सातपुडय़ाच्या पर्वतरांगेत नर्मदेकाठी राहणाऱ्या आदिवासींच्या हजारभर मुलांसाठी गेली २२ वर्षे नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे निव्वळ लोकाश्रयावर ९ प्राथमिक निवासी जीवनशाळा चालवल्या जात आहेत. संघर्षांच्या साक्षीने व साथीने जन्माला आलेल्या जीवनशाळांचं घोषवाक्य आहे.. ‘जीवनशाला की क्या है बात? लडाई-पढाई साथ-साथ.’
बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू
झाडे-वेली, पशू पाखरे, यांची मैत्री करू
बघू बंगला या मुंग्यांचा
सूर ऐकूया त्या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवत
फिरते फुलपाखरू

राजा मंगळवेढेकर यांच्या या कवितेतील बिनभिंतीची शाळा मला प्रत्यक्षात पाहता आली. निमित्त होतं, नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे चालवल्या जाणाऱ्या जीवनशाळांच्या भेटीचं निमंत्रण. खरं तर नर्मदा आंदोलनाबद्दल थोडीफार माहिती होती. पण त्यांची ही नवनिर्माणाची बाजू माझ्यासाठी पूर्णपणे अनभिज्ञ होती. विश्वस्त विजया चौहान यांच्या मेलमधील ज्या वाक्याने मला तिथे जाण्याची ओढ लागली ते असं..
‘सातपुडय़ाच्या पर्वतरांगेत नर्मदेकाठी राहणाऱ्या महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील आदिवासींच्या हजारभर मुलांसाठी गेली २२ वर्षे आम्ही निव्वळ लोकाश्रयावर ९ प्राथमिक निवासी शाळा चालवतोय, आमचं हे दऱ्याखोऱ्यात चालणारं काम समजून घ्यायला तुम्ही काढाल का सवड?’ पुढे एक मधाचं बोटही होतं..जुलै, ऑगस्टमध्ये आलात तर कदाचित स्वित्र्झलडला गेल्यासारखं वाटू शकेल. मेल वाचल्यावर मी आधी ‘यू टय़ूब’वरील ‘जीवनशाळा’ हा मानसी पिंगळे हिनं बनवलेला लघुपट पाहिला आणि त्याच क्षणी ते विलक्षण सेवादान प्रत्यक्ष तिथे जाऊन समजून घेण्याचा माझा निर्णय पक्का झाला.
१४ ते १६ ऑगस्ट असा ३ दिवसांचा कार्यक्रम ठरला. त्यानुसार शरद जोशी, मीना पिंगळे हे मुंबईतील कार्यकर्ते, अभिनेत्री वीणा जामकर व मी असे चौघेजण १३ ला रात्री बडोदा एक्स्प्रेसनं निघालो. बडोद्यानंतरचा प्रवास जीपने सुरू झाला. शहर मागे पडलं आणि आमची जीप वृक्षांच्या हिरव्यागार कमानींखालून धावू लागली. रस्त्याच्या दुतर्फा पडलेला सोनमोहराचा सडा.. आजूबाजूला पसरलेली हिरवीगार शेतं.. हळूहळू जागी होणारी गावं.. डोक्यावरून हंडे घेऊन जाणाऱ्या स्त्रिया.. शहरी मनाला भुरळ घालणारं ते दृश्य पाहताना केवडीया कॉलनी ही सरदार सरोवर प्रकल्पासाठी वसवलेली वसाहत कधी आली ते कळलंच नाही. या ठिकाणी आंदोलनाच्या दोन २ तरुण कार्यकर्त्यां योगिनी खानोलकर व लतिका राजपूत आमच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. पुढचे ३ दिवस त्यांनी आमच्यासाठी ठेवले होते. त्यांना घेऊन पुढे निघालो आणि पाच दहा मिनिटांतच सरदार सरोवर धरणाची महाकाय भिंत सामोरी आली. त्या पाठचा विस्तीर्ण जलाशय तर डोळ्यात न मावणारा. पुढचा २ तासांचा प्रवास इंजिन लावलेल्या होडीतून होता. एकीकडे सातपुडय़ाची अजस्त्र रांग तर दुसऱ्या बाजूला खळाळून वाहणारी नर्मदा. जोडीला सुसाट वारा.. मन पिसासारखं तरंगू लागलं. इतक्यात नावाडय़ाचे शब्द कानी आले. तो पाण्याच्या आत बोट दाखवून आपल्या भाषेत काहीतरी सांगत होता. ते योगिनीनं आमच्यापर्यंत पोचवलं.. ‘हे माझं गाव.. इथे माझं घर होतं..असेल का हो अजून तिथेच?..’ आम्ही खाड्कन जमिनीवर आलो. क्षणार्धात ते सुंदर सरोवर शेकडो गावांना गिळणाऱ्या महाभयंकर राक्षसासारखं दिसू लागलं. आपली बोट त्या बुडालेल्या गावांवरून जातेच हे कळल्यावर सगळा आनंद कडीकुलपात बंदिस्त झाला. पुढचा प्रवास मुक्यानंच झाला..
