News Flash

जगणं बदलताना : शिकणं इथलं संपत नाही!

पालकांना मुलांशी भावनिक जवळीक राखण्यासाठी त्यांच्यातलं एक होऊन असं वागावं, बोलावं लागतंच.

अपर्णा देशपांडे

माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो हे मान्य असलं तरी गेल्या एका वर्षांच्या करोनाकाळानंच इतक्या गोष्टी शिकायला भाग पडलं, की पिढय़ा एकमेकांतलं अंतरही विसरल्या. ऑनलाइन शिकवण्या, ‘मीटिंगस्असोत, की वेब कॅ मेऱ्यातून नातेवाईकांशी गप्पा मारणं, वाढदिवस साजरं करणं, की अगदी अंताक्षरी खेळणं असो. वेगवेगळे अ‍ॅप्स डाऊनलोड करून त्याचा उपयोग करणं असो, की  पाककृतीतलं वैविध्य शिकू न जिव्हातृप्ती करणं असो, थोडा त्रास झाला, कटकटी, अडचणी आल्या, पण तरीही जुनी पिढी नवीन पिढीबरोबर बऱ्याच गोष्टी शिकली.. शेवटी शिकणं इथलं संपत नाही हेच खरं..

एका वर्षांपासून आपण सगळेच किती अभूतपूर्व काळातून जात आहोत नाही? काय नाही शिकवलं या वर्षांनं आपल्याला! संयम, शिस्त, स्वच्छता, परोपकार, स्वानुभूती, त्याग आणि बरंच काही. तसं तर आपण रोज काही न काही शिकतच असतो म्हणा! प्रत्येक पिढी आपल्या मागील पिढीकडूनच नाही, तर पुढील पिढीकडूनही बरंच काही शिकत असते.

करणच्या एकविसाव्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रमैत्रिणींना एका छानशा हॉटेलमध्ये पार्टी द्यावी, अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. त्याच्या बाबांना बऱ्यापैकी गाणं जमत असल्यानं पार्टीत त्यांनी मुलासाठी गाणं गावं असं आईचं म्हणणं होतं. ‘‘बाबा, माझ्या ‘बड्डे’ला ते जुन्या सिनेमातील गाणं नका म्हणू हं, एक झकास ‘रॅप’ होऊन जाऊद्या!’’ चिरंजीवाची फर्माईश. बाबांच्या पोटात गोळा. आता या वयात ते विचित्र अंगविक्षेप करत ‘रॅप’ म्हणणं शिकायचं? आपल्याला शोभेल का? आणि मांडी घालून मैफलीत बसल्यासारखं गाणं त्या ‘रॅप’ला रुचेल का? नुसत्या विचारानंच त्यांना धाप लागली! अशी सतत नवीन काही शिकण्याची प्रक्रिया प्रत्येकाला तितक्या सहजतेनं घेता येईलच असं नाही, पण काय आहे ना, आपल्या गुणसूत्रांतच असा किडा आहे, जो ‘वाकेन पण मोडणार नाही’ या धर्तीवर ‘शिकेन पण सोडणार नाही’ म्हणत चटकन बदलत्या नव्याला सामोरं जाण्याची ताकद देतो. तर करणच्या मित्राच्या मदतीनं बाबांनी काही ‘रॅप’गीतं जमवली. त्यातील काही रचना तद्दन रद्दी होत्या, पण काहींचे शब्द आणि त्यामागील संदेश खरोखरच लक्षवेधक होता. हा नवीन गीतप्रकार शिकताना खूप मजा वाटली बाबांना. तसं त्यांनी करणच्या आईजवळ बोलूनही दाखवलं, ‘‘आवडलं मला हे ‘रॅप’ प्रकरण. तसंही आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात  होणाऱ्या सांस्कृतिक बदलांचं वादळ थोपवणं आता आपल्याला अशक्य आहे गं..’’

‘‘असं वादळ थोपवता येत असतं? त्याच वादळात पुढच्या पिढीचा हात धरून मूल्यं टिकवत तरून जाण्याची कसरत करायची आहे आपल्याला. आणि पिढीचं काय हो, आधीसारखं वीस-वीस वर्ष वाट बघायला तिला बिलकूल वेळ नाहीये. जेमतेम पाच-सात वर्ष झाली की बदलते पिढी.’’ अगदी बरोबर म्हणाली करणची आई.

‘जनरेशन एक्स’पासून आता ‘जेन झेड’पर्यंत किती प्रचंड उलथापालथ झालीये.. दमछाक होते आपल्यासारख्यांची! इवलंसं रोपटंसुद्धा जगण्याच्या धडपडीत प्रकाशाला शोधत खिडकीतून बाहेर डोकावतं. आपण तर माणसं आहोत. जगणं बदलताना आपापला प्रकाश बरोबर शोधतोच.

