News Flash

ज्येष्ठांचे लिव्ह इन : एका मनस्विनीची गोष्ट

सडपातळ, नाजूकशी, छोटीशी मूर्ती. वयाच्या ७२ व्या वर्षांतही मीरा सुंदर दिसत होत्या.

सरिता आवाड sarita.awad1@gmail.com

लग्न आणि ‘लिव्ह इन’ या दोन्ही नात्यांचा अनुभव घेणाऱ्या आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आलेल्या कडू-गोड अनुभवांमधून शिकत, प्रगल्भ होत गेलेल्या मीरा यांची ही गोष्ट. लग्न करून किं वा लग्नाशिवाय, या दोन्ही नात्यांमध्ये त्यांच्या वाटय़ास निराशा आली. पण त्या खचल्या नाहीत. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकारच्या नातेसंबंधांबद्दल त्यांच्या मनात कटुता नाही. स्वत:चं अस्तित्व निर्माण करायला त्यांनी नेहमीच महत्त्व दिलं आणि या वैशिष्टय़ामुळेच त्या वेगळ्या ठरल्या.

ज्येष्ठांमधली ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ या विषयावर लिहायला लागल्यावर अशा नात्याचा अनुभव असलेल्या जोडप्यांचा माझा शोध सतत चालूच असतो. आर्थिक आणि सामाजिक संशोधन क्षेत्रात खूप वर्ष काम करत असलेले माझे एक ज्येष्ठ स्नेही भेटल्यावर नेहमीप्रमाणे मी विचारलंच, की असं कोणी आठवतंय का ज्यांना ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा अनुभव आहे? त्यांना मीरा आठवल्या. त्यांच्याबरोबर मीरांनी सात-आठ वर्ष उत्तम काम केलं होतं. मीरा यांचं नाव घेताच त्यांच्या एकत्र कामाची सुरुवात कशी झाली हेही या स्नेह्य़ांना आठवलं. ते प्रमुख असलेल्या संस्थेत मीरांनी नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यांची आणि मीरांची ती पहिलीच भेट होती. मीरा यांना प्रकल्प समजावून सांगितल्यावर त्यांची चर्चा झाली, मुलाखत संपली. स्नेही म्हणाले, की मी विचार करून सांगतो. मीरा म्हणाल्या, ‘‘पण माझा विचार पक्का आहे. मी या प्रकल्पात काम करणारच आहे. उद्यापासून. फक्त कुठे बसायचं ते सांगा.’’ स्नेह्य़ांनी सांगितलेल्या या प्रसंगामुळे मीरांच्या धडाकेबाज स्वभावाची मला कल्पना आली. फोनवरून मी त्यांच्याशी भेट ठरवली आणि प्रत्यक्ष भेटायला गेले.

सडपातळ, नाजूकशी, छोटीशी मूर्ती. वयाच्या ७२ व्या वर्षांतही मीरा सुंदर दिसत होत्या. बोलके डोळे लक्ष वेधून घेत होते. त्या एकटय़ाच राहात होत्या. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून बाहेर पडूनही त्यांना आता दहा वर्ष झाली आहेत. पण त्याबद्दल कटुतेचा लवलेशही त्यांच्या      वागण्या-बोलण्यात दिसत नव्हता. मी प्रश्न विचारल्याबरोबर मीरांची स्मरणसाखळी उलगडली आणि जवळजवळ तीस वर्ष जुन्या फाइल्स उघडल्या!

