13 July 2020

News Flash

व्यक्तिगत परिवर्तन शक्य

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये भांडवली अथवा साम्यवादी अशा ठळक विचारसरणीमध्ये सामाजिक-राजकीय-आर्थिक चर्चा होताना दिसतात.

(संग्रहित छायाचित्र)

आनंद पवार

सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न सुरू असतानाच व्यक्तींच्या आयुष्यातदेखील सकारात्मक परिवर्तन व्हावे या बाबत ‘सम्यक’ आग्रही आहे. केवळ संस्थेचा विकास झाला, मात्र व्यक्तीचा विकास झाला नाही तर त्याचा अर्थ आहे कदाचित संस्थेने त्या व्यक्तीचे शोषण केले आहे. जर केवळ व्यक्तीचा विकास झाला, मात्र संस्थेचे काम वाढलेच नाही तर व्यक्तीने संस्थेचा फायदा घेतला असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून ‘सम्यक’ सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्यक्तिगत विकासाच्या संधी निर्माण करणे आम्हाला महत्त्वाचे वाटते.

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये भांडवली अथवा साम्यवादी अशा ठळक विचारसरणीमध्ये सामाजिक-राजकीय-आर्थिक चर्चा होताना दिसतात. मात्र जगाच्या दक्षिण गोलार्धातील परिस्थिती ही जास्त व्यामिश्र आहे. दक्षिण आशिया, मध्य आशिया, आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया या भागांमध्ये अनेक वांशिक, धार्मिक, जातीय, सामाजिक आणि सांस्कृतिक समुदाय वास्तव्य करतात. येथील इतिहाससुद्धा असाच व्यामिश्र आहे आणि या भागांमधील पितृसत्ता व लिंगभाव व्यवस्थांवर त्याचा सरळ परिणाम दिसून येतो. शिवाय नव्वदच्या दशकांमध्ये सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाचे परिणामही जगाच्या या भागांमध्ये कमी जास्त फरकाने एकसारखेच होताना दिसत आहेत. सामुदायिकतेची विचारसरणी असलेला समाज काही अंशी व्यक्तिकेंद्रित होत गेला आहे हादेखील एक महत्त्वाचा परिणाम आपल्या समाजावर झालेला दिसतो. या प्रक्रियांचे बरे-वाईट परिणाम आपण सर्वानीच कदाचित अनुभवले असतील. सामुदायिक भल्याचा विचार मागे पडून समाज व्यक्तिकेंद्री बनत चालला आहे असा यामधील महत्त्वाचा आक्षेप मांडला जातो. मात्र दुसऱ्या बाजूला व्यक्तिकेंद्रित विकास अथवा सबलीकरणाच्या कल्पनांमुळे अनेक समाजातील वंचित राहिलेल्या घटकांच्या किंवा व्यक्तींच्या विकासाच्या संधीदेखील उपलब्ध झाल्या आहेत. आजच्या आपल्या लेखात ‘सम्यक’ने केलेल्या कामामुळे आयुष्यामध्ये कायापालट झालेल्या तीन मुलींची कहाणी आपण वाचणार आहोत.

सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न सुरू असतानाच व्यक्तींच्या आयुष्यात देखील सकारात्मक परिवर्तन व्हावे याबाबत ‘सम्यक’ आग्रही आहे. केवळ संस्थेचा विकास झाला, मात्र व्यक्तीचा विकास झाला नाही तर त्याचा अर्थ आहे कदाचित संस्थेने त्या व्यक्तीचे शोषण केले आहे. जर केवळ व्यक्तीचा विकास झाला, मात्र संस्थेचे काम वाढलेच नाही तर व्यक्तीने संस्थेचा फायदा घेतला असा त्याचा अर्थ होतो. परंतु, एखादी संस्था व संस्थेसोबत व्यक्तीच्या क्षमताही वाढल्या तर ही एक परस्परपूरक विकासाची आरोग्यदायी व न्याय्य प्रक्रिया आहे यावर ‘सम्यक’चा विश्वास आहे. आणि म्हणून ‘सम्यक’सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्यक्तिगत विकासाच्या संधी निर्माण करणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. या प्रयत्नांमुळे आमूलाग्र परिवर्तन करू शकलेल्या तिघींची गोष्ट आपण या लेखात वाचणार आहोत. स्त्रियांच्या गटांसोबत, चळवळीसोबत केलेल्या कामाबद्दल व त्याच्या परिणामांबद्दल आपण पुढील लेखांमध्ये वाचणारच आहोत.

