25 February 2021

News Flash

शोषितांचे लढे

डिहग्लज त्यांचे गाव. गडिहग्लजही फार कोणाच्या चटकन ध्यानात येण्याची शक्यता नाही.

सुत्तडगुत्तड : राजन गवस

शोषितांचे लढे हेच विठ्ठल बन्ने सरांचं आयुष्य बनलं होतं. याला खंबीर नेतृत्व होतं वकील श्रीपतराव शिंदे  यांचं. देवदासी, डोंबारी, भटके, कंजारभाट, बेरड रामोशी यांच्यासाठीचा लढा त्यांनी उभा केला. माणसं जगवलीच पण घडवलीही.  त्यांच्या लढय़ाविषयी..

कशी सुरुवात करावी कळत नाही. विठ्ठल बन्ने काळाच्या पडद्याआड गेले. कोण हे विठ्ठल बन्ने, असाही प्रश्न अनेकांच्या मनात येण्याची शक्यता. ते स्वाभाविकही. ते फार नावारूपाला आलेलं, प्रसिद्धी पावलेलं व्यक्तिमत्त्व नव्हतं. त्यांच्यावर खूप लिहिलं गेलं, त्यांना खूप पुरस्कार मिळाले असंही काही झालं नाही. त्यांना या सगळ्यांशी फार देणंघेणं होतं अशातला भाग नाही. ते फक्त आयुष्यभर शोषितांचे लढे लढत गेले.

गडिहग्लज त्यांचे गाव. गडिहग्लजही फार कोणाच्या चटकन ध्यानात येण्याची शक्यता नाही. कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवरचं हे गाव. कोकण-गोवा विभागासाठी महत्त्वाचा दुवा. येथूनच कोकणाला मसाले, गूळ आणि कडधान्याचा पुरवठा होतो. व्यापारपेठ म्हणून थोडंसं महत्त्वाचं. भाषिकदृष्टय़ा गडिहग्लज विशेष उल्लेखनीय. कन्नड-मराठी-कोकणीचा अजब संगम आहे इथल्या भाषेत. या गावात राहायचं तर फक्त मराठी येऊन चालत नाही. तुम्हाला कन्नड आणि मराठी भाषा आल्याच पाहिजेत. धार्मिक, जातीयदृष्टय़ा हे गाव भलतंच सरमिसळ असलेलं. इथं लिंगायत-जैन-मुसलमान- मराठी असे सगळे समूह. इथं कधीच कोणाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. कैक प्रयत्न करूनही या गावात कुणाला जातीय भावना भडकवता आलेल्या नाहीत. या गावाची घडणच मजेशीर.

अशा गावात विठ्ठल बन्ने जन्मले ते धनगर समाजात. ज्या समाजात आजही शिक्षण पुरतं पोहचलेलं नाही. कसे काय ते शिकले कोणास ठाऊक. शिकावं असं वातावरणच नव्हतं. राजाराम महाविद्यालयातून संस्कृत-अर्धमागधी-मराठी घेऊन पदवीधर झाले. संस्कृतवर जबरदस्त हुकुमत. त्यात स्वभाव एकदम उचापत्या. सेवादलात गेले आणि समाजपरिवर्तनाच्या नव्या आकांक्षा घेऊन गडिहग्लजमध्ये परतले. उत्तम वक्ते, काळू-बाळूला लाजवेल असा विनोदी हजरजबाबी स्वभाव. ‘पुढारी पाहिजे’ नाटकात पेंद्याची भूमिका जबरदस्त गाजवली होती त्यांनी. गमतीने म्हणायचे, ‘‘शिकलो नसतो तर निश्चितच तमाशाचा फड काढला असता.’’ जोरदार गाजवला असता तमाशा. बोलके डोळे, तरतरीत चेहरा, मानेवर रेंगाळणारे लांबलचक केस. चालाय लागले की कोणाचेही लक्ष सहज वेधून घेणारे. मग प्राध्यापक म्हणून गडिहग्लजमध्ये आले. विद्यार्थीप्रिय बनले. वर्गात घुसले की बेल झाल्याचे भानही नसायचे त्यांना आणि विद्यार्थ्यांनाही. ‘‘नुस्तं शिकू नका लेकाहो, गाव बदला.’’ हे त्यांचं आवडतं वाक्यं. गाव बदलायचं म्हणजे काय करायचं, कळायचंच नाही तेव्हा. कधी एकटय़ाने दिसायचंच नाही सतत घोळक्यात. पोरांची डोकी फिरवायला एक नंबर.

