News Flash

ज्येष्ठांचे लिव्ह इन : चढ-उतारातला समतोल..

बेलाचे वेंकीला फोन यायचे. हळूहळू वेंकी आणि शुभामध्ये वितुष्ट येईल असे प्रयत्नही बेलानं सुरू केले.

सरिता आवाड sarita.awad1@gmail.com

‘किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया..’ दोघांची अशी अवस्था झाली आणि त्यांच्या सहजीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण नात्यात चढउतार यायचेच, तसे सुखाच्या शिखरावर असताना खाली कोसळण्याची अवस्था त्यांच्याही नात्यात आली.  तो काळ दोघांच्या कसोटीचा. मात्र  शुभा आणि वेंकीच्या सहजीवनातला तो उतार शुभाच्या कणखर प्रगल्भतेनं तोलून धरल्याने त्या नात्याची घसरण आता थांबली आहे.. कसा आहे या दोघांच्या सहा वर्षांच्या सहजीवनाचा प्रवास.. नातं टिकवण्यासाठी चढ-उतारातला समतोल कसा साधायचा हे शिकवणारा हा  उत्तरार्ध..

गेल्या लेखात (५ जून) म्हटल्याप्रमाणे शुभा-वेंकीच्या सहजीवनाला सुरुवात झाल्याच्या निमित्तानं एक छोटासा समारंभ पार पडला. शुभाच्या आई-वडिलांच्या घराजवळच त्यांनी एक घर भाडय़ानं घेतलं आणि सुरू झालं दोघांच्याही आयुष्यातलं निखळ आनंदपर्व. सगळं आयुष्य सैन्यात गेलेल्या, एकल पालकत्व जबाबदारीनं निभावलेल्या वेंकीला संसार करणं, पाहुण्यांची सरबराई करणं, घर सजवणं, बागकाम करणं, नव्या पदार्थाचा दिलखुलास आस्वाद घेणं, अशा सगळ्याचंच अप्रूप होतं. हे नवं वळण आयुष्यात आणणाऱ्या, शुभाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं त्याला झालं होतं. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर नवी झळाळी आली. त्याच्या मित्रांनाही हा बदल जाणवला. मित्रांची  मैफल बऱ्याचदा शुभा-वेंकीच्या घरात जमायला लागली.  स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेणाऱ्या वर्गामध्ये वेंकी गणित आणि पदार्थविज्ञान शिकवत होता. संसार आणि काम दोन्ही आघाडय़ांवर वाटचाल सुरू होती.

शुभासुद्धा खूष होती. विशेष म्हणजे तिचे पाय घट्ट जमिनीवर होते. विचारांत प्रगल्भता होती. आता सहजीवनाचं पर्व सुरू होणार असं नक्की झाल्याबरोबर तिनं काही गोष्टींची खात्री करून घेतली. आर्थिक बाबतीत आपण स्वावलंबी राहायचं असा ठाम निर्णय तिनं घेतला होताच. घराचा खर्च दोघांनी वाटून घेण्याचा तिचा आग्रह होता. वेंकी दर २६ तारखेला सहजीवनाचा महिन्याचा वाढदिवस म्हणून तिच्यासाठी छानशी साडी आणायचा. मग तीही त्याच्यासाठी त्याला आवडेलशी भेट आणायची. भेटींचा ओघ एकतर्फी राहू नये अशी ती काळजी घ्यायची. दागिने घेण्याचा वेंकीचा आग्रह होता खरा, पण शुभा त्याला बळी पडली नाही. आपल्या राहाणीमानाचा आलेख अचानक वर जाणार नाही याची तिनं काळजी घेतली. अशी जपून पावलं उचलली तरी तिचं राहाणं, दिसणं लक्षात येईलसं बदललं. विद्यापीठात जाताना ती निगुतीनं, नीटनेटकं जायला लागली. चेहरा उजळला. हालचालींमध्ये आत्मविश्वास आला. ते जुनं गाणं आठवतंय ना.. ‘किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया..’ अगदी तसाच अनुभव!