पालकांना मुलांशी भावनिक जवळीक राखण्यासाठी त्यांच्यातलं एक होऊन असं वागावं, बोलावं लागतंच. म्हणूनच मुलांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळण्यासाठी सगळा आईवर्गही  बोलताना त्यांच्यासारखं  बोलायला शिकतो. आपल्या वाढत्या वयाच्या मुलांशी गट्टी करताना बाबा लोक त्यांच्यासोबत धापा टाकत, पोटाचा घेर आटोक्यात आणत सायकलिंग, ट्रेकिंग आजमावतात.

मोठय़ा सोसायटीत राहणाऱ्या मुकुंदानं ऑफिसमध्ये रजेसाठी फोन केला आणि इकडे त्याची अर्धागिनी ओरडलीच,‘‘तुम्ही का रजा घेताय? जरा ठामपणे नाही म्हणायला शिका! सोसायटीची कामं तुमच्या गळ्यात बांधतात हे लोक. ते वर्मा भाऊजी बघा कसले स्मार्ट आहेत! सोसायटीचे चेअरमन म्हणून मिरवतात, पण आपली कामं तुमच्यासारख्या भोळ्या (‘बावळट’ म्हणता म्हणता थांबली बिचारी) माणसाकडून करवून घेतात.’’

‘‘बरं! आता ‘कामं टाळण्याचे एकशे एक मार्ग’ असा ऑनलाइन क्लासच लावतो.’’ मुकुंदा हसत म्हणाला. ती नवऱ्याला चतुरपणा शिकायला सांगत होती, तर टाळेबंदीनंतर उण्यापुऱ्या दिवसांसाठी भरलेल्या शाळेत निघालेले चिरंजीव मध्येच बडबडले, ‘‘आई, विहानची आई त्याला कारमधून सोडते शाळेत.  सॉलिड ना! कसला ‘स्वॅग’ ना! तूपण शिक कार चालवायला..’’

‘‘तू तुझा अभ्यास मन लावून करायला शिक आधी. मला सांगतोय. ‘स्वॅग’ म्हणे! ’’ म्हणत तिनं आपली स्कूटर बाहेर काढली. हे सतत काहीतरी शिकण्याविषयीचे विचार मानगुटावर घेऊनच ती शाळेत पोहोचली, तर शाळेच्या गेटवरच गणिताच्या बाई भेटल्या.

‘‘राहुलच्या आई, हा गणितात मागे पडतोय बरं का. या टाळेबंदीमुळे काही मुलांच्या अभ्यासालाही टाळं लागलंय. त्यामुळे पालकांनी मुलांचा अभ्यास घरी कसा करवून घ्यायचा, याचा प्रशिक्षण आम्ही वर्ग सुरू करतोय. तुम्ही जरूर नोंदणी करा.’’

राहुलनं चटकन आईकडे बघितलं. आज संध्याकाळचं आपलं भविष्य आईच्या चेहऱ्यावर बघितल्यानं त्यानं वर्गात धूम ठोकली. ती मात्र वैतागली होती. आता आणखी काय काय शिकावं लागणार होतं! तसं ‘करोना’ काळात अनेक महिने पोरं घरातच असल्यानं त्यांच्या क्षुधाशांतीसाठी ‘नित नवे शिकावे, नित नवे चरावे’ म्हणत ‘यू-टय़ूब’ला  गुरूस्थानी ठेवून मोठी पाकक्रांती केली होतीच.

खाद्यपदार्थ तरी कसे असावेत? ‘ढालगज’ शब्दाशी साम्य दाखवणारी ‘डालगोना’ कॉफी काय, ‘कोकम पल्प गुलाबजामुन’ (!) काय.. कसले कसले प्रयोग केले त्या मेल्या टाळेबंदीत! अळूच्या फदफद्यात रसगुल्ले सोडायचंच बाकी ठेवलं बायकांनी. बाकी नाही नाही ते प्रयोग शिकून, करून झाले. शिवाय ऑनलाइन शाळेची ऑनलाइन पालक सभा, ऑनलाइन गृहपाठ, ऑनलाइन प्रकल्प सादरीकरण (ज्यात मुलांपेक्षा पालकांचा सहभाग जास्त असतो) हे सगळं सगळं समुद्रमंथनातील विषासारखं पचवून झालं होतं. आता जरा म्हणून हुश्श नाही करत, तर ही नवी शिकवणी आली.

परवा आप्पा आले आणि आल्या आल्या त्यांची ज्या विषयात ‘पीएच. डी.’ आहे त्याची लाखोली त्यांनी सुरू के ली. ‘‘काय तुमची ती ०* मेट्रो रे! पृथ्वीवरून सरळ शिंची स्वर्गाला नेऊन पोहोचवते की काय वाटून धोतर ओलं व्हायचं एखाद्याचं..’’ त्यांची ही भाषा ऐकून तिनं दचकून राहुलकडे बघितलं. एकटक बघत दात काढून हसत होता तो. आता आप्पांना जीभ आवरायला ‘शिकवावं’ लागणार, म्हणत तिनं कपाळाला हात लावला.

