12 August 2020

News Flash

वनवासी मी या संसारी

स्वतंत्र भारतात आजही असे असंख्य लोक आहेत त्यांचं भागधेय झाले आहे, रस्त्यावर जन्म, रस्त्यावर लग्न आणि रस्त्यावरच मरणं. पारधी, धीमर, केवट आदी अनेक जमाती अद्याप

| January 3, 2015 01:09 am

timuktस्वतंत्र भारतात आजही असे असंख्य लोक आहेत त्यांचं भागधेय झाले आहे, रस्त्यावर जन्म, रस्त्यावर लग्न आणि रस्त्यावरच मरणं. पारधी, धीमर, केवट आदी अनेक जमाती अद्याप स्वातंत्र्याची वाट पाहत आहेत. देवा-धर्माच्या नावाने भिक्षा मागणारे कडकलक्ष्मी, मसनजोगी, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, गोसावी, नाथपंथी गोसावी किंवा  खेळ करणारे  डोंबारी, नट, गोपाळ, खेळकरी, पहिलवान आदी भिक्षा प्रतिबंधक कायद्यामुळे गुन्हेगार ठरले. मदारी, कलंदर, सपेरा, गारुडी, दरवेशी आदी जमातींचा परंपरागत व्यवसाय वन्य जीव संरक्षक कायद्यामुळे संपुष्टात आला आहे. या सगळ्यामध्ये सर्वात जास्त भरडली जाते ती त्या त्या जाती जमातीतली स्त्री. उपजीविकेचं साधन कोणतंही असो, दोन पातळ्यांवर जगताना तिच्या नशिबी येतं ते वंचित आयुष्यच. काय आहे त्या त्या जाती-जमातीतल्या स्त्रीचं जगणं, तिच्या आयुष्याचा हा लेखाजोखा. दर पंधरा दिवसांनी.
दुपारी बाराच्या सुमारास रेल्वेतून पुणे स्टेशनवर उतरले. तोच एक लेकुरवाळी तरुणी हात पसरत पुढे आली. लाचार चेहरा, आर्जवी डोळे, विटक्या रंगाची जुनी साडी, विस्कटलेले केस, जुन्या साडीच्या झोळीत पोटाला बांधलेले मूल. असेल एक-दीड वर्षांचे. कुपोषित वाटत होते. ‘लेकरासाठी, पोटासाठी काही तरी द्या,’ असे हातवारे आणि ओठांची हालचाल. अनेक ठिकाणी भीक मागताना अशा लेकुरवाळ्या बाया पाहिलेल्या. मोठी उत्सुकता होती. माझ्याकडे वेळही होता. मी म्हटलं, ‘चल जेवायला.’ तिला आश्चर्य वाटलं. ‘पैसेच द्या’ असा तिचा आग्रह. जेवल्यानंतर पैसेही देते, असे आश्वासन दिल्यावरच ती तयार झाली.
     स्टेशनसमोरच्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो. मूल पोटाला बांधलेल्या अवस्थेतच ती खुर्चीवर बसली. जेवताना तिच्याकडून तिची शक्य तेवढी माहिती घेण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. ती मूळची माळशिरस तालुक्यातली. मळणी तिचं नाव. तिचा बाप मजुरीने शेतात, धान्याची मळणी करत असताना, रानातच तिचा जन्म झाला म्हणून तिचं नाव ‘मळणी’ ठेवलं. नेमकं वय माहीत नाही, पण असेल पंचविशीच्या आत. नवरा भान्या तिच्यापेक्षा आठ-दहा वर्षांनी मोठा होता. रात्रंदिवस दारू प्यायचा. त्यातच तो खपला.(हे मळणीचेच शब्द). सध्या तिचा मुक्काम-पोस्ट देहू रोड. याआधी मळणी तिच्या नवऱ्याबरोबर मुंबईत धारावीकडे जाणाऱ्या सायन ब्रिजच्या फुटपाथवर राहत होती. तिथेही ती भीकच मागायची. लोकल रेल्वेमधून कृत्रिम दागिने व टिकल्या विक्रीचा व्यवसाय करून बघितला. परवडलं नाही. पुन्हा भीक मागायला सुरुवात केली. सायन ब्रिजच्या फुटपाथवर पारध्यांची बरीच पालं होती. ती हटवल्यावर इकडे-तिकडे जागा शोधत ते देहू रोडला आले. दोन-तीन र्वष झाली देहू रोडला येऊन. पारध्यांची मोठी वस्ती आहे तिथे. मळणी पालात राहते. बापाचं मालकीचं घर किंवा जागा नाही. नवऱ्याच्या मालकीचंही घर, जागा नाही. काम मिळेल तिथे जायचं व तात्पुरतं पालात राहायचं असाच संसार बापजाद्यापासूनचा. रस्त्यावर जन्म, रस्त्यावर लग्न आणि रस्त्यावरच मरणं.
