डॉ. सुवर्णा दिवेकर

drsuvarnadivekar@gmail.com

‘आमार कोथा’ हे नटी बिनोदिनी या अभिनेत्रीने लिहिलेले भारतीय भाषांतील पहिले आत्मचरित्र मानले जाते. यात बिनोदिनीने गरजू कन्या ते श्रेष्ठ अभिनेत्री हा प्रवास कमालीच्या तटस्थपणाने लिहिला आहे. स्वत:चा गौरव नाही, कुणाला दूषणे नाहीत, कुणाचा दुस्वास नाही. या ‘वृत्ती’ तिने अनेक धार्मिक भूमिका करताना, भूमिकांशी तादात्म्य साधून मिळवल्या आहेत. ‘भूमिका करताना मी साक्षात चैतन्यरूप झाले,’ असे तिला वाटते. मात्र धन-मान-लौकिक मिळूनही अखेरीस तिला रितेपणा आलाच..

साहित्यातील एक महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे, आत्मचरित्र! स्वत: चितारलेले स्वत:चे जगणे, म्हणजे आत्मचरित्र. गेल्या पन्नास वर्षांत तर हा साहित्यप्रकार अनेक अर्थानी आणि अनेक प्रकारे भरभराटीला आला. प्रामुख्याने कलावंतांची आत्मचरित्रे वाचकांच्या पसंतीस उतरली. समाजमनाला नाटय़- चित्रपट आणि आता दूरचित्रवाणी कलाकारांबद्दल नेहमी आकर्षणयुक्त कुतूहल असते. तंत्रयुगाने हे कुतूहल पूर्ण करण्याचे अनेक मार्ग खुले केले आहेत. वेबसाइट्स, यूटय़ूब, व्हिडीओज, रिअ‍ॅलिटी शोज आणि लाइव्ह इंटरव्ह्य़ूज, स्टार शोज आणि अनेक..

परंतु तंत्रज्ञानाच्या आरंभ अवस्थेत, हे कुतूहल शमवण्याचा मुख्य रस्ता फक्त शब्दांच्याच मार्गावरून जात होता. चित्रपट विषय स्वतंत्र नियतकालिके, कलारंजनाच्या पुरवण्या, प्रचंड लोकप्रिय होत्या. पण ही माध्यमे ‘वरवरची’ माहिती पुरवणारी होती. अशा काळात आत्मचरित्र हे माध्यम अनेक कलाकारांनी निवडले. मराठीत दुर्गा खोटे, हंसा वाडकर, शांता हुबळीकर, जयश्री गडकर, उषा किरण, सीमा, या चित्रपट अभिनेत्रींची आत्मचरित्रे, तसेच विजया मेहता, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, अश्विनी भावे यांचे आत्मपर लेखन, ही काही वागनीदाखल उदाहरणे, अर्थात ही संपूर्ण यादी नाही.

कलाकारांची, त्यातही कलावतींची आत्मचरित्रे त्यातील नाटय़मयतेमुळे, घटनांच्या भल्या-बुऱ्या वळणांमुळे, रोचकतेमुळे, उर्वरित समाजापेक्षा वेगळे वळण असल्याने, नाटय़ आणि चित्रपट निर्मात्यांना भूल पाडतात. वर्तमानकाळातील अभिनेत्री या जुन्या अभिनेत्री पडद्यावर साकार करायला उत्सुक असतात. अशी कित्येक उदाहरणे दिसतात.

‘आमार कोथा’ (माझी गोष्ट) हे अभिनेत्रीने लिहिलेले भारतीय भाषांमधील पहिले, लिखित- प्रकाशित, असे आत्मचरित्र मानले जाते. लेखिका ‘नटी बिनोदिनी’. होय, अगदी हेच आणि असेच नाव आहे, ‘नटी’ हे नाम मागे पडून अभिनेत्री, अ‍ॅक्ट्रेस हे वलयांकित नाम, अस्तित्वात येऊनही काळ लोटला आहे. म्हणजे, काळ किती मागचा आहे, हे लक्षात येईल. नटी बिनोदिनीचा जन्म १८६३चा आणि तिचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले १९१२ मध्ये (त्याच्याच आगेमागे मराठीतील पहिले आत्मचरित्र रमाबाई रानडे यांनी लिहिलेलं,‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी, प्रसिद्ध झाले.)

