राजेश देशपांडे

‘कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक’ या दूरचित्रवाणी मालिकेचा इतका परिणाम घडला की त्याचं नाटक करायचा मोह आवरला नाही आणि नंतर चित्रपटही. नाटकाचे तब्बल ६०० प्रयोग झाले. जिथे नाटकातला ‘न’ पण माहीत नाही अशा खेडय़ापाडय़ांत निर्माते दिलीप जाधव नाटक घेऊन गेले. माझ्या गावच्या शेजारच्या पाचल गावात ‘गंगूबाई मॅट्रिक’ नाटकाच्या प्रयोग लावला गेला. मी नेमका गावी असल्याने प्रयोगाला निघालो. ज्या रस्त्यावरून मी बैलगाडीतून इतरांची नाटकं बघायला जात असे तो रस्ता माझं नाटक बघायला जाणाऱ्या लोकांनी जाम झाला होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. अजून काय हवं एका कलावंताला? ही एका ‘बाई’ची जादू होती..

If you can tell stories, create characters, devise incidents, and have sincerity and passion, it doesn’t matter a damn how you write.

– Somerset Maugham

‘ती’ माझ्यासाठी खूप लकी ठरत आलेय आजवर.. म्हणजे मला सुचलेल्या स्त्री व्यक्तिरेखा. तसं अधिकारवाणीने काही लिहावं बोलावं असं अजून मी काही केलेलं नाहीये.. खरं तर डोक्यात असलेल्या बऱ्याच ‘स्त्रिया’ अजून कागदावर उतरायच्या आहेत. त्या प्रेक्षकांसमोर येईपर्यंत अजून नव्या डोकं खायला लागतील. काही स्त्रिया आधी ‘डोक्यात’ जातात आणि मग मनात घर करून बसतात तर काही मनातून डोक्यात जातात, पण त्या कागदावर उतरताना मात्र दोन्ही शाबूत ठेवावं लागतं. अनेकदा ‘लिहविता धनी वेगळाची’ अशी अवस्था असते. येतं कुठून तरी.. सुचतं आणि पांढऱ्यावर काळं केलं जातं. कधी कधी कितीही काळ गेला तरी कागद काळ्या ढगांची वाट बघत पडलेल्या ओसाड जमिनीसारखा पडून राहतो.

A blank piece of paper is God’s way of telling us how hard it to be God.-

– Sidney Sheldon…

आणि एका प्रसववेळी अक्षरं सांडू लागतात.. टप टप.. उगवतं काही मग.. काही विकण्याजोगं तर काही फक्त शिकण्याजोगं.. स्वान्तसुखाय.

मला सगळ्यात आधी स्त्रिया भेटल्या त्या वस्तूंमध्ये. माझ्या ‘वस्तुस्थिती’ या एकांकिकेत. एका कलावंत जोडप्याच्या घरातल्या वस्तू. त्यांच्या होणाऱ्या घटस्फोटासाठी आपण वस्तूच कशा जबाबदार आहोत हे स्त्रीलिंगी वस्तू आणि पुल्लिंगी वस्तू एकमेकांवर दोषारोप करत सांगतात. स्त्रीलिंगी वस्तू बायकोची बाजू घेतात तर पुल्लिंगी नवऱ्याची आणि अर्थात स्त्री वस्तू उजव्या ठरतात. या एकांकिकेसाठी मला ‘इप्टा’चा सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार मिळाला होता. ‘आऊट ऑफ बॉक्स’ का काय म्हणतात ते माहीत नसताना माझ्याकडून लिहिलं गेलं होतं.

