अपर्णा देशपांडे adaparnadeshpande@gmail.com

‘बायोस्कोप’वर हलती चित्रं पाहाणं किती कौतुकाचं असे हे आजीआजोबाच जाणोत; पण त्यानंतर आलेल्या दोन्ही बाजूंनी चित्रपट दिसणाऱ्या टूरिंग टॉकीजचे, ‘रंगीत टीव्ही’चे दिवसही के व्हाच संपले आहेत. ‘करोना’काळात तर मल्टिप्लेक्सनाही ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत खिजवणाऱ्या ‘ओटीटी’ वाहिन्यांनी मागे टाकलं. ‘बी..स्कोप’ अशी हाळी देत गल्लोगल्ली फिरणाऱ्या काकांपासून सुरू झालेला चलतचित्रांचा- सर्वानी एकत्र धमाल करत बघण्याच्या चित्रपटाचा हा प्रवास आता ओटीटीपर्यंत, तेही प्रत्येकाला अगदी आपापल्या मोबाइलवर स्वतंत्रपणे बघता येऊ शकण्याइतपत, व्यक्तिकेंद्रीपणा वाढवण्यापर्यंत पुढे गेला आहे.   

आज तरुण असलेल्यांच्या आई-बाबांनी किं वा आजी-आजोबांनी स्वत:चं बालपण आठवून पाहिलं तर काहीसं हे चित्र समोर येईल – उन्हाळ्यातील एक शांत दुपार. पोरंसोरं उन्हाची पर्वा न करता घराबाहेर आणि ‘पोट्टे  उन्हात, मातीत नाही खेळणार तर काय आपण?’ म्हणत आया घरात निवांत असताना बाहेरून हाक यायची, ‘ए.. बी..स्कोप!’ आणि चड्डय़ा सावरत पोरं तिकडे धावायची. कधीकाळी येणाऱ्या उरुसात किंवा जत्रेपेक्षा या ‘शीनुमावल्या’ची उन्हाळाच्या महिन्यात जास्त कमाई होत असे.

बाबा आदमच्या काळातलं फडकं- जे एकदा ‘बिस्कोप’वर (बायोस्कोपवर) टाकल्यावर जर पुन्हा धुतलं तर सारं कूळ बुडेल अशी भीती असावी बहुतेक! कारण आमच्या बघण्यात तरी ते कधीच बदललं गेलं नव्हतं; पण काहीही म्हणा.. त्यात सिनेमा बघायची जी मजा होती ना, ती काही वेगळीच होती. घरातल्या मोठय़ांकडून महद्प्रयासानं मिळालेले ‘चाराणे’ देऊन एकामागे एक हलणारी चित्रं नीट नाही जरी दिसली, तरी चंद्रावरील ससा (जो आजपर्यंत कधी दिसला नाही!) दिसल्यासारखा आविर्भाव असायचा. ते जगच वेगळं होतं.