प्रीती डोईफोडे, एक अतिशय चुणचुणीत आणि हुशार मुलगी आम्हाला पुण्यातील गुलटेकडी भागातील एका वस्तीमध्ये (झोपडपट्टीमध्ये) लहान मुलांचे अभ्यासवर्ग घेणाऱ्या गटामध्ये भेटली. वस्तीमधील घरांमध्ये मुला-मुलींना अभ्यासासाठी जागा मिळत नाही म्हणून महानगरपालिकेच्या शाळेतील एका वर्गामध्ये ती या गटासोबत लहानग्यांचे अभ्यासवर्ग चालवायची. स्वत: वाणिज्य विभागामध्ये इयत्ता बारावीचा अभ्यास करत करत ती हे सर्व करत होती. लिंगभाव समानता, पितृसत्ता, स्त्रिया व मुलींची होणारी छेडछाड याविषयी प्रशिक्षणानंतर प्रीतीने ‘सम्यक’सोबत स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मुद्दा असा होता की, या सगळ्या स्वयंसेवी कामामधून प्रीतीला स्वत:ला काय मिळेल? तिचे वाणिज्य शाखेचे ज्ञान वाढावे म्हणून संस्थेच्या आर्थिक नोंदीची काळजी तिने घ्यावी असे ठरले. प्रीती मुळातच कष्टाळू आणि अभ्यासू असल्याने तिने ‘सम्यक’च्या आर्थिक व्यवहारांमधे वेगाने गती मिळवली. तिने त्यापुढेही जाऊन सामाजिक विषयांमधे सहभागी होण्याची तयारी केली. तिला काय आवडेल याबाबत अनेकदा चर्चा झाल्या. मुलींची होणारी छेडछाड, जी प्रीतीने स्वत: अनुभवली होती त्याविषयी काम करावे असे तिला वाटले. आम्ही मिळून मग तिच्याच वस्तीमधे एक ‘छेडछाड विरोधी समिती’ स्थापन करण्याचे ठरवले. शिवाय वस्तीतील मुलींना कुठल्या जागा असुरक्षित वाटतात, कुठल्या जागा सुरक्षित वाटतात याबाबत एक अभ्यास पण केला. ज्या जागा असुरक्षित आहेत त्या सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र वीज मंडळाने तिथली वीज कायम ठेवली, पोलिसांनी गस्त वाढवावी, लोकांनी सावध व्हावे असे प्रयत्न तिने केले. शिवाय शाळा भरताना आणि सुटताना मुलींची छेडछाड होत होती तिथे जनजागरण केले. पत्रकं वाटली व वस्तीमध्ये तक्रारपेटय़ा ठेवल्या. कायदेशीर कारवाईपेक्षा युवकांचे प्रबोधन करण्यावर भर दिला गेला. पुढे मग प्रीतीने ‘युथ फॉर इक्वल सोसायटी’ (यस) या महाविद्यालयीन युवक-युवतींचा गट सुरू केला. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुली व स्त्रियांसाठी सुरक्षित कशी होईल यावर छायाचित्रांचे प्रदर्शन तयार केले आणि शहरात अनेक ठिकाणी ते प्रदर्शित केले. या सगळ्या प्रवासात तिने तिच्या घरकाम करणाऱ्या आईच्या जाणिवा वाढवल्या आणि हिंसा करणाऱ्या आपल्याच वडिलांना वठणीवर आणण्याचे कामही केले. बहिणीच्या आंतरजातीय लग्नाला मदत केली. भावाला वठणीवर आणले. प्रीतीने पुण्यातील ‘स्त्री-मुक्ती आंदोलन संपर्क समिती’ या मागील २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या समितीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. या समितीमध्ये ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्यां कार्यरत आहेत. त्या सगळ्यांचे प्रीतीवर खूप प्रेम होते आणि आहे.

हा सगळा व्यक्तिगत प्रवास पुढे कुठे जाणार याबाबत प्रीतीने स्वप्न पाहिले. म्हणाली, ‘‘मला ‘टाटा समाज विज्ञान संस्थे’मध्ये पुढचं शिक्षण घ्यायचं आहे.’’ टाटा इन्स्टिटय़ूट ही जगातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे. त्यासाठी विचारांची स्पष्टता, पैसे, तयारी असे अनेक प्रयत्न करावे लागणार होते. आम्ही दोन र्वष सगळ्या मुद्दय़ावर काम केले. प्रितीने प्रवेश परीक्षा दिली आणि त्यामध्ये ती यशस्वीपण झाली. फी भरण्याची जबाबदारी ‘संपर्क समिती’च्या किरण मोघे, नागमणी राव, साधना दधीच आणि इतरांनी घेतली. शेवटी प्रीतीने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून स्त्री अभ्यास केंद्रातून तिचा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रीती आता स्वंतत्रपणे एक अभ्यासक म्हणून काम करते. झोपडपट्टीतील दहा बाय दहाच्या घरातून सुरू झालेला प्रवास जगप्रसिद्ध शिक्षण संस्थेमार्फत स्वतंत्र अभ्यासक म्हणून पोहोचला. आणखी काय हवे?