पण माझ्याकडून जन्मास आलेली हाडामांसाची व्यक्तिरेखा म्हणजे कुमारी गंगूबाई. ही मला कॉलेजमध्ये असतानाच सापडली होती. मी मामाच्या घरी राहात असे. त्यांच्याकडे दिनेशची आई (हिचं खरं नाव आडनाव कधीच कळलं नाही) म्हणून एक बाई घरकामाला येत असत. वेळेच्या आणि कामाच्या बाबतीत त्या अत्यंत काटेकोर होत्या. म्हणजे त्यांना जायला उशीर होत असेल तर अक्षरश: त्या आपल्या समोरचं जेवतं ताट ओढून घेतील की काय अशी भीती वाटायची, पण त्यांच्यात एक स्त्री आणि विशेषत: कामवाली बाई सुलभ एक दुर्गुण होता. तो म्हणजे गॉसिपिंग, म्हणजे एखाद्या दशग्रंथीच्या मुखाने नकळत मंत्र बाहेर पडावेत तशा कॉलनीमधल्या बातम्या त्या सांगून जात. अगदी निर्लेप चेहऱ्याने. जाताना घासलेल्या भांडय़ांसारखंच लखलखीत हसत निघून जाई. ती माझ्या डोक्यात पेरली गेली. रुजत राहिली. इमारतीच्या पाइपवर उगवणाऱ्या एखाद्या वनस्पतीसारखी. मी काही लक्ष देत नव्हतो तिच्याकडे, पण एके दिवशी त्या वनस्पतीला मागणी आली.

विद्याधर पाठारेंना मालिकेसाठी गोष्ट हवी होती. मी सहज या वनस्पतीबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेतून मला कळलं की, आपल्या डोस्क्यात इतकी र्वष वाढत होता तो एक भरभक्कम ‘वट’वृक्ष आहे. वटलेल्या.. रुक्ष आयुष्य जगणाऱ्याच्या आयुष्यात हास्याच्या पारंब्यांनी आधार देणारा. घुसमटलेल्या जीवांना ऑक्सिजन देणारा आणि मग मशागत सुरू झाली या वृक्षाची. घाटी बोलीचा पार बांधला गेला. नऊ वारीचा फेर धरला गेला. मोठं कुंकू आलं आणि सरकारने राखीव झाडांवर नंबर टाकावेत तसा बांधला गेला कंबरेला गंगूबाई असं लिहिलेला पाऊच. हे झालं आहार्य, पण आत्मा? डीएनए? दिनेशच्या आईचं गॉसिपिंग हा एक वरकरणी गमतीचा भाग झाला. त्यावर तिला मी ‘कोटय़ाधीश’ केलं. शाब्दिक! लोक त्याला ‘पी जे-बी जे’ म्हणतात, पण अशा कोटय़ा करणारी माणसं मी गावात खूप जवळून बघितली आहेत. ती सरळ कधीच बोलत नाहीत. सतत त्यांच्या तोंडात एक तिरकसपणा, उपमा, उत्प्रेक्षांचा तोबरा भरलेला असतो. कधी कुठे पिंक टाकतील सांगता यायचं नाही, पण ‘रंग’ भरतात ही माणसं. त्यात चुकीच्या म्हणी आणि सुविचारांच्या कोलाजचं गुलकंद टाकून विडा रंगवला. पण तरीही उरे काही उणे असं वाटत होतं. कारण शरीर मिळालं तरी मन हवं होतं आणि ते मला सापडलं माझ्याच आईमध्ये. सदैव कुणाच्याही मदतीला तत्पर. नाइटेंगलच जणू! पण कुठे काय बोलावं याचं भान नाही. कारण मनात पाप नाही. त्यातून अनेक गोंधळाचे प्रसंग उभे राहत. गंगूला माझ्या आईचं मन दिलं. हळवं.. समाजवादी, पण वेळप्रसंगी वज्राहून कठोर होणारं. मनाने समाजवादी आणि कृतीने राडेबाज आणि डोक्याने समानतावादी. तिचे वडील गिरणीत कामाला होते. ही चौथीत असताना गिरण्यांचा संप झाला. नोकरी गेली. त्या धक्क्याने वडिलांना अर्धागवायूचा झटका आला. आई पण खचली. घराची जबाबदारी लहानग्या गंगूवर पडली आणि शाळा सोडून ती आईसोबत घरकाम करू लागली. गिरण्यांच्या संपानंतर कामगारांच्या कुटुंबांची झालेली वाताहत मी कोकणातला असल्यामुळे जवळून बघितली होती. अनेक घरं त्यातून अजून सावरली नाहीयेत. घरच कशाला? मुंबई कुठे सावरलेय?