दोन तासांच्या अस्वस्थ शांततेनंतर अचानक ढोल ताशांचा आवाज कानात घुमायला लागला. बघतो तर समोरच्या डोंगर उतारावर लहान मुलांची फौज वाद्यांचा गजर करीत आमच्या स्वागतासाठी उभी होती. सागाच्या फुललेल्या तुऱ्यांचे आणि रानफुलांचे गुच्छ समोर आले आणि आमचा १५/१६ तासांचा शीण कुठल्याकुठे पळाला. ती होती डनेल गावच्या (ता. अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार) शाळेतील मुलं. आम्ही येणार म्हणून गुरुजी व गावकऱ्यांनी २ दिवस खपून बनवलेल्या डोंगरावरील त्या पन्नासेक पायऱ्यांवरून (खाचा) चढताना मन भरून आलं. शाळेच्या अंगणात स्थानापन्न झाल्यावर बराचसा इतिहास समजला.
सातपुडा-विंध्यच्या पर्वतरांगात वसलेली ही आदिवासी गावं. अशिक्षित-अडाणी. सरकार-ठेकेदार यांच्या लुटीला बळी पडलेली. सरकारी शाळा चालायच्या परंतु फक्त कागदावर. शिक्षक शाळेत हजर राहायचे परंतु केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी हे पाहिलं आणि संघर्षांबरोबर पेरलं गेलं निर्माणाचं बीज. त्याचंच फळ म्हणजे नर्मदेच्या खोऱ्यात सुरू झालेल्या या ‘जीवनशाळा’.

bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”

आदिवासींनीच ठरवलं, श्रमदानाने शाळा उभ्या केल्या. गावामधूनच धान्य गोळा केलं आणि सरकारी अनुदानाविनाच सुरू केल्या आपल्या ‘जीवनशाळा’. सध्या ९‘जीवनशाळां’ मधून हजारभर विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. घरं डोंगरात लांब लांब असल्याने पहिली ते चौथीपर्यंत चालणाऱ्या या शाळा निवासी आहेत. सर्व शिक्षक हे सातपुडय़ातीलच आदिवासी व शिकलेले होतकरू तरुण आहेत. शाळेचा कारभार पाहण्यासाठी गावपातळीवर एक समिती नेमली आहे. जेवण बनवण्यासाठी व इतर कामांसाठी एक व्यक्ती व मावशी यांची नेमणूक करण्यात आलीय.
६ ऑगस्ट १९९२ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी येथे पहिली ‘जीवनशाळा’ सुरू झाली. संघर्षांच्या साक्षीने व साथीने जन्माला आलेल्या जीवनशाळांचं घोषवाक्य ठरलं.. ‘जीवनशालाकी क्या है बात? लडाई-पढाई साथ-साथ. चिमलखेडीनंतर ८ दिवसांनीच धडगाव तालुक्यातील निमगव्हाण येथे दुसरी जीवनशाळा सुरू झाली. पुढे या दोन्ही शाळा बुडाल्या तेव्हा पुनश्च हरीओम करत नव्या ठिकाणी पुन्हा उभाराव्या लागल्या.
