News Flash

वसुंधरेच्या लेकी : चळवळीतले कार्यकर्ते घडवताना..

या चळवळीची प्रेरणा झियाला तिच्या ओतोमी आदिवासी जमातीकडूनच मिळाली.

सिद्धी महाजन snmhjn33@gmail.com

‘निसर्गापासून दूर जाऊन मानवाचा विकास शक्य नाही..’ निसर्गाशी नाळ जुळलेल्या एका मेक्सिकन जमातीच्या पूर्वजांचे हे शब्द परंपरेनंच त्यांच्यातल्या या लहान मुलीपर्यंत, झियापर्यंत आले आणि तिनं त्याला आपल्या चळवळीचं ध्येयवाक्य बनवलं, मात्र तिचं वेगळेपण हे होतं, की तिनं पर्यावरण चळवळीचा मुख्य चेहरा असलेल्या बहुसंख्य गोऱ्या लोकांच्या समाजाला आणि हजारो वर्षांपासून पर्यावरणाला आपल्या संस्कृतीत भिनवलेल्या आदिवासी समाजाला एकत्र आणायचं ठरवलं आहे. त्यासाठी ती शालेय मुलांना एकत्र आणून या चळवळीसाठीचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक तयार करते आहे. ती वसुंधरेची लेक झिया बस्तिदा.. हिच्याविषयी.

मेक्सिको सिटीजवळ वसलेलं सान पेद्रो तुल्टपेक हे एक छोटंसं गाव. मेक्सिकन वंशाच्या ओतोमी तोल्टेक जमातीची वस्ती असलेलं. आदिवासी समाजाच्या हजारो वर्ष जतन केलेल्या परंपरांच्या माध्यमातून निसर्गाशी नातं सांगणारं. या समाजाची ओळख घेऊन एक मुलगी इथे जन्माला आली, मोठी होऊ लागली..

२०१५ मध्ये सान पेद्रो गावात कोरडा दुष्काळ पडला. अवर्षणामुळे पिकांचं अपरिमित नुकसान झालं. लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी मात्र पाऊस धो-धो कोसळला.  गावकरी सुटकेचा श्वास सोडत आहेत तोच नदीला पूर आला अन् नदीच्या पात्रात सतत सोडल्या गेलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे ते पाणी कमालीचं प्रदूषित झालं. गावकऱ्यांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या अनेक घातक परिणामांना सामोरं जावं लागलं. पूर, अवर्षण, जलप्रदूषण या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या, पण आतून एका समान धाग्यानं बांधल्या गेलेल्या समस्या. त्यांच्यामधील विरोधाभासाचा सामना या छोटय़ाशा गावाला करावा लागला. हे सारं या लहान मुलीच्या डोळ्यांसमोर घडत होतं. लहानपणापासूनच मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींशी तोंडओळख झाल्यानं तिच्या मनात आता कुतूहल जागृत झालं होतं. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित समस्या आणि त्यामागची कारणं याबद्दल सारी माहिती या मुलीनं जमवली. त्या कारणांचा तिनं अनुभवातून शोध घेतला. सरपण जमलं होतं, मात्र वन्ही चेतवण्यासाठी एक ठिणगी पडणं बाकी होतं!

ती ठिणगी पडली ‘हरीकेन सँडी’च्या रूपानं. हरीकेन सँडी म्हणजे २०१२ मध्ये तब्बल सात दिवस कॅरिबियन समुद्रपट्टय़ापासून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंतच्या भूभागावर हाहाकार माजवणारं तुफान. हे तुफान म्हणजे अनेक वादळांची जणू मालिकाच होती. ही नैसर्गिक आपत्ती जवळजवळ सत्तर अब्ज डॉलर्सचं नुकसान करून गेली आणि अमेरिकेतील मोठय़ा भूभागावर, तिथल्या जनतेच्या मनावर कायमचा ओरखडा उमटवून गेली.  ती मुलगी आणि तिचं कुटुंब जेव्हा न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झालं, तेव्हा तिच्या कानावर या महातुफानानं माजवलेल्या उत्पाताची बातमी आली. हे भयानक वादळ अनेक जीवांचा घास घेऊन गेलं होतं. कित्येक माणसं बेघर झाली होती. मुख्य म्हणजे जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलामुळे उद्भवणाऱ्या परिणामांच्या धोक्याची घणाघण घंटा जगाच्या कानापाशी ते वाजवून गेलं होतं. हीच ती वेळ, जेव्हा तिला हवामानबदलाच्या गंभीर स्वरूपाची जाणीव झाली. त्यावर काही तरी उपाय केले पाहिजेत हे खूप आतून, खूप प्रकर्षांनं जाणवलं.