त्याच काळात श्रीपतराव शिंदे  वकिली करण्यासाठी गडिहग्लजात आले. दोघांची जोडगोळी जमली. म्हणजे ते आधीचेच मित्र. पण इथे आले आणि त्या दोघांनी नवंच विश्व निर्माण केलं. दर आठ-दहा दिवसाला एखादा मोर्चा ठरलेला. कधी तहसील कचेरीवर, कधी प्रांत कचेरीवर. कधी महागाईच्या प्रश्नावर, कधी रॉकेलच्या प्रश्नावर. बाहत्तरचा दुष्काळ नुकताच पडून गेलेला. लोकांच्या जगण्याचे अनेक प्रश्न. त्याला मोर्चा हेच उत्तर. दोघे रस्त्यावर आले की, लोक आपोआप गोळा व्हायचे. त्यांना सांगावंच लागायचं नाही. ते दोघे म्हणजे माणसाच्या जीवन-मरणाचंच काही तरी असणार इतका विश्वास. कधी एस. एम. जोशी यायचे, कधी

ना. ग. गोरे. मृणालताई तर ठरलेल्याच. बाबा आढावांचं येणं नित्याचंच. यातूनच देवदासींचा प्रश्न समोर आला. बन्ने सरांचा आदेश. आपण गडिहग्लज तालुक्यात किती देवदासी आहेत शोधून काढू. त्या वेळी भाडय़ाने सायकली मिळायच्या गडिहग्लजात. पोरं पोरं मिळून तालुक्यातल्या प्रत्येक गावात देवदासी शोधत निघालो. प्रत्येक गावात असायच्या दोघी-तिघी. चौमाळ पसरलेला तालुका. प्रचंड दारिद्रय़. वेशीतच गावाचे दारिद्रय़ टांगलेलं दिसायचं.

‘देवाच्या बाया शोधायला आलो,’ म्हटलं की, गाव एकदम दचकायचं. इतकी दहशत यल्लूआईची. प्रचंड घाबरायचे लोक या देवीला. कोणी नावच उच्चारायचं नाही. प्रत्येक जातीत सापडायचीच एखादी देवदासी. तालुका धुंडून झाला. शिंदे  वकील आणि मास्तरांनी देवदासी मेळावाच घ्यायचं जाहीर केलं. दोघांच्या डोक्यात दुसरं काहीच नाही. या स्त्रियांचं शोषण, दु:खं यावरच बोलायचे. बन्ने सरांच्या तासाला वर्गातही तोच विषय. त्या वेळी हळूहळू कळायला लागले, धर्मसत्तेचं रूप आणि स्त्रियांचं शोषण.

प्रत्येक देवदासी म्हणजे दु:खाची खोल विहीर. अनेक भुयारांनी व्यापलेली. मेळावा जाहीर झाला. लोक प्रचंड काय-काय बोलायला लागले. आम्ही गांगरून गार. या दोघांचा उत्साह पराकोटीचा. रयत शिक्षण संस्थेच्या प्राचार्या सुमती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाबा आढावांच्या उपस्थितीत मेळावा सुरू झाला. आणि गौराबाई सलवादे या देवदासीला आवाज फुटला. तो महाराष्ट्रभर झाला. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे, परिषदा सुरू झाल्या. भारतभर या प्रश्नाचं गांभीर्य चíचलं जाऊ लागलं. शासनाला दखल घ्यावी लागली. आयोग नेमला, पेन्शन मान्य झाली, देवदासींच्या मुलांना वसतिगृह सुरू करण्यात आलं. पण ही प्रथा संपवता कशी येईल यासाठी लढा तीव्र करण्यात आला. आयुष्यभर बन्ने सरांचा देवदासी प्रश्न हा ध्यास राहिला. भारतभर कोणकोणत्या देवाला, देवीला मुलं-मुली सोडल्या जातात, शोधा. तिथे तिथे काम करता येतं का पाहा. यातच त्यांची धावपळ चाललेली असायची. पण यात वर्गातले लेक्चर त्यांनी कधी चुकवले नाहीत. तयारी न करता वर्गात कधी शिकवले नाही.

एकदा वर्गात आले तर वर्गाच्या दारात पाच-पंचवीस डोंबारी. तास संपेपर्यंत उभेच. त्यांच्या झोपडय़ा रस्ता रुंदीकरणात काढलेल्या. गडिहग्लज गावाभोवती या डोंबारी समाजाची घरं. घरं कसली पालं. त्यांनी कसाबसा आसरा उभा केलेला. त्यांनाच हे सरकारी अधिकारी, नोकर त्रास देऊन जगणं असह्य़ करून टाकायचे. त्यांना हाकलून लावायचे प्रयत्न सुरू केलेत हे सांगायला ते लोक आलेले. त्यांना घेऊन सरांचा मोर्चा तहसील कचेरीवर. शंभर-दीडशे डोंबारी बायका-मुलांसह रस्त्यावर. त्यांना घोषणा तरी कसल्या देता येणार? फक्त ओरडायचे. जगण्याची आर्त किंकाळी. या डोंबाऱ्यांचं, भटक्यांचं, कंजारभाटांचं काही तरी केलं पाहिजे. त्या वेळी भटक्या-विमुक्तांची चळवळही आकाराला आली नव्हती. शिंदे  साहेब आणि बन्ने सर यांचा एकच कार्यक्रम, ‘यांना निवारा मिळाला पाहिजे.’ पण कसा मिळणार?