त्या एक नाही, तर दोन लग्नांतून बाहेर पडल्या होत्या. शाळा-कॉलेजात हुशार म्हणून गाजलेल्या मीरांना कॉलेजमध्ये असताना टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि पदवीच्या अभ्यासासाठी त्या अमेरिकेला रवाना झाल्या. तिथे एका अमेरिकन ज्यू मुलाशी त्यांनी लग्न केलं. त्या गर्भवती असल्याचं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना आपलं भवितव्य जाणवायला लागलं. बालसंगोपन, संसार या सगळ्या पुढच्या पायऱ्या अपरिहार्य होत्या. आपलं आयुष्य असं अमेरिकेत बांधून टाकायचं नाही, असं त्यांनी ठरवलं. गर्भपात करणं सोपं नव्हतं. त्यासाठी समुपदेशन घ्यावं लागलं. पण मीरांचा निर्णय ठाम होता. तेव्हा गर्भपात कायदेशीर व्हावा म्हणून अमेरिकेतल्या स्त्रिया आंदोलन करत होत्या. आंदोलनकर्त्यां स्त्रियांच्या विचारांचा मीरांवर परिणाम झाला. स्त्रीवादाशी जान-पहचान झाली. शेवटी गर्भपात करून आणि घटस्फोट घेऊन त्या भारतात आल्या.  मीरा यांची पदवी मात्र उत्तमरीत्या पूर्ण झाली होती.

१९७१ मध्ये परत आल्यावर त्यांनी पाहिलं, की निरनिराळ्या संस्था, गट सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासात त्या सहभागी झाल्या. आई-वडील, कुटुंब, यांचा भारतात त्यांना भक्कम आधार होता. इथे आल्यावर अशा अभ्यासात काम करणारे एक मुस्लीम कार्यकर्ते त्यांच्या परिचयाचे झाले. परिचयाचं प्रेमात रूपांतर होऊन त्यांनी लग्न केलं. मीराच्या आईवडिलांकडेच त्यांचा मुक्काम होता. पुढच्या पाच-सहा वर्षांत उभयतांनी संशोधन करणारी संस्था काढली. मीरा स्त्रियांच्या चळवळीत सक्रिय झाल्या. त्यांना दोन मुलं झाली. त्यानंतर मात्र आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं आणि मीरांच्या पतीच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली. मीरा पतीला म्हणाल्या, तू मुस्लीम आहेस, तुझ्या मैत्रिणीशी तू दुसरं लग्न करू शकतोस. पण तसं करायला त्यांच्या पतीनं नकार दिला. दोन-दोन संसार सांभाळायची त्यांची तयारी नव्हती. सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर मीरांच्या वाटय़ाला घटस्फोट आला. पण घटस्फोटामुळे त्या मोडून पडल्या नाहीत. आई-वडिलांच्या मदतीनं त्यांनी दुसरं घर घेतलं आणि मुलांना घेऊन त्या स्वतंत्र राहायला लागल्या. कामामध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं. ‘मुंबईतील गिरण्यांमध्ये घटत असलेलं स्त्री कामगारांचं प्रमाण’ या विषयावर मुंबई विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ मिळवली. त्या सतारही शिकायला लागल्या. अनेक मित्रमैत्रिणींना त्यांचं घर आपलं वाटायचं.

अशाच एका मित्राबरोबर सुबू मीरांच्या घरी आले. तेव्हा मीरा सतारची गत वाजवत होत्या. उघडय़ा दारातून सुबू घरात आले आणि म्हणाले, गत लय कमी करून वाजवा. हे ऐकून मीरांनी लय कमी केली आणि सतार अधिक श्रवणीय झाली. वादन संपल्यावर मीरांनी उत्सुकतेनं वर पाहिलं, की कोण हा रसिक? मीरांच्या आणि सुबूंच्या नात्याची रुजवात अशी झाली. सुबू घरी येत राहिले आणि हळूहळू घरचे झाले. मीरांच्या इतर मित्रांप्रमाणे ते सामाजिक चळवळींशी संबंधित नव्हते. ते शेअर बाजारात दलाल होते. रजनीश यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्यामुळे रजनीश, त्यांचे विचार याच्याशी मीरांची ओळख झाली. सुबू आणि मीरा एकमेकांत गुंतत चालले. मीरांची मुलं आता मोठी झाली होती. त्यांची जोपासना करत असताना आईला आईचं जग आहे, असा संस्कार त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे मीरांनी सुबू यांच्याबरोबर पुण्याला राहायचं ठरवलं तेव्हा मुलांनी विरोध केला नाही. शिवाय पुण्यात असल्या तरी मीरा वरचेवर मुंबईला येत राहिल्या.