तिला आपल्या ओतोमी जमातीतील जाणत्या लोकांचे शब्द आठवले. ‘निसर्गापासून दूर जाऊन मानवाचा विकास शक्य नाही.’  मानवाचं जगणं आणि निसर्गातील बदल हे परस्परांवर अवलंबून आहेत. या बदलांचं तिनं निरीक्षण केलं, त्यांचा अभ्यास केला. हवामानबदलाच्या विध्वंसक परिणामांपासून दूर पळणं शक्य नाही, हे तिला कळून चुकलं. झालेली पडझड दुरुस्त करणंच फक्त आपल्या हातात आहे, हे समजलं. तिचे हात दुखावलेल्या पृथ्वीच्या जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी सरसावले. पर्यावरण संवर्धनासाठी झोकून देण्यासाठी तिनं आपलं आयुष्य पणाला लावलं.

झिया बस्तिदाची (Xiye Bastida) कहाणी इथून सुरू  होते..

या चळवळीची प्रेरणा झियाला तिच्या ओतोमी आदिवासी जमातीकडूनच मिळाली. या प्रेरणेमागे खूप मोठा इतिहास आहे. जगाला अज्ञात असा खूप जुना इतिहास आहे. आपल्या भारतातही हजारो वर्षांपासून आदिवासींनी जपून ठेवलेल्या देवराया, निसर्गाची गुपितं, त्याच्या संवर्धनासाठी निर्माण केलेल्या कथा-कहाण्या, यांच्यात तो इतिहास दडला आहे, तसंच अ‍ॅमेझॉन, आफ्रिका, मेक्सिकोमधल्या जंगलात निवास करणाऱ्या आदिवासींमध्येही तो रुजला आहे. हा पर्यावरण संवर्धन चळवळीचा इतिहास किती वर्ष मागे जातो? काही लोक तो केवळ पन्नास-साठ वर्ष जुना आहे असं मानतात. पण जगभरातील आदिवासी समाज हजारो वर्षांपासून निसर्गाची काळजी घेत आलेला आहे. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं जतन करणं त्यांच्या रक्तात वाहात आलेल्या संस्कृतीचा एक भाग आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहात त्याचं संवर्धन करणारी मूल्यं आणि संस्कार त्यांनी त्यांच्या जगण्यात भिनवून घेतले आहेत. म्हणूनच झिया या समूहाला आवाज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. आदिवासी समाजाला या चळवळीत महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न

करते. ‘हरिकेन मारिया’ या तुफानानं घरदार गमावलेल्या १३ वर्षांच्या पोएर्तो रिकोच्या एका मुलीला प्रचंड मोठय़ा संख्येनं जमलेल्या समुदायासमोर प्रत्यक्ष अनुभवातून घडलेलं आपलं मत मांडण्यासाठी प्रवृत्त करते. तिच्यासाठी ही चळवळ त्यांची नाही, ज्यांनी केवळ प्रदर्शनापुरतं आणि भाषणं देण्यापुरतं निसर्गाशी संधान बांधलं आहे. तिच्यासाठी ही चळवळ त्यांची आहे, ज्यांनी पर्यावरण संवर्धनाला आपल्या जगण्याचा एक भाग बनवण्यासाठी हजारो वर्षांपासून प्रयत्न केले आहेत. म्हणून या व्यासपीठावर त्यांना प्रतिनिधित्व मिळणं तिच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे.

