मग ते कोणत्याही प्रकारचं असलं तरी आपल्या कामावर अढळ श्रद्धा बाळगून, कोणतीही कसूर न करता ते नेटाने, प्रामाणिकपणे करणाऱ्या त्या दोघी.. दुर्गा आणि आशा मला वेगळ्याच अर्थाने ग्रेट वाटल्या. कारण टागोरांनी म्हटलं आहे, ‘इट इज वेरी सिंपल टू बी हॅपी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिंपल.’ आणि हेच साधं वागणं, या दोघींना सहज जमलं होतं.
वास केला की निसर्ग कळतो, भूगोल कळतो, तशीच माणसंही कळतात. आपल्या चौकटीच्या बाहेरचं जग कळतं. माझंही अनुभवविश्व प्रवासाने खूप व्यापक झालं. प्रवासा दरम्यान मला भेटल्या हटके व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया, दुर्गा आणि आशा. साधंच, पण विचारी जीवन जगणाऱ्या त्या दोघी..
गुहागर हे समुद्राच्या कुशीत वसलेलं निसर्गसुंदर गाव. पण हे गाव जगाच्या नकाशावर आलं ते बहुचर्चित एन्रॉन प्रकल्पामुळे आणि येथील पर्यटनामुळे. गुहागरमधून शेजारच्या दापोली तालुक्यात जायचं तर वासिष्ठी नदीवरची खाडी ओलांडावी लागते. दर अध्र्या तासाने सुटणाऱ्या फेरीबोटीमुळे हे अंतर अगदी चुटकीसरशी पार होतं. त्यामुळे दापोलीला जायचं म्हणजे फेरीबोटीचा प्रवास ठरलेलाच. बोटीची आपल्याला गंमत वाटते, पण शेवटी इथे खेळ पाण्याशी असतो. धक्क्यावरच्या सगळ्या गाडय़ा, प्रवासी यांना बोटीवर चढवणं, त्यांची तिकिटं तपासणं आणि पलीकडे पोहोचल्यानंतर सर्वाना सुरक्षितपणे खाली उतरवणं ही वाटते तितकी साधी-सोपी गोष्ट नाही. त्यातच आपल्याला सगळ्यांना ‘घाई’ हा रोग जडलेला. मग फेरीबोटीतून जाणारे प्रवासी तरी त्याला अपवाद कसे असणार? प्रत्येकालाच सर्वात आधी आपण याची ओढ लागलेली. पण बोटीवरच्या या व्यवस्थापनाची ही आघाडी आत्मविश्वासाने लढवत, प्रत्येक गाडीला तिच्या निर्धारित ठिकाणी जायला मदत करणारी, आपल्या खडय़ा आवाजाने आणि सफाईदार हातवाऱ्यांनी परिस्थितीवर पूर्ण ताबा ठेवणारी दुर्गा मला या बोटीवर भेटली. सहसा वाहतूक आणि गाडय़ा म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. पण हा समज मोडीत काढणाऱ्या या हसतमुख, संयमी दुर्गेने आम्हा सर्वाचंच मन जिंकून घेतलं.
दोन गाडय़ांतलं जेमतेम इंचभर अंतर सफाईने राखत, चालकांशी गोड बोलत सर्वाना शिस्तीत ठेवणारी ही दुर्गा पाहून मला अतिशय आनंद झाला, अभिमान वाटला. तिकीट तपासताना तिचं कौतुक केल्यानंतर ती अगदी खुलून गेली. म्हणाली, ‘मी गेली ११ र्वष हे काम करते आहे. इतकंच काय, वेळ आली तर ही फेरीबोट मी एकटी चालवतसुद्धा नेऊ शकते.’ तिचा स्वत:वरचा विश्वास ओसंडून वाहत होता. त्यामुळे तिच्या सावळ्या कांतीला नवखं तेज आलं होतं. म्हणाली, ‘एकदा तर एक बोटचालक दारू पिऊन कामावर आला होता. मी त्याला बोटीला हातही लावू दिला नाही. स्वत: बोट चालवली, पण प्रवाशांच्या जिवाशी खेळ नाही होऊ  दिला. शेवटी बाई आपली रोजीरोटी इमानेइतबारे केली पाहिजे की नको.’  पुढच्या प्रवाशांची तिकिटं काढत दुर्गा पुढे गेली. पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. सतत गजबजलेल्या त्या बोटीवर तऱ्हेतऱ्हेच्या माणसांशी रोजचा संबंध, कामाचा ताण, हे सगळं ती कसं बरं पेलत असेल? कधी विश्रांती घ्यावीशी वाटली तर सुट्टी मिळत असेल का तिला? पण असल्या प्रश्नांमध्ये न अडकता हातात घेतलेलं काम इतक्या प्रामाणिकपणे, जिद्दीने करणारी ही दुर्गा पाहून मला खरोखरच स्त्री असल्याचा अभिमान वाटला.
