‘‘एखाद्या परिषदेनंतर, संघटनेच्या बैठकीनंतर लोक तिचं, तिच्या वक्तृत्वाचं, तिच्या धडाडीचं कौतुक करतात, त्यावेळी मी गालातल्या गालात हसत असतो. आपल्याला सर्वाधिक आवडणाऱ्या व्यक्तीला इतरही अनेक लोक जीव लावतात, तिच्यामुळे झपाटले जाऊन काम करतात, त्यावेळी आम्ही जी अनोख्या सामुदायिक सहजीवनाची सप्तपदी चाललो, ती सार्थकी लागल्याची प्रचीती येत असते. त्या सार्थकतेच्या क्षणाने जीवनाला पूर्णत्व मिळाल्याचा आनंद काही औरच आहे.’’ सांगताहेत  डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ. शुभांगी अहंकारी यांच्याबरोबरीच्या ३५ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
पस्तीस वर्षांपूर्वी जुलैच्या महिन्यातच माझी व शुभांगीची एका कार्यशाळेत भेट झाली. तेव्हा मी के.ई.एम हॉस्पिटलच्या पथदर्शक ‘जनस्वास्थ्य रक्षक योजने’अंतर्गत वढु बुद्रुक येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. विद्यार्थी दशेतच राष्ट्रसेवा दल, युक्रांद या चळवळीत सक्रिय झाल्यामुळे, डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर आपल्याच गावात (म्हणजेच मूळ खेडेगावी) दवाखाना सुरू करायचा असा माझा निर्णय झाला होता. त्यासाठी जोडीदार डॉक्टरच पाहिजे म्हणून शोध सुरू होता. यदुनाथजी थत्ते, डॉ.अरुण लिमये, डॉ.मधुकर दंडारे, विद्याताई बाळ यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या काळात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुलींचं प्रमाण खरं तर खूपच कमी. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात माझ्या वर्गात तर ९५ मुले आणि केवळ ५ मुली होत्या. डॉक्टर मुलगी मिळणं आणि ती खेडय़ात राहण्यास तयार असणं ही दुरापास्त गोष्ट होती. मुंबईच्या कार्यशाळेतील शुभांगीची भेट ही या पाश्र्वभूमीवर झाली. वढुच्या आमच्या जनस्वास्थ्य रक्षकांनी कार्यशाळेत केलेल्या मांडणीने शुभांगी प्रभावित होऊन गेली. विद्याताईंच्या मैत्रिणीची ती मुलगी. विद्याताईनी आमची ओळख करून दिली आणि आम्ही के.ई.एम.हॉस्पिटल मुंबईच्या परिसरातील एका झाडाच्या कट्टय़ावर भरपूर गप्पा मारल्या.
शुभांगीचं शिक्षण मृणालताई गोरेंच्या अ.भि.गोरेगावकर शाळेतून झालं होतं. समाजवादी विचारांच्या वर्तुळातून, संस्कारांतूनच तिची जडणघडण झाली होती. आमची जवळपास बरीचशी मतं जुळणारी होती. अणदूरला राहण्याची तिची तयारी होती. खरं म्हणजे तिला मुंबईबाहेर मराठवाडा त्यात अणदूर असं काही ऐकून-बघूनही माहीत नव्हतं. माझं गाव खुदावाडी, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील अणदूरच्या जवळ, इथे काही लोकांशी तिच्या भेटी झाल्या. अणदूर ते खुदावाडी असा बैलगाडीचा प्रवास, मर्यादित शौचालयं असं गावाचं खरं स्वरूप तिने पाहिलं. मला तिच्या निर्णयाबद्दल खूप धाकधूक वाटत होती. तिचे खूप प्रश्न होते. मुलांच्या शिक्षणाचं काय? येथील रुग्णांचा प्रतिसाद कसा असेल? एवढय़ा प्रतिकूल परिस्थितीत दवाखाना, रुग्णांवरती उपचार करता येतील का? आम्हाला आमच्या जगण्यापुरते तरी पैसे मिळतील का? आज पािठबा देणारे लोक कायम आमच्याबरोबर राहतील का? यातील बऱ्याच प्रश्नांना माझ्याकडेही उत्तरं नव्हतीच, पण असल्याचा देखावा मात्र मी करत होतो. मी म्हणालो होतो, ‘‘आपली मुलं ज्या शाळेत जातील तिथे आपण जात जाऊ, सुधारणा करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे इतर सर्वच मुलांना फायदा होईल.’’ या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही शुभांगीने अणदूरला राहण्याचा निर्णय घेतला ही माझ्यासाठी फार मोठी आनंदाची बाब होती. मुंबईची तिची जीवनशैली सोडून अणदूरला एका लहानशा जेमतेम दोन खोल्यांच्या भाडेतत्त्वावर मिळालेल्या घरात राहून आम्ही येथील कामाला सुरुवात केली.