झिया प्रामाणिक अनुभव मांडण्यावर भर देते. लोकांना भारंभार माहिती, आकडेवारी पुरवताना एक वेळ अशी येऊ शकते, की त्या आकडेवारीप्रति ते असंवेदनशील होऊ शकतात. सतत कोरडी आकडेवारी कानावर पडत असल्यामुळे त्याचं महत्त्व त्यांना एका मर्यादेच्या पलीकडे जाणवायचं बंद होतं. इथे गरज भासते ती वैयक्तिक अनुभव मांडण्याची. या अनुभवातून हाती आलेला निष्कर्ष स्वत:च्या शब्दांत जगासमोर ठेवण्याची. तिच्या म्हणण्याप्रमाणे तुमचा अनुभव एकच एक नसला तरी त्यातून त्या समस्येला आणि प्रश्नाला भिडण्यासाठी कारण मिळतं. ते मांडण्यातला प्रामाणिकपणा जनतेच्या हृदयात नोंदला जातो आणि एका मोठय़ा समूहाची त्या प्रश्नाकडे पाहाण्याची दृष्टी बदलते. याला सामाजिक कंगोरेही आहेत, जे प्रचलित इतिहासाच्या नजरेतून थोडेफार सुटलेले दिसतात.

वर्षांनुवर्ष चालत आलेली, कमकुवत समाजावर अत्याचार करणारी व्यवस्था पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यासाठी तेवढीच जबाबदार आहे. या अल्पसंख्य समाजाचा दबला गेलेला आवाज आणि सामाजिक प्रश्नांचं वर्षांनुवर्ष झालेलं बाजारीकरण निसर्गाचा समतोल बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरलं. पृथ्वीच्या पोटात आढळणारं खनिजतेल आणि कोळसा यांच्या जोरावर मोठा काळ एका समाजानं दुसऱ्या समाजावर वर्चस्व गाजवलं. त्यांच्या संस्कृतीवर, त्यांच्या मूल्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारचा पर्यावरणीय वर्चस्ववाद जन्माला घातला. याची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत. समाजाच्या मानसिकतेत ती दिसून येतात. ती बहुसंख्य समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आश्वासनांतून प्रतिबिंबित होतात.

झिया म्हणते, ‘हवामानबदल आणि पर्यावरणाचं वाढतं असंतुलन या सर्व मनमानीचं फळ आहे. ते आर्थिक आणि सामाजिक दृष्टीनं असुरक्षित असलेल्या समाजावर दुष्परिणाम घडवून आणत आहे, त्यांचं जगणं दुष्कर करतं आहे. आर्थिकदृष्टय़ा असुरक्षित असलेला समाज नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीचं चुटकीसरशी लक्ष्य होतो, याकडे दुर्लक्ष करून मी पर्यावरणाचं संवर्धन करू शकत नाही. अन्न उत्पादन आणि शेतीकडे दुर्लक्ष करून, पाण्याचं दुर्भिक्ष, प्लास्टिकचा उग्र होऊ पाहाणारा भस्मासूर आणि वस्त्रोद्योग या सर्व मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करून मी माझं पर्यावरण बचावाचं धोरण राबवू शकत नाही. या सर्व गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत, तसंच त्या निसर्गाशी आणि समाजाच्या हिताशीही जोडलेल्या आहेत.’

झिया आपल्या जगण्यातून मुख्य धारेतील पर्यावरण चळवळीला नवं वळण देते आहे. पर्यावरण चळवळीचा मुख्य चेहरा असलेल्या बहुसंख्य गोऱ्या समाजाला आणि हजारो वर्षांपासून पर्यावरणाला आपल्या रक्तात आणि संस्कृतीत भिनवून घेतलेल्या, जंगल, कडेकपारींतून राहाणाऱ्या आदिवासी समाजाला एकत्र आणून त्यांचा एक संमिश्र आवाज तयार करायचा आहे. शालेय अभ्यासक्रमातून आणि विद्यार्थी सहभागातून हे साध्य करण्यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना तिला यात मदत करत आहेत. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एका न्यूयॉर्क शहरात १०० शालेय विद्यार्थी प्रतिनिधी त्यांनी तयार केले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक अभ्यासक्रम तयार केला आहे, ज्यात मुलांना शालेय स्तरावर ही मानसिकता कशी घडवावी याचं ज्ञान करून दिलं आहे. चळवळीचा कार्यकर्ता होण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सहभागाची व माहितीची पूर्वपीठिका यात तयार करून दिली जाते. हा वाढता सहभाग राजकीय इच्छाशक्ती तयार करण्यासाठी मदत करेल असं तिला वाटतं.

