पती पत्नीमुळे, पत्नी पतीमुळे किंवा आई मुलांमुळे वैतागलेली असते.  प्रत्येक व्यक्ती त्रासलेली, गांजलेली असते, पण आपल्या त्रासाचं कारण ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीत, परिस्थितीत शोधत असते. प्रत्येकाला वाटत असतं की, या त्रासाचं कारण कुठे तरी बाहेर आहे. पण नाही, दु:खाचे कारण आपल्या आत असते. ते नाहीसं करा.
जी वन, जगणं, आयुष्य काहीही म्हटलं तरी ते असंच आहे, त्यात ताणतणाव आहेत, चिंता आहेत. विषय भलेही बदलोत. माणूस तर तोच आहे ना? दोन हजार वर्षांपूर्वी तुम्ही बैलगाडी चालवत होतात, आता तुम्ही कार चालवता, पण चालक तोच आहे. माणूस बदललेला नाही. बैलगाडी बदलली. वस्तू बदलल्या. आधी तो बैलगाडीसाठी चिंतेत असायचा, तणावग्रस्त असायचा. आता तुम्हाला कारची चिंता वाटते. त्याचा ताण येतो. विषय बदलत असले तरी मन तेच राहातं.
तुम्हाला जर असं वाटत असेल की, आधुनिक जीवन चिंता आणि ताण यांनी भरलेलं आहे, तर ते खरं नाही. या चिंताचं कारण तुम्ही स्वत: आहात. तुम्ही कोणत्याही संस्कृतीमधले असा, कुठेही राहात असा, चिंतेतच राहाल. कारण चिंतेचं कारण तुम्ही परिस्थितीत शोधता.
कधी कधी असं होतं की, शहरांमध्ये वाहतुकीच्या आवाजांमुळे तुम्ही त्रासून जाता आणि म्हणता ही गर्दी, हा गोंगाट यामुळे रात्ररात्र झोप येत नाही. मग गावाला जा. तिथेसुद्धा झोप येणार नाही, कारण काय तिथे गर्दी, गडबड नाही. गोंगाट नाही. तुम्हाला परत शहराकडे यावंच लागेल. कारण गाव अगदी कळाहीन प्रेतासारखं वाटू लागेल. त्यात काहीच जान नाही असं वाटू लागेल. तुम्ही तेच आहात. कुठेही जा. ताण आणि चिंता बरोबर वागवत जाणारच.
लोक पुष्कळदा अशा तऱ्हेचे अनुभव मला कथन करतात. माझ्या एका मित्राला मी काश्मीरला, पहलगामला जायचा सल्ला दिला. परत आल्यावर तो म्हणाला, ‘तिकडे आयुष्य अगदीच निरस आहे. तिथे कसलं जगणं? ते जगणंच नव्हे. तिथे दोन-चार दिवस पहाडा-पर्वतांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये बरं वाटतं. त्यानंतर कंटाळा यायला लागतो.’ हाच माणूस म्हणायचा की, ‘शहरातल्या या आयुष्यानं डोकं भणभणायला लागलं.’ त्याच माणसाला निसर्गसुंदर पहाडांमध्ये कंटाळा आला. तो परत यायला आतुर झाला.
  समस्या त्या स्थळांमध्ये नाही. तुमच्यात आहे. काश्मीर काही मदत करू शकणार नाही, कारण मुंबई, लंडन, न्यूयॉर्क ही स्थळे बेचैन करीत नाहीत, बेचैनीचं कारण तुम्ही स्वत: आहात. लंडन किंवा मुंबईनं तुम्हाला बनवलं नाही. तुम्ही त्या शहरांना बनवलं आहे. जरा विचार करा. कारण तुमच्या आत दडलेलं आहे. आवाज, गोंधळ यामुळे तुम्ही तणावग्रस्त नाही. उलटपक्षी तुम्ही तणावग्रस्त असल्यानं आवाज, गोंधळ, गडबड होत आहे. त्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. ती तुमची जणू गरज बनली आहे.