तिचं जेवण संपत आल्यावर तिला मी म्हणाले, ‘‘लेकराला पण खाऊ  घाल की काही तरी.’’ एकदम नकारार्थी मान हलवत ती पटकन म्हणाली, ‘‘नाही, नाही. नाही खात, झोपलंय ते.’’ ‘‘दुपारची वेळ आहे, खाऊ  घाल. नंतर झोपू दे हवं तर,’’ या माझ्या आग्रहानंतर ती म्हणाली, ‘‘आफू पाजलीय त्याला सकाळी घरातून निघतानाच. आता दिवस मावळायला उठल ते नशेतून. मध्येच उठलं तर अजून थोडी पाजायची. मग रात्रीपत्तोर घोर नाही. अवं लई त्रास देत्यात लेकरं, रडत्यात. घिऊन फिरायलाबी लई अवघडतंय. मग धंदा होत नाही. दिवसाचं साठ रुपयं भाडं द्यावं लागतं त्याचं त्याच्या आईला. सांच्याला जागं होइस्तोवर परत करायचं त्येच्या मायीला. पुढचं सारं ती बघते.’’ हे ऐकून डोके सुन्न झालं. ठरल्याप्रमाणे पैसे घेऊन मळणी स्टेशनात परत गेली भीक मागायला!
या प्रसंगानंतर अनेक शहरांतून फिरताना भीक मागणारी लेकुरवाळी बाई दिसली की तिच्या पोटाला किंवा पाठीला बांधलेल्या लेकराला निरखून पाहण्याची मला सवयच लागली. जागं असलेलं मूल क्वचितच दिसतं. बाकी सारी मुलं निपचित पडलेलीच दिसतात. सरकारचा भिक्षा प्रतिबंधक कायदा आहे. या कायद्याप्रमाणे भीक मागणं गुन्हा आहे. भीक मागणं वाईट आहेच. पण सन्मानाने जगण्यासाठी पर्याय उपलब्ध न करता तिला भीक मागायला भाग पाडणारी व्यवस्था त्याहून जास्त वाईट आहे. ती कशी सुधारायची?
 भीक मागणाऱ्या अशा लेकुरवाळ्या महिला राज्यात हजारो, तर देशात लाखो आहेत. म्हणजे तेवढय़ाच लहान मुलांचे बालपणाचे दिवस नशेत जातात. विज्ञान व मानसशास्त्राप्रमाणे माणसांची सर्वात जास्त आकलनशक्ती त्याच्या बालपणात असते. यामुळे एकीकडे बालपणातले त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत तर दुसरीकडे अशा नशाबाज मुलांच्या रूपाने समाजात कीडनिर्मितीचं बीजारोपण तर होत नाही?
या साऱ्या महिला अप्रतिष्ठेचे, तिरस्कारयुक्त व शोषित जीवन जगत आहेत. रानावनात शिकार करून व अन्न गोळा करून जगणं ही यांची परंपरागत जीवनपद्धती होती. काळ बदलला पण काही जमातीत काळाप्रमाणे आवश्यक बदल न होता त्यांच्यात प्राथमिक लक्षणं टिकून राहिली आहेत. त्यांची मानसिकता आणि क्षमता लक्षात घेऊन समाज व शासनाने त्यांना वेळोवेळी जगण्याचे सुधारित पर्याय व साधनं सुलभपणे उपलब्ध करून दिली आहेत असं दिसत नाही. जगण्याचाच प्रश्न सुटला नाही, तिथे विकासाची संधी मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
स्वराज्यात अभयारण्याचे, जैवविविधतेचे, वन्य जीव संरक्षणाचे कायदे करण्यात आले. त्यामुळे यांची जगण्याची परंपरागत साधनं हिरावून घेतली गेली. या भटक्यांचं जंगलातून शिकार करणं, अन्न गोळा करणं बंद झालं. हे पदोपदी अन्याय-अत्याचाराचे बळी ठरत आहेत. भूक, अज्ञान, साधनविहीनता, अन्नाच्या परंपरागत सवयी, आधुनिक कायदे आणि समाजाचा पूर्वग्रह या सर्वाच्या पेचात सापडलेलं संघर्षमय जीवन जगणाऱ्या पारधी, धीमर, केवट आदी अनेक जमाती अद्याप स्वातंत्र्याची वाट पाहत आहेत.
