News Flash

पर्यायांच्या शोधात : ‘समर्थ भारतासाठी’

स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणावर सखोल चिंतन केलं, विचार मांडले. परिवर्तनाचा आणि भारताच्या पुनरुत्थानाचा मार्ग शिक्षणातून जातो, असं त्यांचं स्पष्ट मत. याशिवाय मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत आणि

| October 11, 2014 01:01 am

स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणावर सखोल चिंतन केलं, विचार मांडले. परिवर्तनाचा आणि भारताच्या पुनरुत्थानाचा मार्ग शिक्षणातून जातो, असं त्यांचं स्पष्ट मत. याशिवाय मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत आणि त्यांचे मानसिक, भावनिक, शारीरिक विकास सबलीकरण व्हावे यासाठी ‘स्वामी विवेकानंद केंद्रा’चे असंख्य कार्यकर्ते काम करत आहेत अगदी भारतभर. या केंद्रांविषयी.
आज आपण भेटणार आहोत स्वप्न पेरणाऱ्या माणसांना. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ‘समर्थ भारत, संपन्न भारताचं’ स्वप्न पेरणारी ही माणसं. शिक्षणाच्या माध्यमातून हे घडेल असा विश्वास ठेवत कोणी आपला व्यवसाय, घरदार सांभाळत या कामाला जोडून घेतात तर कोणी आपल्या आयुष्यातील काही वर्षे किंवा अख्खं आयुष्यच या स्वप्न पेरण्याच्या कामासाठी झोकून देतात. कारण हे स्वप्नच एवढं भव्यदिव्य आहे की ते पूर्ण करायला हवे अनेकांचे सहकार्य. या भारतभर पसरलेल्या, उच्च शिक्षित, जाती-धर्मापलीकडे जाऊन काम करणाऱ्या माणसांची एकच ओळख स्वामी विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते.
स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणावर सखोल चिंतन केलं, विचार मांडले. परिवर्तनाचा आणि भारताच्या पुनरुत्थानाचा मार्ग शिक्षणातून जातो, असं त्यांचं स्पष्ट मत. यानुसार असंख्य कार्यकर्ते काम करत आहेत अगदी भारतभर. यंदा त्यांच्या जयंतीचं १५०वे वर्ष. म्हणून आणखी विविध उपक्रमांची त्यात भर पडली आहे. या सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे आपल्या प्रतिसादाची. परीक्षेतील यशाएवढंच महत्त्व आहे मूल्य संस्कारांना आणि मानसिक, भावनिक, शारीरिक विकास सबलीकरणाला. हे जाणून घेऊन केंद्रातर्फे विनामूल्य चालवल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याची,  ‘‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना..’’ म्हणत केंद्राचाच एक भाग बनून जाण्याची; कारण स्वप्न जितकं उत्तुंग, भव्य-दिव्य तेवढीच त्याच्या पूर्ततेसाठी लागणारी माणसांची गरज जास्त. आसाम, नागालँड, अरुणाचल अशा सर्व सीमावर्ती भागांत केंद्र शाळा चालवतं आणि व्यवसाय मार्गदर्शन केंद्रही. खास करून मुलींसाठी. इथे शासकीय यंत्रणा अपुरी पडते आणि शिक्षण सम्राटांना रस नसतो. पण भारताशी इथल्या लोकांशी नातं जोडायला या शाळा उपयोगी पडतात. यांची संख्या आहे शेकडय़ात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अति दुर्गम भाग, आदिवासी पट्टे इथे माध्यमिक शिक्षणाची सोय नसते. त्यांची बोली वेगळी असते. म्हणून त्यांना शाळेत समायोजनाचे प्रश्न सतावतात म्हणून त्यांच्यासाठी असतात वसतिगृहे. एरवी ती मुले नेहमीच्या सरकारी शाळेत जातात. वसतिगृहात त्यांना केवळ अभ्यासात मदत केली जाते. महाराष्ट्रातील असं वसतिगृह आहे नाशिकजवळ पिंपळसला.