 खरं म्हणजे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या घरातून शुभांगी आलेली होती. तरीही चळवळीतला असल्याने मला तिच्याबद्दल काही ग्रह होते. मात्र हळूहळू माझ्यापेक्षा तीच जास्त काटकसरी, शिस्तीची, नासधूस टाळणारी आणि आहे त्यात समाधान मानणारी असल्याचं लक्षात येत गेलं. अन्नाची नासाडी टाळणं, एकाबाजूने कोरे असणारे कागद सांभाळून ठेवणं, वस्तूंचा जपून वापर करणं या तिच्या सवयी मला लक्षात येत गेल्या व तिच्यापेक्षा मीच अधिक खर्चीक असल्याचं राहून राहून वाटू लागलं.
  कामावर तिची आत्यंतिक निष्ठा आहे. १९८३ साली स्थापन झालेलं आमचं जानकी रुग्णालय, म्हणजे ‘डॉक्टरबाईंचा दवाखाना’ म्हणूनच प्रसिद्ध होत गेलं. माझ्यापेक्षा तिचा लोकसंग्रह अफाट आहे. प्रत्येक रुग्णासाठी ती भरपूर वेळ देते. आलेल्या बायका फक्त आजारापुरतं बोलत नाहीत तर घरातल्या सगळ्या अडचणी बोलायला लागतात. शुभांगी मन लावून तन्मयतेने त्यांचं ऐकून घेते, सल्ले देते. प्रसंगी कुटुंबातील संबंधित व्यक्तीला बोलावून समजावते. कपाटात, कुलुपात ठेवलेले चहा-साखरेचे डबे सासूबाई सुनांच्या हातात काढून द्यायला लागल्या आणि नवरे आपल्या बायकांना घेऊन साडी खरेदी करायला गेल्याचं समजलं की, शुभांगीचा मूड बहरलेला असतो.अणदूरच्या शाळेतच मी शिकल्यामुळे इथे माझी मित्रमंडळी भरपूर होती. उलट तिला इथे आल्यानंतर कुणीही मैत्रीणच नव्हती, हळूहळू, एक एक मैत्रिणी होऊ लागल्या. आणि आज खऱ्या अर्थाने संस्थेच्या कार्यकर्त्यांच तिच्या मैत्रिणी झाल्या आहेत.
सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतर ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ संस्थेच्या कामाला सुरुवात झाली. भारतवैद्य प्रशिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकविध नावीन्यपूर्ण योजना पुढे आल्या. कामाचा पसारा वाढतच गेला. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन यातील रेषा केव्हा विरून गेली कळलंच नाही. आमचं अहंकारी कुटुंब मुळातच मोठं. त्यात संस्थेचा वाढलेला पसारा यामुळे घरातला पसारा फार वाढला. शुभांगी डॉक्टर म्हणून दवाखान्यात जेवढं काम करते तेवढाच वेळ स्वयंपाकघरात पण नेहमी देत असते. यावरून आमचे वाद होतात. तिला तिच्या चवीचंच खाणं हवं असतं. स्वयंपाक घरातली, एकंदरीत घरातच सगळ्या गोष्टी तिला तिच्या शिस्तीत लागतात. चादरीची घडी, ठेवलेल्या ऊशा, टेबलावरची मांडणी ते सगळ्याच गोष्टी तिला नीटनेटक्या लागतात. त्यासाठी आजारपणातही आराम करायला ती तयार नसते. दुसऱ्यासाठी सतत राबत राहण्यात तिला आनंद असतो. पाहुणे, मित्रमंडळी सतत तिच्या या कार्यक्षमतेचे गोडवे गातात. पण तिच्या या जास्त नीटनेटकेपणाच्या वृत्तीमुळे मला आणि मुलांना सतत त्रास होतो. मित्रांचा फोन आला की, सर्वप्रथम त्यांच्या घरची चौकशी ती करते. अगदी विस्तृत. तिची स्मरणशक्ती अफाट आहे.
