News Flash

मदतीचा हात : रुग्णसेवक

गरज असेल तेव्हा अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवा करायला जाणारे तसेच रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय उपकरणं विनामूल्य पुरवणारे त्यासाठी ‘विनम्र रुग्ण सेवा’ या प्रकल्पाची सुरुवात करणारे

| July 26, 2014 03:27 am

गरज असेल तेव्हा अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवा करायला जाणारे तसेच रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय उपकरणं विनामूल्य पुरवणारे त्यासाठी ‘विनम्र रुग्ण सेवा’ या प्रकल्पाची सुरुवात करणारे अशोक हळबे तसेच ज्येष्ठांसाठी ‘अ‍ॅटहोम मेडिकेअर सव्‍‌र्हिसेस’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ. कुसुम दोशी यांच्याविषयी
सहृदयतेच्या मातीत सेवेच्या विचारांचं बियाणं रुजलं की ईश्वरी कार्य सहजगत्या होतं. मात्र त्यासाठी ईश्वरी संकेतांचा नेमका अर्थ आकळावा लागतो. अशोक हळबे यांच्या बाबतीत नेमके हेच घडलं. जवळजवळ वीस वर्षे ते रुग्णालयातील रुग्णांना ‘बेडसाइड’ कंपनी देण्यासाठी जात असत. घरात अंथरुणाला खिळलेला रुग्ण असेल तर घरातील एकतरी माणूस त्याच्या शुश्रूषेत अडकतो. अशांना कुठल्या कार्यक्रमांना/समारंभांना जाता येत नाही. गरज पडल्यास अशोकजी अशाही रुग्णांना घरी सोबत देण्यास जात असत. रुग्णांना आवश्यक अशी उपकरणे काही काळापुरती विनामूल्य पुरवावी असा विचार त्यांना सुचला, तो याच रुग्णसेवेतून!
 ‘‘पण या कामासाठी माझ्याकडे जागाही नव्हती आणि पुरेसे पैसेही!’’ अशोक हळबे आपल्या कार्याची माहिती देऊ लागतात. ‘‘मला रुग्णांसाठी काम तर करायचंच होतं. काय करावं सुचत नव्हतं. मी अनुवादाची कामे करत असतो. एकदा स्वामी विवेकानंदांच्या कार्यावरील पुस्तकांचा अनुवाद करत असताना एका प्रसंगाचा उल्लेख आढळला. स्वामीजींच्या ऐन उमेदीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. अन्नपाण्यावाचून माणसं पटापट मरत होती. भुकेल्या माणसांच्या मुखी घास घालण्याची विवेकानंदांना अतिशय तळमळ लागली. त्यांना जेवणखाणं सुचेना. झोप येईना. त्याच वेळी जणू गुरुवाणी झाली. ‘कोणी मदतीला येईल याची वाट बघू नकोस. उद्यापासून कामाला लाग. परमहंसांची कृपा असेल तर तू कार्य करशीलच!’ बस्स! मला वाटलं हा संदेश जणू माझ्यासाठीच आहे. आपण कामाला सुरुवात करायचीच असा मी निश्चय केला आणि ‘विनम्र रुग्ण सेवा’ या प्रकल्पाची सुरुवात झाली. आणि सगळ्याच गोष्टी त्याप्रमाणे होऊ लागल्या.
 दरम्यान अशोकजींचे पुतणे व ‘मनसे’चे नगरसेवक मंदार हळबे यांनी उपकरणं ठेवण्यासाठी जागा देऊ केली. जागा मिळताच त्यांनी एक लाख रुपयांची विविध उपकरणं विकत घेतली. फुल फॉलर बेड, सेमी फॉलर बेड, वॉटर बेड, बेडपॅन, व्हिलचेअर्स वगैरे. सुरुवातीला ओळखीचे लोकं, विविध रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स, नर्सेस यांना अशोकजींनी या सेवेची माहिती पुरवली. नंतर जागोजागी जाहिरात फलक लावले. हळूहळू या रुग्णसेवेची माहिती डोंबिवलीकरांना झाली व त्यांचं काम जोमाने सुरू झालं. डॉ. विजय धोंड हे अशोकजींचे मित्र! त्यांनी सुचवलं, ‘‘तू नुसती उपकरणं न देता त्यांचं समुपदेशनसुद्धा कर!’’ हे अशोकजींना पटलं. त्यांनी वैद्यकीय दृष्टिकोन व शरीरशास्त्राचं जुजबी ज्ञान डॉक्टरांकडून घेतलं आणि काही फलक तयार केले. ते फलक असे. १) स्वत:वर दृढ विश्वास ठेवा. ‘मी’च माझ्या प्रकृतीत सुधारणा घडविणार आहे. २) हो! मी पूर्ण बरा/बरी होऊन आनंदाने जगणार आहे. या फलकांनी जणू जादूच होते रुग्णांच्या मनावर!