 ही वसतिगृहे चालवताना लक्षात आलं की ग्रामीण भागातील मुलांच्या क्षमता विकासाला वाव आहे. लेखन, वाचन, श्रवण, आकडेमोड याच्या प्राथमिक ज्ञानाचाही आभाव आहे. बरेच वेळा तिथे शिक्षक उपलब्ध नसणं. दूरवरून येणाऱ्या शिक्षकाची तिथल्या मातीशी आणि माणसांशी नाळ न जुळणं हे कारण असतं म्हणूनच असंख्य खेडय़ातून सुरू झाली ‘आनंदालये.’ कार्यकर्ते आणि तिथलेच युवक, स्त्रिया यांच्या सहकार्यातून. ही आनंदालये ग्राम सुधाराचे जसं की वृक्षारोपण, बंधारे बांधणं, गांडूळ खत बनवणं असे कार्यक्रम हाती घेतात. ग्रामीण भागाप्रमाणे शहरी, निमशहरी भागांत राहणाऱ्यांसाठीही केंद्राचे अनेक उपक्रम चालतात. विविध वयोगटांसाठी स्पर्धा, शिबिरे सार्वजनिक सूर्यनमस्कारांसारखे उपक्रम यात शेकडो शाळा आणि हजारो विद्यार्थी सहभागी होतात. सामूहिकरीत्या तेजाची, ओजाची उपासना करतात. या निमित्तानं जोडली गेलेली मुलं संपर्कात राहावी म्हणून अनेक मॉडय़ुलस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली आहेत.
सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रियांचा विकास त्यातून आत्मभान येणे, आपल्यातील सुप्त सामर्थ्यांची जाण होणं यासाठी उपक्रम आहे ‘सामथ्र्य’. अनेक रंजक गाणी, गोष्टी, खेळ यांच्या माध्यमातून हे होत जातं. इयत्ता ४ थी ते ६ वीचे विद्यार्थी यात सहभागी होतात.
 याहून थोडय़ा मोठय़ा म्हणजेच इयत्ता सातवी ते आठवीच्या मुलांसाठीचा उपक्रम आहे ‘तेजस.’ मुलांना त्यांच्या क्षमता, अक्षमता, आवडीनिवडी यांची ओळख व्हावी. त्यांनी स्वत:चा अभ्यास स्वत: करायला शिकावा. त्यांनी नवनवी क्षितिजे ेधुंडाळावीत आणि स्वत:च्या आयुष्याचं ध्येय निश्चित करावं यासाठी या उपक्रमातून मदत केली जाते.
इयत्ता ९ वी, १० वीत मुलांनी बोर्डाच्या मार्कावर लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा असते. पण या इयत्तात येईपर्यंत मुलांच्यात चांगल्या अभ्यास सवयी रुजलेल्या नसतात. एकाग्रता, स्मरण अशी कौशल्ये विकसित झालेली नसतात. वेळेचं व्यवस्थापन, अभ्यासांच्या तंत्रशुद्ध, वैज्ञानिक संशोधनावर आधारित अभ्यासपद्धतीची त्यांना ओळख नसते. आहार, योगाभ्यास याचं महत्त्व त्यांना कोणी पटवून दिलेलं नसतं. चर्चा, परिसंवाद, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे हे सर्व शिकवणारा ‘परीक्षा द्या हसत खेळत’ हा उपक्रम राबवला जातो. कार्यकर्ते सांगतात या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणांत लक्षणीय वाढ होते.
या छोटय़ा मॉडय़ुल्सबरोबर दीर्घ काळ चालणारा उपक्रम म्हणजे ‘संस्कार केंद्रे.’ यातील निवडक मुलांना जिल्हापातळीवर, त्यातील निवडक मुलांना राज्यपातळीवर आणि त्यातून निवडलेल्या मुलांना राष्ट्रीयपातळीवर प्रशिक्षण दिलं जातं. अनेक ऋषितुल्य माणसांचा सहवास त्यांना घडतो. अनेक शाळांतून, वाडय़ा, रस्त्यांवर एखाद्या सार्वजनिक काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही केंद्रे चालवली जातात. वर्षभर, आठवडय़ातील एक दिवस सलग दोन तास ही केंद्रे म्हणजे जणू केंद्राच्या उपक्रमांचा आत्मा. अत्यंत सुनियोजित, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आखलेला हा कार्यक्रम गाणी, गोष्टी, कोडी, चर्चा, व्याख्यानं, महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख, घोषणा, संकल्प, खेळ अशा विविध अध्यायांतून हा उपक्रम चालतो. इथले खेळही खास. ज्यांना साधनांची गरज नसते. ते खेळल्यास संख्येची अट नसते, खर्च नसतो. प्रत्येक खेळ अनेक इंद्रियांचा विकास साधतो आणि अनेक मूल्यांची रुजवण करतो. सुरुवात होते