आणखी एक महत्त्वाचा बदल झाला. वेंकी येण्याच्या आधी शुभा आणि तिच्या आईचं नातं काहीसं तणावपूर्ण होतं. आई हुशार, कार्यक्षम होती. पण दोघी दोन निराळ्या पातळ्यांवर जगत होत्या. आपल्या गोड, आदबशीर वागण्यानं वेंकीनं आईचं मन जिंकलं. शुभा आणि आईमधला तो दुवा झाला. त्या दोघींमधला दुरावा संपला. वेंकीला धार्मिक समारंभ करण्याची खूप हौस. शुभालासुद्धा सणवारांची ओढ होती. साहजिकच दोघं मिळून समारंभांची तयारी करायचे. वेंकीच्या हौसेखातर गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी शुभानं सुवर्णगौर बसवली. आपल्या लेकाच्या (गणपतीच्या) स्वागताची नीट तयारी झालीय ना अशी खात्री करून घ्यायला ही गौर येते अशी कल्पना!

एक दिवस बाजारहाट करायला बाहेर पाडलेल्या शुभाचा पाय मुरगळला. घोटय़ाला बारीकशी इजा झाली. मग काय.. वेंकीनं तिची इतकी काळजी घेतली की ज्याचं नाव ते. सगळ्या गोष्टी हातात दिल्या. तिच्या मैत्रिणींना बोलावून त्यांची सरबराई केली, तिची आवडती गाणी काय लावली, अगदी नाचूनसुद्धा दाखवलं. कुणी आपल्यासाठी इतकं काही करतंय याचा शुभाला तिच्या छप्पन्न वर्षांच्या आयुष्यात अनुभवच नव्हता. शुभा सुखाच्या शिखरावर होती. होय, शिखरच म्हणायला हवं, कारण पुढे अनपेक्षित उतार होता. अचानक एक दिवस शुभाच्या मोबाइलवर बेलाचा- (जिच्याबरोबर पूर्वी ‘लिव्ह-इन’मध्ये राहाण्यासाठी वेंकी दिल्लीला गेला होता आणि आपले सूर जमणार नाहीत असं वाटून परत आला होता.) मेसेज आला. त्यात तिनं वेंकीची चौकशी केली होती. शुभाला या मेसेजचं विशेष काही वाटलं नाही. संध्याकाळी घरी आल्यावर सहजपणानं असा मेसेज आल्याचं तिनं वेंकीला सांगितलं. त्याबरोबर वेंकीचा नूरच पालटला. ‘असा कसा तिचा मेसेज आला? तिला तुझा नंबर मिळालाच कसा? तुमचं माझ्या अपरोक्ष बोलणं होतं का? काय बोलली आहे ती? ’ एक ना दोन. शुभावर प्रश्नांचा भडिमार सुरू  झाला. वेंकीचं ते रूप शुभाला अनोळखी होतं. जेवण न करता वेंकीनं मद्यपान करायला सुरुवात केली. त्याचं बोलणं थांबलं. चेहरा भेसूर दिसायला लागला. रात्रभर दोघांच्या डोळ्याला डोळा लागला नाही.

दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी एकू ण काय झालंय याचा शुभाला अंदाज आला. वेंकीच्या सैन्यातल्या मित्रांनी बेला आणि वेंकीची ओळख करून दिली होती. बेलाचे वडील सैन्यात अधिकारी होते. बेलाच्या नाजूक तब्येतीमुळे तिचं लग्न झालं नव्हतं. ती एका कंपनीत अधिकारी होती. वेंकी तिच्या घरी काही महिने राहिला होता. तिथे बेलाचा स्वभाव, तिचं राहणीमान, याच्याशी वेंकीला जमवून घेता आलं नाही आणि तो परत आपल्या गावी आला. त्याच्या लेखी हे नातं संपलं होतं. पण बेला कदाचित अजूनही त्याच नात्यात गुंतली  होती किंवा तिला नाकारून वेंकीनं आणखी कुणाशी नातं जुळवणं तिला सहन होत नव्हतं. वेंकीला तिच्या प्रतिक्रियेचा अंदाज असावा. त्यामुळे त्याच्या आणि शुभाबद्दल बेलाला काहीही कळू नये अशी तो काळजी घेत होता. सहजीवनाच्या आरंभी आयोजित के लेल्या समारंभाला वेंकीकडून तो एकटाच का आला, याचा शुभाला आता उलगडा झाला.