देवा-धर्माच्या नावाने भिक्षा मागणारे कडकलक्ष्मी, मसनजोगी, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, गोसावी, नाथपंथी गोसावी, नाथजोगी इ. आणि दोरीवर चालण्याचे तथा कसरतीचे व तालीमबाजीचे खेळ करणारे डोंबारी, नट, गोपाळ, खेळकरी, पहिलवान आदी जमातींवर भिक्षा प्रतिबंधक कायद्यामुळे परंपरागत पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कलेचं प्रदर्शन करून भिक्षा मागण्यावर बंधन आलं. ते कायद्याने गुन्हेगार ठरले. उपजीविकेसाठी पर्याय मिळाला नाही. त्यांचा जीवनाधार धोक्यात आला.
लोकांची करमणूक करायची व लोक देतील ती बिदागी घेऊन पुढच्या गावी जायचं अशी परंपरा असलेल्या जमाती आपल्या परिचयाच्या आहेत. खासकरून कुटुंबातील लहान मुलं-मुली व महिला कसरतीचं काम करतात. व्यवसायानिमित्त हे लोक वर्षभरात अनेक राज्यांतून भटकतात, भिक्षा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी असे खेळ करणं गुन्हा ठरतो. शिवाय बालमजुरी कायद्याप्रमाणे कसरत करणाऱ्या लहान मुलांसह  पालकांना अटक होते. आज हजारो मुलं व त्यांचे पालक अटकेत आहेत. अशा परिस्थितीत लाखोंचा हा समुदाय उपाशीपोटी किंवा अर्धपोटी झोपतो आहे.
सार्वजनिक ठिकाणी माकड, अस्वल, साप, मुंगूस, घुबड इ. वन्य प्राण्यांचा खेळप्रदर्शन करून उपजीविका करणाऱ्या मदारी, कलंदर, सपेरा, गारुडी, दरवेशी आदी जमातींचा परंपरागत व्यवसाय वन्य जीवसंरक्षक कायद्यामुळे संपुष्टात आला, पर्याय मिळत नाही. गरजेपोटी चुकून हा व्यवसाय केला तर कायद्यानुसार गुन्हेगार समजून कडक शिक्षा होते.
नाडीपरीक्षा करून वनस्पतीचं औषध देत गावोगाव भटकणाऱ्या वैदूंचे वडिलोपार्जित परंपरागत ज्ञान व अनुभव ‘ड्रग्स अॅण्ड मॅजिक रेमिडीज प्रोहिबिशन अॅक्ट १९५४’ नुसार कुचकामी ठरले. पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं नव्हती. तेव्हा लोकांत यांना मागणी होती. आधुनिक काळात पदवी आणि परवाना असल्याशिवाय वैद्यकीय सेवा देता येत नाही. ते व्यवहारात वापरणं गुन्हा ठरला.
या जमातींच्या स्त्रियांचं माहेर आणि सासर दोन्ही साधनविहीन भिक्षेकरी असल्याने परित्यक्तांच्या अधिकारांसाठी असलेल्या कोणत्याही कायद्यांचा ते लाभ घेऊ  शकत नाहीत. कुटुंब, जमात आणि समाज या तिन्ही पातळ्यांवरच्या शोषणास तोंड द्यावं लागतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की, देशातल्या किंवा समुदायातल्या महिलांच्या प्रगतीवरून त्या देशाची किंवा त्या समुदायाची प्रगती ओळखली जाते.
भटक्यांच्या भिन्न भाषा, भिन्न व्यवसाय, भिन्न देवदेवता, भिन्न चालीरीती, जातपंचायतीचे भिन्न नीतिनियम, भिन्न मौखिक साहित्य,कलाकौशल्यं, शोषणाचं तथा प्रतिकाराचं, चांगल्या- वाईट संस्कृतीचं प्रचंड भांडार आहे. पण अडगळीत पडलेलं, दुर्लक्षित. या भांडाराचं दार उघडण्याची गरज आहे. अशा अंधारमय परिस्थितीतही जिद्द व सचोटीची काही अपवादात्मक उदाहरणं आहेत. ती बघितली की परिवर्तनाची चाहूल लागते. हा बदलता चेहराच उद्याच्या भारताचा नकाशा उजळवून टाकू शकेल. सुधारणांकडे झेप घेणारा हा बदलता, आत्मविश्वासी चेहरासुद्धा लोकांपुढे आला पाहिजे.   
अॅड.पल्लवी रेणके -pallavi.renke@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2015 1:09 am

Web Title: article about income generation sustainable livelihood of poor tribal women
Just Now!
X