प्रीतम पोतदार, पुढे हिने कायदेशीर पद्धतीने स्वत:चे नाव प्रीत मंजुषा असे करून घेतले. मंजुषा तिच्या आईचे नाव. तिने आडनाव आणि जातीची ओळख सोडली. ‘सम्यक’च्या उभारणीमध्ये हिचे योगदान खूपच मोठे राहिले आहे. सासवडसारख्या छोटय़ा शहरातून आलेली, मानसशास्त्राची ही विद्यार्थिनी. सात-आठ वर्षे राष्ट्र सेवा दलाचे काम केलेली कार्यकर्ती. पूर्वी ती एका पुरोगामी पुरुषासोबत काम करायची. हा पुरुष तिला प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये फक्त गाणी म्हणायला आणि नाच करायला संधी द्यायचा. सैद्धांतिक मांडणी मात्र करू देत नव्हता. वैतागलेल्या प्रीतने ‘सम्यक’सोबत स्वयंसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. मग स्व-प्रयत्नाने ‘कर्वे समाज सेवा संस्थे’मधून समाजकार्याची पदवी घेतली. प्रीतने स्वत:च्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी स्थानिक कापडाच्या दुकानात सेल्सगर्लची नोकरी केली. अतिशय सामान्य आर्थिक कुटुंबातून येऊन तिने स्वत:च्या बळावर स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. तिचे वजन ४७ किलो! पण काम मात्र प्रचंड केले.

प्रीतने पुढे अभ्यास वाढवला. खूप कष्ट घेतले. स्त्रियांच्या प्रजनन हक्काबद्दल अति भटक्या-विमुक्त समाजातील स्त्रियांच्या आरोग्यावर काम करण्याची तिची इच्छा होती. इंग्रजी लिखाण-बोलणे यावर तिने खूप कष्ट घेतले. ‘स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती’ आणि ‘महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद’ यामध्ये तिने स्वत:ची जागा निर्माण केली. ‘महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क’ या परिषदेमध्ये तिने गर्भपाताच्या अधिकाराविषयी प्रभावी ‘वकिली’ केली. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्य़ांमध्ये जवळजवळ १५० संस्था, १०० पेक्षा जास्त पत्रकार व ५०० स्त्री-रोगतज्ज्ञांपर्यंत ती पोहोचली. प्रशिक्षण कार्यक्रम घेतले, ‘मर्जी’ नावाच्या हेल्पलाईनवरून हजारो स्त्रियांना गर्भपात व गर्भनिरोधके याविषयी मार्गदर्शन केले. कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्दय़ावर स्त्रियांना मदत करताना पोलीस यंत्रणेशी भिडली. प्रीतने ‘सम्यक’चे काम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रीत आता ‘सम्यक’सोबत काम करत नाही. ती बहुधा आसाम या राज्यात जाऊन तिथे हे काम पुढे नेईल. तिला खूप शुभेच्छा!

दीपाली क्षीरसागर ‘सम्यक’मध्ये आली. आपोआप नाही, डॉ. साधना नातू या मानसिक आरोग्यावर काम करतात त्यांनी दीपालीला ‘सम्यक’मध्ये पाठवले. घरची गरिबी. डॉ. नातू म्हणाल्या, ‘‘तिला थोडी आर्थिक मदत मिळाली तर ती पुढे शिकू शकेल. आम्ही दीपालीला एक छोटी नोकरी दिली. ‘वन बिलिअन रायजिंग’ (डइफ) या जागतिक अभियानाबाबत पुण्यातील युवक-युवतींना एकत्र करून प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये आणणे. दीपालीने हे काम व्यवस्थित केले. पुढे तिने पुण्यातील झोपडपट्टय़ांमधील स्त्रियांची माहिती संगणकामध्ये नीट भरली. तिला दोन पर्याय होते- घरामध्ये पैसे दे, नाहीतर लग्न करून घरातून बाहेर जा. डॉ. साधना नातूंनी तिला पुणे विद्यापीठाच्या ‘स्त्री अभ्यास केंद्रात’ जायला सांगितले. ती गेली, खूप शिकली. आज स्त्रीवाद, सामाजिक न्याय यांचा जातिव्यवस्थेशी, भांडवलशाहीशी, वर्ग व्यवस्थेशी असलेला संबंध असे ‘आंतरछेदिता’ नावाच्या भयंकर मुद्दय़ाबाबत बोलत आहे. पुण्यातील ‘बापू ट्रस्ट’ नावाच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेमध्ये काम करत आहे.

कार्यकर्त्यांचे पोट भरले पाहिजे, पण पोट भरताना वैचारिक दिवाळखोरी होऊ नये हे पण अपेक्षित आहे. आपल्याला कसं जग पाहिजे? केवळ भाषा शिकलेलं की खरंखुरं स्वातंत्र्य, समता या शब्दांशी जगणारं? या तीन जणींच्या गोष्टी आज लिहिल्या पुढच्या भागात आपण स्त्रियांच्या संयुक्त लढय़ाबद्दल जाणून घेऊ यात!

n  anandpawar@gmail.com

n  chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2018 12:39 am

Web Title: article about from the eyes of the party workers
Next Stories
1 माझी जडणघडण
2 सूरत बदलनी चाहिए..
3 ‘नया जमाना आएगा’
Just Now!
X