गंगू घरकाम करता करता त्या त्या घरातल्या शिकणाऱ्या मुलांचा अभ्यास ऐकू लागली आणि तिच्या चाणाक्ष आयक्यूमुळे परीक्षा न देता स्वत:ला कुमारी गंगूबाई नॉन म्यॅट्रिक म्हणवू लागली. अर्थात हे नॉन म्यॅट्रिक पास ही पदवी मला गावातल्या इरसाल नगांकडूनच ऐकायला मिळालेली. गंगूला सामाजिक, राजकीय भान उत्तम होतं. कारण तिचा चौकस स्वभाव आणि अशा बायकांना ते असतंच. सुशिक्षित पांढरपेशे लोक आपल्या कोशात जगतात. आजूबाजूला बघायला त्यांना वेळ किंवा इच्छा नसते. पण गंगूसारखे लोक जाता येता रस्त्यात थांबून, विनासंकोच प्रश्न विचारून माहिती मिळवतात आणि ती पुढे प्रसारित करतात. थोडक्यात, झाडांचा झाडांशी संवाद करवून देणाऱ्या बुरशीसारखी असतात ही माणसं. त्याच बुरशीची चविष्ट अळंबी होते आणि अळंबीचा आकारसुद्धा वाहिन्यांच्या बातम्या पोहोचवणाऱ्या डिशसारखा नसतो का? गंगूच्या राजकीय कमेंटस् खूप आवडत असत लोकांना. त्या मला माझ्या घरातल्या राजकीय वातावरणामुळे मिळालेलं गाठोडं होतं. नाथ पै, मधु दंडवते ते अगदी शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत घरी राबता होता. प्रमिलाताई दंडवतेंनी मी लहान असताना माझ्या वडिलांना लिहिलेलं एक पत्र वाचून ‘‘खूप छान लिहितोस रे बाळा.. लिहीत राहा’’ असा कौतुकाशीर्वाद दिला होता. तेव्हा नट व्हायचं स्वप्नं असल्यामुळे तो शाप वाटला होता ही गोष्ट वेगळी. पण माझ्या ‘लिखाण कारागीर’ बनण्यामागे पुन्हा एक स्त्रीच आहे. तर अशी गंगू जन्माला आली आणि नंतर तिने निर्मिती सावंत नावाचं अभिनयातलं भक्कम झाड पकडलं ते पकडलच. निर्मितीताई गंगूबाई जगल्या. खरंतर अजूनही त्यांना गंगूबाई म्हणूनच ओळखल्या जातात. आम्ही नुकतीच एक मालिका केली ‘जाडू बाई जोरात’ म्हणून.. त्यात निर्मितीताईंची गंगूबाईच्या अगदी उलट भूमिका होती. पण लोक ‘गंगूबाईची नवीन सीरियल आलेय’ म्हणत.

गंगू नावाच्या महास्त्रीला छू (पंढरीनाथ कांबळे) नावाचं अतरंगी वांग भूत भेटलं आणि दोघांनी मराठी माणसांच्या घरात धुमाकूळ घातला. हसवता हसवता डोळ्यात पाणी आणायचा मंत्र आम्ही आमचं दैवत पु. ल. देशपांडे यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करतोय. त्याचा पहिला वर्ग होता आमची ‘गंगूबाई..’ मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये ‘गंगू-छू’ वावरले.