शहरातले लोक तणावग्रस्त, दु:खी असतात. तसेच गावातले लोकसुद्धा असतात. ते मुंबई, लंडन, न्यूयॉर्ककडे धाव घ्यायला बघतच असतात. या गोष्टीला ते इतके आतुर झालेले असतात की, संधी मिळताच ते तिकडे धाव घेतात आणि तीही मी ऐकत असतो; पण ही चर्चा करणारी मंडळी कधी एखाद्या खेडय़ात जाऊन राहात नाहीत. तशी त्यांच्या मनाची तयारी नसते, पण खेडय़ातल्या जीवनाच्या बाता मात्र लंब्याचौडय़ा मारतात. कुणी अडवलंय तुम्हाला? जात का नाही? जा. जंगलात जा. कुणी थांबवलंय तुम्हाला? पण ते तुम्हाला आवडणार नाही. सुरुवातीचे दोनचार दिवस बदल झाल्यामुळे बरं वाटेल. मग कंटाळून जाल. सर्व निरस, फिक्कं वाटेल, तिथून पळून यावंसं वाटेल. पुन्हा आपल्या नागरी जीवनाकडे परतावंसं वाटेल.
हे शहरी जीवन म्हणजे तुमच्या विक्षिप्त मनाची निर्मिती आहे. या नगरांमुळे तुम्ही वेडे होत नाही. तुमच्या वेडसर मनामुळे ही शहरे अशी बनली आहेत. ही शहरे तुमच्यासाठी निर्माण झालेली आहेत. तुम्ही त्यांना बनवलं आहे. जोपर्यंत तुमचं वेडं मन बदलत नाही तोपर्यंत ही असली शहरं संपुष्टात येणार नाहीत. ती अस्तित्वात राहणारच! ती तुमची उपउत्पत्ती आहे. वेडसर मनानं कार्य करता करता त्यातून सहजी झालेली उत्पत्ती आहे.
एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा. ज्या ज्या वेळी तुम्हाला असं वाटेल की, एखादी गोष्ट चूक आहे, कुठे तरी काही तरी चुकतंय, त्या त्या वेळी चुकीचं कारण आपल्या आत शोधा. अन्यत्र शोधायला जाऊ नका, शंभरांपैकी नव्याण्णव वेळा तुम्हाला आपल्या आतच कारण मिळेल. तर शंभराव्या कारणाला आपोआप रजा मिळेल. तुम्हाला जे काही होतं त्याचं कारण केवळ घटना, प्रतिबिंबित करीत जातं.
पण कारण अन्य ठिकाणी शोधण्यामुळे मनाला एक सांत्वन मिळतं की, मी चूक केली नाही, तुमच्या मनाला अपराधी वाटत नाही. अजाणता मनात निर्माण होणारी आत्मनिंदा अनुभवावी लागत नाही. तुम्ही इतरत्र शोधलेले कारण समोर करून म्हणू शकता. या चुकीचं हे बघा कारण. हे कारण नाहीसं होईपर्यंत मी तरी काय करणार? त्या कारणाच्या मागे तुम्ही लपता. त्याची ढाल करता. ही लबाडी आहे. म्हणून घडलेल्या चुकीच्या गोष्टीचं आपल्या आत लपलेलं कारण आपलं मन बाह्य़ जगात प्रक्षेपित करीत असत. पत्नी पतीमुळे त्रासलेली असते. त्या त्रासाआधी स्वत:चं चुकीचं वागणं ती तपासून बघत नाही. त्या वागण्यावर कदाचित प्रतिक्रिया म्हणून वैतागून पतीची वागणूक त्रासदायक झालेली असू शकते.
आई मुलांमुळे वैतागलेली असते. मुलं वडिलांच्या वागण्यामुळे चिडलेली, त्रासलेली असतात. प्रत्येक व्यक्ती त्रासलेली, गांजलेली असते, पण आपल्या त्रासाचं कारण दुसऱ्या व्यक्तीत, परिस्थितीत, अन्य घडामोडींत शोधत असते. प्रत्येकाला वाटत असतं की, या त्रासाचं कारण कुठे तरी बाहेर आहे. पण, दु:खाचे कारण आपल्या आत असते.