 कल्पना एक रुग्ण. डॉक्टरांनी ती किमान तीन महिने अंथरुणाला खिळून राहील असं निदान केलं होतं. अशोकजींकडच्या उपकरणांबरोबर तिने हे फलक आपल्या खोलींत चटकन नजरेस पडतील अशा जागी ठेवले. आश्चर्य म्हणजे ती महिनाभरात हिंडू-फिरू लागली. तिने अशोकजींना फोन करून आपल्या प्रकृतीतील सुधारणेचे श्रेय त्यांना व त्यांच्या या सकारात्मक ऊर्जा पुरवणाऱ्या फलकांना दिलं.
अशोक हळबे सांगतात, ‘ज्येष्ठ रुग्णांसाठी वस्तू न्यायला त्यांचे जवळचे नातलग येतात. ही माणसं मला भेटायला येतात तेव्हा हताश मन:स्थितीत पाय ओढत, चिंतांचं ओझं मनावर वागवत येतात. मी त्यांच्याशी संवाद साधतो. त्यांना धीर देतो. त्यांच्या आशा पालवतात. जाताना ते ताठ मानेने जातात व अध्र्या तासात फोन येतो. ‘तुमची वस्तू खूप उपयोगी ठरतेय. तुम्ही एकदा आमच्या घरी याल का?’ बस्स! त्याचं हे समाधान हेच माझ्या वस्तूंचं मूल्य! रुग्णांना वस्तू देताना मी फक्त डिपॉझिट घेतो व त्यांनी ती वस्तू परत केल्यावर त्यांचं डिपॉझीट परत देतो. मधल्या काळासाठी मी संपूर्ण विनामूल्य सेवा देतो. अर्थात गरीब रुग्णांकडून मी डिपॉझिटचे पैसेही घेत नाही.’’
अशोकजींच्या घराजवळील एका चर्मकाराची पत्नी पाय घसरून पडली. फ्रॅक्चर झालं. तिची त्यांनी ओळखीने रुग्णालयात सोय केली व घरी आल्यावर कमोडचेअर वगैरे वस्तू तिला वापरायला दिल्या. पण असाही अनुभव येतो की बरेच वेळा लोकांना या विनामूल्य सेवेचा इतका उपयोग होतो की ते डिपॉझिटची रक्कम ‘विनम्र रुग्ण सेवे’ला देणगी रूपाने देऊन टाकतात.
अर्थात ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न’ हेही तितकंच खरं! अशोकजी आपला अनुभव सांगतात. ‘साधारणत: मी तीन महिन्यांसाठी उपकरणे देत असतो. पण काही वेळा रुग्ण बरा झाल्यावरही वस्तू परत दिली जात नाही व मी फोन केला की आम्ही वस्तू देण्यासाठी येणारच होतो, असं सांगितलं जातं. खरंतर त्यांना हे कळायला हवं की त्यांची गरज भागली असेल. पण त्यांच्यासारखा एखादा गरजू रुग्ण त्या वस्तूसाठी तिष्ठत असेल, त्याला ती वेळेवर मिळायला हवी!’’
काही वेळा उपकरणं मोडून, खराब करूनही परत दिली जातात व ती तुमच्याकडून तशीच मिळाली होती असं सांगितल जातं. वास्तविक वस्तू देताना ती पारखून देण्याचा अशोकजींचा रिवाज आहे. मात्र अशा वेळी दुरुस्तीच्या खर्चाचा भरुदड त्यांनाच बसतो. पण तरीही अशोकजींचा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास आहे. सेवाभाव दृढ आहे. फावल्यावेळांत ते त्यांच्या खोलीतील चरख्यावर सूत कातून कापड बनवतात व त्या कापडाचे कपडे दुर्गम भागांतल्या आदिवासी मुलांना पुरवले जातात. अशोक हळबे यांची भूमिका स्पष्ट आहे. ते म्हणतात, ‘अहो, मी तो भारवाही हमाल! मी या सेवेत विशेष काही करतो असं मला वाटत नाही.’ उलट मी लोकांना म्हणतो, ‘तुम्ही माझ्याकडून या वस्तू नेण्यासाठी आला नसता तर ही निव्वळ शोरूम झाली असती. तुमच्यामुळे मला सेवेची संधी मिळते. धन्यवाद!’
अशोक हळबे यांच्याप्रमाणे आणखी एक सेवाव्रती आहेत डॉ. कुसुम दोशी. पाल्र्यात जवळजवळ पन्नास वर्षे प्रॅक्टिस केली आणि मग मनातला रुग्णसेवेचा भाव प्रबळ झाला. त्यासाठीच ‘अ‍ॅटहोम मेडिकेअर सव्‍‌र्हिसेस’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. डॉ. कुसुम दोशी यांचा प्रॅक्टिस करत असताना अनेक कुटुंबांशी स्नेह जुळला. त्या कुटुंबातील मुलं शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त परदेशी, परगावी निघून गेली आणि वृद्धत्व आणि व्याधींनी जर्जर असे त्यांचे आईवडील एकटे पडले. त्यांच्या व्याधी, त्यावरील उपचार व तपासण्या यांचं टाइमटेबल विस्कळीत होऊ लागलं. अशा ज्येष्ठांची नोंदणी