23 January 2020

News Flash

विचित्र निर्मिती : तत्त्व आणि पाण्याच्या बाटल्या

चित्रपट करतानाचे असे छोटे-छोटे निर्णय आपल्या मनाची ताकद वाढवतात.

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्रा भावे

चित्रपटाच्या व्यवसायाला ग्लॅमर चिकटलेलं आहे. चित्रपटातल्या वास्तवातल्या प्रतिमांपेक्षा अवास्तव मोठय़ा दिसणाऱ्या प्रतिमांमुळे त्या प्रतिमा साकार करणाऱ्या अभिनेत्यांना किंवा इतरही कलाकारांना अवास्तव मापदंड लावले जातात. मात्र थोडा त्रास पडला तरी हिरवा दिवा लागल्यावरच जायचं, तांबडा असताना थांबून राहायचं, वन वेमधून उलटं जायचं नाही, यांसारख्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी मन लावून केल्या तरच पोराबाळांशी ताठ मानेनं बोलता येतं. चित्रपटाचा श्रीमंती, लोकप्रिय व्यवसाय, त्याचं ग्लॅमर या सगळ्याहीपेक्षा, चित्रपट करतानाचे असे छोटे-छोटे निर्णय आपल्या मनाची ताकद वाढवतात.

चित्रपट ‘वेलकम होम’ची नायिका सौदामिनी (मृणाल कुलकर्णी)आणि तिचे वडील रिटायर्ड कलेक्टर (मोहन आगाशे), यांच्यात एक संवाद आहे. हे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आपल्या लेकीला सांगतात की, आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाचा परीघ वेगळा आणि घराबाहेरचा समाज-व्यवसाय याचा परीघ वेगळा. मिनीला वडिलांचं हे ‘आग्र्युमेंट’ पटत नाही. ती म्हणते, या परिघाचं स्वरूप वेगळं असेल; पण दोन्हीकडे मूल्यं तीच असायला हवीत. ती वेगळी असून कशी चालतील? वडील असंही म्हणतात, ‘‘वेगळी मूल्यं हा व्यवहार दुटप्पीपणाचा असेल. पण वर्षांनुवर्ष हेच चालत आलंय.’’ मिनीला वाटतं, एखादी कृती पुन:पुन्हा केली की तिची प्रथा होते, त्याची परंपरा बनते आणि नंतर संस्कृती. मग ही कृती अन्याय्य असली तरी चालू ठेवणं, चूकच नाही का? अन्याय्य प्रथा बदलण्यातच माणसाच्या माणूसपणाचा गौरव आहे. मिनीचं हे विवादी विधान मला मनापासून पटतं.

चित्रपटाच्या व्यवसायाला ग्लॅमर चिकटलेलं आहे. चित्रपटातल्या वास्तवातल्या प्रतिमांपेक्षा अवास्तव मोठय़ा दिसणाऱ्या प्रतिमांमुळे त्या प्रतिमा साकार करणाऱ्या अभिनेत्यांना किंवा इतरही कलाकारांना अवास्तव मापदंड लावले जातात. ‘दोघी’ हा आमचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. म्हणजे फीचर फिल्म. त्यात पहिल्यांदाच सदाशिव अमरापूरकरांसारखे, हिंदीमध्ये गाजलेले, व्यावसायिक अभिनेते काम करणार होते. (अमरापूरकर नुसते चांगले अभिनेतेच होते, असे नव्हे तर ते सजग सामाजिक विचारवंतही होते. आमच्याशी त्यांचे संबंध नेहमीच मत्रीचे राहिले.) त्या वेळी चित्रपट उद्योगातल्या अनेक प्रथांची आम्हाला कल्पनाच नव्हती. अमरापूरकरांच्या बरोबर त्यांचा एक ‘बॉय’ आला. आमच्या युनिटमध्ये साधी शिस्त घालून दिली होती की, नाश्ता किंवा जेवण एका टेबलावर मांडलं जायचं. तिथे वाढपी असायचे व सर्व युनिटने रांग लावून आपल्याला हवं तेवढं जेवण घ्यायचं. या लाइनीत लाइट बॉइज, स्पॉट्स मन किंवा हेल्पर्स यांच्यापासून ते अभिनेते, तंत्रज्ञ, दिग्दर्शक सगळेच असायचे. अमरापूरकरांचा ‘बॉय’ या लाइनीत उभं न राहता, लाइन कितीही मोठी असली तरी स्वतंत्रपणे पुढे जाऊन त्यांचं ताट वाढून, त्यांना नेऊन देऊ लागला. अमरापूरकरांनी ‘बॉय’ला विचारलं की, ‘दिग्दर्शक आणि बाकीचे कलावंत कुठे बसले आहेत?’ बॉय म्हणाला, ‘‘ते अजून क्यूमध्येच उभे आहेत.’’ अमरापूरकर गप्प झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. तिसऱ्या दिवशी बॉयने जेव्हा विचारलं, ‘सर, ताट वाढून आणू का?’ तेव्हा अमरापूरकर मोठय़ांदा त्याला म्हणाले, ‘तू कशाला रे माझं ताट वाढून आणायला हवं? मी स्वत: नेमकं हवं तेवढं घेऊ शकत नाही का?’ असं म्हणून ते रांगेच्या शेवटी जाऊन उभे राहिले. रांगेतले पुढचे लाइट बॉइज, अगदी मीसुद्धा, थोडे अस्वस्थ झालो. अमरापूरकर हसून म्हणाले, ‘‘कुणीही अस्वस्थ होण्याचं कारण नाही. हा नियम बरोबर आहे. युनिटमधल्या सगळ्यांनाच तो लागू आहे.’’ या प्रसंगानंतर अमरापूरकर आणि आमची खरी दोस्ती झाली.