फिरतं.. टुरिंग टॉकीज, प्रेक्षकांना खाली सतरंजीवर बसवून, स्त्री-पुरुषांना वेगळं बसवण्यासाठी मध्ये पडदा लावून सिनेमा दाखवणाऱ्या टॉकीज आणि जत्रेत किंवा गणेशोत्सवात पडद्यावर दोन्ही बाजूंनी सिनेमा दाखवणाऱ्या कंपन्या, हे आता इतिहासात जमा झालं. त्यात एका बाजूनं डावखुरा दिसणारा हिरो पडद्याच्या दुसऱ्या बाजूनं उजव्या हाताचा दिसत असे! पक्क्या पडद्याच्या आणि खुच्र्या घातलेल्या टॉकीज गावोगावी उगवल्या तसे मनोरंजनाच्या क्षेत्रात वेगानं बदल घडत गेले. आधी कृष्णधवल आणि नंतर ‘रंगीत टी.व्ही.’ नावाचं वेड लावणारं प्रकरण आलं. चाळी, मोहल्ल्यात ‘टी.व्ही. मालकां’चा रुबाब भलताच वाढला. मंडळी वशिलेबाजी करत दूरचित्रवाणी मालकांकडे टी.व्ही. पाहायला नंबर लावू लागली. आमच्या मुंबईतील एका मावशीला दर रविवारी एका घरी खास जेवणाचं आमंत्रण असे. म्हणजे सोमवारपासून राजरोसपणे ही यजमान मंडळी सहकुटुंब मावशीच्या टी.व्ही.समोर संध्याकाळ घालवायला मोकळी!  ‘बारा-बाय-बारा’च्या खोलीत जास्तीत जास्त किती आणि कसे प्रेक्षक बसवायचे याचं त्या काळी नक्की प्रशिक्षण दिलं जात असावं, कारण एका टी.व्ही.समोर किमान सात-आठ कुटुंबं दाटीवाटीनं, भान हरपून बसलेली असायची. पुढे हेच दृश्य ‘व्हीसीआर’समोर दिसू लागलं. तो तर एक वेगळाच सोहळा असायचा. कॉलनीतील अतिउत्साही मंडळी एकत्र जमायची. बाकायदा वर्गणी गोळा व्हायची. त्यातल्या त्यात थोडं मोठं घर निवडलं जायचं. मग कुण्या व्हिडीओ पार्लरवाल्याशी करार व्हायचा. महिला वर्ग आणि बच्चे कंपनीसाठी काही कॅसेट आणि जागा बदलून रात्री उशिरा प्रौढ पुरुष वर्गासाठी काही कॅसेट्स आणल्या जायच्या. पोरंही इतकी ‘चंद्री’ (चाणाक्ष) होती, की अनेकदा मोठय़ांचा रात्री उशिराचा बेत हाणून पाडत. १९८२ ते ८८ च्या काळात व्हिडीओ कॅसेट्सनं घरबसल्या अनेक चित्रपट दाखवले. अनेक वस्त्यांमध्ये त्याचे दिवसाला सहा-सहा ‘शोज’ चालत. एक समांतर चित्रपटगृह चालवण्याचं महान पुण्यकर्म ही व्हिडीओवाली मंडळी करत. ‘सहा-बाय-सहा’ची पत्र्याची जागासुद्धा ‘टाकीज’ व्हायला पुरायची. बाहेर कळकटलेल्या बोर्डावर त्याहीपेक्षा कळकटलेल्या अक्षरांत ‘प्यार का मौसम- ६ वा.ता.’ असं काही तरी लिहिलेलं असायचं. आपली पोरं तिकडे फिरकत नाहीयेत ना, यावर मायबाप मंडळी लक्ष ठेवून असायची.

आताच्या काळात बाटुकल्यांच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आलेलं आहे. सगळी ‘ज्ञानगंगा’ मिळेल तिथून प्रवासाची वाट काढत मुलांपर्यंत पोहोचते. त्यांचं योग्य समुपदेशन कसं करावं, याचा विचार पालकांनी करण्याच्या आतच  मुलांना ‘सोमी’ (अर्थात सोशल मीडिया) वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झालेली असते. त्याआधी मधल्या काही दशकांमध्ये कॉम्प्युटरचं युग आल्यानं त्यावरदेखील मनोरंजन, खेळ आणि वेळ मिळाल्यास अभ्यासाची सोय होतीच.

‘डी.व्ही.डी’ आणि ‘सी.डी. प्लेअर’च्या जन्मानंतर व्हिडीओसारखा घोळक्यानं जमण्याचा सोहळा थोडा नरम पडला. दूरचित्रवाणीनंही कात टाकून स्वत:चा परीघ वाढवलेला होता. ‘व्हिटॅमिन डी’ मिळवण्यासाठी उंचावलेले अँटेना थोडे बुटके झाले, तबकडी अँटेना गरगरीत बाळसं धरू लागले आणि छतावरून वायरचं जाळं तयार होऊन चोवीस तासांची केबल करमणूक घराघरांत नांदू लागली. तत्पूर्वी वेळेच्या बंधनात फक्त सरकारी कार्यक्रम बघणाऱ्या मायबाप प्रेक्षकांना चोवीस तासांची करमणूक मिळू लागली. ऐंशी पार केलेल्या आजी-आजोबांनाही आपापलं ‘रामायण’, ‘महाभारत’ बघायला, साठीच्या आणि त्याखालच्या पिढीला ‘चित्रहार’, ‘हम लोग’, ‘ये जो हैं जिंदगी’ वगैरे बघायला आवडू लागलं. त्यानंतर सास-बहू कारस्थानं जी सुरू झाली, ती आजही असंख्य मालिका लेखकांची बलस्थानं आहेत. छोटा पडदा मोठा झाला. या छोटय़ा पडद्याची जादू आणि ताकद समजल्यानं मोठमोठय़ा कलाकारांची, निर्मात्यांची पावलं आपसूक तिकडे वळली. धनराशी ओतल्या गेल्या आणि ब्रेकिं ग न्यूजच्या नावाखाली एक बातमी दिवसातून शेकडो वेळा दाखवत डोकं किट्ट करणारी न्यूज चॅनल्स पावसाळी छत्र्यांप्रमाणे जिथे-तिथे उगवली. दूध पिणारा गणपती, व्हायरल व्हिडीओ, खड्डय़ात पडलेल्या मुलाची मुलाखत, अशा बातम्यांनी ऊत आणला. (आजही हे महान कार्य काही बातम्यांच्या वाहिन्या इमानेइतबारे करत आहेत.)

