vaatस्वातंत्र्याचा स्वच्छ सूर्यप्रकाश दिसण्याचं स्त्रीचं स्वप्न पूर्ण कधी होईल माहीत नाही; परंतु अंधार तर फिटू लागला आहे.. सुरुवातीपासूनच खाचखळग्यांच्या या वाटेवर अद्यापही ती ठेचकाळते आहे, पण निदान आता मुक्काम दिसू लागला आहे.. पण चालून आलेली वाट किती काटय़ाकुटय़ांची होती, रक्तलांच्छित करणारी होती हे फक्त ती वाट चालून आलेल्यांनाच माहीत. स्त्रीच्या आताच्या काहीशा स्वातंत्र्याला कारणीभूत ठरले ते लढे, संघर्ष, चळवळी. कोणते होते ते लढे? यांचा घेतलेला हा मागोवा, दर पंधरा दिवसांनी.

वेगवेगळ्या पातळीवरच्या, वेगवेगळ्या जगण्यातल्या स्वातंत्र्याचा अर्थ तिला कळू लागला आहे. पण ही वाट वळणावळणाची होती, अवघड घाटांची, कधी उंच चढाची, कधी एकदम खोल उताराची. तरी आपण सगळ्याजणी इथवर येऊन पोचलो. आता पायात शक्ती आहे, आपले हात हेच आपले दिवे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, जिद्द आहे, आपण हवे ते करू शकतो; जे करिअर करायची इच्छा असेल तिचं आव्हान स्वीकारू शकतो. आज किती तरी जणी उच्च शिक्षण घेऊन महत्त्वाकांक्षेच्या भराऱ्या मारताहेत.  आणि आकाश असीम आहे, जिथवर नजर पोचते, तिथवर आपले क्षितिज आहे. कोणी प्राध्यापक आहे, कोणी डॉक्टर,कलेक्टर, कोणी आयुक्त, कोणी पोलीस इन्स्पेक्टर, कोणी पायलट, कोणी राजकारणी, कोणी उद्योजक. जीवनाच्या आव्हानाचं एखादंच क्षेत्र असेल, जिथे स्त्रीच्या जिद्दीने तिला पोचवलं नाही. काय आहे या स्त्रीचं सामथ्र्य? तिच्याकडे शिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, पैसे मिळवायची कुवत आहे, ते कसे खर्च करायचे याची जाण आहे, ती स्वावलंबी आहे, जगण्याची लढाई स्वत:च्या क्षमतेवर लढण्याची तिची ताकद आहे.  
     प्रवास इथवर झाला खरं, पण वाटेत संघर्ष होते, लढे होते, परंपरांच्या मणामणाच्या शृंखला पायात बेडय़ांसारख्या होत्या, रीतिरिवाजांचे काच गळ्यापर्यंत होते. पुरुषांच्या व्यसनांनी मोडून पडलेल्या संसाराचं आव्हान होतं. महागाई, बेकारी, भ्रष्टाचारविरोधातल्या चळवळी खुणावत होत्या. स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार, अपहरण, व्यापार यासारख्या असंख्य समस्यांची जाळी होती. धर्म आणि पुरुषप्रधान संस्कृतीने लादलेल्या बंधनांच्या भिंती होत्या आणि मुख्य म्हणजे स्वत:चं स्वत:शी भांडण होतं, स्वत:चीच स्वत:ला ओळख नव्हती, पण गेल्या शंभर-दीडशे वर्षांच्या काळात एकेक काच तुटत गेला, एकेक बंधन मोडत गेलं, कधी सामाजिक तर कधी वैयक्तिक स्तरावर, कधी मोर्चे काढून तर कधी निषेधाचं शस्त्र उगारून. कधी हातात लेखणी धरून तर कधी बंड करून एकेक अडथळे आपण पार करत गेलो. आजही सगळे लढे संपलेले नाहीत, पण आता लढण्याचं भान आहे.