आमच्या ‘दहावी फ’ चित्रपटात ‘आपल्यावर शाळा आणि सगळंच जग अन्याय करतं’, असं म्हणून ‘फ’ तुकडीतली मुलं शाळेची लॅब फोडून टाकायची ठरवतात. चित्रपटातूून दोन्हीही बाजूंना संदेश द्यायचा होता. म्हणजे ‘फ’ तुकडीवाल्यांचे कुटुंबीय, शिक्षक, भोवतालचा समाज यांनी या मुलांच्या आशा-निराशा, त्यांचे कष्ट, त्यांची स्वप्नं समजून घ्यावी’ हा त्यांना संदेश; आणि त्या मुलांनी ‘अन्यायाचा प्रतिकार म्हणून कुठलीही तोडफोडीची हिंसक कृती करणं, म्हणजे नवा अन्याय तयार करणंच आहे’, हा मुलांसाठी संदेश. त्या मुलांना सांगतात की, ‘आपल्या बसगाडय़ा असतील, रेल्वे असेल, रस्त्यावरच्या गाडय़ा असतील किंवा शासकीय इमारती असतील, या सगळ्यांच्या बांधणीत आपल्या सर्वाच्या आई-वडिलांच्या घामाचे थेंब, रक्ताचे थेंब पडले आहेत, असं नाही का वाटत तुम्हाला? दगड उचलल्यावर तो फेकण्यापूर्वी, एक क्षण, ज्या सर्वाच्या खांद्यावर आज आपण उभे आहोत, त्यांची आठवण नाही का होत?

दिग्दर्शक म्हणून मला प्रश्न होता की, लॅबची मोडतोड कशी दाखवायची? आमचे नट म्हणजे, खरीच, दहावीतली २०-२५ मुलं. ते सगळे, आपल्याला इतका शौर्याचा सीन करायचा आहे म्हणून खूशच झाले. सारखा प्रश्न यायला लागला, ‘‘मावशी, तोडफोडीचं शूटिंग केव्हा आहे?’’ मला प्रश्न पडला, तोडफोड करावीशी वाटणं विकृत आहे, असं म्हणताना आपण मुलांना शूटिंगसाठी का होईना, तोडफोड करण्याचा विकृत आनंद देणार का? मला पटेना. मग आम्ही दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे प्रयोगशाळेतलं चांगलं सामान बाजूला काढलं, खिडक्यांच्या चांगल्या काचाही बाजूला काढल्या आणि त्या जागी सर्व फुटकं सामान विकत आणून ठेवलं. निर्णय असा घेतला की तोडफोडीचे सगळे शॉट हे ‘सबजेक्टिव शॉट्स’ असतील. म्हणजे, काय फुटेल ते दिसेल; पण फोडणारा दिसणार नाही. आणि फुटक्या वस्तूच फोडण्याचं काम आमचा कॅमेरामन संजय मेमाणे करेल आणि त्याच वेळी संजय मेमाणेचा सहकारी कॅमेरा चालवेल.