दुसरा किस्सा आहे चिपळूण-कराडदरम्यानच्या पाटण बस स्थानकावरचा. सार्वजनिक स्वच्छतागृहात जाण्याची वेळ न येवो अशी मनोमन प्रार्थना करीतच आपल्याला प्रवास करावा लागतो हे आपलं दुर्दैव. त्यातही महिलांसाठी हे कोण संकटच! पण शेवटी तो निसर्गधर्म आहे, काय करणार? अशीच सगळी काळजी घेऊनही पाटणच्या बस स्थानकावरील स्वच्छतागृहात जाण्याची माझ्यावर एकदा वेळ आलीच. बाहेर बसलेल्या मावशींनी दोन रुपये मागताच मी त्यांना शांतपणे सांगितलं की प्रवाशांना ही सुविधा मोफत उपलब्ध असते. सगळीकडच्या स्वच्छतागृहांचा अनुभव गाठीशी असल्याने मी जातानाच त्यांना सुनावून मोकळी झाले. पण तितक्याच शांतपणे त्या बाई मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही आधी आत जाऊन या आणि मग मला सांगा.’’ त्यांचं म्हणणं ऐकून न ऐकल्यासारखं करीतच मी आत गेले आणि मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कमालीची स्वच्छता, फिनेलचा मंद सुवास, भरपूर पाणी येणारे आणि बंद होणारे नळ, कडय़ा लागणारे दरवाजे! मनातल्या मनात खजील होत मी बाहेर आले आणि मावशींना सांगितलं की अशा ठिकाणी दोनच काय, मी राजीखुशीने दहा रुपयेसुद्धा देईन. त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘ताई, मी दर अध्र्या तासाने ही स्वच्छता करते, येणाऱ्या बायकांना आवर्जून सांगते की पाणी पुरेसं ओता, कचरापेटीचा वापर करा. आता मला सांगा, हे सगळं मी फुकट का म्हणून करायचं? भाडय़ापोटी आम्हाला काही रक्कम मिळते. पण त्यात भागत नाही हो. पण मला सांगा, प्रत्येकानं स्वच्छता ठेवली तर घाण निर्माणच होणार नाही ना?’ मावशींचे शब्द माझ्या मनात अक्षरश: घुसले. सार्वजनिक स्वच्छतागृहं स्वच्छ ठेवणं ही काय तिची एकटीची जबाबदारी आहे? वाट्टेल त्या किमतीला हवी ती वस्तू खरेदी करताना का नाही आपला हात अडखळत? मग इथले दोन आणि पाच रुपये देताना का आपण विचार करतो इतका? मुख्य म्हणजे आपले घर स्वच्छ ठेवतो तसे आपला परिसर, बस स्थानक, रेल्वे गाडय़ा स्वच्छ ठेवण्याचा सोयिस्कर विसर का पडतो आपल्याला.. माझी मलाच लाज वाटली आणि मी ठरवलं, स्वच्छतेचा वसा घेतलेल्या अशा सर्व आशांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला द्यायचा. मी आशाबाईंच्या हातावर खुशीने दहाची नोट टेकवली.
काम, मग ते कोणत्याही प्रकारचं असलं तरी आपल्या कामावर अढळ श्रद्धा बाळगून, कोणतीही कसूर न करता ते नेटाने, प्रामाणिकपणे करणाऱ्या दुर्गा आणि आशा मला वेगळ्याच अर्थाने ग्रेट वाटल्या. टागोरांनी म्हटलं आहे, ‘इट इज वेरी सिंपल टू बी हॅपी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिंपल.’ आणि हेच साधं वागणं, या दोघींना सहज जमलं होतं..