मागे वळून पाहताना एकेका वळणावरच्या लढाईचा प्रवास पाहत गेलो तर पुढच्या प्रवासाला अधिक जोम येईल, मागच्या उजेडात कदाचित पुढची वाट अधिक सुकर होईल, मागचे लढे उद्याच्या लढय़ाची स्फूर्ती देतील. मागे दूरवर पाहताना स्त्रिया सक्षम होण्याची धुसर सुरुवात जिथे निर्माण झाली ते १९वं शतक मला खुणावतं आहे. मला दिसतं आहे नवरा गेल्यावर त्याच्या पाठोपाठ चितेवर उडी मारून जिवंतपणी मरण पत्करणारी सती. तिला धर्माची धास्ती आहे, पतीमागे जिवंत राहिल्यावर सोसाव्या लागणाऱ्या अनंत यातनांची भीती आहे, पातिव्रत्याच्या मनावर सतत बिंबवल्या जाणाऱ्या श्रद्धांचं ओझं तिच्या मनावर आहे. अशा हजारो स्त्रियांचं मूक आक्रंदन आपल्या आजच्या स्वतंत्र विचारांच्या पाठीमागे काळ्या ढगासारखं लपलेलं आहे. मला ऋणी राहावसं वाटतं आहे ते राजा राममोहन राय यांचं. १८२६ मध्ये झालेल्या सतीबंदीच्या कायद्याचं. स्त्रियांच्या जगण्यातला पहिला अडथळा तर पार पडला.
पण सती नाही गेली तरी विधवा स्त्री कुठे सुखी होती? ‘पण लक्षात कोण घेतो’मधल्या केशवपन झालेल्या तरुण यमूचा चेहरा डोळ्यापुढून हलत नाही. केशवपन करावे लागल्यावर डोळ्यातून घळघळ ओघळणाऱ्या अश्रूंनी डबडबलेल्या चेहऱ्याच्या बाया कर्वे, पार्वतीबाई आठवले आणि नामोनिशाणी पुसून गेलेल्या हजारो स्त्रिया. तरुण वय, दडपून टाकलेल्या सुप्त इच्छा, ना चांगले वस्त्र, ना अलंकार, ना चांगलेचुंगले खाण्याची परवानगी, ना कोणाशी मनातले बोलण्याची सोय! पण अशा या नैराश्याच्या ढगांमधूनसुद्धा आशेचे किरण चमकू लागलेले दिसतात. श्रीमाळी ब्राह्मण समाजातली एखादी विधवा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन यांना पत्र लिहण्याचं धाडस करते, तेही १८५५ साली. तिची मागणी असते केशवपनावर कायदेशीर बंदी आणावी. सक्तीचं वपन झालं तर नातेवाईकांना आणि न्हाव्याला शिक्षा व्हावी. या एकीचा आवाज त्या काळच्या हजारो मूक स्त्रियांचा आवाज होता. सारा समाज या जुन्या रूढींचे पालन आंधळ्या विश्वासाने करत असताना जोतिबा, सावित्रीबाईंसारखे पती-पत्नी या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस दाखवतात. पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या स्त्रियांची गुपचूप बाळंतपणाची सोय करतात, त्यांच्या अनाथ मुलांसाठी आश्रम काढतात. मला खुणावताहेत आगरकरांच्या ‘सुधारका’मधील तेजस्वी विचार, जे स्त्रीचंशिक्षण, स्वातंत्र्य याबद्दल त्या काळाला ना रुचणारी मतं निर्भीडपणे मांडतात.