‘दहावी-फ’चाच दुसरा एक अनुभव, असाच लक्षात राहिलेला आहे. आम्ही ज्या शाळेत चित्रीकरण करत होतो, त्याला लागूनच एक गाई-म्हशींचा मोठा गोठा होता. मी आमच्या सगळ्या मुलाबाळांना, सहकाऱ्यांना सांगत होते की, शूटिंगदरम्यान उगीच आरडाओरडा करून दुसऱ्याला आपला त्रास होईल, असं वागायचं नाही. एके दिवशी गाण्याचं शूटिंग चालू होतं. शूटिंग आमच्या कल्पनेपेक्षा जास्त लांबलं. रात्र झाली. दहा वाजून गेले. गाण्याचं शूटिंग म्हणजे, नागऱ्यावर पुन:पुन्हा त्याच ओळी लावल्या जायच्या आणि सर्वाना ऐकू जाव्यात म्हणून मोठय़ाने लावल्या जायच्या. शेजारपाजाऱ्यांना त्याचा त्रास व्हायला लागला. साहजिकच होतं. माझ्या लक्षातच आलं नाही. शेजारी तक्रार करायला आले, विशेषत: गोठावाले. ते म्हणाले, ‘‘तुमच्या या आवाजामुळे आमच्या गाई-म्हशींना ताप भरायला लागला आहे.’’ शेजाऱ्यांच्या त्रासाची आपल्याला कल्पनाच आली नाही, या गोष्टीची मला खूप लाज वाटली. मी ताबडतोब शूटिंग थांबवायला सांगितलं.

आमचे अभिनेते, म्हणजे ‘फ’ची मुलं आणि सगळा क्रू, सगळे इतके रंगात आले होते की, शूटिंग थांबवायला ते तयार होईनात. मुलं म्हणाली, ‘‘मावशी, तुम्ही शेजाऱ्यांशी थोडा वाद घालत राहा. तेवढय़ात आम्ही शूटिंग उरकून घेतो.’’ मी म्हटलं, ‘‘मुळीच नाही. आपण कुठलाच खोटेपणा करायचा नाही.’’ गाण्याचं शेवटचं कडवं शूट व्हायचं राहिलं होतं. त्यामुळे शेवटचं कडवं चित्रपटातून काढूनच टाकावं लागलं. सहकाऱ्यांना ते कडवं पाहिजे होतं असं वाटत होतं. मलाही तसं वाटत होतं, पण शेजाऱ्यांना होणारा त्रास आणि मुक्या जनावरांना दिलेला त्रास कमी करणं ही आमची पहिली जबाबदारी होती. मुलं पहिल्यांदा हिरमुसली पण नंतर त्यांना ते पटलं.

अण्णा हजारेंच्या लोकपाल बिलासंबंधी चाललेल्या आंदोलनाच्या निमित्ताने येणारं ‘टी.व्ही चॅनल’ हे एक पात्रच आमच्या ‘हा भारत माझा’ या चित्रपटात आहे. त्यात एके ठिकाणी