वकील साहेब सगळ्या कायदेशीर चौकटी अभ्यासत होते. बन्ने सर गडिहग्लजमध्ये किती ‘भटके’ आहेत याची खातरजमा करून घेत होते. त्यांची संख्या लक्षणीय. उद्योग एकच प्लास्टिक-लोखंड-बाटल्या गोळा करणं.

एके दिवशी बन्ने सरांनी सगळ्या भटक्यांना गोळा केलं. तेही भल्या सकाळी. दोरी आणायला सांगितली एकटय़ाला. कुणालाच काही माहीत नव्हतं. मास्तर पुढं डोंबारी मागं. कुठं निघालेत त्यांचं त्यांनाच ठाऊक. भरी रस्त्याला थांबले. भली मोठी मोकळी जागा. अगदी शहराच्या लगत. मास्तरनं दोरीनं मापं टाकायला सुरुवात केली. चॉकपीठनं रस्ते आखले. आणि प्रत्येकाला प्लॉटवाटप सुरू केलं. जणू काय हे आपल्या बापाचीच जागा वाटप करतायत. प्रत्येकाला जागा मापून दिली. ‘घर कधीपण बांधा, पहिली पालं उभी करा,’ मास्तरचा आदेश. कुठल्याही डोंबाऱ्याचा विश्वास बसत नव्हता. पण पालं उभी राहिली. मरायचं पण जागा सोडायची नाही. आख्खं गडिहग्लज चक्रावलं. कायदेशीर लढय़ाला श्रीपतराव विशद्यांचं नेतृत्व. अधिकारी चक्रावले. डोंबाऱ्यांना हटवता येईल, पण या दोघांचं करायचं काय? हे दोन खांब त्यांच्याभोवती भरभक्कम. सगळ्यांनी नांगी टाकली. भटक्यांना हक्काचं घर मिळालं. लाखे वस्ती तालुक्यात प्रसिद्ध पावली.

तर या दोघांच्या दारात माकडवाल्यांनी ठाण मांडलं. ‘आमचं काय?’ तोवर माकडवाला जमात आहे, हे कुणाच्या ध्यानीमनीच नव्हतं. त्यांचेही प्रश्न आहेत. हे कोणास कळणार? मास्तरनं लावलं कामाला. तालुक्यात, जिल्ह्य़ात माकडवाल्यांच्या वस्त्या किती? त्यांच्या उपजीविकेचं एकमेव साधन म्हणजे माकड. काय जगतात या देशातील माणसं, याची भयावह जाणीव करून देणारी जमात. माकडवाल्यांचं संघटन उभं राहायला सुरुवात झाली. त्यांच्याही मनात आपण संघटित झालो तर चांगलं जीवन जगू शकतो याची जाणीव निर्माण झाली. त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये पहिल्यांदा नोंदवलं गेलं. या भूमीवर जगत असणारे ते जीव कागदावर नोंदवले गेले. तेव्हा मास्तरांचा आदेश, ‘‘अरे, यांच्या रीतीभाती, जन्ममृत्यू यांचे विधी याची माहिती जमा करा. त्यातून समाज कळेल. पुस्तकातून काय ढेकळं कळणार?’’ हा अभ्यास महत्त्वाचा. त्यांचं ते म्हणणं खरं होतं. माकडवाल्या समाजाचे आमचे बाड तयार झाले. पण त्याचं करायचं काय? अजूनही काही करता आलं नाही. डोंबाऱ्यांच्या अंधश्रद्धा, माकडवाल्यांच्या अंधश्रद्धा शोधता शोधता तालुक्यातल्या सगळ्याच समाजातल्या अंधश्रद्धा असा शोध सुरू होता. तो भुतापर्यंत पोहोचला. तर मास्तर स्वत:ला ‘भुताचा भाऊ’ म्हणून घ्यायला लागले. त्यांनी एक बाड लिहिलं होतं. त्याचं नावच ‘भुताचा भाऊ.’ एकदा विचारलं, ‘‘भुताचा भाऊ म्हणजे?’’ तर म्हणाले होते, ‘‘श्रीपतराव भूत, मी त्यांचा भाऊ.’’ आणि स्वत:च जोरदार हसले होते. पण या दोन भुतांनी या तालुक्यातल्या अनेक भेसूर प्रथांना हद्दपार केलं होतं हे मात्र निश्चित. ही गोष्ट एकोणिसशे ऐंशीची. तेव्हा ‘अंनिस’ स्थापन व्हायची होती.