‘म्हातारा इतुका ना अवघे पाऊणशे वयमान, लग्ना अजुनी लहान’ हे शारदा  नाटकातलं गाणं आठवतंय ना? ते ‘नाटक’ होतं, म्हणून तिला कोदंडासारखा तरुण पती शेवटी भेटला आणि म्हाताऱ्याशी लग्न करण्याच्या संकटातून तिची सुटका झाली, पण अशा हजारो शारदा त्या वेळी प्रौढ आणि म्हाताऱ्यांशी लग्न करून रजोदर्शनापूर्वी मुलीचा विवाह झाला पाहिजे या रूढीला बळी पडल्या. पण आशेचा एक किरण होता तो म्हणजे संमती वयाच्या चर्चेत आणि वादविवादामध्ये प्रथमच स्त्रियांचा आवाज उमटू लागला होता. १८९०मध्ये मुंबईच्या सुमारे दोन हजार स्त्रियांनी संमती वयाच्या वाढीला पाठिंबा देणारा अर्ज सह्या करून सरकारकडे पाठवला. याच वर्षी झालेल्या सामाजिक परिषदेसाठी पंडिता रमाबाई, काशीबाई कानेटकर वगैरे आठ स्त्रिया हजर राहिल्या. १४ वर्षांखालील मुलींवर गर्भाधान संस्कार होऊ  नये, असा ठराव करण्यात आला. पुण्यातूनही अशा प्रकारच्या अर्जावर तीनशे स्त्रियांनी सह्या केल्या. स्त्रियांना आपल्या प्रश्नांसंबंधी जाग येऊ  लागली होती याचीच ही सुरुवात नव्हती का? ‘स्त्रियांनी बंड केल्यावर पुरुषांचे काही चालेनासे होऊन त्यांना निमूटपणे मान तुकवावी लागेल,’ हे न्या. रानडय़ांचे भाकीत पुढच्या काळात स्त्रियांनीच खरं करून दाखवलं.
यानंतरच्या एका छोटय़ाशा वळणावर मला दिसते आहे हातात पुस्तकं घेऊन शाळेत जाणारी स्त्री. शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्याची आस तिच्यात होती. बायका शिकल्या तर विधवा होतील, प्रियकराबरोबर पळून जातील, वडीलधाऱ्यांचा उपमर्द करतील वगैरे धाकधपटशांना मागे ठेवून स्त्री चक्क शाळा शिकायला घराबाहेर पडली, सगळ्या विरोधांना न जुमानता. स्त्रीच्या व्यक्तिविकासातील ही पहिली पायरी होती. १८२४ पासूनच मिशनऱ्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या होत्या आणि १८५० मध्ये काढलेल्या शाळेत स्वत: सावित्रीबाई शिकवू लागल्या होत्या. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या आणि शिकणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढू लागली. बालपणीचा विवाह अमान्य करण्याचं धाडस डॉ. रखमाबाईंना शिक्षणानेच दिलं आणि वैद्यकीय शिक्षणाच्या ध्यासापोटीच आनंदीबाई जोशी अमेरिकेला गेल्या. स्त्री-शिक्षणासाठीच पंडिता रमाबाईंनी अमेरिकेत व्याख्यानं देऊन ३०००० डॉलर्स जमा केले. कॉरनेलिया सोराबजीला मुंबई विद्यापीठाने प्रवेश नाकारला, ऑक्सफर्ड आणि अलाहाबाद येथेही वकिलीच्या परीक्षा देऊन पदवी नाकारण्यात आली, तरी त्या यशस्वी वकील झाल्या. अपमान, विरोध, टीका, एवढंच काय प्रसंगी घरच्यांनी दिलेल्या शिक्षा भोगतही त्या काळातल्या स्त्रिया शिकत राहिल्या. आपल्या आज्या-पणज्यांनी त्यांच्या हातात आलेले हे दिवे समर्थपणे आपल्याकडे सुपूर्त केले, म्हणूनच आज खंबीरपणे वाऱ्यावादळाशी सामना करत आपण आपले पाय रोवत उभ्या आहोत.
स्त्रीच्या अंधाऱ्या आयुष्याची पहाट तर झाली होती, आणि अंधार फिटल्यावर सूर्याची किरणंही लवकरच चमकू लागतात, नाही का?
डॉ. अश्विनी घोंगडे -ashwinid2012@gmail.com