१८६३ चा तो काळ, बंगालमध्ये कसा होता? हे पार्श्वभूमी म्हणून, पाहावे लागेल. प्रबोधनकाळ असे संबोधले जाते, तो हा काळ. स्त्री शिक्षणाची अगदी सुरुवात झाली होती. राजा राममोहन राय, विद्यासागर, केशवचंद्र सेन, अक्षयकुमार दत्त, हे सुधारक, स्त्रियांना इंग्रजी, बांगला, धर्मग्रंथ शिकण्यास प्रोत्साहन देत होते. पण, घरी राहून, महिला ‘टय़ुटर’ ठेवून, १८४९ मध्ये कोलकात्यातील ‘बेथून मुलींच्या’ शाळेत अवघ्या वीस मुली शिक्षण घेत होत्या. ज्ञाननंदादेवी टागोर, कैलासवासिनी गुप्त स्त्रियांच्या प्रगतीबद्दल उघड बोलू लागल्या आणि ‘अबला बांधव’,‘भारती’ अशा नियतकालिकांतून लिहू लागल्या होत्या. ‘हिंदू महिला गणेर हीनावस्था’ हे कैलासवासिनी गुप्तने लिहिलेले वंग पुस्तक आणि कृष्णभाविनीने लिहिलेले ‘इंग्लंडे वंग महिला’ हे तुलनात्मक पुस्तक, बदलत्या वाऱ्याची दिशा दाखवणारे होते.. अर्थात हे वास्तव होते, सुशिक्षित, सधन, उच्च वर्ग संदर्भातले!

बंगालमध्ये १८७३ मध्ये अभिनयक्षेत्रात स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी करण्यास प्रारंभ झाला. मात्र अभिनयक्षेत्रात येणाऱ्या मुली लब्धप्रतिष्ठित घरातून येत नसत. अत्यंत दरिद्री, पोटार्थी आणि जास्त करून वेश्या- वारांगना यांच्या मुली नाटकात येत. त्या ‘नटय़ा’ कंपनीतच राहात आणि कंपनीतच त्यांना अभिनय, नृत्य, आदी कला शिकवल्या जात. अन्न- वस्त्र- निवारा एवढय़ाच ‘मानधनावर’ (?) त्या ‘नटय़ा’ जगत राहात. समाजात त्यांना ना मान, ना स्थान! बिनोदिनी अशीच पोटासाठी रंगमंचावर आली. तेव्हा अकरा वर्षांची होती. तिचे नाटय़गुरू गिरीषचंद्र घोष यांच्या आग्रहावरून तिने हे आत्मचरित्र लिहिले. ‘आमार कथा.’ लेखिकेचे नाव म्हणून, तिने स्वत:चा उल्लेख ‘दासी- बिनोदिनी’ असा केला आहे. आणि प्रस्तावनेत ‘माझी क्षुल्लक कहाणी पूजनीय नाटय़गुरूंच्या आग्रहामुळे प्रसिद्ध झाली.’ अशी अर्पण पत्रिकाही जोडली आहे. ही लीनता म्हणावी, की दीनता?

स्त्रीने स्वत:ला अत्यंत क्षुल्लक समजणे, ही वृत्ती सामाजिक (कु)संस्कारातून उगवली होती. त्या काळातील मराठी साहित्यातील स्त्रियासुद्धा ‘दुर्दैवी रंगू’ किंवा ‘अभागी कमळ’ या साच्यातील होत्या. पतीला पत्र लिहिले तरी, खालची सही – विनिता, दासी, अबला, अशा विशेषणाने युक्त असे. इथे तर काय, यशस्वी, स्वयंपूर्ण, अभिनयनिपुण, तरीही समाजाला आणि तिला स्वत:लाही कमीपणा वाटावा, अशी नटी! तिचे नाटय़गुरू मात्र तिच्याबद्दल आदर बाळगतात. ते म्हणतात, ‘‘तू पुष्कळ महत्त्वाचं कार्य केलं आहेस. रंगभूमीवरून शेकडो प्रेक्षकांना आनंद दिला आहेस. तुझ्यात विलक्षण अभिनयशक्ती आहे. तू ज्या तऱ्हेने पात्रं जिवंत केलीस, ते साधसुधं काम नाही. माझ्या चैतन्य नाटकात तू लोकांच्या भक्तीला उधाण आणलंस, त्यासाठी अनेक वैष्णवांचे तुला आशीर्वाद मिळाले.’’ गिरीषचंद्र घोषांनी तिला श्रेष्ठ अभिनेत्रीचे स्थान दिले आणि आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त केले.