डॉ. कुसुम दोशी आपल्या संस्थेत करतात. मात्र या सर्व सोयींसाठी त्या मूल्य आकारतात. सुरुवातीला त्यांची पूर्ण तपासणी केली जाते व त्याची फाइल बनवली जाते. मुख्य फाइल डॉ. दोशी स्वत:कडे ठेवतात व डुप्लीकेट फाइल त्या ज्येष्ठांना सुपूर्द करतात. त्या ज्येष्ठांना असलेल्या व्याधी व औषध उपचारांची संपूर्ण माहिती त्या फाइलमध्ये असते. डॉ. कुसुम दोशी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असतात. त्यांचा लॅबोरेटरीजशी संपर्क असतो. त्यांच्याकडून फोन जाताच त्या रुग्णाच्या सर्व तपासण्या घरच्या घरी केल्या जातात. तसंच डॉ. दोशींनी डॉक्टरांचं एक पॅनल बनवले आहे. ज्येष्ठ रुग्णांनी तब्येतीची कोणतीही तक्रार केली की त्या ज्येष्ठाची केस सबंधित डॉक्टरकडे पाठवतात. एक ८६ वर्षांचे आजोबा एकटे राहात असत. ते पडले व बेशुद्ध झाले. शेजाऱ्यांनी डॉ. दोशींना हे कळवताच त्यांनी ताबडतोब त्यांना इस्पितळात भरती केलं. मुलांना कळवलं व मुलं येईपर्यंत त्याची सर्वतोपरी काळजी घेतली. अशा वेळी रुग्णवाहिकेशी सुद्धा त्यांची संपर्क व्यवस्था असल्यामुळे ज्येष्ठांना खूप फायदा होतो. वय झालं की हाडं ठिसूळ होतात व वृद्धांची हाडं फ्रॅक्चर होण्याच्या अनेक घटना घडतात. अशा वेळी त्यांच्या मोडलेल्या हात वा पायाचा डिजीटल कॅमेऱ्यातून फोटो काढून त्या परदेशस्थ मुलांना मेल करतात व पुढील उपचारांची दिशा ठरवतात. नर्सेस ब्युरो, वॉर्डबॉय व आया यांचे ब्युरोज त्या सर्वाशी त्या सतत संपर्कात असतात व गरजू ज्येष्ठांना त्यांची मदत मिळवून देतात. त्या सांगतात, ‘मी स्वत: जेरिअ‍ॅट्रिक डॉक्टर असल्याने वृद्धांच्या व्याधी व उपचार याविषयी मला ज्ञात आहेच. पण काही वेळा खूप विचित्र परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. असेच एक निराधार वृद्ध, माझ्याकडे नोंदणी झालेले! ते अचानक वारले. त्यांच्या बहिणीचा अविवाहित मुलगा लंडनला! त्याने कळवलं, मी येऊ शकत नाही. तुम्हीला जे करायचं ते करा. मी तुम्हाला त्याचा खर्च पाठवीन! अक्षरश: ब्राह्मण आणून त्या वृद्धाचे अंत्यसंस्कारसुद्धा आम्ही केलं. अशीच आणखी एक स्त्री. तिची तिन्ही मुलं परदेशी. ती इथे एकटी! टेली कॉन्फरन्स करून तिच्या मुलांशी चर्चा केली. दिवस ख्रिसमसचे. दहा दिवस त्यांना येणं शक्य नव्हतं. शेवटी पोलिसांची परवानगी घेऊन दहा दिवस भाभा इस्पितळातल्या शवागारात तिचं शव ठेवण्याची व्यवस्था आम्ही केली. आणि ते भारतात आल्यानंतर पुढचे सोपस्कार केले गेले.’’
बहुतेक ज्येष्ठांना एकाकीपणाने व्यापलेलं असतं. त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून डॉ. कुसुम दोशी त्यांना खास बसने ‘केशवसृष्टी’ किंवा धारावीतील ‘नेचर पार्क’ला नेतात. एस.एन.डी.टी हॉलमध्ये त्यांच्यासह नाच, गाणी, ओरीगामीची प्रात्यक्षिकं असे कार्यक्रम करतात. त्या सांगतात, ‘‘वृद्धत्व ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली अपरिहार्य अशी अवस्था आहे. म्हणूनच दुसऱ्याचं ज्येष्ठत्व जेव्हा आपण सुखकर करू, तेव्हाच आपली वृद्धावस्थाही आनंदी, निरामय होईल.   
  

  ‘विनम्र रुग्णसेवा’
अशोक हळबे
हीना पॅलेस, तळमजला, डोंबिवली,
जिल्हा ठाणे.
चलभाष-८०९७९७५३१७
हॉम मेडिकेअर सव्र्हिसेस.
……………
डॉ. कुसुम दोशी.
१/३१, गुजराथी सोसायटी,
नेहरू रोड, विलेपार्ले  (पू.)
मुंबई- ४०००५७
चलभाष- ९८२१३७७६५४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:27 am

Web Title: article on at home medicare service founder dr kusum doshi
Next Stories
1 कलाविज्ञानाचं सहजीवन
2 दिसतं तसं नसतं
3 आवाज उठू लागला आहे, पण..
Just Now!
X