विचार करता कायदेशीर लग्न आणि ‘लिव्ह-इन रिलेशन’मधला एक फरक शुभाच्या लक्षात आला. लग्नसंबंधाच्या आरंभी तसंच शेवटीही कायद्याचं शिक्कामोर्तब असतं. त्यामुळे घटस्फोट घेतला असेल तर संबंधित दोघांच्याही नात्याचा शेवट गृहीत असतो. याउलट ‘लिव्ह-इन’च्या संबंधाचा आरंभ आणि शेवट कायद्याच्या परिघापलीकडे असतो. त्यामुळे दोघांच्याही बाबतीत नात्याचा शेवट झाल्याचं गृहीत धरता येत नाही. आपल्या नात्याचा शेवट झाला आहे, असं वेंकी म्हणाला. त्यावर आपण विश्वास ठेवला. पण त्याच वेळी बेलाकडेही चौकशी करायला हवी होती. तिला वाटलं, आपण बेलाला गृहीत धरण्याची चूक केली.

आपली चूक झाली खरी, पण वेंकीचं काय? नातेसंबंधांच्या बाबतीत वेंकीची पाटी अगदी कोरी करकरीत असेल अशी तिची अपेक्षा नव्हती. पण त्यानं पारदर्शकपणे पूर्ण परिस्थिती सांगितली नव्हती. शुभाच्या मनावर या वंचनेचा ओरखडा उठला. ‘मी बेलाच्या नात्यातून बाहेर पडलो आहे, तुझ्या सहवासात मी सुखात आहे’ अशी ग्वाही वेंकी पुन:पुन्हा देत होता. पण शुभाच्या नजरेत आता संशयाचं सावट आलं होतं. आता एक झालं, की शुभाच्या समोर वेंकी बेलाचे फोन घ्यायला लागला. अशाच एका संभाषणात ‘माझी तब्येत खूप बिघडली आहे, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे,’ असं बेलानं सांगितलं. त्यामुळे अनिच्छेनं का होईना, वेंकी दिल्लीला निघाला. ही अनिच्छा म्हणजे दाखवायचे दात आहेत की खायचे, असा प्रश्न शुभाच्या नजरेत तरळला. पण अडचणीत असलेल्याला कसंही करून मदत करण्याचा त्याचा स्वभाव लक्षात घेऊन शुभानं त्याचं दिल्लीला जाणं समजून घेतलं. पण दिल्लीला गेल्यावर वेंकीनं शुभाचा फोन ‘ब्लॉक’ केला. आपल्याला सोयीचं असेल तेव्हाच तो ‘अनब्लॉक’ करून बोलायचा. तेसुद्धा मनावर दडपण असल्यासारखा. परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर आल्यावर मात्र तो शुभाशी बांध फुटल्यासारखा धो-धो बोलायला लागला. घरी आल्यावर ‘सुटलो बुवा’ असा आविर्भाव! ‘बेलाशी नातं संपलं, तरी तिच्यासाठी तू इतकी दगदग का करतोस?’ या शुभाच्या प्रश्नाला त्याचं उत्तर म्हणजे ‘कुठल्या नात्यात किती अंतर राखायचं ते मला समजतं’. या उत्तरानं शुभा चमकली. सगळ्या नातेसंबंधांचं नियमन आपल्या मुठीत ठेवणारा वेंकीमधला पुरुष तिला या उत्तरातून दिसला. तोपर्यंत तिच्या लेखी त्यांचं नातं एकाच पातळीवर होतं. अगदी ‘दोन मनांची उघडी दारे, त्यात खेळते वसंत-वारे’ असावेत तसं. पण वरवर खुल्या वाटणाऱ्या नात्याच्या किल्ल्या वेंकीच्या हातात आहेत, निदान त्याला तसं वाटतं, याची तिच्या मनानं नोंद घेतली. बेला आणि वेंकीच्या नात्याबद्दल शुभा वेंकीशी बोलायचा निष्फळ प्रयत्न करायची. वेंकी खोलात न जाता विषय बदलायचा. अशा वेळी कुणाला तरी जेवायला बोलवायचा घाट घालायचा किंवा खरेदीला बाहेर जायची टूम काढायचा. या वेंकीच्या युक्त्या शुभाला माहितीच्या झाल्या. तिनं एकदा विचारलं, की आपलं सहजीवन सुरू  झाल्यावर माझ्या आयुष्यात दुसरी कोणी व्यक्ती आहे असं तुला कळलं असतं, तर तुझी काय प्रतिक्रिया असती?’ यावर वेंकीनं, ‘असं घडणंच अशक्य आहे’ असं म्हणून विषय संपवला.

हा एक विषय सोडला तर त्यांचं आयुष्य सुखात चाललं होतं. सुखातही सावध असलेल्या शुभाला वेंकीमधला ‘पुरुष’ जाणवायला लागला होता. एकदा गॅस संपल्यावर शुभानं कोठीच्या खोलीतून भरलेला सिलिंडर आणून सहज बसवला. वेंकीला याचं मोठं नवल वाटलं. विद्यापीठात काही कारणानं उशीर झाला तरी शुभा अंधार पडलेला असून एकटी घरी यायची. ‘रात्र झाली असूनही मला सोबतीसाठी बोलावत कशी नाही’ याचं त्याला आश्चर्य वाटायचं. ‘अंधाराची बेलाला भीती वाटते’ असं एकदा तो बोलून गेला. त्याची स्वप्रतिमा स्त्रीला आधार देणाऱ्याची आहे हे शुभा समजली. पण या स्वप्रतिमेत स्त्रीला आधार लागतोच असं गृहीत आहे, हेही लक्कन तिला जाणवलं. ‘स्वाधार हाच आधार’ मानणाऱ्या शुभाला वेंकी आधार म्हणून नाही, तर संवादी सूर म्हणून हवा होता, हे तिच्या लक्षात आलं. बेलाचे वेंकीला फोन यायचे. हळूहळू वेंकी आणि शुभामध्ये वितुष्ट येईल असे प्रयत्नही बेलानं सुरू केले. मग मात्र शुभामधलं पोलाद कणखर झालं. शांत आवाजात तिनं वेंकीला सांगितलं, ‘तुला बेलाकडे जायचं असेल तर जरूर जा, पण माझ्यापाशी राहून स्वत:ची अशी दोन शकलं करू नकोस. तू गेलास तर मला दु:ख होईल, पण त्यानं मी मोडून पडणार नाही हे लक्षात ठेव. कुठे राहायचं हा निर्णय तुझाच आहे. तो तू ठामपणे घ्यावा. त्या निर्णयाची तुला किंमत द्यायला हवी.’ शुभाच्या या भक्कम भूमिकेमुळे वेंकीच्या मनातलं वादळ हळूहळू शांत होतंय..

सकाळी आलेल्या शुभाचा मेसेज आता मला वेगळा भासतोय, – ‘आज आमच्या सहजीवनाला सहा वर्ष पूर्ण झाली. थोडय़ा खाचाखोचा, तीव्र उतार.. किंचित चढाव. भासमान का असेना, पण आयुष्याला पूर्णत्व आलं. रिकाम्या बिखरलेल्या कणाकणात भरून राहिलं. ही सारी तुमच्या सर्वाच्या शुभकामनांची फळं आहेत. याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही आपल्या नित्य ऋणात..

शुभा आणि वेंकी.’

हे वाचून माझे डोळे पाणावतात आणि उभयतांसाठी माझ्या मनात निर्मळ शुभेच्छा अंकुरतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 1:08 am

Web Title: article bout living relationship in old couple unmarried older couples living together zws 70
Next Stories
1 व्यर्थ चिंता नको रे : मनाचा ‘ब्रेक’..
2 मी, रोहिणी.. : डॉक्टर!
3 वसुंधरेच्या लेकी : पर्यावरणलढय़ातले आपले शिलेदार
Just Now!
X