म्हणजेच काय, या आत्मचरित्राचे मोल एक उत्तम अभिनेत्रीचे आहे, स्वयंप्रकाशित स्त्रीचे आहे. फक्त प्रवाहपतित वारांगना, दुबळ्या, सोशिक, समाजाने पायदळी तुडवलेल्या, अडाणी स्त्रीचे नाही. बिनोदिनीला पती नाही, पण ‘यजमान’ आहेत. आत्मचरित्रात ती तिच्या जीवनात आलेल्या ‘यजमानां’बद्दलही कृतज्ञ आहे. तिला प्रेमाची, लग्नाची वचने देऊनही वंचना केलेल्या पुरुषांबद्दल ती तळतळाट करत नाही की, फसवणूक केल्याचे आरोप लादत नाही. तिने तिच्या आयुष्यात आलेल्या यजमानांची नावे मुद्दाम नोंदवली नाही कारण, त्यांना समाजात, त्यांच्या कुटुंबात मानहानी पत्करायला लागू नये. असा मनाचा मोठेपणा तिने दाखवला आहे, त्यांचा उल्लेख ‘आश्रयदाता’ असा केला आहे. ‘कृतज्ञता’ हा संस्कार, या ‘नटी’ने जन्मभर जपला आहे. हे विशेषत्वाने जाणवते.

ती कृतज्ञता गुरूंबद्दल आहे, नाटकाबद्दल आहे, निर्मात्यांबद्दल आहे आणि प्रेक्षकांबद्दल तर अपार आहे. ‘आमार कथा’ सुरू करण्यापूर्वी निवेदन (प्रस्तावनास्वरूप) आहे. गिरीशचंद्रांनी तिला आत्मकथा लिहिण्यास प्रवृत्त केले आणि प्रस्तावना लिहून देण्याचे मान्य केले. पण कहाणी प्रसिद्ध होण्याआधीच ते मरण पावले. त्यांना उद्देशून ती म्हणते, ‘‘प्रस्तावना लिहून दिल्याशिवाय मरणार नाही. असं वचन दिलं होतं तरी माझ्या नशिबी ते नव्हतं, महाशय, तुम्ही मला सांगत होता, मी विनाकारण कोणालाच घडवत नाही. कार्य संपलं की देह ठेवतात. मला हे उमगलेलं नाही, माझ्यासारख्या हीन दर्जाच्या व्यक्तीकडून ईश्वर काय कार्य करवून घेणार? आता तर जगाच्या शाळेतून निरोप घेण्याची वेळ आली.. काय करू मी? कुठली शिदोरी घेऊन महानिर्वाणाची वाट चालू?’’

‘‘..महाशय, तुम्ही म्हणता, मी शेकडो प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण प्रेक्षकांना माझे अंतर्मन कळत होते का? मी लहानपणापासून किती इच्छा, किती सरळ सत्प्रवृत्तींची जपणूक केली. त्या कालप्रवाहात कशा बुडून गेल्या, ते कसं सांगू? कृष्णनामाच्या गजरात गुंगून गेलेलं मन, मोहजाळात गुंतून फसव्या वाळूखालील डोहात सत्प्रवृत्तीला बुडवून टाकत असे.’’ बिनोदिनीने हे लेखन तिच्या अखेरच्या काळात केले आहे. आजारी शरीर, वाढलेले वय, निराशेने ग्रस्त मन, आठवणींच्या तीव्र वेदना आणि तेराव्या वर्षी मृत्यू पावलेल्या एकुलत्या एका कन्येच्या वियोगाची चिरवेदना अशा परिस्थितीत हे लेखन झालेले आहे.