सियाराम सिंगा पाडवी हा जीवनशाळेचा पहिला विद्यार्थी. त्याने शाळा बुडली तेव्हाची आठवण सांगितली. म्हणाला, ‘‘पाणी कंबरेपर्यंत आलं तरी पोलिसांना न जुमानता मुलं व मी पाण्यात तसेच उभे होतो. आमच्या शाळेला दुसऱ्या जागेची हमी मिळेपर्यंत आम्ही हलणार नाही असा सर्वाचा निश्चय होता. पण जेव्हा पाणी गळ्याकडे सरकू लागलं तेव्हा पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलांना सक्तीने खांद्यावरून, डोक्यावरून बाहेर काढलं,’’ गेल्या अनेक वर्षांपासून सियाराम आंदोलनाचा पूर्णवेळ कार्यकर्ता बनलाय. आदिवासींना मासेमारीचा परवाना मिळवून देणं, त्यांच्या सहकारी सोसायटय़ा स्थापन करणं. जातीची प्रमाणपत्रं मिळवून देण्यात त्यांना मदत करणं.. अशी कामं करतो. या शाळांना सरकारमान्यता मिळावी यासाठी परत एक लढाई लढावी लागली. अखेर स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर २०१३ मध्ये मान्यता मिळाली. त्याआधी अनेक र्वष चौथीच्या मुलांना इतर मान्यताप्राप्त शाळांशी परीक्षेपुरतं जोडून देण्याचा उपद्व्याप करावा लागत असे.
जीवन जगायला शिकवते ती जीवनशाळा. लिहायला-वाचायला व शिक्षणक्षेत्रातील स्पर्धेत मागे पडू नये म्हणून शालेय अभ्यासक्रम इतर शाळांप्रमाणेच असतो. परंतु ‘आमऱ्या काण्या (आमच्या कहाण्या) अक्षरान् ओळखाण’ या तिथल्या शिक्षकांनीच बनवलेल्या पावरी भाषेतील पुस्तकांचा अभ्यास मुलांना आपल्या मातृभाषेचा विसर पडू देत नाही. जंगलातून लाकूडफाटा तोडून आणताना कोणती झाडं तोडायची आणि कशी याचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. जून ते ऑगस्ट महिन्यात माशांचं प्रजनन सुरू असल्यानं मासेमारी पूर्ण बंद असते. मुलं स्वत:चे कपडे, जेवणाचं ताट स्वत: धुतात. नदीवरून पाणी आणतात. जंगलात जाऊन औषधी वनस्पतींची ओळख करून घेतात. गुरुजींच्या मदतीने शाळेच्या आजूबाजूच्या जागेत भाज्या, मका, ज्वारी पिकवतात.
आदिवासींच्या संस्कृतीची, रीतिरिवाजांची त्यांना माहिती दिली जाते. त्यामुळे मुलं शिकली तरी परंपरागत कामासाठी सक्षम राहतात. वर्षांतून एकदा भरणारा बालमेळा व वार्षिक सहल तर मुलांसाठी पर्वणीच! काटकपणा व चापल्य ही या मुलांना वंशपरंपरेनं मिळालेली देणगी. त्यांचं खो-खो व कबड्डीतील कौशल्य बघताना आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. विजय वळवी हा आदिवासी तरुण (पूर्ण वेळ कार्यकर्ता) या मुलांचा मार्गदर्शक. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असलेल्या या विजयच्या अथक परिश्रमांमुळे जीवनशाळांचे काही विद्यार्थी आज पुण्याच्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी भीमसिंग वसावे हा मुलगा तर कबड्डीतील नैपुण्यामुळे आज ठाण्याच्या वनविभागात अधिकारी झालाय तर काही पोलीसदलात सामावले गेले आहेत. डी.एड., बी.एड. होऊन शिक्षक झालेले तर अनेक. जीवनशाळांमधे प्राथमिक शिक्षण झाल्यानेच ही दारे त्यांना उघडता आली.