मुल्ला नसरुद्दीन एका रस्त्यावर चालला होता. संध्याकाळची वेळ होती. अंधारलं होतं. अचानक त्याच्या लक्षात आलं की, रस्ता सुनसान आहे. कुणीच नाही वाटेत. त्या विचारानं तो भयभीत झाला. त्याच वेळी त्याला समोरून लोकांचा घोळका येताना दिसला. त्यानं चोर, डाकू, दरोडेखोरांबद्दल वाचलं होतं. ते आठवल्यामुळे त्याच्या मनात भय निर्माण झालं. तो भीतीनं कापू लागला. त्याला वाटलं हे खुनी डाकू येताहेत. ते आपल्याला ठार करणार. आता आपला जीव कसा वाचवावा? त्यानं सगळीकडे पाह्य़लं. जवळच एक कबरस्तान होतं. त्याच्या भिंतीवरून उडी मारून तो आत गेला. तिथे त्याला कबरीकरिता नुकताच खोदलेला खड्डा दिसला. त्याला वाटलं यात मेल्याचं सोंग करून पडून राहावं. पाठीमागून येणाऱ्या डाकूंना वाटेल हा तर मेलेला मुडदा दिसतोय. याला मारून काय मिळणार! ते निघून जातील. असा विचार करून तो त्या अर्धवट बांधलेल्या कबरीत निपचित पडून राहिला.
तो येणारा घोळका म्हणजे एक वरात होती. डाकूंची टोळी नव्हती. लोकांनी मुल्लाला धावताना आणि कबरीच्या खड्डय़ात उडी मारताना पाहिलं. हे बघून ते घाबरले. विचार करायला लागले की, हे काय चाललं आहे, हा माणूस कोण आहे, हा काही तरी उपद्रव करेल. त्याच हेतूनं हा लपला आहे. वरात कबरस्तानाजवळ थांबली. त्यातले लोक कुंपणाची भिंत ओलांडून आत शिरले. इकडे मुल्ला खूपच घाबरला. वरातीचे लोक त्याच्या खड्डय़ाच्या बाजूला जमा होऊन विचारू लागले, ‘तू इथे काय करतो आहेस? या कबरीत का आडवा झाला आहेस?’ सारी गोष्ट लक्षात आल्यावर मुल्ला म्हणाला, ‘तुम्ही खूप कठीण प्रश्न विचारता आहात. माझ्या इथे असण्याला तुम्हीच कारण आहात आणि तुमच्या इथे असण्यालाही मीच कारण आहे.’
हे असंच सगळीकडे घडत आहे. तुमच्या त्रासाचं, हाल होण्याचं कारण कुणी दुसरे आहेत आणि दुसऱ्यांच्या त्रासाचं कारण तुम्ही स्वत: आहात. तुम्ही सगळे मिळून आपल्या चारी बाजूंना काही निर्माण करता, प्रक्षेपित करता आणि मग स्वत:च भयभीत होता. तुम्हाला दहशत बसते आणि मग आपल्या संरक्षणाचे उपाय करीत बसता. मग दु:ख आणि निराशा अनुभवाला येते. द्वंद्व आणि विषाद मूळ धरतो. भांडणं होतात. सगळं काही मूढपणाच्या पातळीवर उरतं. जोपर्यंत तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत हा घटनाक्रम असाच चालत राहाणार. म्हणून माझं सांगणं असतं की, नेहमी आपल्या आत त्रासाचं, दु:खाचं कारण शोधा. बाह्य़जगात याचा शोध घेऊन हाती काहीही येणार नाही.
(मनोविकास प्रकाशनाच्या ‘ओशो विचारदीप’ या डॉ. राजन भोसले यांनी संपादित केलेल्या, माधवी कुंटे अनुवादित पुस्तकातील हा भाग, साभार.)