त्यांना वाचवणं के वळ अशक्य वाटावं! अशा काही रुग्णांना अनेक दिवस, आणि पूर्वीच्या काळी तर महिनोंमहिनेदेखील रुग्णालयात ठेवायची वेळ येई. प्रचंड प्रयत्न के ल्यानंतर जेव्हा असा रुग्ण वाचतो, तेव्हा डॉक्टरला होणाऱ्या आनंदाचं मोजमाप होऊ शकत नाही. थक्क करून सोडणारे हे अनुभव असतात. प्रत्येक रुग्णावर उपचार करताना जसा डॉक्टरचा अनुभव वाढत जात असतो, तसंच त्याच्या जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनातही प्रत्येक रुग्ण भर घालतोच.

माझ्या तरुणाईत मी असाच समृद्ध झालो असं मला वाटतं. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरनं रुग्णाचं हित आधी लक्षात घ्यायला हवं. आपण परमेश्वर नाही, तर रुग्णाचं आरोग्य सुधारण्यासाठीचं एक माध्यम आहोत, याचं भान ठेवून शांतपणे रुग्णाशी संवाद साधायला हवा, त्याचा विश्वास संपादन करायला हवा. ज्या लोकांना आरोग्य सुविधा सहजासहजी उपलब्ध होत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवर्जून काही प्रयत्न करायला हवेत. या गोष्टी मला उमजत गेल्या आणि मी माझ्या परीनं तसं करण्याचा प्रयत्न करत आलो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगण्याच्या प्रत्यक्ष ‘प्रॅक्टिस’ची ओळख करून देणारा तो काळ म्हणूनच मला खूप महत्त्वाचा वाटतो.

 शब्दांकन – संपदा सोवनी

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:15 am

Web Title: article about dr ravi bapat zws 70
Next Stories
1 ट्रॅजेडी क्वीन
2 छोड जाएंगे  यह जहाँ तन्हा..
3 ज्येष्ठांचे लिव्ह इन : ढाई आखर प्रेम के !
Just Now!
X