प्रार्थना, उपासना, सूर्यनमस्कारांनी. मग गीत, गोष्ट, घोषणा, खेळ एकाच सूत्रात बांधलेल्या अनेकविध उपक्रमातून कार्यक्रम पुढेपुढे जातो. विवेकानंदांच्या एखाद्या विचाराचं वाचन होतं. ‘‘शिवा की जय जय, राणा की जय जय! ’’ ‘‘देशकी रक्षा कोन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। देशकी ताकद कौन बनेगा? हम बनेंगे, हम बनेंगे’’ अशा नानाविध, प्रेरणादायी घोषणा दिल्या जातात. या घोषणा समाजासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपण काही करायला हवं ही भावना मुलांत रुजवतात. शेवटी जसं वंदेमातरम् होतं तसंच प्रत्येक जण त्या दिवसाच्या मूल्याशी सुसंगत, स्वत:च्या अंत:प्रेरणा क्षमता यानुसार एखादं ध्येय निश्चित करतं. ध्येय मग ते कोणतेही असू दे. ते गाठणं महत्त्वाचं असतं. ‘‘मी कचरा घराबाहेर टाकणार नाही, रोज एक गोष्ट वाचेन, आईबाबांना नमस्कार करेन, मोठय़ांचा आदर ठेवीन.. असं काही असू शकेल. मात्र ते गाठण्यासाठी तुम्ही काय केलंत, यश आलं का? नसेल तर का नाही? या साऱ्याची चर्चा पुढच्या आठवडय़ात होते. ओल्या मातीला आकार द्यावा, हिऱ्याला पैलू पाडावेत तशी इथे मुलं घडत जातात. केंद्रात शिकायला येणारी मुलं छोटी-मोठी जबाबदारी घ्यायला शिकतात. काही जण स्वत:च्या वाडय़ा,वस्त्यांवर इमारतीत केंद्रही सुरू करतात. हे सारं आपोआप घडतं. सभाधीटपणा, नेतृत्वगुण, इतरांना समजून घेणं, नवीन विचार, कल्पना सुचनं आणि निसर्गाची, माणसांची, राष्ट्राची हाक येऊन तिथे मदतीला धावून जाणं हे सारे गुण मग त्यांना त्यांच्या कामात, उद्योग व्यवसायात उपयोगी पडतात आणि यातूनच केंद्राला कार्यकर्तेही मिळतात. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या आयुष्यातील काही वर्षे ती समाजाला, राष्ट्राला अर्पण करतात.
मुलांबरोबर शिक्षक आणि पालकांसाठीही प्रशिक्षण वर्ग, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे सुरू झाली आहेत. हल्ली नव्यानं सुरू झालेला उपक्रम म्हणजे ‘युवा संपत्ती’. मूल जन्माला येणं हा अपघात नसावा आणि त्याला वळवणं हे दिशाहीन नसावं, ही त्यामागची कल्पना, तरुण जोडप्यांसाठीचा हा उपक्रम. सतत फॉलोअप हे त्याचं वैशिष्टय़. जन्माला येणारं बाळ सकस, सबळ असावं म्हणून.
या सर्व उपक्रमातून संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात स्वप्न पेरलं जातं. समृद्ध, संपन्न भारताचं आणि भारताच्या पुनरुत्थानाचं.
विवेकानंद केंद्राचा व्याप मोठा. पसारा मोठा हे खरंच, पण त्यांच्या प्रमाणेच काम करणाऱ्या इतर अनेक संस्था, त्यांचे कार्यकर्ते निरपेक्षपणे, विनामोबदला काम करतात. स्वप्नपूर्तीसाठी उदा. लोणावळ्याचं मन:शक्तीकेंद्र. शिक्षणक्रांती चळवळ, मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर काम करणाऱ्या भारती ठाकूर, बस्तरसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या माता किंकिणी आणि त्यांना मदत करणारे असंख्य डॉक्टर राम गोडबोले यांच्यासारखे. चला आपण सारे या स्वप्नांच्या प्रवासातील एक वाटसरू होऊया. दिव्य मार्गावर चालूया.
संपर्कासाठी क्रमांक
अभय बापट- ९८२०२३५४८४
सुजाताताई – ९८६९९७४६५९
मंगलाताई ९८२०८३१५७१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2014 1:01 am

Web Title: article about swami vivekananda centre
टॅग : Swami Vivekananda
Next Stories
1 विनम्र दातृत्व
2 सहजीवनाचा भक्कम वृक्ष
3 स्वत:ला बदलताना : स्वतच्या संवेदना
Just Now!
X