मालिकेचा इतका परिणाम घडला की त्याचं नाटक करायचा मोह आवरला नाही. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘गंगूबाई म्यॅट्रिक’ नाटकाचे तब्बल ६०० प्रयोग झाले. जिथे नाटकातला ‘न’ पण माहीत नाही अशा खेडय़ापाडय़ात निर्माते दिलीप जाधव नाटक घेऊन गेले. ‘गंगू-छू’च्या एन्ट्रीला लोक अक्षरश: हिस्टेरिक होत हे मी माझ्या गावात डोळ्यांनी बघितलं आहे. माझ्या गावच्या शेजारी पाचल नावाच्या गावात पूर्वी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत. मधल्या काळात ते बंद झाले. पण आमच्या ‘गंगूबाई मॅट्रिक’ नाटकाचा प्रयोग लावला गेला. मी नेमका तेव्हा गावी गेलो होतो. प्रयोगाला निघालो. आणि ज्या रस्त्यावरून मी बैलगाडीतून इतरांची नाटकं बघायला जात असे तो रस्ता माझं नाटक बघायला जाणाऱ्या लोकांनी जाम झाला होता. आमची कारपण बैलगाडीच्या वेगानेच चालत होती..

माझ्या डोळ्यात पाणी आलं. अजून काय हवं एका कलावंताला? ही एका बाईची जादू होती..

आणि अशीच दुसरी बाई माझ्या नशिबात आली ती म्हणजे पु.लं.ची ‘फुलराणी’.. मंजू. आपण जन्माला घातलेली व्यक्तिरेखा करणं खूप सोप्पं असतं. कारण तिचा डीएनए.. आजार.. विकार.. आपल्याला माहीत असतात, पण दुसऱ्याने जन्माला घातलेली व्यक्तिरेखा हाती घेणं म्हणजे दुसऱ्याचं मूल सांभाळायला घेण्यासारखं.. त्यात पुन्हा ते पु.लं.च्या मंजूसारखं असेल तर? अरे बापरे! पण आव्हान स्वीकारलं. माझ्याकडे जमेची बाजू एकच होती ती म्हणजे मी आणि ‘फुलराणी’ साकारणाऱ्या हेमांगी कवीने भक्तीताईंनी केलेलं स्वगत वगळता आधीची कुणाचीच ‘फुलराणी’ बघितलेली नव्हती. त्यामुळे आम्ही फक्त पुलंच्या शब्दांवर श्रद्धा ठेवून ‘फुलराणी’मध्ये घुसत गेलो. हेमांगी हीच मला फुलराणी म्हणून दिसत होती. कारण मंजूला मास्तर (गिरीश ओक) भेटण्याआधीची अस्सल ग्रामीण मंजू खरी वाटायला हवी होती. नंतर तिच्यात होणारा बदल हा तिने लादून घेतलेला आहे आणि त्यातूनच तिची घुसमट होत जाते. आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा..’ बाहेर पडतं. हेमांगीची ओळख आता ‘फुलराणी’ म्हणून झालेय यातच तिने केलेल्या मेहनतीचं फळ आहे. अशा भूमिकेत स्वत:ला झोकून देणाऱ्या अभिनेत्री अभिनेते मिळाले की लेखकांच्या मन:पटलावरच्या व्यक्तिरेखा रसिकांच्या दिलावर राज्य करतात आणि मग अधिकाधीक व्यक्तिरेखांना जन्म द्यायचा उत्साह लेखकांना येतो.

अशा अनेक स्त्रिया अजून मेंदूगर्भात बाहेर येण्यासाठी लाथा मारतायत.. मीपण त्यांच्यासोबत पुन्हा बाईचं आयुष्य जगण्यासाठी आसुसलोय.. हो.. लेखक त्याची प्रत्येक व्यक्तिरेखा जगतो लिहिताना.. म्हणून दुसऱ्या कुणी ती मारली की त्याचा उद्वेग होतो, होतोच..

n rjsh.deshpande@gmail.com

n chaturang@expressindia.com