शुभांगी स्वभावाने जशी प्रेमळ. लाघवी आहे. तेवढीच प्रसंगी ती मनाने कणखर असते. माझ्या मोठय़ा भावाला (नानांना) कर्करोगाचं निदान झालं. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. ज्याला वडिलांच्या ठिकाणी मी मानलं. ज्याचा आदर्श ठेवून मी अणदूरला दवाखाना सुरू केला. त्याला अचानक हा आजार झाल्याने मी खचून गेलो. या कठीण प्रसंगाची जबाबदारी शुभांगीने पूर्णपणे घेतली. पुढच्या सगळ्या तपासण्या, उपचार याचं नियोजन करून मला पूर्ण धीर दिला. २००२ सालच्या घशाच्या कर्करोगातून नाना पूर्ण दुरुस्त झाले. आई, मावशी, माझा भाचा इत्यादीच्या आजारपणात सेवाभावी वृत्तीने संयमाने डॉक्टर आणि त्यांची सून म्हणूनही तिने समíपत भावनेने घेतलेल्या कष्टाने सारं कुटुंबच सुखावून गेलं. माझं कुटुंबच २५-३० जणांचं मोठं कुटुंब असलं तरी ती कधी वैतागली नाही, कंटाळली नाही. कधी पैशाचा हिशोब केला नाही. सर्वानाच काही ना काही तरी देत राहण्याच्या तिच्या वृत्तीचा मला अभिमान वाटतो.‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ चळवळीचा वाढता विस्तार, अनेक आव्हानात्मक प्रकल्पांची अंमलबजावणी, भारतवैद्यांनी गावपातळीवरील आरोग्यस्थितीबाबत प्रयत्नपूर्वक केलेली मेहनत यामुळे आनंदाने, समाधानाने, ध्येयाने भारलेल्या आमच्या वाटचालीचा आढावा घेतला तर आयुष्यात काहीतरी करू शकलो असं वाटतं. समस्या संपलेल्या नाहीत, त्यामुळे एक अस्वस्थता सतत भरून राहिलेली असतेच. त्यासह एक खंत मनाला टोचणी लावते. शुभांगीसारखी रसरसून जगणारी, कलासक्त जोडीदार लाभूनही आमचं असं ‘खासगी आयुष्य’ आम्ही अनुभवू शकलेलो नाही. दोघंच आहोत, सिनेमाला गेलो आहोत, नाटक पाहतो आहोत, असं एकही उदाहरण आमच्याकडे नाही. तो निवांतपणा वाटय़ाला आला नाही. शुभांगीला गाणं आवडतं. शास्त्रीय संगीताची तिला जाण आहे, चित्रकलेतही गती आहे. मात्र कामाच्या घाईत या गोष्टी मागे पडत गेल्या. तिची आवड-निवड जोपासण्याचा वेळ तिला मिळाला नाही, मीसुद्धा हा तिचा हक्काचा वेळ तिला देणारा चांगला मित्र होऊ शकलो नाही. याबाबत ती कधीतरी कुरबुरते, ‘‘तुझ्याकडे माझं ऐकायला वेळ आहे का’’ किंवा ‘‘मी कंटाळले आहे, हे काम लवकर हातावेगळं करू या.’’ अशी नाराजी व्यक्त करते. पण हा थकवा क्षणिक असतो. पुन्हा एकदा नवी कामं, नव्या जबाबदाऱ्या समोर ठाकल्या की माझ्याआधी ती सरसावते. ती मास लिडर आहे. मुद्देसूद भाषण करते, पाच हजार महिलांचा समुदाय एकचित्ती तिचं बोलणं ऐकत असतो तेव्हा मला अतीव समाधान मिळतं. एखाद्या परिषदेनंतर, संघटनेच्या बैठकीनंतर लोक तिचं, तिच्या वक्तृत्वाचं, तिच्या धडाडीचं कौतुक करतात, त्यावेळी मी गालातल्या गालात हसत असतो. आपल्याला सर्वाधिक आवडणाऱ्या व्यक्तीला इतरही अनेक लोक जीव लावतात, तिच्यामुळे झपाटले जाऊन काम करतात, त्यावेळी आम्ही जी अनोख्या सामुदायिक सहजीवनाची सप्तपदी चाललो, ती सार्थकी लागल्याची प्रचीती येत असते. त्या सार्थकतेच्या क्षणाने जीवनाला पूर्णत्व मिळाल्याचा आनंद काही औरच आहे.
आज ३५ वर्षांच्या आमच्या सहजीवनाकडे पाहतो तेव्हा वाटतं, ‘हॅलो’साठीचा पुढाकार, संकल्पना जरी माझी होती तरी नेतृत्व मात्र आम्हा दोघांचं होतं. मम म्हणून कोणत्याही कामात सहभागी होण्यापेक्षा स्वतंत्र विचाराने योजना आखण्याचं कसब तिच्याकडे होतं. म्हणूनच हा सहप्रवास शक्य झाला, यशस्वी झाला. अनेक मतभेदांनंतर आमचा निर्णय होतो. एकाला मान्य असलेला निर्णय कायमचा मागे पडतो. कामसू, मेहनती कार्यकर्त्यांची फळी आम्हाला लाभली व असाध्य मार्ग सुकर झाला. आमचं सहजीवन समजूतदार करण्यात आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचा वाटा आहे.    

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा