सरिता आवाड

उतारवयात एकत्र आलेले आजी-आजोबा..  मनं जुळली नि त्यांचा एकमेकांचा आधार वाटला. मनाला हिरवे कोंब फु टले. तसं त्यांनी एकत्र यायचं ठरवलंही. पण त्यांच्याच माणसांनी त्यांच्या आनंदात खो घातला. शेवटी आजी-आजोबांनी लग्नाचा विचार सहजीवनात बदलला. मात्र  गेली आठ वर्ष आजी-आजोबांनी स्वत:ला, आपल्या नात्याला आक्रसून एका घरात बंदिस्त केलंय. त्याचं असं जगणं अनेक प्रश्नांना जन्म घालणारं, सामाजिक मानसिकतेच्या मर्यादा दाखवणारं.. प्रेमाची पालवी फुटलेलं नात्याचं रोपटं असं खुरटवलं गेलं..   

१६ जानेवारी आणि ३० जानेवारीच्या सदरात आपण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधल्या दोन जोडप्यांची ओळख करून घेतली. दोन्ही उदाहरणं ‘वा! किती छान!’ असं वाटणारी होती. आयुष्याच्या उत्तरायणात लाभलेल्या जोडीदारामुळे दोन्ही उदाहरणांत समाधान होतं, बांधिलकी होती, आश्वस्त भाव होता. त्यात विवाहसंस्थेवर हल्ला करण्याचा अभिनिवेश नव्हता, पण ‘अनुसरले मी अपुल्याच मना’ असं म्हणण्याचा ठामपणा होता. जवळचे मित्र, मुलं, नातेवाईक यांनी या नव्या नात्याचा स्वीकार केलेला दिसला. दोघांमध्ये आर्थिक अवलंबित्व नव्हतं. या नात्यांमधला सुखद गारवा मनाला स्पर्श करणारा होता. पण असं सगळं छान छान घडतंच असं नाही. अनेक खाचखळग्यांतून पार झाल्यावर, कटू अनुभव घेतल्यावर सर्वार्थानं दिलासा देणारं नातं अनुभवाला येणं हा भाग्ययोगच म्हणायला हवा. स्वभावत:च तो दुर्मीळ असतो.

या सदराच्या निमित्तानं निरनिराळी नाती मला बघायला मिळतायत, नात्यांमधले ताण जाणवतायत. हे ताण मला अंतर्मुख करतायत. माधव दामले यांच्या ‘हॅपी सीनियर्स’च्या माध्यमातून एकत्र आलेल्या एका आजी-आजोबांची ही गोष्ट. आजोबा आज ८० वर्षांचे आहेत, तर आजी ७५ वर्षांच्या. गेली आठ वर्ष

ते एकत्र राहात आहेत. त्यांची ओळख करून घेण्यासाठी, त्यांच्या सहजीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आधी फोन करून मी त्यांच्या घरी गेले. पण मनमोकळ्या गप्पा होत नव्हत्या. वातावरणात चमत्कारिक तणाव होता. घर नीटनेटकं होतं, पण काही तरी जाचत होतं. आजी उतारवयाच्या असल्या तरी तब्येतीनं व्यवस्थित दिसत होत्या. आजोबा घरातच होते, पण मला भेटायला बाहेरही आले नाहीत. आपल्या सहजीवनाबद्दल बोलायची त्यांची इच्छा दिसत नव्हती. त्यांच्या अनिच्छेचं दडपण आजींच्या मनावर आलं असावं. धीर करून मी आजींशी गप्पा मारायला सुरुवात केली. आपलं नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर आजी बोलायला तयार झाल्या. ज्या अर्थी दोघंही गेली आठ वर्ष एकत्र राहात आहेत त्याअर्थी त्यांच्या सहजीवनाविषयी बोलण्यासारखं आजींकडे नक्कीच होतं. त्या बोलल्याही, परंतु मोकळेपणानं बोलल्या नाहीत एवढं नक्की.

आजी- त्यांना आपण सुमन आजी म्हणू, मूळच्या मुंबईच्या. आयुष्यभर त्यांनी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नोकरी केली. रात्रपाळी करावी लागली. त्यांचे पती औषध कंपनीत विक्रे ते होते. तेही बऱ्याचदा फिरतीवर असायचे. त्यांना मूलबाळ झालं नाही. निवृत्तीच्या दोन वर्ष आधी त्यांच्या पतीला रक्ताचा कर्क रोग झाला. लक्षात आलं तोपर्यंत उशीर झाला होता. सहा महिन्यांतच त्यांचं निधन झालं. दीड वर्षांत आजीही नोकरीतून निवृत्त झाल्या. त्यांचे नातेवाईक- पुतणे, दोन भाचे पुण्यात राहात होते. मुंबईचं घर भाडय़ांनं देऊन त्यांनी पुण्यात शांतपणे निवृत्त आयुष्य काढायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्या पुण्यात आल्या. सुरुवातीला भाच्याकडे राहून निवृत्तीच्या पुंजीतून त्यांनी पुण्याच्या पूर्व भागात छोटं घर घेतलं. एकटीनं राहायला सुरुवात केली. ते वर्ष  होतं अंदाजे २०१०. एकदा वर्तमानपत्रात ‘हॅपी सीनियर्स’च्या माधव दामले यांचा लेख त्यांच्या वाचनात आला. उरलेलं आयुष्य एकाकी न काढता कुणाच्या तरी सोबतीनं काढण्याची संकल्पना त्यांना भावली. त्याप्रमाणे त्यांनी

‘हॅपी सीनियर्स’मध्ये नाव नोंदवलं. त्यांच्या कार्यक्रमात त्या सहभागी व्हायला लागल्या. वाईला दामले यांनी आपल्या वडिलोपार्जित वाडय़ात छोटा वृद्धाश्रम सुरू के ला आहे. तिथे या ज्येष्ठ मंडळींची सहल गेली. आजीही या सहलीला गेल्या होत्या. धोम धरणाच्या पाण्यात त्यांनी नौकाविहार केला, जवळच मेणवलीचा नाना फडणवीसांचा वाडा बघितला. महाबळेश्वरलाही जाऊन आल्या. याच दरम्यान त्यांची आजोबांशी गाठ पडली.

आजोबा मूळचे पुण्याचेच. ते बांधकाम अभियंता म्हणून काम करायचे. आयुष्यभर त्यांनी निरनिराळे पूल बांधले. कामाच्या निमित्तानं मध्य प्रदेश, बिहार, आसाम राज्यांत राहिले. राहाणं नेहमीच गावाबाहेर- प्रत्यक्ष काम चालायचं तिथे असायचं. तिथे त्यांची एकटय़ाची राहुटी असायची. साहजिकच ते स्वयंपाक करायला शिकले. रिकामा वेळ वाचनात जायचा. वडिलांचं छत्र विसाव्या वर्षीच हरपलं होतं. आई आणि दोन बहिणींची जबाबदारी होती. मिळवलेले पैसे मुख्यत: घरीच पाठवायचे. यथावकाश दोन्ही बहिणींची लग्नं झाली. आईही वारली. आजोबा एकटेच राहिले. लग्नाचं वय उलटून गेलं होतं. पुढे संस्कृतची गोडी लागली. एकलव्यासारखा दूर देशात त्यांचा अभ्यास सुरू झाला. जोडीला व्यायामाचीही आवड होती. रोजचे सूर्यनमस्कार कधी चुकले नाहीत. योगासनांचा सराव सुरूच होता. निवृत्तीनंतर ते परत पुण्यात आले. त्यांच्या जुन्या वाडय़ाची पुनर्बाधणी झाली. पण गावातल्या गदारोळात राहाण्यापेक्षा गावाबाहेर कोथरुडला राहाणं त्यांनी पसंत केलं. आजोबांचं निवृत्तीचं आयुष्य शांतपणे सुरू झालं. योगायोगानं त्यांच्याही वाचनात वर्तमानपत्रातला माधव दामले यांचा लेख आला आणि ते ‘हॅपी सीनियर्स’च्या संपर्कात आले. आधी सांगितलेल्या स्काऊट ग्राऊंडवरच्या गप्पांमध्ये ते सहभागी व्हायचे, तेही वाईच्या सहलीला गेले होते. या दरम्यान सुमन आजींची आणि त्यांची भेट झाली. वाचन हा दोघांमधला दुवा बनला. दोघांच्या छान गप्पा रंगायच्या. आजींना गाण्याची आवड होती, पण नोकरीच्या धबडग्यात तिकडे लक्षच गेलं नव्हतं. आजोबांनी ही आवड जोपासायला आजींना प्रोत्साहन दिलं. आजींनी हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. सात-आठ महिन्यांनी आपण सहजीवनाला सुरुवात करावी असं दोघांना वाटलं. आजोबांना पाश नव्हते. पण आजींना पुतणे-भाचे होते. त्यांना आजींनी आजोबांची माहिती दिली आणि त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर त्यांनी कडाडून विरोध केला. आजींचं मुंबईमधलं घर, पुण्यातलं घर, त्यांनी जमवलेली थोडी गंगाजळी, यात कुणी तरी तिसरा वाटेकरी होणार ही कल्पनाच त्यांना भयंकर वाटली. हे घबाड कधी ना कधी आपल्याला मिळेल हे मनात ठेवून का होईना, ते अधूनमधून आजींकडे जायचे. आजींचा मानस ऐकल्यावर, ‘‘आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला? या वयात ही काय थेरं सुचतायत तुला?’’ असं म्हणून त्यांनी आजींनाच बोल लावला. बोलण्याच्या भरात त्यांच्या मनातला आजींच्या संपत्तीचा मोह उघड झाला आणि आजी दुखावल्या. या प्रश्नावर आजी आणि आजोबांची चर्चा झाली आणि दोघांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायचं ठरवलं. नातेवाईकांचा इतका विरोध झाला नसता तर त्यांनी लग्न केलं असतं. पण कडवा विरोध लक्षात घेऊन त्यांना हाच योग्य पर्याय वाटला. ‘लिव्ह इन’संबंधी त्यांनी आपसात करार केला. आर्थिकदृष्टय़ा एकमेकांवर अवलंबून राहायचं नाही, एकमेकांच्या आवडी जोपासायच्या. एकमेकांना सर्वार्थानं आधार द्यायचा असा लेखी करार करून आणि मनोमन ठरवून आजी आजोबांकडे राहायला आल्या. आजींच्या आयुष्यातली ही घडामोड नातेवाईकांना कळली. त्यांचे आणि आजींचे संबंध दुरावले.

आजी आणि आजोबांच्या सहजीवनाला आता आठ वर्ष झाली आहेत. म्हणजे सहनिवासाला सुरुवात झाली तेव्हा आजी

६६ वर्षांच्या होत्या, तर आजोबा ७२ वर्षांचे होते. दोघांना एकमेकांची सोबत आहे. दोघांनाही नाटक बघायला आवडतं. ‘करोना’ टाळेबंदीच्या आधी ‘बालगंधर्व’ला त्यांची महिन्यातून एकदा चक्कर असायची. गाण्यांच्या कार्यक्रमांना ते हौसेनं जायचे. टाळेबंदीच्या काळात एकमेकांची  सोबत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली. आजोबांना संगणकावर काम करण्याची आवड आहे. त्यात ते रमतात. आजींचा हार्मोनियमचा रियाज चालू आहे. याशिवाय पत्ते खेळण्यातही वेळ जातो. आजोबांचा सकाळचा व्यायाम न चुकता सुरू असतो. त्यांचं बघून बघून आजींना योगासनांत रुची वाटू लागली आहे. शेजाऱ्यांशी मात्र फारसा संबंध नाही. आपल्या घरातच त्यांनी त्यांचं स्वत:चं छोटंसं जग उभं केलंय. त्यात ते दोघे रमलेत. बाहेरच्या जगाशी संबंध अगदी कमीतकमी ठेवलेला जाणवला.

आजींचा निरोप घेऊन मी बाहेर पडले तेव्हा माझ्या मनावर ताण आला होता. या ताणाचे ताणेबाणे माझे मीच तपासायला लागले. आजी आणि आजोबांना एकमेकांचा आधार मिळाला खरा, पण त्यांच्या नात्यांचा परीघ खूप आक्रसून गेला होता. दोघांच्या बाबतीत मला प्रश्न पडायला लागले. आजी मुंबईहून पुण्याला कोणत्या अपेक्षेनं आल्या? भाचे-पुतणे यांच्या संसारात त्यांना एकाकी वाटलं असेल म्हणूनच त्यांना ‘हॅपी सीनियर्स’मध्ये जावंसं वाटलं. कौटुंबिक नात्यांचा आधार पुरेसा नाही हे त्यांना जाणवलं असेल बहुतेक. आजोबांचं आयुष्य एकाकीच गेलं होतं. कामामध्येच मन रमवलं त्यांनी. मित्र मात्र कुणीच नाही. किमान उतारवयात आपल्याभोवती कुणाचा तरी वावर असावा असं वाटलं असेल त्यांना. एकमेकांशी ओळख झाल्यावर काही तरी कोवळं, हिरवं त्यांच्या मनात अंकुरलं असेल का? वेल जशी आधार शोधते तसा आजी आधार शोधत होत्या का? लग्न न करता सहजीवन स्वीकारण्याचा निर्णय घेताना त्यांच्या मनाची काय उलाघाल झाली? पूर्वसंस्कारांचं ओझं त्या झुगारू शकल्या का? समाजमनाला न रुचणारी कृती केल्याबद्दल त्यांना कानकोंडं वाटतं का? समाजमनाचा एक तुकडा त्यांच्याही मनात आहेच. स्वत:मधल्या समाजमनावर कशी मात केली त्यांनी? आजोबांच्या काय अपेक्षा होत्या आजींकडून? एकमेकांना आधार देता देता मैत्रभाव फुलला असेल का? कशी असेल मैत्रभावाची अभिव्यक्ती? आजोबा तर बोललेच नाहीत माझ्याशी. माझ्याशी बोलणंही नको असं का वाटलं असेल त्यांना? दडपणाखाली का होईना, आजी बोलल्या. माझ्या मनातले प्रश्न मी विचारत होते, पण आजींनी काहींना उत्तरं  दिली नाहीत. ओठ घट्ट मिटून मौन धारण केलं. त्या मौनाचं भाषांतर करण्यात माझं मन गुंतून गेलं.

आजींचा विचार करता करता विधवांची स्थिती आज काय आहे हे वाचलेलं मला आठवलं. २०११च्या जनगणनेनुसार भारतात ४.२३ कोटी विधवा होत्या. २००१ मध्ये ही संख्या ३.४३ कोटी होती. अधिकाधिक विधवा असण्याच्या जागतिक क्रमवारीत भारतानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतात विधवेचं जीवनमान तिच्याच वयाच्या सधवेपेक्षा निम्मं असतं, असं काही अभ्यास सांगतात. आजींना हे अभ्यास, ही आकडेवारी माहीत नसेलही. पण वैधव्याच्या झळा त्यांनी सोसल्या असतील. निपुत्रिक असण्यामुळे झालेले अपमान सहन केले असतील. आता उतारवयात का होईना स्वत:पुरता विसावा त्यांनी शोधला आहे. पण या विसाव्याच्या तुकडय़ाचा समाजापासूनचा तुटलेपणा मला खिन्न करत होता. त्यांचे नातलग आपल्या मुलाबाळांना घेऊन त्यांच्या घरी येते-जाते तर आजी-आजोबा किती आनंदले असते.. तर कदाचित त्यांनी आपल्याभोवती उभारलेला तटस्थपणाचा तट कोसळलाही असता. माणसानं माणसाशी माणसासम वागणं एवढं का अवघड आहे?

wsarita.awad1@gmail.com