हल्लीच्या मुलांना मात्र काहीही नवीन शिकण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी आई-वडील लागतातच असं काही नाही. तो मोबाइल त्यांचा द्रोणाचार्य आणि ही सगळी मंडळी एकलव्य. फक्त चांगलं तेच शिकावं, ‘नको ते ज्ञान’ अर्जित करू नये म्हणून पालकांनाही काही आंतरजाल स्थळांना कुलपं लावायला शिकावं लागतंय. या शिकण्याच्या प्रक्रियेत ज्येष्ठ मंडळींही अजिबात मागे नाहीत.

‘‘आई, आज बंटीची शाळा अकरा वाजता असणार आहे बरं का. साडेनऊला नाही.’’ ऑफिसमधून सूनबाईंचा फोन होता.

‘‘मी पावणेअकराला मोबाइल त्याच्या जवळ देईन गं. मग तो करेल पुढचं.’’ इति आजीबाई.

‘‘आई, मोबाइलमध्ये तो ‘पॅरेंटल कंट्रोल’चा पर्याय असतो. मी केलंय सेटिंग, पण तुम्ही तेवढं तपासून बघाल प्लीज?’’

‘‘पॅरेंटल कंट्रोल?’’ आजीनं असं म्हटल्याबरोबर बंटीच्या कानांचे अँटेना ताठ उभे राहिले.

आई तिकडून आजीला काही समजावून सांगत होती. आजीला आज पुन्हा काहीतरी नवीन शिकावं लागणार होतं.

‘‘एवढं वय झालं, पण हे सततचं शिकणं मेलं कधी संपतच नाही!’’ आजी खोटय़ा रागात म्हणाल्या.

‘‘माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो गं. मी नाही का या वयातही वर्तमानपत्रांची ‘अ‍ॅप्स’ डाऊनलोड करून मोबाइलवर पेपर वाचले? तो दामले तर रोज काय काय नवीन नवीन ‘अ‍ॅप्स’बद्दल सांगत असतो मला. तशी आपल्या आजूबाजूला शहाणपणा शिकवणाऱ्यांची मांदियाळी आहे म्हणा!’’ आजोबा हसत म्हणाले.

शिकण्याच्या प्रक्रियेला वयाचं बंधन नसतं हे खरंच आहे नाही? परदेशातील नातवाशी बोलण्यासाठी आजी ‘वेब कॅमेरा’ आणि इंटरनेट हाताळायला शिकतेय. आई किंवा सासू जमात मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणासाठी परदेशात जाऊन तीन-चार महिने तिथल्या जीवनशैलीशी जुळवून घ्यायचं शिकते. शहरातील समस्त ज्येष्ठ  नागरिक बाहेर जाण्यासाठी ‘कॅब बुक करणं’, सामान ऑनलाइन मागवणं या गोष्टी किती लगेच शिकले. ‘अवघे पाऊणशे’ नावाच्या ज्येष्ठांच्या मंडळानं जपानची मोठी सहल आयोजित केली होती, तर सगळ्या आजी मंडळीनं सुटसुटीत आणि सोयीस्कर होईल अशी कुर्ता आणि पॅन्टची वेशभूषा तर अंगीकारलीच, पण अत्यावश्यक चार-पाच प्रश्नोत्तरं जपानी भाषेत सराव करून शिकून घेतली.

स्वत:चं जगणं सुधारताना हल्ली बाजारात प्रत्येक लहानमोठय़ा फेरीवाल्याजवळही ‘ऑनलाइन’ पैसे भरण्याची सोय दिसते. कदाचित अक्षरओळख नसेलही, पण आर्थिक स्थित्यंतराच्या काळात ही नवीन प्रणाली त्यांनी पटकन शिकून आत्मसात केली हे विशेष.  गावाकडे प्रशस्त, खोली भरून असलेल्या देवघरात साग्रसंगीत तासभर पूजा करणारी आई शहरात मुलाकडे येते, तर तिथे फूटभराच्या भिंतीवरील देवघरात दाटीवाटीनं बसलेल्या देवांची  तितकीच मनोभावे पूजा करते. ‘अजूनही देवाची पूजा करतो हो मुलगा,’ म्हणत समाधान मानते.

शेवटी काय हो, हे समाधानच तुमच्या आनंदी जगण्याचा गाभा आहे ना? म्हणूनच या बदलाच्या वावटळीत उद्ध्वस्त न होता, लव्हाळी बनून तग धरण्यात शहाणपण आहे. जगणं बदलतंय.. ते बदलणारच. त्यातल्या बोचणाऱ्या काटय़ांना बोथट करण्याची कला आपल्याला शिकावी लागेल. म्हणजे आलं पुन्हा शिकणं.

माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो नाही? जगण्याच्या शाळेतला विद्यार्थी. ती शाळा कधी ‘ऑनलाइन’ असेल, तर कधी ‘ऑफलाइन’. चांगलं ते शिकता आलं पाहिजे हे नक्की.

adaparnadeshpande@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:19 am

Web Title: article about online education covid 19 pandemic zws 70
Next Stories
1 पुरुष हृदय बाई : पौरुषाचं अनघड सुख
2 जोतिबांचे लेक  : ‘मुलगे’ घडवणारी प्रयोगशाळा!
3 गद्धेपंचविशी : समृद्ध तरुणाई!
Just Now!
X