वयाच्या पंधराव्या वर्षी मलेशियामध्ये युनायटेड नेशन्सच्या जागतिक परिषदेच्या व्यासपीठावर झिया व्यक्त झाली. त्यात तिनं आपलं म्हणणं मांडलं आणि पिढय़ान्पिढय़ा आदिवासी समाजाला देण्यात आलेल्या वागणुकीवर स्पष्ट शब्दांत कोरडे ओढले. तेव्हा तिला समजून चुकलं की पूर्वीच्या लोकांकडून होत असलेल्या चुका स्पष्टपणे मांडण्यात, त्यातून पुढील पिढीवर होत असणारा अन्याय पुढे आणण्यात तिच्या पिढीची ताकद वसली आहे. चर्चा आयोजित करणं, समाजमाध्यमांवर वेळोवेळी व्यक्त होणं, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तरुण पिढीचा आणि जुन्या स्थानिक  जमातींचा आवाज मांडणं, यांत तिनं स्वत:ला गुंतवून घेतलं आहे. हवामानबदलाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वानी आपल्या जगण्याची रीत बदलण्याची गरज नाही, प्रत्येकाने आपला छंद शोधावा अन् त्याला हवामानबदलाच्या चष्म्यातून कसं पाहाता येईल हे शोधावं, असं ती म्हणते. ती फोटोग्राफी असू शकेल, लेखन, नृत्य, संगीत यांपैकी काही असू शकेल. आपल्या आवडीचं काम करत पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस या कार्यात आपलं योगदान देऊ शकतो, उपायांचा एक भाग बनू शकतो. एकाच वेळी आनंद आणि समाधान मिळवू शकतो. फक्त इथे गरज आहे ती इच्छाशक्तीची. पोटतिडकीनं काम करण्याची. आपल्या हृदयाची हाक ऐकून त्यानुसार काम करण्याची.

१९ वर्षांची झिया बस्तिदा तिच्या आंतरिक जाणिवेला मूर्तरूप देते आहे. अमेरिकेतील हवामानबदलाच्या चळवळीचा ताजा आवाज बनू पाहाते आहे. तिच्या अथक प्रयत्नांतून जगभरातील तरुणाईच्या मनात पर्यावरण संवर्धनाची इच्छा जागृत होते आहे. झियाची कहाणी २०१२ मध्ये सुरू झाली. आपल्या सर्वाच्या सहभागाची कहाणी मात्र इथून पुढे खऱ्या अर्थाने सुरू होते.. व्हायला हवी..

अकरावीच्या प्रवेशाचे काय?

दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने मुलांच्या अभ्यासाचे मूल्यमापन कसे केले जाणार आणि त्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचे काय, हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्या विषयावर वेगवेगळे पर्याय सुचवले जात असले तरी ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तुम्हाला काही पर्याय सुचत असतील तर आम्हाला जरूर कळवा. १०० शब्दांत, मुद्दय़ांच्या  स्वरुपात.  पाठवा chaturang@expressindia.com,

किंवा chaturangnew@gmail.com इ-मेल वर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 1:02 am

Web Title: article about environmental activist xiye bastida zws 70
Next Stories
1 गद्धेपंचविशी : चित्तचक्षुचमत्कारिक काळ
2 व्यर्थ चिंता नको रे : महासाथीला पुरून उरताना..
3 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आव्हान की संधी?
Just Now!
X