नर्मदा घाटीतील जगण्याच्या चळवळीचा संघर्ष हा शाळांचा पाया आहे. त्यामुळे मुलांच्या गाण्या-नाटकांतूनही याची जाणीव दिसत राहते. भिली, भिलाली, पावरी.. अशा आदिवासी भाषांमधील त्यांची गाणी
चालू से भाई चालू से – आमरी लडाई चालू से
लूट-फाट बंद करीने आमरी लडाई चालू से
तसेच
जंगल जमीन कुणीन् से आमरी से आमरी से
बच्चा बच्चा लडेगा – आंदोलन चलाएगा
अशा घोषणा ही मुले अत्यंत आवेशाने देतात. विशेषत: ‘‘आमु आखा (हम सब) एक से (एक है) हा नारा तर भलताच बुलंद. या डोंगरमाथ्यात राहून पूर्ण वेळ काम करणाऱ्यांपैकी सियाराम, योगिनी, लतिका व चेतन या चौघांशी आमची भेट झाली. योगिनी व लतिका या तर मुंबईच्या मुली, पण इथे आल्या व इथल्याच झाल्या. त्यांच्याकडे बघताना मन कौतुकानं भरून येतं. भिंगरीसारख्या फिरत असतात. जेमतेम ४० किलो वजनाची योगिनी इथे आली तेव्हा विशीची पण नव्हती. रुईयामधून बी.एस्सी. करून थेट दाखल झाली. काम करता करता एलएलबी झाली. आता एलएलएम करते आहे. धडगाव-शहाद्याच्या न्यायालयात आदिवासींच्या केसेस लढते आहे. ही मुलगी ‘जनसुनवाई’च्या वेळी धरणग्रस्तांची बाजू आकडेवारीसह जोरदार मुद्दे मांडून प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनाही निरुत्तर करते. आमच्याबरोबर सतत फिरत होती. जीवनशाळेचा धान्यपुरवठा, शिक्षकांच्या अडचणींचे निवारण, शिक्षकांचा विकास ही लतिकाची जबाबदारी. एम.ए. सोशॉलॉजी, पत्रकारिता वगैरे करून ही गेली ५-६ वर्षे इथलीच झाली आहे. हजारभर मुलांना रोजचा नाश्ता व दोनवेळचं पोटभर जेवण मिळावं यासाठी तिचा अखंड आटापिटा चालू असतो. डोंगरातल्या शाळांसाठी डोक्यावरून धान्यपोती, तेलडबे न्यावे लागतात- तिथवर होडीतून ते पोचवावे लागतात, या साऱ्यावर तिची बारीक नजर असते.
चेतन साळवे याच्या डायरीतील पहिल्या दिवसाची नोंद अशी -पूर्ण दिवसाचे उपोषण आणि १२ कि.मी. चाल. तो म्हणाला, ‘‘नंतर नंतर या साऱ्या गोष्टी अंगवळणी पडून गेल्या. जिथं साधं चालणंही मुश्किल, तिथे हे कार्यकर्ते खांद्यावर, पाठीवर जड जड ओझी घेऊन ४-४/५-५ तास चालतात.. अनेक वेळेला त्यांचं अत्यल्प असलेलं मानधन रखडतं, पण मुलं उपाशी राहणार नाहीत याची काळजी घेतात.’’
नूरजी पाडवी हे खोऱ्यातले एक प्रमुख जुने कार्यकर्ते. संघटनेचा एक प्रमुख आधारस्तंभ. मुंबई, पुणे, धुळे..अशा शहरात राहून जीवनशाळांच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी जीवाचे रान करणारे कार्यकर्तेही बरेच आहेत. या साऱ्यांची मेधाताईंवर (मेधा पाटकर) असलेली अलोट भक्ती पाहून आपण अवाक् होतो.
शेवटच्या रात्री आम्ही धडगावला नर्मदा परिवाराच्या कार्यालय कम निवासमध्ये वस्तीला होतो. जीवनशाळातून बाहेर पडून ५वी ते ७वी मध्ये शिकणारी २५ मुले इथे राहतात. ती रात्र मुलांबरोबर गोष्टींच्या देव-घेव तत्त्वावर रंगली. परत येताना राहून राहून ‘आरक्षण’ चित्रपटातलं अमिताभचं एक वाक्य आठवत होतं.. इस देश मे दो भारत बसते हैं..’ मनात आलं, बांधता येईल का पूल या दोन टोकांत? का नाही येणार.. नक्की येईल. या विचारानेच मला स्फुरण चढलं आणि मी नकळत ओरडले, ‘आमु आखा’ आणि अचानक कानांमध्ये जोरदार प्रतिसाद घुमला, ‘एक से’. हा गरजलेला आवाज नक्कीच आपल्या असंख्य वाचकांचा असणार. होय ना?
संपर्क :
परवीन जहांगीर – ०९८२०६३६३३५
pjehangir@gmail.com
योगिनी खानोलकर – ९४२३९४४३९०
yogini.narmada@yahoo.com,waglesampada@gmail.com