आता दोन घरं झाल्यावर मीरांचा खर्च वाढला. पैसे मिळवण्यासाठी हात-पाय हलवणं भाग होतं आणि लेखाच्या अगदी सुरुवातीला सांगितलेला नोकरीच्या मुलाखतीचा किस्सा घडला. संशोधनपर काम करणाऱ्या संस्थेत त्यांना नोकरी मिळाली. सुबू आपल्या व्यवसायात होते. रजनीश आणि संगीत हा दोघांना जोडणारा धागा होता. मीरा सामाजिक चळवळी, स्त्री संघटना यांच्याशी संबंधित असल्या तरी या संघटनांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मीरांमध्ये एक महत्त्वाचा फरक होता. तो म्हणजे मीरांच्या स्वभावातलं आध्यात्म. चळवळीतले बहुतेक कार्यकर्ते नास्तिक होते. कार्यकर्त्यांमधल्या आपापसांतल्या संबंधांतला अहंकार मीरांना डाचायचा. व्यक्ती म्हणून कार्यकर्ते त्यांना उथळ वाटायचे. शिवाय स्वत: सर्वज्ञानी आणि इतरांना अज्ञानी समजून वागण्या-बोलण्याची त्यांची पद्धत मीरांना पटायची नाही. थोडक्यात इतकी वर्ष जरी सामाजिक चळवळींच्या क्षेत्राशी त्या जोडलेल्या होत्या, तरी मनापासून त्यात त्या गुंतल्या नाहीत. त्या मानानं पणन व्यवस्थापनाशी संबंधित संशोधनात त्या रमल्या. उद्देश निश्चित आणि आर्थिक लाभही निश्चित.

पण मीरा जशा नोकरीत रमल्या, मिळवत्या राहिल्या तसं सुबूंचं झालं नाही. शेअर बाजारात त्यांचा जम बसला नाही. फारसे पैसे मिळेनात. सुबू मीरांवर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून राहायला लागले. स्त्री जेव्हा पुरुषावर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून असते, तेव्हा तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो खरा, पण समाजाला आणि बहुतेक वेळा तिला स्वत:लाही ते अवलंबित्व अस्वाभाविक वाटत नाही. स्त्रीवरचं पुरुषाचं आर्थिक अवलंबित्व मात्र ना पुरुषाला स्वीकारता येतं, ना समाजाला. इथेही तसंच झालं. मीरांच्या कामाबद्दल सुबू तुच्छता दाखवू लागले. त्यात मीरांचे पाय खेचून त्यांची उंची कमी करायचा प्रयत्न होता. मुळातल्या स्वत:बद्दलच्या नाराजीचं झाकोळ सगळीकडे पसरायला लागलं. विसंवादाची भेग खोल खोल चरत गेली. या विलगतेचं विश्लेषण करण्याच्या खटपटीत मीरा पडत नाहीत. जे झालं त्याला ‘पुरुषप्रधानता’ असं सोपं लेबल लावून मोकळ्या होत नाहीत. नात्याचे अनेक रंग असतात, पापुद्रे असतात. स्त्री-पुरुष नात्यात गाभ्याशी उतरंड असते का? मीरा या प्रश्नाला निस्संदिग्ध ‘उतरंड असते’ असं उत्तर देत नाहीत. पण नात्यात दुरावे येतात आणि तडजोड म्हणून त्या दुराव्यांवर पांघरुण घालत जगणं मात्र त्यांना मंजूर नाही. नात्याचंही आयुष्य असतं. नातं संपल्याचा त्या खुल्या मनानं स्वीकार करतात. सुबू आणि मीरा अजिबात न भांडता,        आरोप-प्रत्यारोप न करता वेगळे झाले. लग्न न करता ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहाणं योग्य होतं असं मीरांना वाटतं. कारण त्यामुळे विलग होणं सुकर झालं. स्थावर-जंगम संपत्तीच्या वाटणीचा तिढा आला नाही. वेगळं झाल्यावर कोलमडून वगैरे जाण्याचा प्रश्नच नव्हता. मीरांचं संशोधन चालूच होतं. अनौपचारिक क्षेत्रातल्या स्त्रिया, स्त्रिया आणि पतधोरण, अशा विषयांचा त्यांनी अभ्यास करणं सुरू ठेवलं. आरोग्य आणि लैंगिक जीवन यासंबंधी निरनिराळ्या स्तरातल्या स्त्रियांची त्यांनी शिबिरं घेतली. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात निबंध वाचण्याचीही संधी मिळाली.

त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं, की एकीकडे अतिशय मनस्वी आयुष्य त्या हिमतीनं जगल्या आहेत. पण त्यांचे पाय अगदी घट्टपणे जमिनीत रोवलेले आहेत. आपल्या मिळकतीचा, जमाखर्चाचा हिशोब त्यांच्या डोक्यात पक्का असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेल्या वसाहतीत त्या राहातात. तिथे जेवायची सोय आहे. आम्ही जेवायला गेलो आणि माझ्या ताटात तीन चपात्या आल्या. मला तर एकच पुरे होती. तशी मीरांनी पिशवीतून डबा काढून जास्तीच्या चपात्या त्यात ठेवल्या. होतील रात्रीला म्हणून.

आमच्या भरपूर गप्पा झाल्या. आतापर्यंत जे जे घडलं ते काही मुद्दाम काही तरी क्रांतिकारक करायचं म्हणून त्यांनी केलेलं नाही. त्या-त्या परिस्थितीप्रमाणे जे योग्य वाटलं ते केलं. आपल्या चुका त्या मान्य करतात. उदाहरणार्थ, ज्याच्याबरोबर मजेत प्रवास करता येतो, त्याच्या सहवासात चोवीस तास सुखानं राहाता येईलच असं नाही, हे आता त्यांना समजलं आहे. इतकं मात्र खरं, की त्या भरभरून आयुष्य जगल्यात. अशी संधी क्वचितच स्त्रियांना मिळते याचीही त्यांना जाणीव आहे. जे झालं त्याबद्दल त्यांना ना खंत आहे ना खेद.

विवाहाशिवाय राहाण्याचा त्यांना जरी अनुभव असला तरी विवाह संस्थेच्या त्या विरोधात नाहीत. त्यांचा स्वत:चा मुलगा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये होता. त्यांनी मुलाच्या मैत्रिणीला स्पष्ट सांगितलं, की लग्न करा. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची ताकद असेल तरच तसं धारिष्टय़ करावं. त्यांची स्वत:ची वेशभूषा, राहाणीमान समाजमान्यतेची पर्वा न करणारं आहे. पण त्याचे परिणाम त्या मोकळेपणानं स्वीकारतात. अडचणीत असलेल्या शेजारणीला जमेल तितकी मदत करण्याइतकी त्यांची संवेदना जागृत आहे. त्यामुळे जिथे जातील तिथे मैत्रभावाची सावली त्यांना मिळते.

माझा शेवटचा प्रश्न म्हणजे आता एकटय़ा आहात, पण दुकटं व्हायला आवडेल का? त्यांनी हसून होकार दिला. ‘‘हो. का नाही? पण तसाच कोणी भेटला तरच.’’

एकटं असूनही एकाकी नसणाऱ्या या मनस्विनीला माझा सलाम!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 12:05 am

Web Title: article about live in relationship in older couples zws 70
Next Stories
1 व्यर्थ चिंता नको रे :  ‘हॅम्लेट’ झाल्यावर!
2 मी, रोहिणी.. : ‘फिल्म इंडस्ट्री’शी ओळख
3 वसुंधरेच्या लेकी : निसर्गाचं देणं देण्यासाठी..
Just Now!
X