डॉ. अभय बंग यांचं एक मनोगत आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘मुळात कुणाही माणसाला चांगलंच वागण्याची इच्छा असते. त्या दिशेने त्याला आधार मिळाला की, कुणीही प्रामाणिक आणि चांगलंच वागतो.’’ याचा प्रत्यय फार पूर्वी, म्हणजे, ऐंशीच्या आसपास मला एका प्रवासात आला होता. त्या वेळी काही महिन्यांसाठी मी उत्तराखंडातल्या कौसानी या गावी गांधी विचाराने चालणाऱ्या ‘अनासक्त आश्रम’ येथे माझं काही लिखाणाचं काम करायला गेले होते. आश्रमात कुठंही उभं राहिलं की समोर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं दिसायची. अतिशय शांत, स्वच्छ, प्रसन्न असं या आश्रमातलं वातावरण. माझ्याबरोबर माझी १२-१३ वर्षांची मुलगीही होती. आश्रमातून परत यायचं म्हणजे कौसनीहून, अलमुडय़ावरून काठगोदामला यायचं. तिथून ट्रेनने आग्य्राला यायचं. मग आग्य्राला गाडी बदलून मुंबई, मुंबईहून गाडी बदलून पुणे. लांबचा, जिकिरीचा प्रवास. आग्य्राला पोहोचलो. मुंबईला जाणारी ट्रेन आली. मी तिसऱ्या वर्गाच्या स्लीपरमध्ये जागा मिळवायला धावले. डब्याच्या दारात टी.सी. उभा होता. मी म्हटलं, ‘‘डब्यात गर्दी दिसत नाहीय?’’ तो म्हणाला, ‘‘हो, तुम्हाला दोन सिट्स मिळतील. पण प्रत्येक बर्थच्या मागे जादा पन्नास रुपये द्यावे लागतील.’’ आदल्या रात्री जागून, गर्दीत बसून केलेला प्रवास. मुलगी तर अगदीच कोमेजून गेली होती. तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून तिचं अंगही तापतंय की काय, अशी मला शंका येत होती. अशा स्थितीत मी टी.सी.समोर उभी. अगदी रडकुंडीला आलेली. त्याला म्हटलं, ‘‘माझ्यासोबत लहान मुलगी आहे. फार दमलीय. तेव्हा मी तुला तू मागत असलेले पैसे देते. मला बर्थ दे.’’ गाडीत शिरून थोडा वेळ गेल्यावर टी.सी. पैसे मागायला आला. मी शंभर रुपयांची नोट त्याच्यासमोर धरली आणि त्याला म्हटलं, ‘‘यह आपके पैसे.. यह पहले लेलो और बाद में मेरी बात सुनो. पर मेरी बात आपको सुननीही है.’’ मग मी त्याला म्हटलं, ‘‘आपल्या देशाचं हे काय झालंय या विचारानं मला खूप वाईट वाटतं. तसं ते तुम्हाला नाही का वाटत? तुमच्या मुलाला शाळेतल्या प्रवेशासाठी तुम्हाला कुणी तरी असंच अडवणार आहे, तेव्हा तुम्हाला माझ्या या बोलण्याची आठवण येईल. मी आत्ता गांधींच्या आश्रमातून येते आहे. त्यामुळे तर मला जास्तच वाईट वाटतंय. ज्या महान माणसानं भारतीयांना सत्य आणि अहिंसा ही दोन तत्त्वं सांगून जागं करण्याचा प्रयत्न केला, त्याचा किती लवकर आपल्याला विसर पडला!’’ टी.सी.नं तिकिटाच्या, म्हणजे बर्थच्या, अधिकृत रकमेची पावती मला दिली आणि मान खाली घालून तो नुसतं एवढंच म्हणाला, ‘‘और पैसे नही चाहिये.’’ मला त्याची ही प्रतिक्रिया अनपेक्षित होती. म्हणजे अभय बंग म्हणतात ते खरंच आहे. थोडय़ाशासुद्धा टेकूने माणसाला खरं आणि चांगलं वागण्यातच आनंद असतो.

‘कथासरिता’ या आम्ही केलेल्या मालिकेमध्ये ‘नागीण’ नावाची कथा केली. कथेचं नावच ‘नागीण’, तेव्हा खरंच त्या कथेत नागीण दाखवणं फारच आवश्यक होतं. बुलढाण्याजवळच्या एका छोटय़ा खेडय़ात आम्ही हे चित्रीकरण केलं. कुणी तरी म्हटलं, ‘‘थोडा शोध घेतला तर कुणी तरी गारुडी सहज मिळेल.’’ नागपंचमीच्या वेळी हे गारुडी नाग पकडतात, त्यांचे दात काढतात आणि सणाची धामधूम संपली की सोडून देतात. गारुडय़ांकडे त्यांची खूप आबाळही झालेली असते. त्यामुळे ‘सर्पमित्र’ म्हणून एक स्वयंसेवी संस्था सध्या काम करत असते. मी म्हटलं, ‘‘या एनजीओशी आपण संपर्क साधू.’’ सगळे म्हणाले, ‘‘या एनजीओच्या संपर्कापेक्षा गारुडय़ाशी लवकर संपर्क करता येईल.’’ शिवाय आणखीही एक मुद्दा होता. तो म्हणजे, सर्पमित्र नाग घेऊन आले तर तो त्याच्या विषारी दातासह येणार. म्हणजे कलाकारांना आणि सर्वानाच धोका जास्त. मला वाटायला लागलं, ‘हीच तर ती वेळ असते, जेव्हा तडजोड न्याय्य आहे की अन्याय्य, हा विचार सोडून देऊन आपण आपले तत्कालीन कष्ट कमी करण्यासाठी अयोग्याची बाजू घेऊन टाकतो. तेव्हा मी म्हटलं, ‘थोडं थांबू पण सर्पमित्रांनाच गाठू. नागाला आणि कलाकारांना, दोघांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने एकमेकांसमोर उभे करू.’ सहकाऱ्यांना थोडी तसदी पडली खरी, पण खरा विषारी दातवाला, ऐटबाज फणा काढणारा नाग आम्ही मिळवला. आमचा अभिनेता सोमनाथ लिंबरकर, त्या नागासमोर जीव मुठीत घेऊन अजिबात हालचाल न करता स्थिर बसला. त्याला घाबरून गट्ट झाल्याचा अभिनय करायची गरजच उरली नव्हती.