भडगावजवळ सामानगडच्या पायथ्याला घोलराक्याचा तळ. सगळ्यांची आडनावं घोलराके. सामानगड ते बेळगाव जिल्ह्यापर्यंत ही जमात पसरलेली. बेरड म्हणून सुपरिचित असलेली. अत्यंत निब्बर बेरड लोक. पूर्वी गावांच्या शिवांचे रक्षण त्यांच्याकडे होते. ठरवून दरोडे घालण्याबाबत ख्याती. कधीकाळी त्यांच्या पूर्वजांनी केलेले हे व्यवसाय. या जमातीच्या कपाळावर तोच शिक्का कायम बसला. गुन्हेगारी जमात. शेतीभातीत त्यांचं फारसं मन रमत नव्हतं अशी अफवा. खोल जंगलात यातील काही लोक दारू गाळण्याचा व्यवसाय करायचे. पोलीस त्यांना पकडून आणायचे. मरेपर्यंत मारायचे. प्रचंड आर्थिकक शोषण करायचे. पिढय़ान्पिढय़ा त्यांचा हा छळ चाललेला. यातील एकादोघांना या दोन्ही भुतांचा सुगावा लागला. बेरड रामोशी जमातीचा मोर्चा सरळ पोलीस ठाण्यावरच धडकला. तालुक्यात बेरड-रामोशी समाजाची संघटना उभी राहिली. नंतर त्यांच्याच समाजातील तरुणांचं त्यांना नेतृत्व मिळालं. मास्तरचं म्हणणं, या समाजाने शिकलं पाहिजे आणि खरोखरच या समाजाची पोरं उच्चपदस्थ झाली.

बन्ने सर या साऱ्या समाजात सहजपणे विरघळून गेले. शोषितांचे लढे हेच त्यांचं आयुष्य बनलं. याला खंबीर नेतृत्व होतं श्रीपतराव शिंदे  यांचं. सह्य़ाद्रीच्या डोंगरकपारीत राहणाऱ्या डंगे धनगरांचा लढा यांनीच उभा केला. कैक हजार वर्षांपासून जंगलात राहणाऱ्या या जमातीला वनखाते बेवारस करू पाहत होते. कारण फक्त त्यांची नावं सात बाराला नोंदलेली नाहीत. बिचाऱ्यांची नोंद रेशनकार्डावरच नव्हती तर सात बाऱ्याला येणार कुठून? संपूर्ण प्रशासन एका बाजूला आणि मूठभर लोक दुसऱ्या बाजूला. पण निकरानं झुंज दिली. असे किती लढे या दोघांनी उभे केले त्याची गणतीच नाही. त्यांनी स्वत: याची नोंद करावी, दस्तऐवजीकरण करूा सामग्री उपलब्ध करून द्यावी अशी तसदी घेतली नाही. मुळात अनेक लढय़ातच त्यांच्या आयुष्याचा एवढा कालखंड गेला की, अशी उसंतच त्यांना मिळाली नाही. या साऱ्याचा पद्धतशीर लिखित वापर करून काय मिळवावं, असं त्यांच्या स्वप्नातही नव्हतं.

आज हे सारे तीस वर्षांतलं चित्र डोळ्यासमोरून सहज तरळत गेले. कधी तरी यावर लिहायलाच हवं असं त्यांच्या अंत्ययात्रेत चालताना उगाचच वाटायला लागलं. या प्रेतयात्रेत डोंबारी, रामोशी, कंजारभाट तर होतेच पण अनेक देवदासी हंबरडा फोडून, धाय मोकलून रडत होत्या. मी नाना ऊर्फ श्रीपतराव शिंदे  यांचा हात धरून चालत होतो. चितेजवळ गेल्यावर त्यांना गदगदून आलं. मित्राला शेवटचा निरोप देताना त्यांना आवंढा आवरता आला नाही. मी धीर तो काय देणार? मतभेदासह ते दोघे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होते. त्या दोघांनी माणसं फक्त जगवली नाहीत तर माणसं घडवली. गडिहग्लज परिसराला ओळख दिली. या क्रांती प्रवासातील एक दुवा निखळला. साऱ्या शोषितांचा आवाज काळाआड झाला. – chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 1:04 am

Web Title: article in chaturang fight exploits akp 94
Next Stories
1 असीम प्रयत्नांची यशोगाथा
2 आई गेली, पण संवाद चालूच आहे..
3 कृष्णाकाठची कृष्णाई सावरते आहे..
Just Now!
X