१८६३ चा सुमार. कोलकाता शहर कॉर्नवॉलिस स्ट्रीट १४५ नंबरचे बिनोदिनीचे घर. घर मोठे.. त्या घरातल्या भाडय़ाने दिलेल्या खोल्या एवढेच जगण्याचे साधन, एरवी दारिद्रय़ चहूअंगांनी अंगावर येणारे. उपाय म्हणून पाच वर्षांच्या भावाचे, दोन वर्षांच्या मुलीशी लग्न लावून आलेला ‘हुंडा’ हे जेवण्याचे साधन. पुढे, हा भाऊ मरण पावला. बिनोदिनीला अगदी लहानपणी लग्न झाल्याचे अस्पष्ट आठवते. एके दिवशी तो पळून गेला. आणि काही वर्षांनी तो ‘मेल्याचे’ समजले. ती नऊ वर्षांची झाली (त्या पूर्वीची ही लग्नाची घटना). तेव्हा गंगाबाई नावाची गायिका, तिच्या घरी भाडय़ाने राहायला आली. पुढे, ती ‘गंगामणी’ म्हणून ‘स्टार थिएटर’ची नायिका झाली. गंगाबाईकडे बिनोदिनी गाणे आणि अभिनय शिकायला लागली. ती ‘पडेल’ ती भूमिका स्वीकारून, पोटापाण्यासाठी चार पैसे मिळतील, एवढय़ाचसाठी. बेंगाल थिएटरमधल्या ‘सीता-विवाह’मध्ये तिला काम मिळाले. बिनोदिनी साक्षर झाली. ‘नॅशनल थिएटर’च्या वातावरणात रुळू आणि रमू लागली. ‘‘माझ्या मनात स्वप्नांचे उत्तुंग महाल तयार होत होते. लवकर लवकर सर्व शिकून मला मोठी नटी व्हायचे होते. राजमणी, क्षेत्रमणी, लक्ष्मी आणि नारायणी या नटय़ांच्या दर्जाची नटी मला व्हायचे होते. पुढे फारच थोडय़ा काळात अविरत कष्ट आणि प्रयत्न करून मी श्रेष्ठ अभिनय करू लागले.’’असे ती सांगते.

रंगालयात आणि बेंगॉल थिएटर, आणि पुढे ‘स्टार थिएटर’च्या गोष्टी, या प्रकरणांतून तिचे रंगभूमीवरचे जीवन, कपालकुंडला, पलाशीर युद्ध, मेघनादवध, मृणालिनी, आगमनी, दोललीला, आणि चैतन्यलीला अशा अनेक नाटकांतून तिने सजीव केलेल्या भूमिका, ‘स्टार थिएटर’मधील फसगत, कपडे आणि मेकअपचे शिकून घेतलेले तंत्र, प्रेक्षकांचे अनावर प्रेम, पहिली भूमिका, रंगभूमीवरचे पहिले पदार्पण, या गोष्टी विस्ताराने मांडल्या आहेत. त्या इतक्या, समर्पक शब्दांत आहेत, की, बिनोदिनीच्या जगण्याबरोबर ‘बंग रंगभूमीचा’ तो काळ, म्हणजे साधारणपणे एकोणिसाव्या शतकाचा प्रारंभ आहे.

बिनोदिनी पुढे इतकी मोठी अभिनेत्री (नटी) झाली की तिची दखल ‘इंग्लिशमन’ ‘स्टेटसमन’ अशा वृत्तपत्रांनी घेतली. ‘फ्लॉवर ऑफ द नेटिव्ह स्टेज’ असा तिचा गौरव झाला. इंग्रज साहेबसुद्धा तिच्या भूमिका पाहायला येत असत. बिनोदिनीने गरजू कन्या ते श्रेष्ठ अभिनेत्री हा प्रवास कमालीच्या तटस्थपणाने लिहिला आहे. स्वत:चा गौरव नाही, कुणाला दूषण नाहीत, कुणाचा दुस्वास नाही. या ‘वृत्ती’ तिने अनेक धार्मिक भूमिका करताना, भूमिकांशी तादात्मता साधून मिळवल्या आहेत. ‘भूमिका करताना मी साक्षात चैतन्यरूप झाले,’ असे तिला वाटते. मात्र धन-मान-लौकिक मिळूनही तिला रितेपणाच आला अखेरीस. ‘‘स्त्री हृदयातील कोवळीक ईश्वराने आम्हालाही दिलेली असते. घर, संसार, पतिप्रेम नको होते का मला? आम्ही शरीर विकू शकतो. पण प्रेम? सगळीकडून फक्त अंगावर येते, ती सौदेबाजी.’’