आम्ही कर्नाटकात सुप्रसिद्ध लेखक अनंत मूर्ती यांच्या, ‘सूरज का घोडा’ या कथेचं चित्रीकरण करत होतो. त्यात कर्नाटकातलेच कृष्णमूर्ती हे अभिनेते काम करत होते. कृष्णमूर्ती लहान मुलांचा थिएटर ग्रुप चालवतात. थिएटर प्रशिक्षणात मुलांना नुसता अभिनय शिकवायचा नाही तर स्वच्छ, विवेकी जगणंही शिकवायचं, असा त्यांचा विश्वास. श्रद्धेच्या अनेक परी असतात. कृष्णमूर्तीनी, म्हटलं तर साधी शिस्तीची वर्तणूक, म्हटलं तर स्वधर्म श्रद्धा, असा एक अनुभव दिला. मी तो कधीच विसरू शकत नाही. पाहिल्याच दिवशी चित्रीकरणानंतर कृष्णाजी दोन्ही हातांवर अलगद ठेवलेले, त्यांना दिलेले पोशाख आणि दागदागिने नेटकेपणाने घेऊन आले आणि काही तरी पवित्र वस्तू द्यावी, तसं ते सामान त्यांनी माझ्यासमोर धरलं. मी म्हटलं, ‘‘तुम्ही कशाला तसदी घेतलीत?’’ ते म्हणाले, ‘‘छे, तसदी कसली? धिस वॉज माय डय़ूटी.’’ अभिनेत्याला वाचिक अभिनयासाठी जसा आवाजाचा सराव हवा, भाषेचं ज्ञान हवं, शब्द उच्चारणाचं महत्त्व समजायला हवं, आंगिक अनुभवात (बॉडी लँग्वेज) शारीरिक हालचालींचं भान हवं, सात्त्विक अभिनयात शुद्ध एकाग्रतेचा रियाज हवा; तसा पोशाख व दागदागिने हा ‘आहार्य अभिनय’ असल्यामुळे तो स्वत:च्या हाताने आवरून जागच्या जागी व्यवस्थित ठेवण्याची सवय हवी. हे त्यांचं वक्तव्य सगळ्याच अभिनेत्यांचे डोळे लख्ख उघडणारं आहे, असं मला वाटतं.

थोडा त्रास पडला तरी हिरवा दिवा लागल्यावरच जायचं, तांबडा असताना थांबून राहायचं, वन वेमधून उलटं जायचं नाही, यांसारख्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी मन लावून केल्या तरच पोराबाळांशी ताठ मानेनं बोलता येतं. चित्रपटाचा श्रीमंती, लोकप्रिय व्यवसाय, त्याचं ग्लॅमर या सगळ्याहीपेक्षा, चित्रपट करतानाचे असे छोटे-छोटे निर्णय आपल्या मनाची ताकद वाढवतात. छोटय़ा गोष्टी निगुतीनं केल्या तर सगळ्यांनाच समाधान मिळतं. कुठं माळरानात किंवा जंगलात शूटिंग असलं की मधे येणारी झाडं-झुडुपं उपटून-तोडून बाजूला करण्याचा मोह असतो. (झाडं बिचारी पळून जाऊ शकत नाहीत किंवा आक्रमक प्रतिकार करू शकत नाहीत.) पाणी पिऊन बाटली रिकामी झाली की तिथंच टाकून जाण्याचा मोह असतो. नाश्त्याचे कागद, प्लास्टिकच्या पिशव्या.. शूटिंग संपल्यावर मी लोकेशनवर बाटल्या शोधत हिंडायला लागले की सगळं युनिट कचरा गोळा करण्याच्या कामाला लागतं..

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on September 7, 2019 12:08 am

Web Title: article on actual images in film creation abn 97
Next Stories
1 ‘मी’ची गोष्ट : इकीगाई
2 सृजनाच्या नव्या वाटा : इमली महुआ जाणिवा वाढवणारी शाळा
3 आव्हान पालकत्वाचे : कौमार्यपरीक्षा
Just Now!
X