एकाच घरात टी.व्ही.समोर सगळ्या कुटुंबानं एकत्र कार्यक्रम बघणं ही जुनी फॅ शन झाली आणि प्रत्येक खोलीत वेगळा टी.व्ही. संच विराजमान होऊन आपापली ‘स्पेस’ अबाधित राखण्याला महत्त्व आलं. आता बऱ्याचदा आपलं तरुण पोरगं घरातच आहे की बाहेर, हेही आयांना त्यांना फोन करून विचारावं लागतं, कारण आईनं मारलेल्या हाका टी. व्ही.च्या आवाजात किंवा मोबाइलच्या गुंडय़ा कानात घातल्यानं ऐकायलाच जात नाही. हे करताना, म्हणजे एकमेकांना स्पेस देता देता शारीरिक आणि मानसिक ‘स्पेस’ वाढत जातेय याकडे दुर्लक्ष झालं.

मोठय़ा शहरांतील अनेक ‘एक पडदाधारी’ चित्रपटगृहं काळाच्या पडद्याआड गेली आणि ‘मल्टिप्लेक्स’चं पेव फुटलं. चाळीस वर्षांपूर्वी आपल्या मुलांना ‘बाबाजी का बाइस्कोप’साठी दहा पैसे देताना अनेक ‘तह’ करवून घेणाऱ्या म्हाताऱ्या      आई-वडिलांना आता नातवंडांबरोबर गुबगुबीत खुच्र्यावर बसून चित्रपट बघायला जाम आवडू लागलं. जगण्याचा स्तर उंचावताना खिशाला अतिशय सराईतपणे कात्री लागेल अशा कॉफी, कोला आणि पॉपकॉर्नच्या बादल्याच्या बादल्या रिचवल्या जात होत्या. ‘करोना’मुळे मल्टिप्लेक्सची मंदिरं भाविकांनी गजबजणं अवघड झालं, पण ‘द शो मस्ट गो ऑन’ या उक्तीनुसार भाविकांना लगेच ‘ओ.टी.टी’चा प्रसाद मिळाला. त्या भक्तिसागरात काय नाही महाराजा? इथे अनेक प्रकारचं शिक्षण खर्चीक-माफक दरात घरपोच आपल्या मोबाइलवर पुरवलं जातं. हे ‘ओव्हर द टॉप’वालं विद्यापीठ  (नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन आणि काय काय!) काय नाही शिकवत? इथे ‘फ’ची भाषा, ‘च’ची बाराखडी आणि अख्खं कामसूत्र विस्तारानं शिकवणारे प्रोफेसर आहेत!

करोनामुळे पोरासोरांचं सगळं शिक्षण हातातल्या ‘चार इंच बाय सहा इंचा’च्या शाळेत सामावलं. यात सगळ्यात जास्त पंचाईत झाली ती पोरांच्या पालकांची. बिचारे मोबाइलच्या विविध अ‍ॅप्सपासून मुलांना कसं सुरक्षित आणि दूर ठेवायचं या चिंतेत पार सुकून गेले.  पन्नास वर्षांपूर्वीचा निरागस ‘बाबाजी का बाइस्कोप’ वेगळ्या रूपात आज इवल्या इवल्या हातात आलाय. काळ बदललाय, जगणं बदललंय. अशात चिमुकल्यांची निरागसता जपणं हे फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे; पण त्याहीपेक्षा जास्त आव्हान आहे ते मुलांमध्ये वाढत चाललेल्या व्यक्तिकेंद्रीपणाचं. बायोस्कोप ते ओटीटी हा प्रवास हा सार्वत्रिकतेकडून व्यक्तिके ंद्रीपणाकडे चालल्याने जास्त आव्हानात्मक ठरतो आहे. त्यांना कु ठला ‘स्कोप’ देता येईल?