शेवटच्या गोष्टी सांगताना या महापातकी बाईची गोष्ट विसरून जा. या कंगाल पतितेचे हेच निवेदन. इति ११ वैशाख १९१२ वर्ष.. असे निवेदन लिहून बिनोदिनी निरोप घेते. परंतु, विसरून जा म्हणून विनवणी केलेले भारतीय भाषातील अभिनेत्रीने लिहिलेले पहिले आत्मचरित्र विसरण्यासारखे नाही (बंगालीतील ही आत्मकथा मराठीत ‘पद्मगंधा’ प्रकाशनने आणली असून वीणा आलासे यांनी अनुवाद केला आहे.). त्याचे परिशीलन करताना, अनेक गुणवत्ता समोर येतात. ज्या काळात बहुसंख्य स्त्रिया अक्षरशत्रू होत्या, त्या काळी या गरीब, अशिक्षित मुलीने साक्षर होऊन (काही लिखित नाटय़संहिता वाचन) स्वत: आत्मचरित्र लिहिले. साहित्य निकष माहीत नसूनही, प्रथम प्रस्तावना, क्रमश: प्रकरणे, प्रकरणांना यथोचित शीर्षक आणि तारीख, वर्ष लिहून समारोप करताना घेतलेला भावविभोर निरोप, असे वाङ्मयीन मूल्य (कदाचित अजाणता) जपले आहे. भाषा अलंकारिक आहे. उपमा, उपेक्षा आणि रुपकांचा योग्य वापर केला आहे. तो अगदी सहजभावाने आहे. नाटकातली ‘नाटय़मय’ किंवा ‘अतिरंजित’ भाषा, बिनोदिनीने ‘नटी’ असून वापरली नाही. तेव्हाची बंगाली (मराठीही) नाटके, पुराणे, देवदेवता, नीतिकथा अशा विषयांवरची होती. सामाजिक नाटकांचा उदय झाला नव्हता. देवतांच्या भक्तांच्या भूमिका करताना, तीही परमेश्वरी तत्त्वांशी एकरूप झाली. मराठीमधील गणिका संत कान्होपात्रा, हिचे स्मरण आत्मकथा वाचताना होते.

बंगाली रंगभूमी ही समृद्ध रंगभूमी आहे. असा लौकिक आहे. त्यातील पन्नास वर्षांचा नाटय़काल, विषय, नाटके, दिग्गज नाटककार- दिग्दर्शक आणि ‘नटनटय़ा’ आत्मचरित्रात रसरशीतपणे जिवंत होतो. राजकारण, समाजकारण आणि कलाक्षेत्र, याबाबतीत बंगाल आणि महाराष्ट्रात अतिशय साम्य आहे. तेव्हा तौलनिक विचारांनाही चालना मिळते. कलाक्षेत्रात म्हणजे मनोरंजनक्षेत्रात, स्त्रियांनी पाऊल टाकून, शंभर वर्ष होऊन गेली. तेव्हापासून प्रत्येक दशकात नाटय़ (आणि चित्रपट- आता दूरचित्रवाणी) क्षेत्रात बदल होत गेले. पर्यायानेच नटी ते अभिनेत्री, अभिनेत्री ते अ‍ॅक्ट्रेस हा नायिकांचा कलाप्रवास, पर्यायाने जीवनप्रवास, घडत, बदलत गेला.

‘पोटार्थी नटी’पासून, प्रशिक्षित, अभिनय (आणि -धन) संपन्न, प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ‘अ‍ॅक्ट्रेस’, हा प्रवास बिनोदिनी या स्त्री कलावतींच्या उन्नयनाचा आलेख आहे.